सामना (१)

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
20 Feb 2022 - 8:25 pm

सामना
(विशेष सुचना:या कथेतील सर्व प्रसंग आणि  पात्रे  काल्पनिक आहेत.प्रत्यक्षातील कुण्या व्यक्तीशी  वा प्रत्यक्षात अनुभवलेल्या  प्रसंगांशी कुणाला साम्य आढळल्यास, काय समजायचे समजा.
मी काय करू ?)
सामना १
   अंदाजे पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट असावी.जानेवारीचा पहिला आठवडा होता.संध्याकाळी साडेसहाची वेळ होती.अंधार पडू लागला होता.रस्त्यावरचे लाईट लागले होते.हवेत गारठा वाढू लागला होता.बोचरी नाही पण गुलाबी थंडी सुरू झाली होती.महाराष्ट्रातल्या त्या जिल्हा न्यायालयातले शिपाई  आपापले न्यायालय कक्ष (कोर्ट हॉल) बंद करत होते.काही कक्षांमधे कारकून मंडळी लाईट लावून राहिलेले काम पूर्ण करत होती होती.बाररूम मधे शुकशुकाट होता.बहुतेक वकीलमंडळी केव्हाच निघून गेली होती.तीन चार वकील,काही वकीलांचे कारकून,काही पक्षकार अजूनही आवारात होते.एवढे सोडले तर बाकी सगळीकडे सामसूम होती.
दुस-या मजल्यावरील ग्रंथालय (जज्जेस ल्यायब्ररी) मात्र उघडे होते.तिथल्या मोठ्या अंडाकृती टेबलाभोवती पंधरा सोळा न्यायाधीश गंभीर चेह-याने बसले होते.दिवसभर काम करून मंडळी थकली होती.घरी निघायचे तयारीत असतानाच नोटीस घेऊन शिपाई आला होता. मोठे साहेब म्हणजे ,मुख्यजिल्हा न्यायाधीश रोंगे (खासगीत न्यायाधीश मंडळी त्यांना बिग बॉस म्हणत)यांच्याखालोखाल जेष्ठ असलेले सहजिल्हा न्यायाधीश कुमठेकर,यांनी न्यायाधीशांची एका महत्वाचे विषयावर चर्चां करण्यासाठी बैठक बोलावली होती.काहीशा नाराजीने व नाईलाजाने,पुन्हा कोट चढवून टाय लावून सगळे ल्यायब्ररीत जमा झाले होते.मोठेसाहेब,नव्हते.पण कुमठेकर,त्यांचे खालोखाल चे  अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश,त्या खालोखालचे चार पाच वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश  (दि.न्या व.स्त)आणि  कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश  (दि.न्या क.स्त.)हजर होते. तीन महिला न्यायाधीश (  एक व.स्त. दोन क.स्त.)पण  होत्या.त्या वैतागलेल्या होत्या.घरी गेल्यावर करायची कामे डोळ्यासमोर दिसत होती.मकर संक्रात जवळ आली होती.देशपांडे बाईंना मुलाचा स्कॉलरशीपच्या परिक्षेचा अभ्यास घ्यायचा होता.नलावडे बाईंकडे पाहूणे आले होते.कोरे बाई वर्षांपासून पाहात असलेली दूरदर्शनवरची मालीका आता वेगळ्या वळणावर आली होती.आज(नेहमीप्रमाणेच )त्यात अतिशय महत्वाची घटना घडणार होती.ती चुकवायची नव्हती.पुरुष न्यायाधीशांची पण आपापली  महत्वाची कामे होती.पण कुमठेकरांनी बोलावलेली मिटींग चुकवणे शक्य नव्हते आणि परवडणारेही नव्हते.पन्नाशीला आलेले बुटके ,सडपातळ,चष्मीस्ट कुमठेकर एरवी तसा राजामाणूस.वागायला
बोलायला एकदमअघळ पघळ आणि उत्साही.पण शीघ्रकोपी.केव्हा कशाने बिनसेल काही सांगता येत नसे.एकदा बिघडले की मग समोरच्याची खैर नसे.अर्थात पारा जेवढ्या लवकर वर चढे तेवढाच झटकन खाली येई.
पण तेवढ्यात काय करतील याचा नेम नसे.ते प्रमोशनला ड्यू होते.त्यामुळे त्यांच्या मर्जीत असणे शहाणपणाचे होते हे सगळेच जाणून होते.
आजची बैठक कशासाठी बोलावली याचा ऊल्लेख नोटीस मधे नव्हता.काय विषय असावा याची आपसात हळू आवाजात चर्चा सुरू होती.
'अरे ढवळे आले नाहीत का अजुन?' सगळ्यांवर नजर टाकत कुमठेकर म्हणाले.'व्हाट ईज धीस?' चेह-यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.'या लोकांना गांभीर्यच नाही कशाचं!'शेजारच्या काट्यांना ते म्हणाले.सगळ्यानीच ते ऐकले.'नोटीस काढा इनसबॉर्डीनेशनची,कोण आहे रे तिकडे?स्टेनोला बोलवा'.हे शिपायाला उद्देशून.
'अहो येतील. चीफज्युडिशियलमॅजिस्ट्रेट(सीजेएम )आहेत.रीमांडचे काम चालू असेल .खूप सह्या कराव्या लागतात त्यांना.वाट पाहूया'.प्रकरण उगीच वाढेल हे लक्षात येऊन काट्यांनी त्यांना शांत केले.तेवढ्यात धापा टाकत,घाईघाईत ,ढवळे पोहोचलेच.'सॉरी सर उशीर झाला.बेलच्या ऑर्डरवर सही व्हायची होती',असे म्हणत उशीराचे स्पष्टीकरण दिले.ते ऐकताच कुमठेकरांचा मुड एकदम बदलला.
'अहो चीफ तुमच्याशिवाय आमचं काय खरं? चीफ सगळ्यात महत्वाचे.बसा.'असे हसत,थट्टेच्या सूरात म्हणताच,वातावरण एकदम निवळले.मंडळी निवांत झाली.ढवळे बसताच,बाजूच्या खुर्चीवरचे काळे त्यांच्या कानात कुजबुजले,'पाच मिनिटे ऊशीर केला असतास तर तुझं काहीं खरं नव्हतं.भडकला होता गडी'.ढवळेनी ते ऐकले न ऐकल्या सारखे केले.ही कुजबुज कुमठेकरांच्या कानी पडू नये म्हणून ते प्रार्थना करत होते.
सुदैवाने कुमठेकराचे लक्ष समोरच्या कागदावर होते.तो वाचून झालेवर,'सगळ्या शिपायांनी,लांब जाऊन थांबायचे,बेलवाजल्या शिवाय कुणीही आत यायचे नाही',अशी तंबी देऊन, त्यांना बाहेर पिटाळले.आणि सगळ्यात ज्युनियर असलेल्या तांबेंना(दि.न्या.क.स्त)दरवाजात जाऊन शिपाई दूर गेल्याची खात्री  करायला सांगितले.तांबेनी दरवाजापाशी जाऊन बाहेर नजर टाकली.जवळपास कोणी नव्हते याची खात्री झाल्यावर,ते खुर्चीवर येऊन बसले,आणि कुमठेकरांना नजरेनेच तशी खूण केली.
हे सगळे पाहून,आपल्याला ज्यासाठी बोलावले ते प्रकरण फार गंभीर आणि महत्वाचे असावे अशी एक दोन जण सोडून बाकीच्यांची खात्री झाली.या एक दोन जणापैकी एक होते शेरकर.ते कुमठेकराच्या सोबतच  न्यायाधीश झाले.पण काही कारणाने माग पडले ते पडलेच.अजूनही दि.न्या.क.स्त.च होते.तरीही त्यांचे कुमठेकरा सोबत मैत्रीचे संबंध होते.दुसरे होते जगनाडे .अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश.ते पाच सहा महिन्यात निवृत्त होणार होते.धार्मिक माणूस.ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत.माळकरी.सगळे त्यांना मामा म्हणत.पुर्वीते दोघे कुमठेकरा सोबत दोन तीन ठिकाणी एकत्र होते,आणि कुमठेकराना चांगले ओळखून होते.असे 'दरबार' भरवून स्वत:चा मोठेपणा मिरवायची,कुमठेकरांना सवय आहे असे दोघांचे मत होते.पण ते त्यांनी उघड केले नाही.
मामांनी खिशातून माळ काढली.ती टेबलाखाली धरून मनातल्या मनात जप सुरू केला.शेरकरांनी कोटाच्या खिशातून तंबाखू चुन्याचीडबी काढून टेबलाखाली धरली अन एका बाजूचे झाकण उघडून त्यातली तंबाखू डाव्या तळव्यावर घेवून मूठ बंद केली.ते झाकण उजव्या हाताने
बंद करून उलट बाजूचे झाकण उजव्याच हाताने उघडून त्यातील चुना उजव्या नखानेच तंबाखूवर टाकला.
उजव्या हातानेच झाकण बंद करून डबी परत कोटाचे खिशात ठेवली.तळवा उघडून उजव्या हाताने तंबाखू चोळून उजव्या हाताचा अंगठा व तर्जनीत मळलेली तंबाखू धरून कुणाला दिसणार नाही अशा बेताने मोठ्या शिताफीने,कौशल्याने अलगद उजव्या दाढेखाली सोडली.अनेक वर्षाचा सराव आणि अनुभवाने मिळवलेल्या शिताफी अन कौशल्याचा वापर करून या मुखरसाने मिळणारा ब्रम्हानंद ते नीत्य अनुभवीत असत.
तो मुखरस दीर्घकाळ न गिळता तोंडात धरून ठेवायचे त्यांचे कसबही वाखाणण्या जोगे होते.कदाचित त्यामुळे शांत आणि न बोलणारे न्यायाधीश म्हणून ते ओळखले जात! शेजारी बसलेल्या शिंगण्यांना तंबाखूच्या वासाने आलेली शिंक वगळता,शेरेकरांचे मळणी आणि गुळणीचा कुणालाही त्रास झाला नाही अन सुगावाही लागला नाही.शिंगण्यांना त्या वासानेच सिगारेटची  आठवण झाली.कोर्टकाम संपताच घरी जाण्यापूर्वी एकदा धुम्रपान करायची त्यांची रोजची सवय.आज मात्र त्यासाठी वेळ मिळाला नव्हता.किती वेळ चालते मिटींग अन केव्हा तो धूर श्वासात अन पोटात सामावून घ्यायला मिळेल कुणास ठाउक?असा विचार त्यांचे मनात आला.अशाच वेगवेगळ्या विचारात मंडळी होती.कुमठेकरांनी आपली गंभीर नजर सर्वत्र फिरवली. सगळ्या नजरा आपल्यावर खिळलेल्या आहेत,सगळ्यांचेकान टवकारले आहेत,हे लक्षात येताच त्यांना अतीव समाधान वाटले.मग त्यांनी समोर ठेवलेल्या ग्लास मधील पाण्याचा घोट घेतला.टायच्या टोकाला चष्मा पुसला.विरळ झालेल्या केसावरून हात व नंतर चेह-यावरून रुमाल फिरवला.आणि प्रास्ताविक सुरू करण्याआधी मोठ्ठा पॉज घेतला.सगळीकडे शांतता पसरली.श्रोत्यांची उत्सुकता हवी तेवढी ताणली गेली आहे,हे ध्यानात आल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली.
                      ( क्रमशः)

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

पूभाप्र... सुरवात छान झालिये.. लकबी मस्त खुलवून सांगितल्या आहेत

नीलकंठ देशमुख's picture

21 Feb 2022 - 9:50 am | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मुक्त विहारि's picture

20 Feb 2022 - 11:07 pm | मुक्त विहारि

असे काही लेख वाचतांना, एक वाक्य आठवते ...

माणसे, इकडून-तिकडून सारखीच, पण खुर्ची मात्र आब ठेऊन असते... खुर्ची माणसाची किंमत ठरवते...

नीलकंठ देशमुख's picture

21 Feb 2022 - 9:54 am | नीलकंठ देशमुख

खरे आहे. धन्यवाद

नीलकंठ देशमुख's picture

21 Feb 2022 - 9:54 am | नीलकंठ देशमुख

खरे आहे. धन्यवाद

शित्रेउमेश's picture

21 Feb 2022 - 12:41 pm | शित्रेउमेश

वाह!! जबरदस्त सुरवात....

नीलकंठ देशमुख's picture

21 Feb 2022 - 3:07 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल आभारी आहे

सौंदाळा's picture

21 Feb 2022 - 3:44 pm | सौंदाळा

अप्रतिम भाग
उत्सुकता ताणली गेली आहे, कुमठेकर काय सांगणार? पुढील भाग लवकर टाका.
तपशीलवार प्रसंगवर्णन वाचून द. मा. मिरासदारांची आठवण झाली.

नीलकंठ देशमुख's picture

21 Feb 2022 - 5:25 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. द.मा.मिरासदार अतिशय आवडते लेखक होते. त्यांची आठवण झाली हे म्हणून खूप सन्मान केला आहे.

अनन्त्_यात्री's picture

22 Feb 2022 - 3:26 pm | अनन्त्_यात्री

पु भा प्र

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2022 - 12:46 pm | चौथा कोनाडा

रोचक सुरुवात !
|| पु भा प्र ||

अनिंद्य's picture

23 Feb 2022 - 12:56 pm | अनिंद्य

चित्रदर्शी !

पु भा प्र

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2022 - 11:57 am | नीलकंठ देशमुख

अभिप्राय उशीरा पाहीला. क्षमस्व. छान वाटले.धन्यवाद