२१५ - आता पुढे काय?

सारिका होगाडे's picture
सारिका होगाडे in जनातलं, मनातलं
4 Jul 2021 - 11:21 am

२१५ - आता पुढे काय?

यावर्षी कॅनडामध्ये ‘कॅनडा डे’ साजरा करायचा कोणाचाही, इथल्या कुठल्याही लोकांचा, विचार नव्हता, इच्छा नव्हती. काय आहे कॅनडा डे? तर हा दरवर्षी १ जुलैला साजरा केला जातो. राणीने १९८२ मध्ये जेव्हा कॅनडा काबीज (?) केला आणि तिची सत्ता स्थापन केली, त्या दिवसाला कॅनडा डे म्हणतात. म्हणजे आपल्या १५ ऑगस्टच्या अगदी उलट. त्यामुळे कॅनडा डे हा नेटिव्ह लोकांसाठी दुःखाचा, तिरस्काराचा असा दिवस झाला. त्यांनी तो कधीही साजरा केला नाही, अर्थातच!

२१५ (अजून एका शाळेत ७५१ अन्मार्कड (अचिन्हन्कित) ग्रेव सापडल्या आहेत. याचा अर्थ मेलेल्याना तसेच पुरले आहे. त्या लेखाची लिंक मी खाली दिली आहे.) लहान मुलांचे पुरलेले शव सापडल्यानंतर एक भयानक हत्याकांड समोर आल्यामुळे इथले सर्व लोक नाराज आहेत, दुःखी आहेत. त्यांना नेटिव्ह कॅनडिअन्सबद्दल खूप सहानुभूती आहे. ज्या दिवशी शव सापडले, त्यादिवसापासून सर्व कॅनडा झेंडे अर्धे खाली केलेले आहेत. (हो, इथे तुम्ही घरात, घराबाहेर, कुठेही, कोणीही कॅनडाचा झेंडा लावू शकतात. तो चढवणे, उतरवणे वगैरे काहीच नियम नाहीत.) ठिकठिकाणी लोकांनी एकत्र येऊन सभा भरवल्या व आपल्या भावना व्यक्त केल्या. अबोरोजिनल / नेटिव्ह लोकांसाठी आपली सहानुभूती व्यक्त केली. फक्त तिथेच नाही थांबले ते, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, याबद्दल चर्चा सुरु केली आणि त्याप्रमाणे योजना आखण्यात आली.

आतापर्यंत लोकांना सत्य माहित नव्हते पण या घटनेमुळे लोक जागरूक झाले आहेत. अधिक माहिती मिळवत आहेत आणि एकमेकांना सांगत आहेत, शिक्षण देत आहेत. ही जागरूकता सर्व स्तरांवर सुरु झाली आहे. शाळांमध्ये बालवाडीपासून सर्व मुलांना त्यांच्या वयाला झेपेल अशी पण सत्य माहिती सांगितली जात आहे. आता कॅनडामध्ये मुलांनासुद्धा काय घडले होते, याची कल्पना मिळाली आहे. सगळीकडे २ मिनिटे १५ सेकंड मौन पाळले गेले. त्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली गेली आणि यापुढे असा प्रकार कुठल्याही लोकांबरोबर होणार नाही, होऊ दिला जाणार नाही, आणि झाला असेल, होत असेल तर त्या लोकांना संपूर्ण सहकार्य केले जाईल, पाठिंबा दिला जाईल अशी प्रतिज्ञा केली जात आहे.

कॅनेडियन कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये सर्व लोकांना खूप सवलती/ मुभा दिल्या जातात. या घटनेमुळे तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर तो तुम्ही सांगा, एकमेकांशी बोला, मनातल्या मनात कुढत राहू नका, बोलून मन मोकळे करा, असे वारंवार सांगण्यात येत आहे. तुमचे मानसिक स्वास्थ्य ठीक होण्यासाठी जे काही तुम्हाला करावेसे वाटत आहे ते तुम्ही करा. मग कोणी १-२ तास बीचवर जाऊन विश्रांती घेतात, कोणाला डोंगरावर जाऊन सायकल चालवायची असते, कोणाला तलाव(लेक)मध्ये जाऊन पोहायचे असते तर कोणी बागकामात मन रमवतात. इथे तसेही कामाचा कोणताही दबाव दिला जात नाही. त्यामुळे सर्व लोक मन लावून, जबाबदारीने, अजून आनंदाने काम करतात. तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्व स्तरांवर सरकार काम करत आहे. इथे सर्वानाच खूप सवलती मिळतात. त्यामुळे जगणे सुखकर झाले आहे. तुम्ही कदाचीत वाचले असेलच "जीवन गुणवत्ता" या श्रेणीमध्ये कॅनडाचा पहिला क्रमांक आहे. त्या लेखाची लिंक मी खाली दिली आहे.

तर आता सरकार नेटिव्ह/ अबोरिजिनल/ फर्स्ट नेशन्स/ इंडिजिनिअस लोकांसाठी काय करत आहे?
सर्वात आधी पहिली गोष्ट म्हणजे - पोचपावती/ कबुली / जाणीव. शाळेतील छोटेसे एकत्र येणे असो, संस्थांमध्ये कोणतीही मीटिंग असो, सरकारी काही काम असो, सर्वात आधी पोचपावती जाहीर केली जाते जी आधीही केली जायची पण आता वारंवार सुरु केली आहे. कॅनडामध्ये नेटिव्ह लोक राहत होते तेव्हा जागेला जी नावे होती, ती नावे घेतली जातात. त्या जागेवर जे लोक राहत होते, त्यांच्या त्या त्या टोळीचे (ट्राइब) नाव घेतले जाते आणि आभार मानले जातात. उदाहरणार्थ: मी ह्या (=जागेचे नाव) जागेवर, राहत आहे, खेळत आहे, आनंदाने जगत आहे त्यासाठी ह्या (=टोळीचे/ समूहाचे नाव) टोळीचे आम्ही आभारी आहोत, असे जाहीर करून जाणीव ठेवली जाते, दुसऱ्यांनाही ती करून दिली जाते, आठवण ठेवली जाते. लेखाच्या शेवटी लिंकमध्ये मी तो नकाशा देत आहे.

जी आत्ताची नेटिव्ह लोकांची पिढी आहे त्यांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी सरकार आणि इतर संस्था खूप मदत करत आहेत. अशा लोकांना भरती करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. कंपन्यांना आवाहल केले जात आहे. पण नेटिव्ह लोकांमध्ये ते कौशल्य आहे का? जर ते नाहीये पण त्यांना एखाद्या क्षेत्रात आवड आहे तर योग्य असे प्रशिक्षण दिले जाते. ते देण्यासाठी काही संस्था आहेत जे त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतात. या संस्थांचे हेच काम आहे. प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. उदाहरणार्थ: जर एकाला संगणक क्षेत्रात आवड आहे, त्यानुसार प्रशिक्षण सुरु केले जाते. मग जशी जशी त्याची प्रगती होईल त्यानुसार पुढे नोकरी मिळण्यासाठीही सहकार्य केले जाते आणि पुढे काही अडचण आलीच तर पुढे मार्गदर्शनही केले जाते.

त्यांची मुले आता सरकारी आणि खाजगी शाळेत जाऊन इतर मुलांप्रमाणे शिकू शकतात. आज कॅनडामध्ये सर्व जाती- धर्माच्या लोकांना सन्मानानेच वागवले जाते. इथे कोणताही भेदभाव तुम्हाला रोजच्या जीवनात सहसा जाणवत नाही. तुमचा धर्म कोणताही असो तुम्हाला सन्मानानेच वागवले जाते. तुम्ही जसे आहात तसे आणि तुमच्या संस्कृतीसह तुम्हाला स्वीकारले जाते. उलट इथे तुमच्या संस्कृतीबद्दल तुम्ही सांगा, त्यांना खूप आवडते. अजून माहिती घ्यायची त्यांची इच्छा असते. नेटिव्ह लोकांना अशी वागणूक मिळण्यासाठी खूप सहन करावे लागले आहे, खूप उशीर झाला आहे. पण आज सर्व लोकांना चूक समजून आली आहे. आपल्या पूर्वजांनी जी चूक केली त्याची त्यांनी माफी मागितली आणि ती चूक सुधारण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

फक्त सरकारच हे करत आहे असे नाही, तर इथे लोकही खूप समंजस, जागरूक आहेत. दुसऱ्याच्या भावना समजून मगच बोलणे हे त्यांना लहानपणापासूनच शिकवले जाते. दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही असे बोला. एखादी नकारात्मक गोष्ट पण कशी सांगावी हे यांना चांगले माहित आहे. अनोळखी माणसाशी किंवा रोजच्या भेटण्यात आलेले त्यांच्याशी बोलताना इथे अलिखित असा नियम आहे कि फक्त हवा पाणी, तू कसा, मी कसा, छंद, आवड निवड असे विषय बोला. एकमेकांचे चांगले अनुभव सांगा ज्याने समोरच्याला ऐकून आनंद वाटेल. असे अनुभव सांगा ज्याने समोरच्याला काहीतरी छान शिकता येईल. राजकारण, खेळात तुझी टीम, माझी टीम, असे वादविवादाचे विषय नको. त्यामुळे तुमचे आणि दुसऱ्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडेल असे कुठलेही विषय बोलू नये. असे विषय निघाल्यानंतर कसे हळूहळू वादात परिवर्तित होतात ते त्यांनाही कळत नाही, मग उगीचच कोणाचं तरी रक्त सळसळत आणि त्रास होतो, भांडणे होतात.
तसेच वैयक्तिक असेही प्रश्न विचारू नये. जर समोरच्याला सांगायचे असेल तर ऐकून घ्या, वाटले तर तुम्हीही सांगा.

आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, त्रास होत नाहीयेना याची खबरदारी घेतली जाते. झाली तर मदतच होईल असे बघितले जाते.
आता हेच बघा ना एवढा कडक उन्हाळा आहे इथे, तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. इथे घरात एसी नसतो, कारण एवढा कडक उन्हाळा नसतोच इथे त्यामुळे कधी गरजच पडली नव्हती. पण आता जागतिक तापमानवाढीमुळे कॅनडामध्ये कडक उन्हाळा सुरु झाला आहे, तर लोक लगेच एकमेकांना मदत करण्यासाठी सज्ज.
त्यातील एक-दोन उदाहरणे: एका दुकानाच्या बाहेर दुकानदाराने कूलरमध्ये गार पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. ज्याला तहान लागली आहे कोणीही यावे, पाणी घेऊन जावे. दुकानातून काहीही खरेदी करण्याची गरज नाही, किंवा किती बाटल्या घेतल्या याची विचारपूस नाही. तसेच एका महिलेने पाटी लावली, माझ्याकडे घरात एसी आहे. कोणालाही एसीची हवा घ्यायची असेल त्याने यावे आणि घरात बसावे अगदी तुमच्या पाळीव प्राण्यांसह. प्राण्यांना तर उन्हाळ्यात फारच गरम होत असते.

सांगायचा उद्देश हाच कि लोक एकमेकांची खूप काळजी घेतात. तुम्हाला तुमच्या संस्कृतीसह स्वीकारले आहे. हा देश बहू सांस्कृतिक देश म्हणून ओळखला जात आहे. इथे सर्व लोकांना समान वागणुक मिळावी आणि सर्वांनी एकमेकांना सन्मानाने वागवावे हा एकच मंत्र आहे. तो सर्व लोक कसोशीने पाळतात. अर्थात तुम्हाला गाव आणि शहर यात थोडा फार फरक सापडेल पण एकूण हा देश असाच आहे. कॅनडामध्ये राहणारे आणि हा लेख वाचणारे मराठी लोक याला नक्कीच सहमत होतील.

आता नेटिव्ह लोकांबद्दल जी काही माहिती आहे, त्यांची जी काही थोडीफार संस्कृती माहित आहे, त्यावर अभ्यास केला जात आहे. शाळांमधून ती शिकवली जाणार आहे. ज्यांना कोणाला ती शिकायची आहे, ती शिकू शकतात. सर्व विषय सर्वांसाठी उपलब्ध आहेत. ही फक्त पहिली पायरी आहे. अजून काय काय पुढे घडणार आहे तसे ते आपल्याला समजेलच.

अधिक माहिती:
अजून एका शाळेत ७५१ अन्मार्कड (अचिन्हन्कित) ग्रेव सापडल्या आहेत. याचा अर्थ मेलेल्याना तसेच पुरले आहे:
https://www.bbc.com/news/world-us-canada-57592243

"जीवन गुणवत्ता" या श्रेणीमध्ये कॅनडाचा पहिला क्रमांक आहे:
https://www.usnews.com/news/best-countries/quality-of-life-rankings

नेटिव्ह लोकांनी दिलेली जागेची नवे आणि त्याची माहितीचा नकाशा:
https://native-land.ca/

धन्यवाद.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

4 Jul 2021 - 3:30 pm | गुल्लू दादा

बरीच नवीन माहिती मिळाली . धन्यवाद.

गॉडजिला's picture

4 Jul 2021 - 3:52 pm | गॉडजिला

सांगायचा उद्देश हाच कि लोक एकमेकांची खूप काळजी घेतात. तुम्हाला तुमच्या संस्कृतीसह स्वीकारले आहे. हा देश बहू सांस्कृतिक देश म्हणून ओळखला जात आहे. इथे सर्व लोकांना समान वागणुक मिळावी आणि सर्वांनी एकमेकांना सन्मानाने वागवावे हा एकच मंत्र आहे. तो सर्व लोक कसोशीने पाळतात. अर्थात तुम्हाला गाव आणि शहर यात थोडा फार फरक सापडेल पण एकूण हा देश असाच आहे. कॅनडामध्ये राहणारे आणि हा लेख वाचणारे मराठी लोक याला नक्कीच सहमत होतील.

वाचून मस्त वाटले... भारतात हे होणे शक्य नाही

कॅनडाचे पॉप्युलर मिडियातले स्टीरियोटाईप म्हणजे स्वस्त वस्तू आणि सद्भावनेने मदत करणारे लोक.