✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतीय संगीतातली साथसंगत आणि कांही अनोखे प्रयोग

स
सुधीर कांदळकर यांनी
Sat, 06/14/2025 - 18:38  ·  लेख
लेख
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा. तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात. परंतु आज जास्तीत जास्त रसिक हे सुगम संगीत ऐकतात. सुगम संगीत हा शब्दप्रयोग कसा उगवला कोण जाणे. पण हे संगीत कोणते हे मात्र आपल्याला ठाऊक आहे. या सुगम संगीतात मात्र शब्द, स्वर, ताल, नाद अशा प्रत्येक पैलूला जास्तीत जास्त वाव देऊन सादरीकरण अधिकाधिक सौंदर्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. प्रथम शब्द, उच्चारनाद आणि स्वर एकमेकांचे देखणेपण कसे वाढवतात ते अगोदर पाहूंयात. शब्दांत आपल्या वर्णमालेतले स्वर अणि व्यंजने असतात. व्यंजनांच्या उच्चारांत अक्षरावरील आघाताचा नाद असतो. प्रत्येक व्यंजनाचा नाद वेगळा. न म्हटले की कपावर चमच्याने टिण टिण वाजवल्यासारखे वाटते. ण म्हटले की मनांत मंदिरातली घंटा वाजते. ट चा नाद वेगळा तर ड चा नाद वेगळा. व्यंजनाचा सोबती बदलला की त्याचा नादही बदलतो. चटणीतल्या च नाद वेगळा तर चिमणीच्या च चा नाद वेगळा आणि चंपा वा चंट मधल्या च चे नाद आणखी वेगळे. विरामचिन्ह आले किंवा बदलले तरी व्यंजनाचा नाद बदलतो. काम कर मधला र वेगळा तर हात या अर्थाने कर मधला र वेगळा ऐकू येतो. अशी आहे शब्द आणि नाद यांची नादमय साथसंगत. अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा इ. शब्दालंकार तसेच अर्थालंकार भाषेचे सौंदर्य कसे वाढवतात ते आपण शाळेंत शिकलो आहोत. नादमय शब्द कवितेचे सौंदर्य वाढवतात. ’आनंदवनभुवनी’, नंदकिशोरा, असा शब्दांचा उच्चार करणेंच किती आनंददायी वाटते. कवीचे कल्पनासौंदर्य मग अशा उच्चारनादसुंदर शब्दांत व्यक्त झाले की मग आपण या मंत्रजालात सापडतों. ’घननीळा लडिवाळा झुलवूं नको हिंदोळा’ अशा ओळी मग मोहमयी बनतात. प्रतिभावंत कवी अमूर्त भावनांना हळूच शब्दांत पकडतात आणि सुंदर दागिन्यात कलाकुसरीने रत्ने जडवावीत तसे नादमय शब्द कवितेत जडवले जातात. नादमयतेबरोबरच कवितेतले शब्द अर्थगर्भ असतात. गद्यातला शब्द पद्यात जातांना अर्थाच्या नवनव्या मोहक छटा लेऊन जातो. गेय कवितेला व्याकरणातील वाक्यरचनेच्या नियमांची, विरामचिन्हांची गरज नसते. व्याकरणाला मागे सारून कवी शब्दांना वेगळे अर्थ आणि नाद देतो. रसिकाने मग या शब्दयोजनेच्या सौंदर्यपूर्ण नवलाईने विस्मयचकित होऊन नेत्रांनी कविता वाचावी तर कल्पनेत्रांनी शब्दचित्रांचा तो न्यास पाहावा आणि मनकर्णांनी त्यातले मंजुळ स्वर अनुभवावेत. एखादी सुंदर कविता मग एखाद्या प्रतिभावंत संगीतकाराच्या प्रतिभेला साद घालते, गोंजारते, आपल्या मोहमयी जाळ्यात पकडते. संगीतकार मग स्वतःचा उरत नाही. त्याला कवितेबरोबर सूरही ऐकू येतात आणि त्याच्या मनांतल्या सतारी झंकारूं लागतात. एक गाणे आकार घेऊं पाहातें. गाण्याचे स्वर त्याच्या कानांत गुणगुणूं लागतात, त्याला अस्वस्थ करतात, उत्कट भावनांच्या हिंदोळ्यावर बसवतात. पण भाव शब्दांतून व्यक्त करायला सुरेल कंठ हवाच. संगीतकाराचे मन मग कवितेतल्या शब्दांना अनुरूप अशा आवाजाचा शोध घेते. मग एखाद्या गायकाचा किंवा गायिकेचा आवाज मनाला गवसला की ते गाणे त्याच्या मनांत रुंजी घालूं लागते. संगीतकार आणि गायक यांचे या गाण्यापुरते मग मस्त मेतकूट जमते. एकमेकांशी बोलतांबोलतां मग ते गाण्याला एकामागोमाग एक सौंदर्यप्रसाधने चढवून असे देखणेपण देतात की रसिकाने केवळ अवाक होऊन ऐकावे. कार्यक्रमाच्या तालमीच्या वा ध्वनीमुद्रणावेळी संगीत संयोजक आणि वाद्यवादक त्या स्वरचित्रात असे काही जडावाचे काम करतात की विश्वसुंदरीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते आहे असे वाटावे. शब्द आणि स्वरविचार यांची साथसंगत अशी जुळून येते. कविता कवीच्या मनांत फुलत जाते तर आधुनिक काळात चित्रपटाच्या कथानकातील प्रसंगानुरूप भावावस्था संगीतकाराच्या मनांत विविध तरंग निर्माण करते. संगीतकार मग भावोत्कट स्वरमालिका रचतो, तिला तालबद्ध करतो आणि एखाद्या गीताची चाल आकार घेते. गीतकार तालबद्ध स्वरमालिकेला मग हळूच शब्दबद्ध करतो आणि मग एक गीत आकार घेते. संगीत संयोजक आणि वादक नंतर गीतात आणखी स्वररंग भरतात. गीतकारांच्या या अलौकिक प्रतिभेला दाद द्यावी तेवढी थोडीच. नादमय शब्दांना पहिली साथ असते आवाजाची आणि तालासुरांची. प्रथम शब्दांनी आणि स्वरांनी एकमेकांना केलेल्या साथ संगतीचा मनोहर अनुभव यावा म्हणून दोन भावगीतांची ओळख करून देतो आणि नंतर सहवादकांच्या सवालजबाबांनी रंगत वाढवण्याचे कांही नमुने सादर करतो. मुग्ध तारुण्य प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच येते आणि या काळातील आठवणी अमोल, अमीट आनंदाचे, बहराचे क्षण देऊन जातात. या पहिल्या दुव्यात गाण्यातली कविता आहे इंदिरा संतांची. इंदिरा संतांच्या या शब्दांबद्दल बोलणारा मी कोण? ते मुळातूनच ऐकावेत. पद्मजा फेणाणीचा आवाज अगदी नवथर किशोरीचा वाटतो. अतिशय स्थिर स्वर प्रकाशमान होऊन त्वरित आपल्या मनाची पकड घेतो. उच्चारातील नादमयता काय वर्णावी? मुग्ध तारुण्यातील भावनांच्या हरकती अशा सुंदर उतरल्या आहेत की मधली सारी वर्षे, विरघळून जावीत, स्थलकालाच्या सार्या सीमा हरवून जाव्यात आणि आपण अत्तर होऊन मुग्ध तारुण्यांत जावे. मनोहर शब्दांत भावनांनी ओथंबून जातां जातां स्वर आपल्याला हलकेच आठवणींच्या कल्पसृष्टीत नेऊन सोडतात. स्वरांच्या दागिन्यात मग शब्दरत्ने आणि कल्पनासौंदर्य अनोख्या प्रकाशातून लकाकत आपल्याला विस्मित करतात. दुवा १: मराठी भावगीत: ६ (सहा) मिनिटे: पुस्तकातली खूण कराया: गायिका पद्मजा फेणाणी. https://www.youtube.com/watch?v=GZTIK-1nxPw शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत विविधतेसाठी ख्यालापाठोपाठ एखादी ठुमरी, दादरा, टप्पा, गझल, गीत, नाट्यगीत, भक्तिगीत, भजन वगैरे सादर केले जाते. अनेक वेळा गायक वा गायिकेच्या आवाजाचा पोत, शब्दफ़ेक इ. अनेकदा या आकृतीबंधाला साजेसे नसतात. कौशिकी चक्रवर्तीचे ख्याल गायन मी यू-ट्यूबवर आणि प्रत्यक्ष मैफ़िलीतही ऐकलेले आहे. यूट्यूबवर तिने गायलेले गीत मी ऐकले आणि उडालोच. गीताला साजेसा असा त्यांनी लावलेल्या आवाजाचा धारदार, लवचिक पोत आणि शब्द ठळक करणार्या हरकती, मुरक्या फारच सुरेख घेतल्या आहेत. पुढील दुव्यात अनुभवतां येतील. दुवा २: सलोना सा सजन: …गायिका कौशिकी चक्रवर्ती: ३ मि. ३९ सेकंद. https://www.youtube.com/watch?v=pZgN0XtiO3Y अशी ही शब्द, आवाज आणि स्वरताल यांनी एकमेकांना केलेली साथसंगत आणि त्यांनी मिळून बनवलेले रसायन. या रसायनाची धुंदी ओसरेपर्यंत दुसरे न काही करावे, न काही ऐकावे. भानावर यायला कुणाला काही मिनिटे पुरतील तर कुणाला कांही दिवस वा आठवडे. भानावर आल्यावरच पुढील दुवे ऐकावेत. तबल्याची साथ ख्यालगायनाला वेगळी, ठुमरीला वेगळी, वाद्यसंगीताला आणखी वेगळी तर नृत्याला अधिकच वेगळी. दीपचंदी, केहरवा, दादरा, क्वचित अद्धा त्रिताल अशा वेगळ्या तालांत ठुमरी सहसा गायली जाते. अद्धा त्रिताल सोडला तर ख्यालगायनातील बंदिशी सहसा या तालांत बांधल्या जात नाहींत. ठुमरीसाथीला वाजणार्या तबल्याचा नखरेल नाद ऐकणे हा देखील एक वेगळा, मस्त अनुभव आहे. एखाद्या सुंदरीचा कलापूर्ण पदन्यास रसिकांच्या डोळ्यांसमोर आणत तबला अणि डग्गा देखील एकमेकांशी आणि लयीशीं नादझिम्मा खेळूं लागतात. बडे गुलाम अली खां साहेबांनी लोकप्रिय केलेली ’याद पिया की आये… ’ ही ठुमरी बहुतेकांनी ऐकली असेल. पुढील दुव्यात पं. सुधीर नायक संवादिनीवर हीच ठुमरी वाजवताहेत आणि तबलासाथ आहे पं. मुकुंदराज देव यांची. कित्येक वर्षांत ठुमरीला केलेली एवढी सुंदर तबलासाथ मी ऐकली नव्हती. सुरुवातीपासून दुय्यम भूमिका घेतल्यानंतर अकराव्या मिनिटापासून तबलासाथीने ठुमरीला चढवलेला साजशृंगार लाजबाब आहे. दुवा ३: संवादिनीवर पं. सुधीर नायक: याद पियाकी आये: सुमारे १५ (पंधरा) मिनिटे. https://www.youtube.com/watch?v=S_7f9xdACZ4 ठुमरीला केलेली तबलासाथ नखरेल, लयीशी नाचत, मुरकत, लचकत केलेली शिवाशिवी तर गझलेला आणखी वेगळी. पुढील दुव्यात पेशकार्यापासूनच ओजस अधियांचा तबला आपल्या मनाची पकड घेतो, पण गायकाचा अधिक्षेप न करतां बरोबरीची मैत्रीपूर्ण साथ देत. दुवा ४: अजय पोहनकर यांच्या गझलेला तबलासाथ करताहेत ओजस अधिया:३ मिनिटे १९ सेकंद. https://www.youtube.com/watch?v=R2Li3_ymFPU आतां नव्या प्रयोगांविषयीं. शास्त्रीय संगीत म्हणजे स्वरप्रधान संगीत. मग ख्यालगायनात स्वरसाथीला संवादिनी, सारंगी वा व्हायोलीन असे स्वरवाद्य घेण्याची आपली परंपरा आहे. पुढील दुव्यात कौशिकी चक्रवर्ती गाताहेत. साथीला संवादिनीसोबत बांसरी पण आहे. खरे म्हटले तर बांसरी हे कंठसंगीताला सर्वांत जवळचे वाद्य. पण ख्यालगायनाला बांसरीची साथ दीर्घकाळ आढळली नव्हती. बांसरीसाथीमुळे या मैफिलीतील स्वरमांडणीचे सौंदर्य निःसंशय खुलले आहे. या संगीतसाथीच्या प्रयोगात आणखी एक नवा आणि चांगला पायंडा कौशिकीजींनी पाडलेला आहे. आपले सर्व सहवादक – accompanists प्रतिभावान आहेत त्यांना केवळ सहवादक म्हणतां येणार नाही आणि ते एकल वादन – solo ही इतक्याच उत्कृष्ट रीतीने सादर करूं शकतात. मला साथ करणे हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि त्यांनी सुंदर साथ केल्यामुळेंच माझे सादरीकरण एवढ्या उंचीवर गेले आहे आणि त्यांचे हे ऋण मी मान्य करते अशा अर्थाचे वक्तव्य त्या मैफ़िल सुरू असतांना ३५व्या मिनिटाला या ५० मिनिटांच्या ख्यालगायनात करतात. दुवा ५: ५० (पन्नास) मिनिटे. https://www.youtube.com/watch?v=gfCpFMsKGMA पुढील दुव्यात जगजीत सिंग गाताहेत. सोबत तबला, ढोलक, व्हायोलीन आणि गिटार देखील आहे. जगजीत सिंगांनी वाव दिल्यावर त्यांनी काय धम्माल उडविली आहे याचे शब्दांकन कितीही छान झाले तरी खूपच लांबलचक होईल. आणि बहुतेक वाचकांनी दुव्यातले संगीत ऐकलेले असेल. वाचण्यापेक्षां ऐकण्यात मजा आहे. यात आणखी एक प्रयोग आहे. जगजीतजींनी एक विनोदी शेर या गझलेत म्हटला आहे. पण कुठेही रसभंग होत नाही. मोतीचूर लाडवात खरपूस लवंग अनोखी चव देऊन जाते तशी मैफिलीची खुमारी वाढतेच. दुवा ६ : १९ (एकोणीस) मिनिटे. https://www.youtube.com/watch?v=dDtLyDxXhvk पुढील दुव्यात आणखी कांही प्रयोग पाहायला मिळतात. गझलगायनांत मूळ गझलेंत भावार्थोचित शेर म्हणण्याची परंपरा आहे. पुढील दुव्यातील गायिका आहे प्रतिभा सिंग बघेल. यातील पहिला प्रयोग म्हणजे एक गीत म्हणतां म्ह्णतां त्यातला एक स्वर पकडून गायिका दुसरे गीत म्हणूं लागते. फक्त स्वर नव्हे तर गीतातील भाव व्यक्त करणारे शब्द देखील भावाभिव्यक्ती ठळक करीत जातात. सोबत दोन्ही गीतांचे सौंदर्य खुलतें. अशी कांही गीते एकापाठोपाठ जोडली की आपण त्याला मेडले म्हणतो. कांही हिंदी तर कांही मराठी सिनेगीतात मेडलेचा वापर केलेला आहे. परंतु बहुतेक प्रयोगातले मेडले हे जाणकार रसिकांकडून मात्र फारसे नावाजले गेले नाहीत. हा दुव्यातला मेडले मात्र उत्कट भावाभिव्यक्तीमुळे मनाला भिडून जातो. ओरिगामी कलावंताने कागदाच्या एका आकृतीतून जादू केल्यासारखी दुसरी आकृती काढावी, दुसरीतून तिसरी काढावी त्यातून आणखी पुढे असे कांहींसे वाटून जाते. या मेडलेतील आणखी एक प्रयोग. खरे तर इसराज अणि दिलरुबा ही दोन सारंगीसदृश अशी वाद्यें आजकाल जवळजवळ विस्मरणांत गेलीं आहेत. या दुव्यातील मेडलेला मात्र साथीला चक्क इसराज वाजवलेला आहे. दिलरूबा वाजतांना मी ऐकलेला आहे. इसराज हे वाद्य वाजतांना मात्र मी पहिल्यांदा ऐकले. सारंगी आणि व्हायोलीन या दोन्हींपेक्षां जास्त धारदार, काळजाला भिडणारा ध्वनी ऐकला आणि अंगावर सर्रर्रर्रकन कांटा आला. हृदयात हलकेच रेशमी कट्यार घुसल्यासारखे वाटले. विनायक व्होरा फेम तारशहनाईची आठवण करून देणारा पण कमी कणखर तरीही जास्त तलम पण धारदार असा ध्वनीचा पोत. इसराजची साथीला केलेली निवड अप्रतिमच. अशा रीतीने या मेडलेमधील मेलडी देखील नावीन्यपूर्ण साजसाथीने केवळ अविस्मरणीय सुंदर झाली आहे. दुवा ७: ८ (आठ) मिनिटे: सिनेसंगीताचा मेडले. https://www.youtube.com/watch?v=tSU67P9zENg लिखाणाला जाणकार वाचकांची आणि त्यांच्या प्रतिक्रियांची साथसंगत असेल तर लेखाचे लेखनवाचनही अपार रंगत देऊन जाते. या भावोत्कट क्षणी माझ्या मनांत सुंदर कवितांतल्या शब्दांनी फेर धरलेला आहे आणि वाद्यांचे मधुर स्वर माझ्या मनांत गुंजन करताहेत. अशा या नादमय क्षणीं आपला अमूल्य वेळ देऊन वाचन केल्याबद्दल वाचकांना धन्यवाद देतच या लेखाचा समारोप करतो. - X – X – X –
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
6290 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

सुंदर लेख. आणि तितकीच सुरेख

विजुभाऊ
Sat, 06/14/2025 - 19:33 नवीन
सुंदर लेख. आणि तितकीच सुरेख अनुभूती. खूप दिवसानी अनुभवता येईल इतके छान लिखाण आले मिपावर
  • Log in or register to post comments

भावोत्कट क्षणी माझ्या मनांत सुंदर कवितांतल्या शब्दांनी फेर धरलेल

कर्नलतपस्वी
Sat, 06/14/2025 - 20:58 नवीन
लेख वाचताना माझ्या मनातही असाच विचार आला की लेखकाने कुठल्या धुदींत हा लेख लिहीला असावा? कमीत कमी तीन चार वेळातही वाचला पाहिजे. वाचताना पं जयतिर्थ मेवूंडी आणी कौशीकी यानी गायलेले "बाजे रे मुरलिया" गाणे आठवले. गाण्याच्या आगोदर मेवूंडी व कौशिकी यांचा संवाद मनाला भुरळ घालतो. तसे हे गाणे पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी अजरामर करून ठेवले आहे . मेवूंडी,कौशिक यांच्या जोडीने तेव्हढ्याच ताकदीने पेलले आहे. https://youtu.be/DwvWvjszKas?si=_3WbFcaosKOXZC7b धन्यवाद. गागाण्यातले काही कळत नाही पण कानाला गोड वाटते म्हणून जीवाला ओढ लागते.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख !

मारवा
Sun, 06/15/2025 - 09:08 नवीन
सुधीरजी भारतीय संगीतावरील तुमचे उत्कट प्रेम जाणवते. तुम्ही दिलेले दुवे पण मेजवानी आहेत. मी कौशिकीपेक्षा त्यांच्या वडिलांचा अजॉय चक्रवर्ती यांचा फॅन आहे. जगजितसिंग सुद्धा कौशिकी प्रमाणे नेहमीच त्यांच्या सहकलाकारांना मानाची वागणूक देत असत. या गायकांचं हे वेगळेपणं उठून दिसतं. लेखाचा विषय साथ सांगत आहे तरीही ध्रुपद गायक उदय भवाळकर यांचा हा दरबारी तुम्ही ऐकलाय का ? https://youtu.be/gBHZmbyyynU?si=GZWRS5FW2K500_Dj अतीव सुंदर असा आहे.
  • Log in or register to post comments

अनुष्का शंकर यांचा हा विलक्षण सुंदर performance

मारवा
Sun, 06/15/2025 - 09:33 नवीन
https://youtu.be/jljQnU-hIns?si=dbWagK4e31SkfOia लेखाचा विषय प्रयोगशीलता हा सुद्धा आहे यातील नुकताच ऐकलेला हा विलक्षण प्रयोग जरूर ऐकावा.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख !

धर्मराजमुटके
Sun, 06/15/2025 - 19:12 नवीन
सुंदर लेख ! कौशिकी चक्रवर्ती माझ्या आवडत्या गायिका आहेत. मी पहिल्यांदा युट्यूबवर त्यांच्याच ध्वनिफिती पाहिल्या. त्यांच्या वडीलांच्या नंतर. दोन्ही अतिशय उत्तम गायक आहेत. या निमित्ताने सारेगामा लिटील चॅप्स मधून पुढे आलेली बाल गायिका आर्या आंबेकर हिने गायलेलेलं "सहेला रे" आठवलं. वयाच्या मानाने चांगले गायलयं.
  • Log in or register to post comments

@धर्मराज भाऊ...

कर्नलतपस्वी
Sun, 06/15/2025 - 22:40 नवीन
आर्या अंबेकर चे हे ऐका व नंतर पं भीमसेन जोशी यांचे हेच गाणे ऐका. कदाचित ऐकलेही असावे.... https://youtu.be/wW1qJReShxM?si=iRxp_VjUxXgYxdlQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 06/18/2025 - 12:37 नवीन
हे गाणेच मुळी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. फार कमी गायक हे गाणे गातात आणि त्यातही अपेक्षित उंची गाठू शकतात. पं. भीमसेन जोशी यांसारख्या कलाकारांनी हे गाणे वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. एकदम घरगुती वाटणार्‍या कार्यक्रमात आर्या आंबेकरने गायलेले हे गाणे पहा. साथीला असणारे कलाकारही दिग्गज आहेत. तबल्यावर भरत कामत, पेटीवर तन्मय देवचके आणि टाळ वादन करणारे माउली टाकळकर सुद्धा. https://www.youtube.com/watch?v=UeQtfXbs8gc बाकी लेखाबद्दल काय बोलावे? बर्‍याच दिवसांनी मिपावर असा तब्येतीत लिहिलेला लेख (ए आय वगैरे कुबड्या न वापरता) बघितला आणि भरुन आले. असे अभ्यासपूर्ण लेख वाचणे हीच आमच्यासारख्या कानसेनांना मेजवानी. लिहित रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

सर्व प्रतिसादकांस .....

सुधीर कांदळकर
Sun, 06/15/2025 - 21:12 नवीन
सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांस .....

सुधीर कांदळकर
Sun, 06/15/2025 - 21:13 नवीन
सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.
  • Log in or register to post comments

कौशिकी नी गायलेला मालकंस "

विजुभाऊ
Sun, 06/15/2025 - 21:43 नवीन
कौशिकी नी गायलेला मालकंस " कानडा राजा पंढरीचा " या इथे https://youtu.be/IfR0Nev1Jv0?si=8jmxZtz1xxZOugOp ऐकताना भान हरपते
  • Log in or register to post comments

ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक

विजुभाऊ
Sun, 06/15/2025 - 21:46 नवीन
ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक पटीने वाढलेली असते. फक्त ऐकताना हेडफोन किंवा मोठ्या स्पीकरवर ऐका. आसपासचा विसर पडतो. बासरी आणि मृदुंगही आनंदात भर घालतात
  • Log in or register to post comments

१२ व्या मिनीटानंतर गाण्याची

विजुभाऊ
Sun, 06/15/2025 - 21:49 नवीन
१२ व्या मिनीटानंतर गाण्याची रंगत वाढतच जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सुंदर लेख. आसे लेख मिपा वर

सुक्या
Mon, 06/16/2025 - 00:14 नवीन
सुंदर लेख. आसे लेख मिपा वर यायला हवे. जगजित सिंह, पं झाजिर हुसैन, पं हरीप्रसाद चौरासिया यांचे गायन / वादन प्रत्यक्ष अनुभवनाची संधी मिळाली असल्याने मैफिली चे वातावरण अनुभवले आहे. पं हरीप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमात तर ते बासरी वाजवत असताना लोक ईतके मंत्रमुग्ध झाले की त्यांचे वादन संपले तरी सारा हॉल स्तब्ध बसुन राहीला ... मग स्वतः हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगीतले की या रागाचे वादन संपले आहे. मग कुठे लोक भानावर आली नी टाळ्या वाजवत राहीली. नवीन पीढी ची नव्या दमाचे वादक / गायक आता दिसायला लागले आहेत. वारसा चालवत आहेत. मला आवडलेल्या अभंगापैकी हा एक. विश्वजित बोरवण्कर. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=o8vEdhKHMms&t=0s
  • Log in or register to post comments

श्री सुक्या भाऊ....

कर्नलतपस्वी
Mon, 06/16/2025 - 06:40 नवीन
वेढा वेढा रे बोरवणकरांनी अप्रतिम गायले आहे. अनेक वेळा ऐकले तरी गोडी अवीट. मंजुषा कुलकर्णी पाटील अशीच उभरती कलाकार. मास्टर कृष्णराव आणी राम मराठे यांनी गायलेला "परब्रह्म निष्काम तो हा",नामदेवांचा अभंग अतिशय सुंदर गायला आहे. https://youtu.be/BeZS_9du3Og?si=HK80SgeOYLOMx3LP बादवे, वेढा वेढा वर राजकिय विडंबन मिसळपाव वर आहे कदाचित आवडेल. ज्याहीरात केली. https://misalpav.com/node/51141
  • Log in or register to post comments

तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा

सुक्या
Mon, 06/16/2025 - 08:39 नवीन
तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा काय सुटला बॉ? आज वाचली कवीता :). जुणी असली तरी अगदी समयोचित कविता होती ... भारतीय संगीतकारांची अजुन एक जमेची बाजु म्हणजे त्यांचा रियाज. रियाज करुन करुन त्यांच्ये सुर / ताल ईतके घट्ट झालेले असतात की समोर त्यांना कागद लागतच नाही. पं झाकीर हुसेन, कमला रमानाथ व जयन्ति कुमारेश यांची मैफील बघायला मी सहकुटूंब गेलो असता, दोन तास तिन्ही संगीतकारांनी कुठलाही स्कोर न बघता अप्रतीम पर्फॉर्मन्स दिला त्याचे माझ्या मुलीला खुप अप्रुप वाटले होते. अजुन गंम्म्त म्हणजे सारा कार्यक्रम झाल्यावर, तिघेही स्टेज वरुन निघुन गेले. लोक मात्र तसेच उभे राहुन जवळ्पास १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. ते पाहुन पं. झकिर हुसेन दोन्ही कलाकारंसोबत परत स्टेज वर आले व त्यांनी १५ मिनिटे अजुन एक अप्रतिम राग सादर केला. केवळ अप्रतीम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

अप्रतिम लेख

मूकवाचक
Mon, 06/16/2025 - 09:48 नवीन
असे लेख वाचून मिपावर येण्याचे सार्थक होते. धन्यवाद सुधीर जी.
  • Log in or register to post comments

कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल

युयुत्सु
Mon, 06/16/2025 - 18:19 नवीन
कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल इतकं उत्कटेने लिहीलेले वाचून मला भडभडून आलं. यांच्या पुण्यात प्रवेशबंदी आणि गायनबंदी घालावी अशा मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments

प्रत्येकाची आवडनिवड असू शकते

विजुभाऊ
Tue, 06/17/2025 - 09:56 नवीन
प्रत्येकाची आवडनिवड असू शकते वेगळी. आता एखाद्याला जर अमरीशपुरीने म्हंटलेला राग दरबारी कानडा आवडत असेल आणि त्यापुढे इतर सर्व फिक्के ,इतर कोणी गावू ऐकू नये असे वाटत असेल तर काय बोलावे . पण एव्हरी वन हॅज राइट टू गो राँग....... या वचनावर ठाम विश्वास ठेवून चालतोय अजूनही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हो, हो नक्कीच! प्रत्येक

युयुत्सु
Tue, 06/17/2025 - 10:16 नवीन
हो, हो नक्कीच! प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक गायकाला त्याचा श्रोता मिळायलाच हवा! पण पुण्याच्या गायनसंस्कृतीला विटाळणारे कलाकार वेशीबाहेर असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्रत्येकाचे मत हे

सुबोध खरे
Wed, 06/18/2025 - 10:29 नवीन
प्रत्येकाचे मत हे घड्याळासारखे असते. प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर. त्यातून काही लोकांचा नुसता असा विश्वास नसतो कि आपलेच घड्याळ बरोबर आहे. तर इतरांचे घड्याळ चूकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

धन्यवाद ...

सुधीर कांदळकर
Mon, 06/16/2025 - 20:47 नवीन
@विजूभाऊ: ऐकण्यासाठी हेडफोन वा होम थिएटर हवेच. धन्यवाद. @ सुक्या: बोरवणकर उत्कृष्टच. धन्यवाद. @ कर्नल तपस्वी: मंजुषाताईंचे गाणे प्रत्यक्ष देखील ऐकले आहे. परब्रह्म ... छान. @मूकवाचकः धन्यवाद.
  • Log in or register to post comments

@अनिंद्य ...

सुधीर कांदळकर
Mon, 06/16/2025 - 20:50 नवीन
@अनिंद्यः आपल्या शब्दपारखी नजरेची तारीफ करावी तेवढी थोडीच. अन्यत्र प्रशंसिलेला मोदवर्तमान हा शब्दहीआठवतो आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेख डिलीट करणेंबाबत.

सुधीर कांदळकर
Tue, 06/17/2025 - 15:35 नवीन
मा. साहित्य संपादक यांस, या लेखातल्या कांही भागामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. तरी कांही मिपकरांच्या तीव्र भावना लक्षांत घेऊन हा संपूर्ण लेख डिलीट करावा ही नम्र विनंती. सुधीर कांदळकर
  • Log in or register to post comments

सुधीरजी हा लेख वाचून अनेकांच्या भावना सुखावल्या देखील आहेत.

मारवा
Tue, 06/17/2025 - 21:51 नवीन
सुधीरजी माझ्यासारख्या अनेकांच्या भावना हबलेख वाचून सुखावल्या देखील आहेत. त्यामुळे हा लेख राहू द्यावा. प्रत्येकाचे एकमत व्हावे ही अपेक्षाच चुकीची आहे. लेख कुठलाही असो उडविण्याची गरजच नाही. लेख हा व्हिडिओ सारखा आढळत नसतो तो वाचणे न वाचणे किंवा वाचून सोडून देणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

+१

सुक्या
Tue, 06/17/2025 - 22:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मा. साहित्य संपादक यांस,

कर्नलतपस्वी
Tue, 06/17/2025 - 15:50 नवीन
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. आपण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम केले. गाढवाला गुळाची चव नसते त्यात गुळाचा काय दोष.? जसा गुळ आपला गोडाचा गुणधर्म सोडत नाही तसेच आपणही लिहीत रहा. अशाच सुंदर लेखाच्या प्रतिक्षेत असलेला कानसेन.
  • Log in or register to post comments

मिपाकरांच्या भावना

विजुभाऊ
Tue, 06/17/2025 - 17:00 नवीन
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. नेहमीप्रमाणे ते कारण त्यानाही अज्ञातच असते. काळजी करू नका. तुमचे लिखाण मस्त आहे. सौंदर्यचा आस्वाद घेण्याच्या प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असते. सुंदरीच्या गालावरच्या तीळाला, गालबोट म्हणणारे महाभाग सर्वत्र असतात.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ सलाम...

कर्नलतपस्वी
Tue, 06/17/2025 - 17:53 नवीन
काय संतुलित प्रतिसाद, आगदी तुकोबारायांचा अभंग आठवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्या आधी. मला कधी जमेल हे माहीत नाही.
  • Log in or register to post comments

कौशिकी चक्रवर्ती आणि पतियाळा घराण्याची गायकी

मूकवाचक
Tue, 06/17/2025 - 23:04 नवीन
कौशिकी चक्रवर्ती या पं. अजय चक्रवर्ती यांची पतियाळा घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. पतियाळा घराणे म्हणजेच उस्ताद बडे गुलाम अली असे एक समीकरण देखील रसिकांच्या मनात पक्के ठसलेले आहे. घरंदाज गायकीबद्दल कित्येक दशकांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्याचा सारांश आजही लक्षात आहे. तपशील थोडाफार चुकू शकेल, पण त्यातले विश्लेषण साधारणपणे असे आहे: किराणा घराणे स्वरप्रधान - सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया अशी या घराण्याची पहचान काही लोक करून देतात. आग्रा घराणे लयकारी प्रधान - ताल आणि लयीत 'जहांबाज' असलेले गायक अशी या घराण्याची ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्यात स्वर आणि ताल दोन्हींना समतोल महत्व आहे, पण गायकी बरीच सरधोपट किंवा सुगम आहे. जयपूर घराण्यात स्वर आणि ताल यांचा बुद्धीप्रधान, काहीसा समजायला क्लिष्ट पण सौंदर्यप्रधान असा मिलाफ आहे. ही चार प्रमुख घराण्यांची खासियत. या पुस्तकात पतियाळा घराण्याच्या गायकीबद्दलचे मतप्रदर्शन साधारण या धर्तीवर आहे - गायकीमधली 'तयारी' या बाबतीत पतियाळा घराण्याची बरोबरी करायला कुणीही धजावणार नाही. विलक्षण तयारी बरोबरच गायकीतले सगळे प्रकार (शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत वगैरे) तितक्याच समर्थपणे पेलणे हे काम देखील प्राधान्याने पतियाळा घराण्यातल्या गायकांनीच केलेले आहे. चमत्कृतीप्रधान गाण्याकडे कल असल्याने, काही वेळा या चमत्कृतींचा अनाठायी वापर केल्याने गाण्यातून रसनिर्मिती होत नाही, भाव निर्मिती होत नाही असा आक्षेप पतियाळा घराण्याच्या गायकांवर पूर्वापार होत आलेला आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचा आणि त्यांच्या टीकाकारांचा जन्म होण्यापूर्वीपासून अशी टीका होत आलेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. पतियाळा घराण्याचा एकही गायक अशा टीकेने विचलीत झालेला नाही. या गायकांनी आपल्या तयारी, कल्पकता आणि रसिकांचे प्रेम या जोरावर मैफिली गाजवलेल्या आहेत, पद्म पुरस्कार वगैरेंना गवसणी घातलेली आहे. आजचे शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल (विचार) गायकी. यात व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. वानगीदाखल सांगायचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायकीतून 'सरगम' हा प्रकार वर्ज्य मानलेला होता, तर डॉ. प्रभा अत्रे 'सरगम' विषयी कित्येक तास भरभरून बोलू शकतील इतके त्यांचे सरगम वर प्रेम होते, व्यासंग होता. तेव्हा थोडा साक्षेप बाळगत विचार केला, तर टोकाचे मतप्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. पण यातही व्यक्तिपरत्वे भिन्नता असायचीच. असो.
  • Log in or register to post comments

@सुधीर कांदळकर

सुबोध खरे
Wed, 06/18/2025 - 10:41 नवीन
@सुधीर कांदळकर आपण लेख अप्रतिम लिहिला आहे. यातील अनेक कलाकारांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला संगीतात काहीही कळत नाही राग ओळखता येत नाही परंतु शास्त्रीय संगीत तीन चार तास सलग ऐकू शकतो इतकं आवडतं. उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हे जास्त आवडतं. अर्थात आपण लिहिलंय तसं उत्कटपणे लिहिणं सुद्द्धा जमत नाही. आपण लिहीत रहा. काही विघ्न संतोषी लोक सर्वत्र असतातच. आता औरंगजेब ९० वर्षे जगला म्हणजे त्याचे वंशज पण बरेच असणार. तुम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. आणि लिहीते राहा
  • Log in or register to post comments

सर्वांना ...

सुधीर कांदळकर
Wed, 06/18/2025 - 16:34 नवीन
धन्यवाद. मारवा, सुक्या, कर्नल तपस्वी, विजूभाऊ, मूकवाचक, डॉ. खरेसाहेब, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आता सत्तरीपार गेल्यानंतर मला आयुष्यात आणखी काहीही कमवायचे नाही. जरी रक्तदाब हृदय सारे सामान्य असले तरी आता मानसिकदृष्ट्या माझ्यात काहीही फायटिंग स्पिरीट राहिलेले नाही. आयुष्यातले उरलेले दिवस मस्त मनोरंजनात घालवायचे एवढाच उद्योग आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीत नम्रता, सौजन्य या गोष्टींना सर्वांत वरचे स्थान आहे. उच्च स्थानी पोहोचलेल्या एखाद्या गायक्/वादक मान्यवराला जर आपण एखाद्या नवोदित कलाकाराबद्दल मत विचारले तर माझ्यापेक्षा चांगला गातो/गाते किंवा वाजवतो/वाजवते असे विनम्र उत्तर मिळते हा माझा अनुभव आहे. एखाद्या मान्यवराच्या एखाद्या मैफिलीला आपण गेलों आणि त्याच शहरात जर एकदोन दिवसातच दुसया मैफिलीला गेलो आणि त्या मान्यवर कलाकाराची आपल्यावर नजर पडलीच तर परवाच्या मैफिलीला पण आपण होतांत ना? अशी चौकशी केली जाते. असा सामान्य रसिकाचाही आदर ठेवणार्‍या संस्कृतीत असे काही घडते याचा मला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. द्वेषाधिष्ठित विचारसरणी पाहून मन नक्कीच उद्विग्न होते. पण चालायचेच. कालाय तस्मै नम:. आपणा सर्वांसारखी तसेच इतर बहुसंख्य मिपाकरांसारखी चांगली माणसे अजून आहेत म्हणून जग चालले आहे यावर माझा विश्वास आहे. पुन्हां एकदा धन्यवाद देतो आणि संगीतातली आणखी सौंदर्यस्थळे शोधायला लागतों.
  • Log in or register to post comments

जाऊ द्या हो

सुबोध खरे
Wed, 06/18/2025 - 18:30 नवीन
जाऊ द्या हो आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे अहंमन्य कोंबडे जगात कमी आहेत का? आणि आज आपण आरवलो नाही म्हणजे सूर्योदय झालाच नाही असे ठासून सांगणारे कोंबडे सुद्धा बरेच आहेत. कुठे जीवाला त्रास करून घेताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

मवाळ हळवे सूर, जाऊ द्यात.....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/19/2025 - 06:33 नवीन
कांदळकरजी, आपले मवाळ प्रतिसाद वाचून पुरूषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार मधली नाट्यगीते आठवली.. खां साहेब राजगायक बनल्यावर पंडितजींच्या घरात पाय ठेवताच म्हणतात,"या भवनातील मवाळ हळवे सूर,जाऊ द्यात ". भार्गवराम अचरेकरांचे, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद ",याचा ताणा बाणा खां साहेब आपल्या शैलीत पेश करतात. वसंतराव, भारगवराम,बकुल पंडीत,फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, इनामदार असे दिग्गजांकडून सादरीकरण, प्रत्यक्ष ऐकण्याचा अमृतानुभव.. फाट्यावर मारा व लिहीते रहा. सत्तरीत मी पण आहे पण आजही विचारले ",हाऊ इज जोश",तर अपसूक निघते "यस्स सर". तुकोबाराय अशा लोकांसाठी सांगतात, , तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

सुधीरजी इतका चांगला लेख

विजुभाऊ
गुरुवार, 06/19/2025 - 09:04 नवीन
सुधीरजी इतका चांगला लेख लिहीलात. सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट चांगलीवाटते ती गोष्ट समिक्षकांना वाइट वाटू शकते. त्या बद्दल त्या समिक्षकांत दुमत कधीच नसते. कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते पन म्हणून ते तसे प्रत्यक्षात नसते. (माझ्या एका वचनावर गाढ विश्वास आहे " एव्हरी वन हॅज राईट टी गो राँग " ) कोणीतरी म्हणाले आहे की मोनालीसाच्या चित्रातल्या हास्याचे गूढ म्हणजे तीला बद्धकोष्ठ झाला होता. म्हणणाराला लोकांनी फाट्यावर मारत चित्राचे सौंदर्य महत्वाचे मानले. असो. तुम्ही असेच आणखी काही संगीत क्षण शेअर करा. मजा येईल.
  • Log in or register to post comments

नादमय सुंदर लेख आहे.

Bhakti
गुरुवार, 06/19/2025 - 10:58 नवीन
नादमय सुंदर लेख आहे. सध्या अवचिता परिमळूचे निरूपणासह पारायण सुरु आहे. अवांतर स्वगत Sapphire चे पण पारायण निराळेच ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...

सुधीर कांदळकर
गुरुवार, 06/19/2025 - 19:55 नवीन
@रामे : धन्यवाद राजेंद्रजी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भीमसेनजींचे ऐकले होते. एकदां बेळगांव ते व्हाया यल्लापूर कारवार या प्रवासात बस सकाळी सहासाडेसहाला मस्तीकट्टा या गांवात चहासाठी थांबली होती. नुकतेच फटफटत होते. जवळच्या मंदिरात लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर हे गाणे लागले होते. पाठोपाठ कन्नड भाषेतली संतवाणी आपल्यास चालीवर भीमसेन लताच्या आवाजात सुरू झाली होती. तो अनुभव विसरूंच शकत नाही. तुमच्या प्रतिसादाने ही आठवण ताजी केली. अनेक, अनेक, धन्यवाद. आर्याचे आजच ऐकले. आवडले. @ मूकवाचकः आपण विविध घराण्यांतल्या गायनशैलीच्या विषयींच्या वाचनाचा तपशील दिला आहे. तो मी वाचलेला मला आठवतो आहे. बहुधा कुमारांचे गुरुबंधु चंद्रशेखर रेळे यांच्या 'कुमार माझा सखा' या पुस्तकात. वसंतराव देशपांडे खास पंजाब घराण्याच्या गायनशैलीचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला जाऊन आले असा त्यांनी एका मैफिलीत उल्लेख केल्याचे आठवते. रेळेंचे पुस्तक वाचले तेव्हां आणखी एक सुंदर, संस्मरणीय पुस्तक वाचले होते. आपल्या मनांत ठेवा म्हणून जपून ठेवावे असे. दत्ता मारुलकर यांचे 'अंतर्यामी सूर गवसला'. हे खळेकाकांवर आहे. अनेक आठवणी जागविल्यात अनेक अनेक धन्यवाद. @भक्ती: धन्यवाद भक्तीताई. @विजूभाऊ, कर्नल तपस्वी, डॉ. सुबोध खरेसाहेब : पुन्हा एकदां धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा