सिलींडर २

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
20 Jul 2021 - 11:48 am

सिलींडर २
सुरुवातीचा प्रवास साधारण रितीने,ब-यापैकी झाला.
म्हणजे टेम्पो आपला,आपल्या गतीने  चालला होता.टेम्पोचा वेग लक्षात घेता 'चालला'होता म्हणणेच योग्य.अंदाजे अर्ध्या तासानंतर,रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पटकाधा-याने हात दाखविला.टेम्पो थांबला.म्हणजे ड्रायव्हरने थांबवला.पटकाधा-याला जवळच्या  गावाला जायचे होते.तो एकटा नव्हता.सोबत दोन शेळ्या होत्या.
ड्रायव्हरने उदार अंतःकरणाने त्या सगळ्यांना टेम्पोच्या मागील भागात सामावून घेतले.आणि आपल्या खिशात काही नोटाही.टेम्पो पुढे निघाला.वाटेत मधून मधून लोक हात दाखवत .ड्रायव्हर  टेम्पो थाबंवे.ड्रायव्हर आणखी कांही पॅशींजरना सामानासहीत टेम्पोमधे, टपावर सामावून घेई.आणि त्या बदली जंगम ऐवज स्वत:चे खिशामधे ,असे सुरू झाले.आता केबीनही पॅशींजरनी गच्च भरली होती.सुरुवातीला मी थोडा निषेधाचा भाव चेह-यावर दाखवण्याचा प्रयत्न केला.पण ड्रायव्हरने 'थोडं बाजूला सरका'असं दटावणीवजा सुरात सांगताच मी चलाखीने खिडकीचे बाजूची सीट (?) पटकावली व अंग चोरून बसलो.केबीनमधे माझ्या बाजूला दोन व ड्रायव्हरचे बाजूला एक पॅशींजर.त्यामुळे गाडीचा गियर माझ्या सहपॅशींजरचे दोन्ही पायामधे आला होता.त्यामुळे गियर बदलताना काय होत असेल याची कल्पना करवत नव्हती.
दर चार पाच किलोमीटर नंतर पॅशींजरची चढउतार होई.केबीन मधला पॅशींजर असला की प्रत्येक वेळी मला टेम्पोतून पाय उतार व्हावे लागे.तेवढीच हवा  लागत असे.टपावरची मंडळी मात्र मजेत हवा खात होती.ऊन्हाचा त्रास होता,अन पडण्याची भिती. तेवढं सोडलं तर बाकी सगळं ठीक होते.दुपारचे बारा वाजले असावेत.मजल दरमजल करत टेम्पो ने ब-यापैकी अंतर कापले.
हळूहळू एक एक पॅशींजर गळत गेला.एका टप्प्यावर तर टेम्पो जवळ जवळ रिकामाच झाला.केबीन मधे ड्रायव्हर व्यतिरिक्त मी आणि मागे क्लीनर आणि एकजण पॅशींजर, एवढेच शिल्लक उरलो.गावचा थांबा आता जवळच होता.पंधरा वीस  किलोमीटरचाच प्रश्न होता. तेवढ्यात इंजिन मधून धूर यायला सुरुवात झाली.टेम्पो चा वेग कमी होत एकदम थांबला. ड्रायव्हरने शिवी दिली.अन टेम्पो सुरू करायचा प्रयत्न केला.पण तो सुरू होण्याचे नाव घेत नव्हता. ड्रायव्हर खाली उतरला. सोबत क्लिनर पण.'आता ही काय आपत्ती आली?आज व्यतिपात होता असं काल कुणीतरी म्हणालं होतं.म्हणजे प्रवासासाठी शुभ दिवस नव्हता. त्यात शनिवार.आज निघायलाच नको होतं.' विचार सुरू झाले.धडधड वाढली.तेवढ्यात ड्रायव्हर सीट वर येऊन बसला.टेम्पो सुरू होतो की काय?मनात आशेला पालवी फुटली. 'खाली उतरा 'त्याने आज्ञा सोडली.माझ्या चेह-यावरचा 'का?'पाहून; 'टेम्पोला धक्का मारा,'त्याने खुलासा केला. मुकाट्याने खाली उतरलो.क्लिनर,मी आणि उरलेला सहपॅशींजरअसे तिघे  टेम्पो ढकलू लागलो. 'जोर  लावा, जोर लावा',क्लिनर धक्का मारता मारता सुचना देत होता. दम लागला होता.पण काय करणार?आमचे सामुहिक धक्काधक्कीने,टेम्पोने वेग पकडला.काही अंतर जाताच इंजिन सुरू झाल्याचा आवाज आला आणि टेम्पो जोरात पुढे धावू लागला.आम्ही तिघे
मागे मागे.सुदैवाने अंदाजे एक फर्लांगावर ,ड्रायव्हरला आमची आठवण झाली अन त्याने टेम्पो थांबवला.हाश्श हुश्श करत,घामाघुम झालेले आम्ही टेम्पो जवळ पोहचलो.कुणीच बोलण्याच्या परिस्थिती मधे नव्हतो.
ड्रायव्हरला शिव्या दिल्या.अर्थात मनातल्या मनात. क्लिनरने,मात्र टेम्पो लगेच का थांबवला नाही म्हणून त्याचे पुर्वजांचा उध्दार केला.बरे वाटले. ड्रायव्हर मात्र ढिम्म होता.आम्ही स्थानापन्न झाल्यावर पुढचा प्रवास सुरु झाला.एका थांब्यावर सहपॅशींजर उतरून गेला.आता क्लिनर केबीन मधे माझ्या बाजूला येऊन बसला.
धक्काधक्कीचे एकत्रित प्रयत्नात आमच्यात संघभावना निर्माण झाली होती..ड्रायव्हरने गप्पा सुरू केल्या.त्या ओघात मी वकील असल्याचे त्यांना कळले.मग काय, दोघांच्या चेह-यावर विलक्षण आदराची भावना दिसू लागली.ड्रायव्हरने एकदा दारूचे प्रकरणात पंचनाम्यावर पंच म्हणून सही केली होती.ती केस कोर्टात यायची होती.त्याला कोर्टाची फार भिती वाटत होती. म्हणून क्लिनरला पण वाटत होती.ते दोघेही कोर्टा विषयी वेगवेगळे प्रश्न विचारू लागले.मला तरी कुठे फारशी माहिती होती? पण माझ्या परीने त्यांचे शंकां समाधान करू लागलो.ड्रायव्हरची साक्ष कोर्टात असेल तेव्हा मी तिथे हजर राहावे ,अशी त्याने विनंती केली.मी ती मान्य केली.या बदल्यात त्याने अनेक गोष्टी करायचे कबुल केले.पुढच्या वेळी  सिलिंडर नेताना टेम्पो अगदी वेळेत निघणार होता ,आणि कुठे न थांबता,वाटेत पॅशींजर न घेता मला डायरेक्ट गावच्या थांब्यावर किंवा जमल्यास अगदी  घरापर्यंत ही सोडणार होता. या आश्वासनाने मलाही एकदम छान वाटू लागले.पुढच्या प्रवासाची चित्रे डोळ्यासमोर दिसू लागली.
  थोडा लांबला होता प्रवास,पण ड्रायव्हर ची ओळख झाली. पुढे  नक्कीच फायदा होईल.शनिवार,व्यतिपात,शुभ मुहूर्त वगैरे काही खरे नसते.मनात विचार येऊ लागले. तालखेड नावाचे गावाचा थांबा दिसू लागला.येथून फक्त सात किलोमीटरवर,आडगावचा थांबा.तिथे बैलगाडी आली असेल.बसने प्रवास करताना  तालखेड फाटा दिसला की धस्स होत असे. कारण प्रत्येक बस, प्रवासी असो वा नसो तिथून  आत चारपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात जाउन येत असे.तिथे गेल्यावर ड्रायव्हर कंडक्टरला चहापाणी होई.एक तासाची निश्चिंती असे.कधी काळी या रस्त्यावर रेल्वे आली तर ती पण सरळ जाण्याऐवजी तालखेडच्या भोज्याला शिवून येत जाईल असा विचारयेई!आज मात्र तालखेड गावात जाण्याची कटकट नव्हती. डायरेक्ट गावाकडे. आनंद कारंजे थुईथुई नाचू लागले मनात.
  पण ...
                       क्रमश:
                     नीलकंठ देशमुख

वाङ्मयविरंगुळा

प्रतिक्रिया

बापूसाहेब's picture

20 Jul 2021 - 12:24 pm | बापूसाहेब

वाह.. हा भागदेखील मजेशीर...
पुढचा भाग लवकर येऊद्यात..

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:43 pm | नीलकंठ देशमुख

असा प्रतिसाद वाचून खूप छान वाटते. उद्या तिसरा भाग येईल

तुषार काळभोर's picture

20 Jul 2021 - 1:37 pm | तुषार काळभोर

मजा यायला लागली आणि संपला पण :)

असो... तुमच्या वकीलीचे किस्से (तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस केली असावी असे गृहीत धरून) वाचायला आवडतील.

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 1:49 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
न्यायाधीश होण्यापूर्वी वकीली केली आहेच. सरकारी वकील पण होतो. त्या विषयावर पण लिहीत आहे.

गॉडजिला's picture

20 Jul 2021 - 2:18 pm | गॉडजिला

पुढील भाग लवकर टाकाा

@ नीलकंठ देशमुख

न्यायाधीश होण्यापूर्वी वकीली केली आहेच.

न्यायाधीश ? साहेब कसे आहात ? आमची गरीबाची ओळख ठेवा बरं _/\_

नावातकायआहे's picture

20 Jul 2021 - 2:45 pm | नावातकायआहे

बाडिस!

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 7:31 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. मी ठीक आहे. आपलेही क्षेम इच्छितो.
पुढील भाग ऊद्या.

सौंदाळा's picture

20 Jul 2021 - 2:23 pm | सौंदाळा

हा भाग पण भारीच.
कोर्टात जायला चालक घाबरला आणि तुम्ही वकील आहे हे त्याला समजले तेव्हा त्याला जरा अजुन घाबरवायला पाहिजे होते तुम्ही, आधीच्या मनस्तापाचा थोडा वचपा काढायला.
गिअरच्या दोन्ही साईडला पाय टाकुन बसलेला माणुस ऐकुन मौज वाटली, काय हाल झाले असतील त्याचे त्यालाच माहीती.

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 7:32 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

कंजूस's picture

20 Jul 2021 - 3:08 pm | कंजूस

रस्त्यावर हात दाखवून ट्रकात बसण्याची माहिती नसेल तर अचानक अनपेक्षितपणे नवीन अनुभव येतात. हे मी भिगवण - भुलेश्वर - उरळी कांचन असे सोलापूर पुणे रस्त्यावर अनुभवले.

ड्राईवरच्या बाजूला दोन पायांत गिअर ठेवून बसलो. मी पहिलाच प्रवासी. तो म्हणाला सरकून बसा. अजून पाशिंजर येतील. जरावेळाने त्याने एक पुडी डाव्या हाताने माझ्याकडे दिली. मला ती पुडी घेतल्यावर समजले की ती गायछाप आहे.
"मी खात नाही."
"खायाचं न्हाय. चोळा आणि द्या. "
तर ही विद्या शिकलो ओनलाईन.

तुषार काळभोर's picture

20 Jul 2021 - 4:27 pm | तुषार काळभोर

बेक्कार!!!

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 7:32 pm | नीलकंठ देशमुख

हा हा हा हा

सौन्दर्य's picture

20 Jul 2021 - 11:27 pm | सौन्दर्य

कॉलेजमध्ये असताना आम्ही पंधरा-वीस मुले मुंबईच्या लोकल ट्रेनने ने कॉलेजला जात असू. बोरिवलीहून विलेपार्ले पर्यंत. आम्ही कित्येक मुले दारातच अर्धे दार अडवून उभे असायचो. बसलेल्यांपैकी एकदा एकाने मला कांदिवली स्टेशनवरच्या स्टॉलवरून एक सिगारेट पेटवून आणण्यास सांगितली. मी सिगारेट विकत घेतली, ती ज्योतीवर पेटवली व धावत येऊन त्या मुलाला दिली. पण तोपर्यंत ती विझली होती, त्याने मग माझी अक्कल काढली म्हणाला "XXXच्या, सिगारेट अशी पेटवायची असते होय रे ? तिचा झुरका मारायचा असतो तरच ती पेटत राहते नाहीतर लगेच विझते. विडी मात्र झुरका न मारता देखील पेटलेलीच राहते, उद्या हे लक्षात ठेव."

उद्याच कशाला ? हे ज्ञान आयुष्यभर लक्षात राहिले.

गाडीचा गियर माझ्या सहपॅशींजरचे दोन्ही पायामधे आला होता.त्यामुळे गियर बदलताना काय होत असेल याची कल्पना करवत नव्हती.
बाल्यावस्थे मध्ये आणि किशोरवयात पदार्पण करण्याचा आधीच्या काळात मला टमटम मध्ये अशाप्रकारेच बसवले जायचे पण तेव्हा कधी हा असा विचार डोक्यात आला नाही कदाचित लहान असल्यामुळे असावे.
खुपच छान लिखाण आहे पुढील भागाची वाट पाहतोय लवकरच सिलेंडरचा हास्य स्फोट होईल अशी अपेक्षा आहे.

आता सिलींडर घरी पोहचू पर्यंत वाट पाहावी लागेल.

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 7:34 pm | नीलकंठ देशमुख

वाट पाहावी वाटते हे वाचून आनंद झाला.
उद्या पुढील भाग येईल. आपल्याला निश्चित आवडेल.

Nitin Palkar's picture

20 Jul 2021 - 8:16 pm | Nitin Palkar

.. उत्कंठा वाढतेय. छान लिहिताय.

तुमच्या लिखाणात कुठेच कृत्रिम पना नसतो.
प्रसंगाचे अगदी योग्य वर्णन करता .

नीलकंठ देशमुख's picture

21 Jul 2021 - 9:02 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. हा प्रतिसाद खूप उत्साह वर्धक आहे

चौथा कोनाडा's picture

23 Jul 2021 - 2:57 pm | चौथा कोनाडा

वाह, झकास भारी शैली !
शेवटी शनिवार म्हणजे डेंजर वारच म्हणयचा ! शनीदेवा, सांभा़ळून घ्या बरे !

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2022 - 11:54 am | नीलकंठ देशमुख

तुमचा प्रतिसाद खूप उशीरा पाहीला. कसा नजरेतून सुटला माहीत नाही.धन्यवाद. कथा आवडली.छान वाटले