कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 3)

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
3 Aug 2021 - 6:48 pm

23 जुलै ला पाणी बरचसं उतरलं होत पण अनेक ठिकाणी अजूनही साचून होत. काही ठिकाणी पाणी उतरलं असलं तरी चिखल, आडवी झालेली झाडे, विजेचे खांब, तारा इत्यादी मुले जाणे अशक्य होते. मित्राचे आई वडील होते त्या शंकरवाडीत हीच परिस्थिती होती. ते सुखरूप आहेत हे समजलं पण त्यांची भेट घडू शकली नाही. 2 दिवसात इन्व्हर्टर संपल्याने नेलेल्या मेणबत्त्या आणि कडेपेट्या उपयोगात आल्या. चिपळुणात निदान 3 4 दिवस लाईट येणार नाहीत हे समजून चुकलो होतो. उदयाला पाणी पूर्ण उतरेल आणि मग प्रत्यक्षात सगळीकडे कामाला सुरुवात होईल याचा अंदाज आला. भाऊ ज्याचं कापडाच दुकान होत, त्याच्या इथे देखील अजून ढोपर भर पाणी रस्त्यावर होत. पण निदान विचारपूरस करून दूध नि प्यायचं पाणी , खाणं देऊन परत फिरलो.फोन ला रेंज मिळाल्यावर सगळ्यांचे मेसेज मिळाले, काहींना रिप्लाय केले आणि तो दिवस संपला.

24 तारखेला मी माहेरून परत घरी आले. चिपळूण मध्यवर्ती ठेवून एक बाजूला सासर आणि दुसऱ्या बाजूला माहेर अशी घरं आहेत आमची त्यामुळे दोन्ही घरं सुरक्षित होती. आईकडून परत येताना मित्रच्या आई वडिलांना जमल्यास भेटून जाऊ म्हणून वाडीकडे निघालो. पण वाडीला जाणाऱ्या रस्ताच झाडांमुळे अडवला गेला होता. अजूनही 2 किंवा 4 चाकी गाड्या वाडीत जाऊ शकत नव्हत्या. गाडी तिथेच पार्क करून आम्ही चालत निघालो. अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे वेडीवाकडी पडलेली दिसत होती. जी झाडं उभी होती त्यांच्या वर पर्यंत कचरा जाऊन अडकला होता. पाणी किती उंचीपर्यंत तिथे चढलं असेल याची कल्पना येत होती. अक्षरशः वाट काढत काढत कसे बसे त्या चिखलातून आम्ही त्या दोघांपर्यंत पोहोचलो. शेजारच्या घरी ती सुखरूप बघून परत एकदा बरं वाटलं. सगळी विचारपूस करून भावाकडे गेलो. कपड्याच दुकान त्यामुळे सगळंच भिजलेलं असणार. दुकान कधी उघडायच नि साफ सफाई कधी सुरू करूया विचारलं तर भाऊ म्हणाला इन्शुरन्स वाले आल्याशिवाय हात लावता येणार नाही. अरे देवा! अख्खी बाजारपेठ पाण्यात गेलेली म्हन्जे सगळेचजण इन्शुरन्स साठी पाठी लागणार. आणि जोवर इन्शुरन्स हिट नाही तोवर दुकान साफ करता येणार नाही. म्हणजे ते कापड अजून कुजणार, वास येणार, फुकट जाणार. हे आणि असे अनेक विचार डोक्यात येऊन गेले.म्हणजे आजचा दिवस सुद्धा असाच जाणार. दरम्यान अनेक छोट्या छोट्या गाड्या रेडी फूड पॅकेट्स आणि पाण्याच्या बाटल्या जागोजागी वाटत दिसायला लागल्या. घराघरातून लोक चिखल उपसताना दिसायला लागले. संध्याकाळी भावाचा फोन आला की इन्शुरन्स च काम झालाय , उद्या दुकान उघडायच.

25 ला सकाळी उठून घराचा स्वयंपाक करून ठेवला. आमच्यासाठी आणि शिवाय थोडी जास्तीची पोळी भाजी डब्यात भरून घेतली आणि मी नि श्रीनिवास दोघंही चिपळूणला आलो.
माझा दादा गावाहून येताना 4 गडी आणि जनरेटर ,डिझेल घेऊन आला होता. सगळी जमावजामव होऊन दुकानाचं शटर वर केलं आणि टचकन डोळ्यातून पाणी आलं. कापडाच्या ताग्यांवर नुसता चिखल आणि बरचसं समान अस्ताव्यस्त पडलं होतं. चिखलाचा एक प्रकारचा वास भरून राहिला होता. दादाने बिल्डिंग च्या बोरिंग वर पंप सेट करून जनरेटर ने पाणी चढवायच काम हाती घेतलं आणि आम्ही इकडे दुकान. तेव्हढ्यात आंजर्ले गावातून 10 जणांची टीम जनरेटर सह मदतीला आली होती ती तिथे उतरली. 5 माणसं आमच्या इथे थांबून बाकी दुसरीकडे गेली. 1 2 3 म्हणत घातला त्या राड्यात हात. त्या माणसाने भराभर सगळं सामान बाहेर काढायला सुरवात केली. सुदैवाने बघितलं तर दुकानाचा वरचा मजला सुरक्षित होता. तो माल अजिबात भिजला नव्हता. एक एक कापड जस बाहेर निघत होत तसं तसं वाईट वाटत होतं. 200/250 रुपये मीटर असणारी कापडं चिखलात बरबटलेली होती. चिखलाचा थर बसल्याने हातातून प्लास्टिक मध्ये असलेलं कापड सटकून परत चिखलात पडत होत. साड्यांचे फॉल, गाऊन ची कापड, ड्रेस पीस, तागे, अस्तरची कापड, परकर, रुमाल, स्कार्फ सगळे प्रकार एक होऊन मातीत मिळाले होते. गाऊन च्या कापडांचे गठ्ठे चिखलातून काढत होतो.दमत होतो, चहा पिऊन परत तेच काम चालू होतं होत.दुपारी एक वडापाव ब्रेक झाला. मीटर, पाण्याचा पंप सगळंच पाण्यात गेल्याने पाणी चढायला खूप वेळ लागत होता. आता सुरुवातीचं सामान बाहेर काढून रॅक रिकामे करणं चालू होतं. शेजारीच श्रीनिवास च्या मित्राचं स्टेशनरी च दुकान आणि त्या शेजारीच घर अस आहे. त्याची विचारपूस करायला गेलो. त्याच घर, दुकान दोन्ही पाण्यात. फक्त आमचे जीव वाचले म्हणाला. बाकी परत शून्यातून सुरवात म्हणत हसला. आम्हालाच भरून आलं. खरंच किती कठीण आहे हे. श्रीनिवास मग त्याच्याकडे मदतीला थांबला, मी परत भावाकडे आले. आजच्या दिवसभरात फक्त दुकानातील माल बाहेर काढून झाला. आणि दिवस संपला. त्यातही बायका येऊन भिजलेल्या कापडाची किंमत विचारात होत्या. त्या चिखलात भिजलेल्या कापडाच काय बरं या बायका करणार अस वाटलं. पण गाऊन ची कापडं बायका म्हणालाय धुवून चांगली होतात आणि शिवाय एखादा डाग राहिला तरी गाऊन घरातच वापरायचा तर चालतो. त्या बायकांनी तिथल्या तिथे 10 गाऊन ची कापडं विकत घेतली. आणि इथून खरी मजा सुरू झाली.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

5 Aug 2021 - 2:30 am | गॉडजिला

अन एकही प्रतिसाद नाही ? ते ही वास्तव विशद करणाऱ्या धाग्यावर ?

पूर आता ओसरला असल्याने वाचकांचा उत्साहही ओसरला की काय ? वातानुकूलित खोलीत बसून उसासे टाकता येण्यासाठी सतत ग्रिपिंग किक मिळाली पाहिजे हेच खरं... मग विषय काय चालु आहे त्याच्याशी फारसे देणे घेणे नसावे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

5 Aug 2021 - 8:54 am | रावसाहेब चिंगभूतकर

इथून खरी मजा सुरू झाली

लोक बहुधा कन्फ्युज असावेत. वाट बघतायत काय झालं त्याची.

निनाद's picture

5 Aug 2021 - 1:10 pm | निनाद

वास्तवाचे विवेचन चांगले केले आहे. पुढील लेखनाची वाट पाहतो आहे.

सौंदाळा's picture

5 Aug 2021 - 1:24 pm | सौंदाळा

विदारक परिस्थिती होती.
एकदम जिवंत वर्णन केले आहे.
लोक आता आपत्तीमधून सावरुन उभे रहात आहेत हे वाचून थोडे बरं वाटलं.