गृहकृत्यदक्ष(?) कवियित्रींसाठी मार्गदर्शन. !!

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जनातलं, मनातलं
7 Dec 2025 - 2:01 pm

कवियित्रींना साधारण गृहीणीसारखे पण वावरावे लागते व कविता लिहुन रसिकांना ही खुष ठेवावे लागते.
हे फार कसरतीचेच काम आहे.
मी खाली काही Techniques देत आहे जे वापरल्यावर कवियित्रींना ग़ृहीणीच्या रुपात वावरताना सुध्दा कविता लिहिण्यात काहीच अडचण येणार नाही.
नेहेमीच्या रोजच्याच वेळात घरकाम करता करता बर्याच प्रसंगातुन स्वत:मधील कवियित्रीला कसे जिवंत ठेवायचे हे समजायला त्यामुळे त्यांना नक्कीच मदत होईल.
मी खाली काही काव्यप्रकार कवियित्रींनी केव्हा आणि कसे वापरायचे हे सविस्तरपणे सांगितले आहे.
खरेतर खालील उपाय वाचुन इतर गृहीणी सुध्दा कविता लिहु शकतील.
काही समस्या असल्यास व्यासपीठावर मार्गदर्शन करणेत येईल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काव्यप्रकार पहिला : मुक्तछंद
सगळी कामे वार्यावर तशीच सोडुन..
दुपारी मस्त डुलकी घेण्याची वेळ..
अन त्याच वेळेला वाजते..
दाराची कर्णकर्कश्श्य्य बेल...

हाफ-डे टाकुन..
राव दारात उभे असतात...
रावांच्या डोळ्यात कि-होल मधुन सुध्दा..
तुम्हाला भलते सलतेच भाव दिसतात..

तेव्हा एक करावे..
पटकन एक पिशवी..अन एक यादी..
रावांच्या हातात कोंबावी..
सामान संपल्याची बोंब अगदी जोरात ठोकावी...

रावांची सातव्या आसमानातील नजर जमिनीवर येईल..
धुसफुसत फुत्कारत राव सामान आणायला जातील..

तुम्हाला मिळेल मग वेळ निवांत..
झोपमोड तर अशीतशी झालीच आहे तर मग
तेव्हा लिहायला घ्यावा एक मुक्तछंद..

काव्यप्रकार दुसरा : अभंग
सासुसासरे घरात येता..
गात राहावे अभंग..
नेहेमीच दाखवावे ..
आहे किर्तन प्रवचनात दंग....

सासुसमोर तेव्हा मग नऊवारीतच फिरावे..
येताजाता उठसुठ त्यांच्या पाया पडावे..

सासर्यांना नेहेमी लागणार्या चहा कॉफि ऐवजी.
एखादा जालीम बैद्य अथवा पाटणकर काढा द्यावा..
खायला काय आहे ह्या रावांच्या नेहेमीच्या दळभद्री प्रश्नावर..
देहासाठी नव्हे तर आत्म्यासाठी पोषक असे अन्न..असा जवाब गाढा द्यावा..

देवधर्म..पापपुण्याचा गोष्टी करुन दोघांनाही गोंधळात टाकावे..
रावांच्या मागे भुणभुण करुन .मग दोघांनाही पुन्हा लांब अमरनाथ तीर्थयात्रेला पाठवावे..

हाश..हुSSSSश करुन..सुटले एकदाची म्हणुन..मग अभंग लिहायला घ्यावेत..

काव्यप्रकार तिसरा : गझल
रात्री राव रंगात येताच..
एक गोष्ट करावी..
आर्त..काळीज फाटेल अश्या स्वरात..
एखादी अंगाई गावी..

युक्ती आहे ही फारच सोपी..
पेंगुन पेंगुन राव नंतर जातील झोपी..

जागेच राहीले असते तर रावांनी काय केले असते ह्याची कल्पना करावी..
आणि मग स्वत:शीच हसत..लाजत मुरडत..इश्श करत.. एक गझल लिहावी..
(
किती घोरता म्हणुन रावांना उठवावे..जर गझल जास्तच खुलली तर....
पेटवायला असा कितीसा वेळ लागतो रावांची पुन्हा एकदा नजर..
)

काव्यप्रकार चौथा : चारोळी.
चारोळी.ही उस्फुर्त सुचते..

सकाळी उठायला उशीर झाला..
गैस संपला..स्वयंपाक नाही झाला..
रावांकडे बघुन कसेनुसे हसावे..
घायाळ नजरेने मग रावांना नजरेत फसवावे..

मग हळुच..अशी चारोळी म्हणावी..

स्त्रियांच्या जन्माला नेहेमी..
रांधा,वाढा काढा उष्टी..
तुम्हाला मेले असेच आवडते..
ठेवणे मला दु:खी कष्टी..

म्हणत तोंडात पदर कोंबुन हुंदका दाबल्याचा अभिनव करावा..
एखादी बट चेहर्यावर पाडुन ..फिल्मी स्टाईल मध्ये चेहरा तेव्हा पटकन रावांसमोरुन वळवावा..

राव लगेच हॉटेलात जातील पळत पळत..
रडताना आपण कसे दिसतो.. हे मग बटेशी खेळत...आरशात बसावे न्याहाळत..

काव्यप्रकार पाचवा: लावणी

लावणी....हा एक एक लावालावीचा काव्यप्रकार आहे..

दुपारी येता शेजारीण रिकामटेकडी.. ..
ऐकुन घ्यावी तिची बितंबातमी.चुगली चहाडी..
ती गेल्यावर लगोलग निघावे..
दुसर्या शेजारणीच्या घरी जावे..

तिच्या चहाड्या हिला सांगाव्यात..
आपणही टाकावे त्यात थोडेसे तिखटमीठ..
काही दिवसानंतर मग झक्क लावणी लिहावी..
दोघींची खडाजंगी पाहात बसुनि खिडकीत..

वरील लेखावरची एक प्रातिनिधीक प्रतिक्रिया :

सदर कवी हा बुरसटलेल्या जुन्या पुरुषी मानसिकतेचे हुच्च उदाहरण आहे.त्याच्या वरील लेखात स्त्रीला नेहेमी घरकामात गुंतलेले दाखवले आणि पुरुष बाहेर बोंबलत फिरणारा दाखवला आहे. सदर विचार हा लेख लिहीत असताना लेखकाच्या/कवीच्या मनात आल्याने सदर लेखक/कवी स्वतःचीच किव करत आहे व निषेध म्हणुन जवळ असलेल्या बॉलपेनच्या रिफिल मधली शाई स्वतःच्या चेहर्याला फासत आहे व हा निर्लज्ज कवी आता मी शाईस्नान केले..मी शाईस्नान केले असे स्वतःशीच बडबडत आहे.

+ कानडाऊ योगेशु

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

7 Dec 2025 - 3:08 pm | युयुत्सु

Ha ha ha..