हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा - बॉर्डर गावसकर ट्रॉफी

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
20 Feb 2023 - 12:34 am

काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी.
भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी
मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव
ता सार्‍यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव
चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.

साक्षात विक्रमादित्य सुनील गावसकरनी गायलेलं (हो-"तो" सुनील गावसकर. आम्ही देवाला अहो जाहो करत नाही) शांताराम नांदगावकरांचं हे गाणं आज दुपारपासून लूप वर चालू आहे. काय करावं ह्या खेळाचं? टी-२० आमचा "क्रश" असेल, वनडे ही गर्लफ्रेंड असेल तर कसोटी क्रिकेट म्हणजे डोक्याला हेल्मेट घालून आणि पायाला पॅड्स बांधून, अंपायर - प्रेक्षकांच्या साक्षीनं रन्स काढत म्हणत थाटलेला संसार आहे. चार वर्षातून एकदा फुटबॉल, जून - जुलै मध्ये टेनिसचा तिला सवतीमत्सर होत असेल. पण "मांगल्यम तन्तुनानेन मम जीवन हेतुना, कण्ठे बध्नामि सुभगे त्वम जीव शरद: शतम|" म्हणावं अशी हीच! गेल्या काही दिवसांत नागपूर आणि दिल्लीमध्ये जे काही झालं त्यानंतर कसोटी क्रिकेटच्या प्रेमात का पडू नये? आणि हे सगळं भारत जिंकतोय म्हणून नाही. तर ऑस्ट्रेलिया आणि भारताचे २२ खेळाडूच नाही तर त्यांच्या "थिंक टँक्स" नी क्रिकेटच्या मैदानावर जो बुद्धिबळाचा डाव मांडलाय त्यासाठी.

या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचं 'होमवर्क' चोख होतं. खेळपट्ट्यांचा व्यवस्थित अभ्यास करून रणनीती ठरवली गेली होती. अश्विनसारखी अ‍ॅक्शन असलेल्या महेश पिठियाला सुद्धा आणलं गेलं. इतकंच काय, ऑस्ट्रेलियन मीडियाने सुद्धा पहिला बॉल टाकला जाण्यापूर्वीच सराव सामन्यावरून आणि खेळपट्टीवरून शिमगा सुरू केला होता. थोडक्यात तयारी पूर्ण झाली होती. बरं. ऑस्ट्रेलियाचा हा संघ काही नवोदित नाहीये. वॉर्नर, स्मिथ, स्टार्क, लॉयन यांच्यामागे उदंड अनुभव आहे. लाबुशेन, हेड, ख्वाजा, हेझलवुड यांनी क्रिकेटजगताला आपली धमक दाखवलेली आहे. मर्फी, ग्रीन, बोलंड सारखे आश्वासक खेळाडू आहेत. आयपीएलमुळे जवळपास प्रत्येकाला भारतात खेळण्याचा अनुभव आहे. तेव्हा खरंतर ऑस्ट्रेलियाकडे समाधानकारक कामगिरी न होण्याचं काही कारण नाही. पण तरीही आज बोर्डर गावसकर ट्रॉफी भारतातच राहणार हे नक्की झालं.

टेस्ट क्रिकेट हा खरंतर बॅट-बॉलनी खेळला जाणारा बुद्धीबळाचा डाव आहे. समोरचा राजा 'चेक-मेट' होईपर्यंत कोणाचं पारडं कधी आणि कुठे झुकेल ते सांगणं कठीण. पण टेस्ट क्रिकेटचा एक आजकाल दुर्लक्षित होणारा घटक असतो तो 'वेळेचा'. तब्बल पाच दिवस, साडेचारशे ओव्हर्स पडलेल्या असतात हेच बहुधा संघ विसरतात. समोरच्याची रग जिरू देऊन योग्य संधी मिळाल्यावर ठोश्यांची बरसात करणार्‍या बॉक्सरची मनोवृत्ती या "बॅझबॉल" च्या जमान्यात कमी दिसते. आणि ऑस्ट्रेलियन्स दोन्ही कसोटीत ह्याच बाबतीत कमी पडले - "संयम". Australia blinked first on both the occasions.

नागपूरची पहिली टेस्ट भारतानं एक डाव आणि १३२ रन्सनी आणि दिल्लीची ६ विकेट्सनी जिंकली. दोन्ही टेस्ट्स तिसर्‍या दिवशी संपल्या. पण स्कोअरबोर्ड दाखवतो त्यापेक्षा ह्या दोन्ही कसोटी कितीतरी चुरशीच्या झाल्या. नागपूरला पहिल्या दिवशी स्मिथ आणि लाबुशेन स्पिन खेळण्याचे धडे देण्याच्या मूडमध्ये होते. वाटलं होतं की यांचा होमवर्क कामी येणार. दोघांचेही काय सुरेख सूर लागले होते. आपल्या स्पिनर्सनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे असं वाटत होतं. पण अभ्यास केला अश्विनचा आणि पेपर आला जडेजाचा! दोघंही जडेजाच्या दोन अप्रतीम चेंडूंचे बळी ठरले.

कॅरीने एक वेळ आपल्या स्पिनर्सना आवंढा गिळायला लावला होता. हॅन्ड्सकोम्ब सेटल झाल्यासारखा वाटत होता. आणि नेमका त्याच वेळी त्यांचा 'संयम' सुटला. काही गरज नसताना आडव्या बॅटीने खेळायच्या प्रयत्नात दोघे आऊट झाले. आपल्या बॅटिंगच्या वेळी सुद्धा एक वेळ ७ बाद २४० अशी परिस्थिती होती. जडेजा, अक्षर पटेल आणि शमीनं धावा केल्या नसत्या तर ऑस्ट्रेलियानं आपल्याला खिंडीत गाठला होता. पण पुन्हा ऑस्ट्रेलियानं कच खाल्ली.

दुसरी कसोटी तर तिसरा दिवस सुरू होताना ऑस्ट्रेलियाच्या खिशात होती. हेड आणि लाबुशेन सुटले होते. तिसर्‍या दिवसाच्या पहिल्या सेशनवर पूर्ण सीरीजची मदार होती पण पुन्हा जडेजा नावाच्या खिसेकापूने ऑस्ट्रेलियाचं पाकिट मारलं. कुठल्या ऑस्ट्रेलियन 'चाणक्याने' यांना variable bounce असलेल्या दिल्लीच्या खेळपट्टीवर मागे राहून 'कट' करण्याचा, स्वीप - रिव्हर्स स्वीप करण्याचा सल्ला दिला कोणास ठाऊक. पक्ष फुटलेल्या आमदारांसारखे ऑस्ट्रेलियन बॅट्समन एकापाठोपाठ एक चालते झाले. बारा ओव्हर्सच्या खेळात ऑस्ट्रेलिया होत्याचं नव्हतं झालं.

दोन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियाचा घात केला त्यांच्या वर्चस्व गाजवण्याच्या ऊर्मीने. आता ह्यात टी-२० च्या प्रभावाचा दोष की मुळातल्या ऑस्ट्रेलियन आक्रमकतेचा हा चर्चेचा विषय आहे. पण आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसताना फक्त तग धरण्याच्या हेतूने शटर खाली करून शत्रूच्या आक्रमणाची धार बोथट करण्याचा संयम ऑस्ट्रेलियाला दाखवता आला नाही. दिल्ली मधली आजची ऑस्ट्रेलियाची परिस्थिती आणि २०२० मधली आपली मेलबर्नमधली परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. पहिली टेस्ट हरलेली आणि दुसर्‍या टेस्टमध्ये नाजुक स्थिती. पण तेव्हा आग ओकणार्‍या ऑस्ट्रेलियन वेगवान मार्‍यासमोर सहा तास धीरोदात्तपणे उभा राहून ३ बाद ६४ वरून ३२६ पर्यंत नेणार्‍या अजिंक्य राहाणे सारखा कोणी ऑस्ट्रेलियाकडून उभा राहिला नाही. त्यांच्यापैकी कोणी अजून बगळ्याचं ध्यान लावून खेळपट्टीवर उभा राहिलेला नाही.

दोन्ही टेस्ट्स तीन दिवसांच्या आत संपल्या असल्या तरी डाव-प्रतिडावात मात्र पुरेपूर आनंद देऊन गेल्या आहेत. स्मिथ - जडेजा, लाबुशेन - अश्विन, विराट - मर्फी, लॉयन - पुजारा सवाल-जवाब कमाल रंगले आहेत. मालिकेच्या निकालानंतरही दोन्ही संघ तुल्यबळ आहेत हे विसरून चालणार नाही. पिचवरून घसाफोड करणार्‍या ऑस्ट्रेलियन मीडियाचं तोंड एव्हाना बंद झालं असावं. पण निदान आता ऑस्ट्रेलियन रक्त खवळावं. पॅट कमिन्सला "भारतात व्हाईट वॉश झालेला संघ" घेऊन अ‍ॅशेससाठी नक्कीच जायचं नसेल. आणि तसं झालं तर भारतीयच नाही तर इंग्लिश मीडिया सुद्धा त्यांना पदोपदी ती आठवण करून देईल.

एकंदर काय आहे ना - टेस्ट क्रिकेट म्हणजे फिल्मी गाण्यांची 'नाइट' नाही तर क्लासिकलची मैफल आहे. टाळ्या मिळवण्यासाठी सुरुवातीलाच ताना घेण्याची काहीच गरज नसते. गरज असते ती आधी तुमचा सूर व्यवस्थित लागण्याची. जाऊदेत पहिली काही आवर्तनं. इथे कोणाला किती टाळ्या पडल्या यापेक्षा कोणी आम्हाला किती वेळ आणि किती वेळा नि:शब्द केलं याचा हिशोब जास्त महत्वाचा. या मैफलीत कलाकार तर मातब्बर आहेत. पहिली दोन सत्र "सुश्राव्य" होती खरी पण तितका "विस्तार" नाही ऐकायला मिळाला. अजूनही वेळ गेलेली नाही. एका ऑस्ट्रेलियन बॅट्समनने बैठक जमवण्याचा सवाल आहे. जुगलबंदी रंगवण्याची पूर्ण मदार आता ऑस्ट्रेलियावर आहे. या मालिकेची भैरवी सुरेल व्हावी हीच अपेक्षा!

© - जे.पी.मॉर्गन

१९ फेब्रुवारी २०२३

क्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2023 - 8:43 am | श्रीगुरुजी

सुंदर लेखन! मन लावून मी कसोटी सामने पाहतो. ऑस्ट्रेलियाची इतकी दयनीय अवस्था पाहवत नाही. स्टार्क, हेझलवूड व ग्रीन नसल्याचा त्यांना फटका बसलाय हे नक्की. हे तिघे असते तर इतकी वाईट अवस्था झाली नसती. विशेषतः हेझलवूड भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली गोलंदाजी करतो. पुढील सामन्यात हेड भरपूर धावा करेल असे वाटते.

सौंदाळा's picture

20 Feb 2023 - 11:25 am | सौंदाळा

लेख आवडला.
फलंदाजीचा कसोटी मधील दर्जा (सर्वच संघांचा) एकूणच ढीसाळ झाला आहे असे वाटते. संयमाचा अभाव वाटतो. दोन्ही सामने पूर्ण तीन दिवससुद्धा झाले नाहीत.
कसोटी मधे सर्रास स्विप, रिवर्स स्विप किंवा एकंदरच आडव्या बॅटने खेळणे हा माझ्या मते गुन्हा आहे आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तो पुन्हा पुन्हा केला आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली.
भारताकडूनपण मधल्या फळीने निराशा केली. के. एल. राहुल बद्दल तर लिहावे तितके कमीच आहे. तिसर्‍या कसोटीत तरी तो दिसणार नाही अशी अपेक्षा. पुजारा हा द्रविडप्रमाणे संयमी आहे पण द्रविडइतके सातत्य त्याच्यात नाही. एखादा प्रमुख फलंदाज चांगला खेळला आणि नंतर तळातील गोलं(फलं)दाजांनी चांगली फलंदाजी केली हे चित्र कधीतरी ठीक आहे.
असो, काहीही झाले तरी भारतीय संघ सलग दोन कसोटी पूर्ण वर्चस्वाने जिंकला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक. पुढील २ सामन्यात प्रमुख फलंदाजांकडून अधिक चांगली खेळी होइल ही अपेक्षा.