मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नावात काय ठेवलय?

vcdatrange · · काथ्याकूट
कोणताही विदा हातात आला की त्याच्याशी खेळत बसायची सवय आहे. नुकताच नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी गावातील हजारहून अधिक मुलांचे कुपोषण संदर्भात सर्वेक्षण केले. हजारभर मुलांचे दोन हजार पालक असा भला भक्कम विदा हाती आला. त्यातील अभ्यास संदर्भाने काढावयाची निष्कर्षे व्यतिरिक्त सहज म्हणून नावे बघत असताना काही बाबी जाणवल्या. तसं म्हटलं तर नावांत काहीच नाही तरी ती आपली आयुष्यभराची ओळख बनते.ती एक अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या साठी निवडलेली नसते तरीही आपल्याला चिकटलेली असते. कधी तरी आपल्या रंगरुपावरुन,कधी आपण आपल्या येण्यामुळे निर्माण केलेल्या परिस्थितीवरुन,कधी आत्याच्या आग्रहावरुन कधी फक्त माॅडर्न दिखाव्याला भुलून,कधी केवळ अनुकरण म्हणून,कधी परंपरेचा अभिमान म्हणून,कधी इतरांना उच्चारायला सोपे जावे म्हणून, कधी आजोबा आजींची आठवण म्हणून अशा असंख्य वेगवेगळ्या कारणानी आपलं नांव ठरवतात व ते आपल्याला मरेपर्यंत चिकटतं. दुर्गम आदिवासी बहुल भागातील गेल्या दोन वर्षात जन्म झालेल्या बालकांच्या नावातील विविध्य ६० % इतके आढळले. म्हणजे ९३० मुलांची मिळून ५६९ नावे आहेत. मुलग्यामध्ये प्रचलित नावे रियांश, आर्यन, आयुष, शिवम, आरव, विहान, राजवीर, अनुष, पियुष, शिवांश ही आढळून आली. तर मुलींमध्ये खुशी, जान्हवी, माही, वेदिका, आराध्या, आरुषी, तन्वी, परी, भाग्यश्री ही नावे अधिकतम रुढ आढळली. जोडाक्षरे व उच्चारणास दुर्बोध नावाचे प्रमाण १५% (१४२) इतके आहे. क्रिषिका, जेश्नवी, दिक्षिका, निधिक्षी, रुद्राक्षी, सिद्धिमा अशी मुलींची अवघड नावे तर धृवांश, प्रहर्ष, रुद्राक्ष, सर्वैक्ष, हेताक्ष अशी मुलांची नावे ठेवण्याचा शहरी ट्रेंड इथवरही पोहोचलेला दिसतो. या पिढीतील काही भावलेल्या नावांचा उल्लेख करावयाचा झाल्यास मानवी, कनक, दुर्गेश्वरी, राघवी, आनंदी, परिधी, युवांशी तसेच अलकेश, आयुष्यमान, इंदीराज, कनिष, गर्वीत, नैतिक ही नावे प्रकर्षाने लक्षात राहिली. याच सोबत ऐंजल, किजल, ग्लोरी, सलविना, प्रिन्स, लकी आणि येशू ही इंग्लिश नावे तसेच अर्थ न लागलेली दोनसिका, नांदुरी, तुरूष, जिगर , लोकशील ही देखील उल्लेखनीय नावे सांगता येतील. यांच्या पालकांच्या नावांचा गोषवारा काढला असता मागील पिढीत म्हणजे अगदी पंचवीस तीस वर्षामागे पुरुष नावातील वैविध्याचे प्रमाण ३५% इतके होते तेच स्त्री नावातील विविध्य ३३% होते. याच परिसरात 2000 सालादरम्यान कविता, सविता, सुनिता, अनिता, आरती, भारती, मनीषा ही नावे प्रचलित होती. पुरुष नावांमध्ये राहुल, दिनेश, राकेश, गणेश, संजय, अजय, गोविंद, दीपक, मुकेश, रविंद्र अधिकतम रुढ आढळली. तीस वर्षापूर्वी देखील आमची, आम्ही, इंकाबाई, गुंता, गुड्डी, चिंगी, चिडकी, जरेला, जिंकू, झिमला, निमुंडी, पंजाबी, पप्पी, पिना, बायशी, भुरी, मोगरा, रोती अशी सर्वनामे विशेष अर्थ नसलेली नावे सहजी होती. पुरुषांमध्ये देखील सुकदेव, हिरालाल, काळूसिंग, मंगलसिंग, मन्साराम, तुळशीराम, शांतीलाल, रामलाल अशी सामान्य नावे आढळतात. काही निष्कर्षे नोंदवितो - जन्म नक्षत्र, कुंडली इ चा संदर्भित आद्याक्षराहून नाव ठेवण्याची पद्धत आदिवासी समाजात आढळत नाही - आदिवासी समाजात लिंगभेदास फार महत्व नाही. मुलींच्या नावातील वैविध्य ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. - जोडाक्षरे असलेली नावे ठेवण्याकडे वाढता कल आढळतो - एका पिढीत वैविध्यपूर्ण नावांचे पर्याय तब्बल दुप्पट झाले - पारंपारिक नावे ठेवली जात नाहीत - चित्रपट, सिरीयल, यु ट्यूब,रील्स चा प्रचण्ड प्रभाव आढळतो. आदिवासी क्षेत्रातील हे स्थित्यंतर सामाजिक, वैचारिक बदलाची झलक दर्शवितो. संपर्क क्रांतीने आता कोणताही प्रदेश दुर्गम न राहिल्याने तसेच उपजीविके करीता सातत्याने प्रगत शहरी भागाशी नियमित संपर्क येत असल्याने आपल्या पारंपारिक जीवनशैली सोबत या चमकत्या जगाशी बरोबरी करायची मानसिकता प्रकर्षाने समोर येते आहे. भविष्यात या आदिम जमातीच्या रूढी, परंपरा, नैसर्गिक जीवनपद्धती चे सामान्य करण होण्याचा प्रवासाच्या वाढत्या वेगाची ही चुणूक म्हणूयात . डॉ वैभव कीर्ती चंद्रकांत दातरंगे सामाजिक आरोग्य सल्लागार, नाशिक

वाचने 850 वाचनखूण प्रतिक्रिया 0