कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 2)

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
2 Aug 2021 - 9:52 am

22 तारीख. सकाळी 10.30 ची भरती होऊन ओहोटी सुरू झाली. समुद्राच्या जवळ आणि खाडी असल्याने भरती ओहोटी च्या वेळी वाशिष्ठी मध्ये पण पाण्याचे चढ उतार नेहमी होत असतात. पाणी आता थोडं कमी होईल अशी आशा वाटत होती. पण डोळयांसमोर पावसाने भरलेले ढग दिसत होते. पाणी 2 फूट कमी झाल्याचे मेसेज आले. थोडं हायस वाटलं पण पाणी ज्या वेगात भरलं त्या वेगात कमी होत नव्हतं. खर तर ओहोटीच्या वेळी पाणी वेगाने उतारावरून धावत जावं तसं जात असत पण यावेळी बाहेर गेलेल्या पाण्याला आत घ्यायला नदी तयार नव्हती. त्यामुळे हे 2 फूट कमी झालेल पाणी फक्त एक खेळ होता हे लवकरच जाणवलं. धरण क्षेत्रात चिक्कार पाऊस पडल्याने त्यांनाही नाईलाजाने पाण्याचा विसर्ग करावा लागत होता, त्यात आजूबाजूने येणारे असंख्य नाले, छोट्या मोठ्या नद्या ज्या वाशिष्ठी ला येऊन मिळतात. पण आज वाशिष्ठीने इतकं रौद्र रूप धारण केलं होतं की ती इतर कुणाला सामावून घ्यायला तयार नव्हती. परिणामी हे आजूबाजूचे नाले, छोटे ओढे , छोट्या नद्या हे देखील त्यांची पात्र सोडून बाहेर गावात घुसले. चिपळूण शेजारच्या खेर्डी भागात वाशिष्ठी बरोबरच या सगळ्यांनी भर घालून तिथे 10 फुटापर्यंत पाणी चढवलं.

पाऊस खंड न घेता कोसळत होता. ग्रुप वर मेसेज चालू होते. त्या वर्गमित्राचा अजूनही रेस्क्यु साठी मेसेज चालू होता. 2 फूट कमी झालेल पाणी थोड्याच वेळात 5 फुटांनी वाढलं. त्या मित्राच्या आई वडिलांच्या घरात सुरवातीला 3 फूट पाणी होत ते आता 5 फूट पाणी झालं. त्याचे आई वडील स्वयंपाकघराच्या ओट्यावर कंबरभर पाण्यात होते. मेसेज वाचून मी सुन्न झाले. क्षणभर सुचेना काय होतंय? काय चाललंय? आणि मी काय करतेय? असहाय वाटणं कशाला म्हणतात ते जाणवलं. NDRF च्या टीम आल्या, आता त्या सुटका करतील, आणखी पण दुसऱ्या टीम आल्या आहेत वगैरे मेसेज येत होते तर टीम रस्त्यामुळे अडकल्या, त्यांना यायला मिळत नाही असेही मेसेज फिरत होते. नक्की काय ते कळायला मार्ग नव्हता.

दरम्यान दुसऱ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला की आई बाबांशी कॉन्टॅक्ट होत नाही. तुझा कोणाशी कॉन्टॅक्ट झाला तर फक्त विचार . तसे मेसेज पाठवले पण दुर्दैवाने त्या क्षणी फक्त आयडिया नेटवर्क चालू होतं त्यामुळे फोन लागत नव्हते. ज्यांचं आयडिया नेटवर्क असलं तरी रात्रभर झाल्यावर अगदी इन्व्हर्टरचही चार्जिंग संपल्याने फोन बंद पडले होते. संपर्क जवळपास संपल्यात जमा होता. माझ्या भावाने इन्व्हर्टर बंद करून ठेवला होता. फक्त फोन चार्ज करण्यापूरता वापरायचा म्हणून त्याच्याशी थोडा संपर्क होता.

असाच वेळ जात होता.निदान ओळखीतल्या कुणाला मदत मिळाल्याचं कळलं नव्हतं. काही ठिकाणी रेस्क्यु ऑपरेशन सुरू झालं होतं. पाणी अजूनही उतरलं नव्हतं. 12 तासांनी परत भरती येईल आणि पाणी आणखी वाढेल याची भीती होती. मित्राचे ओट्यावर उभे असलेले आई बाबा डोळ्यासमोर येत होते. शेजारी हाका मारून त्यांच्याशी संपर्क साधून होते. दुर्दैवाने पाण्याला प्रचंड ओढ होती त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. संध्याकाळी 6 वाजता अशी अवस्था आली की भावाच्या घरात ड्रेनेज तुंबल्याने टॉयलेट बाथरूम मधून पाणी घरात पसरू लागलं. तो सकाळीच वरच्या मजल्यावर गेला होता तरी पण डोळ्यासमोर हे सगळं बघणं किती अवघड आहे याची कल्पना नाही करवत.

आज 9.30 ची भरती होती. प्रचंड कोसळणारा पाऊस, भरती आणि त्यात धरणाचं सोडलेलं पाणी यामुळे चिपळूण मध्ये पाणी वाढायला सुरवात झाली. मिळतील त्या रेस्क्यु वाल्याना फोन केले पण मित्राचे आई वडील राहत तो शंकरवाडी एरिया अति प्रचंड पाण्याने भरलेला होता. फोन वरच त्या माणसाने कबूल केलं की ,"सॉरी मॅडम पण आम्हाला पण जीवाची पर्वा आहे. तिथे पाण्याला ओढ एवढी आहे की नाही कोणी जाऊ शकत" त्यांची अगतिकता देखील खोटी नव्हती. बराच वेळ जागे राहून मेसेज चालू होते. रात्री 1 च्या दरम्यान मित्राचा मेसेज आला तेव्हा त्याचे आई बाबा गळाभर पाण्यात ओट्यावर उभे होते असे कळलं. माझे आई वडील असतील त्याच साधारण वयाचे ते दोघे. लहानपणापासून सगळ्यांना ओळखत आहोत. आता ती माणसं गळाभर पाण्यात जीवन मृत्यू च्या सीमारेषेवर झगडत आहेत. मला कल्पना सहन होईना. घरात गेले की स्वयंपाकघराच्या ओट्यावर मला ती दोघे उभे असलेले दिसत. डोळ्यासमोरून ती दोघे हलायला तयार नाहीत. फक्त देवाची प्रार्थना करणं हातात होतं आणि ते अगदी सुरवातीपासून करताच होते. पण आता मात्र प्राण कंठाशी आले होते.अजून थोडा वेळ आणि ती दोघे बुडून जाणार ही कल्पनाच सहन होईना. रात्री 2 वाजता कशी बशी झोपले पण त्यातही जिथे तिथे ती दोघे दिसत होती. अगदी स्वप्नात देखील.

23 तारखेला न राहवून 6 वाजता जाग आली. दाराबाहेर पडून आधी मेसेज चेक करायला गेले. पण आज 2 दिवस उत्तम साथ दिलेल्या नेटवर्क ने आज मान टाकली. इतकी चिडचिड झाली की विचारू नका. एक काडी नेटवर्क नाही. गाडी घेऊन आसपास राऊंड मारून आलो पण तरी नेटवर्क मिळेना. ती दोघ अजूनही नजरेसमोरून जात नव्हती. शिवाय बाकी पण काही कळत नव्हतं. दादा सुद्धा बेचैन होता. आज काही झालं तरी चिपळूण ला जाऊन यायचं त्याने ठरवलं. शेजारच्या गावातील दोघे मित्र आले आणि पाऊस थांबलाय पाणी उतरायला सुरुवात झाली आहे असं कळलं. ऐकून बरं वाटलं पण त्या दोघांच काय झालं कळायला मार्ग नव्हता. दादा बरोबर मी पण चिपळूण ला जायला निघाले.
निघताना बराबर आजूबाजूकडून गोळा केलेलं 20 लिटर दुध, 50 लिटर प्यायचं पाणी, बिस्कीट पुडे, मॅगीची पाकिटं, मेणबत्ती, काडेपेटी अस सुचेल तसं गोळा करून निघालो. कामथे गाव क्रॉस केलं नि ट्रक ची मोठी लाईन दिसली. वाशिष्ठी चा पूल बंद केल्याने अडकलेले सगळे ट्रक एका बाजूला लाईन लावून उभे होते. चिपळूण मध्ये प्रवेश करतानाच सुरवातीला पागेवर माझ्या मैत्रिणीच आणि एक मित्रच घर लागत. दोन्ही घरी जाऊन विचारपूस केली. मित्र सुखरूप होता आणि दुसरीकडे निघाला होता. मैत्रीनीचे आईवडील देखील सुखरूप होते. त्यांना दूध पाणी देऊन पुढे निघालो. आणि माझ्या त्या मित्राचा नातेवाईक भेटला. तो म्हणाला सकाळी 6 ला त्या दोघांची शेजाऱ्यांनी सुटका केली आणि आता सुखरूप आहेत. डोळ्यातून नकळत अश्रू आले. हात जोडले गेले. समाधान वाटलं. मी काहीच केलं नव्हतं पण तो दोघ सुखरूप आहेत या बातमीने दिलासा मिळाला. माझीच सुटका झाल्याचं फीलिंग आलं. नेटवर्क नसल्याने काहीच मेसेज वगैरे करता येत नव्हते पण तरीही मी खुश झाले. जवळपास 24 तास ती दोघे पाण्याशी झगडत होते. त्यातही रात्री 1 ते सकाळी 6 पर्यंत ती दोघ गळाभर पाण्यात होती. शेजारचे त्यांना हाका मारून संपर्कात होते. आणि तेव्हढाच आधार होता त्यांना. जगण्यामरण्याच्या धडपडीत त्याच्या जगण्याच्या इच्छेपुढे यमदेव नुसतेच दर्शन देऊन गेले .अजूनही त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. कारण तिकडच पाणी अजून उतरलं नव्हतं. बाजारपेठेत पण अजून पाणी शिल्लक होत. हळूहळू पाणी जाऊन गोष्टी दिसायला लागल्या होत्या नि भयानकता जाणवायला लागली होती. भिंतींवर पुराच्या पाण्याची रेषा उमटली होती. पुढच्या पुराच्या बंदोबस्तासाठी.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

2 Aug 2021 - 3:17 pm | गॉडजिला

तुमचा अनुभव आम्हालाही अस्वस्थ करून गेला...

गळाभर पाणी तर आजुन भीतीदायक... २००५ साली सांगलीच्या पुरात एक जीव असाच घरात अडकून डोळ्यासमोर कायमचा नाहीसा झाल्याचा अनुभव माहिती आहे व आजूबाजूच्या लोकांना बसलेला मानसिक धक्का व त्यातून सावरायलाा गेलेली काही यातनामय वर्षे सगळेच भीषण प्रकरण होते...

सुदैवाने ती वेळ आली नाही _/\_

कॉमी's picture

2 Aug 2021 - 3:34 pm | कॉमी

बापरे

तुषार काळभोर's picture

2 Aug 2021 - 3:39 pm | तुषार काळभोर

वाचताना अस्वस्थ होत होतं.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2021 - 5:42 pm | श्रीगुरुजी

बापरे, फारच भयंकर परिस्थिती.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

2 Aug 2021 - 9:13 pm | रावसाहेब चिंगभूतकर

एक साधा प्रश्न. कुठल्या घटनेनंतर लोक जबाबदार व्यक्तींच्या हत्या करायला लागतील? "बिल्डर, राजकारणी आणि प्रशासनाची मिली भगत" असं एक भोंगळ कारण असं काही घडलं तर दिलं जातं. पण या मागे खरं सांगायच तर व्यक्ती असतात. आता या दोन व्यक्ती ज्यांना जीवदान मिळालं त्या कदाचित वयस्क असतील. पण असेही लोक असतील जे तरुण असतील. अशा व्यक्ती अशा घटनेनंतर बदला घ्यायला प्रवृत्त होऊन वरील तीन कॅटेगरी मधील लोकांना शोधुन त्यांना यमसदनाला का पाठवत नाहीत? जीवाला धोका हा सगळ्यात मोठा धोका. लोकांना असं काय व्हायला हवं की ते या व्यक्तींच्या जीवावर उठतील?

सौन्दर्य's picture

2 Aug 2021 - 11:29 pm | सौन्दर्य

ह्याच भीतिपोटी राज्यकर्ते हेलिकॉप्टरने पाहणी करत असतील. लोकांचा राग अनावर झाला तर काहीही घडू शकते.

सुजित जाधव's picture

12 Aug 2021 - 3:07 pm | सुजित जाधव

खरंच अंगावर काटा आला हे सगळं वाचून...

पूर्वेकडे सह्याद्रीच्या उंचउंच अशा अतूट रांगा, पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र, या दोन परिसीमांमधील लहानमोठ्या दऱ्या आणि त्यांमध्ये दूरवर पसरलेले समुद्र खाड्यांचे पाणी

अशी तेथील भौगोलिक स्थिती आहे सह्याद्री पर्वत रांगेतून वाहत येणाऱ्या मध्ये तीव्र उतारावरून वाहतात त्या मुळे पाण्याचा वेग प्रचंड असतो.
त्यांची लांबी सुद्धा खूपच कमी आहे ५५ ते ६०, किलोमीटर. आहे.
पूर्वेला उंच सह्याद्री आणि पश्चिम दिशेला विशाल अरबी समुद्र
अशा रचणे मुळे तिथे लोकवस्तीत मध्ये पाणी जमा होण्याचे प्रमाण जास्त असावे.

पूर्वेकडे सह्याद्रीच्या उंचउंच अशा अतूट रांगा, पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र, या दोन परिसीमांमधील लहानमोठ्या दऱ्या आणि त्यांमध्ये दूरवर पसरलेले समुद्र खाड्यांचे पाणी

अशी तेथील भौगोलिक स्थिती आहे सह्याद्री पर्वत रांगेतून वाहत येणाऱ्या मध्ये तीव्र उतारावरून वाहतात त्या मुळे पाण्याचा वेग प्रचंड असतो.
त्यांची लांबी सुद्धा खूपच कमी आहे ५५ ते ६०, किलोमीटर. आहे.
पूर्वेला उंच सह्याद्री आणि पश्चिम दिशेला विशाल अरबी समुद्र
अशा रचणे मुळे तिथे लोकवस्तीत मध्ये पाणी जमा होण्याचे प्रमाण जास्त असावे.