धारूर, धर्मापुरी आणि अंबेजोगाई - २ (अंतिम)

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
2 May 2021 - 6:56 pm

अंबेजोगाई - धर्मापुरी रस्ता सिमेंटचा बनत असला तरी रस्त्याचे काम ब-यापैकी झालेले आहे. एका तासात आम्ही धर्मापुरीला पोहोचलो. किल्ला गावाच्या मध्यभागी, थोड्या उंचीवर आहे. खरंतर याला किल्ला न म्हणता गढीच म्हणणं योग्य ठरेल. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपैकी हा सगळ्यात छोटा किल्ला असावा.

प्रत्यक्ष किल्ला ब-या स्थितीत असला तरी किल्ल्याला लागून असलेला परिसर आणि किल्ल्यात शिरण्याच्या वाटेवर मात्र काटेरी झुडुपे उगवलेली आहेत. अस्वच्छता अर्थातच आहे. शिवाय काही गावकरी किल्ल्याचा वापर हागनदारी म्हणूनही करत असावेत. मुळच्या मोठ्या, पण आता दगडांनी बंदिस्त केल्यामुळे चोरवाटेइतक्याच राहिलेल्या एका दरवाज्यातून आम्ही आत शिरलो. गडाची संपूर्ण तटबंदी अजूनही शाबूत आहे. तटबंदीवर एक पायवाट दिसत होती, तेव्हा एका दगडी जिन्याने आम्ही वर चढलो आणि चालायला सुरुवात केली.



तटबंदीवरून किल्ल्याबाहेरच्या विटेच्या भट्ट्या दिसत होत्या.


किल्ल्याशेजारीच एक तळे आहे.


किल्ल्यावर एक पीर आहे.


किल्ल्याचा आकार सांगायचा झाला तर तो एखाद्या फुटबॉलच्या मैदानापेक्षाही छोटा असेल.


किल्ल्याचे प्रवेशद्वार


तटबंदी फिरून झाल्यावर आम्ही मगाशी वरून दिसलेली अष्टकोनी विहीर पहायला निघालो.
सुमारे २५ फूट रुंद आणि ४० फूट उंच अशी ही विहीर पूर्णपणे दगडात बांधलेली आहे.


विहिरीचे निरिक्षण करताना अचानक विहिरीच्या तळाशी एक झरोका दिसला. या झरोक्याचे प्रयोजन काय असावे याचा शोध घेताना पलीकडे विहिरीच्या तळापर्यंत पोहोचवणारा रस्ता दिसला.


सुमारे १०० पाय-या उतरून गेल्यावर आम्ही विहिरीच्या तळाशी पोचलो.


तळाशी उघडणा-या झरोक्याजवळ एका दगडात कोरलेले व्यालाचे शिल्प


हा आटोपशीर किल्ला आम्हाला आधीच आवडला होता, ही विहीर पाहून तब्ब्येत आणखी खुश झाली. मी म्हणेन महाराष्ट्र सोडा, जगात दुस-या कुठल्या किल्ल्यात एवढी सुंदर विहीर नसेल! फक्त ही विहीर पाहण्यासाठी एवढे लांब यावे इतकी ही विहीर आकर्षक आहे.
विहीर पाहून आम्ही निघालो. एका बाजूला दगडात बांधलेल्या काही खोल्या दिसल्या.


किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतिमध्ये काही कोरीव शिल्पे दिसतात. असं म्हणतात की धर्मापुरी गावात असलेली मंदिरं पाडून ते दगड या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले गेले.


किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार


किल्ल्याकडे जाणारा रस्ता


किल्ला पाहून होईपर्यंत दोन वाजून गेले होते. खरंतर जेवणाची वेळ झाली होती, पण आता फक्त मंदिरच राहिले आहे, ते पाहून घेऊ आणि नंतर आरामात जेवू असे ठरले. जवळच्याच एका घरातून पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो.
धर्मापुरी किल्ल्यापासून मंदिर फारसे लांब नाही. फरक एवढाच की किल्ला गावात आहे तर मंदिर गावाबाहेर.
सध्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. (खरंतर जीर्णोद्धारापेक्षा पुनर्निमाण शब्द जास्त योग्य ठरेल.) त्यामुळे येण्याआधी या मंदिराचे फोटो इंटरनेटवर पाहिलेल्या लोकांना इथे आल्यावर एक सुखद धक्का बसतो.
आधी:

नंतर:

आधी:

नंतर:

(दोन्ही आधी छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)
आम्ही गेलो तेव्हा मंदिर बांधून पूर्ण झाले होते आणि मंदिराच्या जोत्याभोवती फरशी बसवण्याचे काम चालू होते. मंदिराचे मुख्य आकर्षण (आणि माझ्या मते, ह्या मंदिराचं पुनर्निमाण होण्यामागचं मुख्य कारण) आहे त्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या अतिशय देखण्या मूर्त्या. अनेक हातांमध्ये विविध शस्त्रे घेतलेले आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत उभे असलेले, क्वचित असुराचा वध करताना दिसणारे नाना प्रकारचे देव, अनेक अलंकार ल्यालेल्या सुंदर स्त्रिया, पायात काटा गेल्याने सैरभैर झालेली देखणी युवती आणि तिच्या पायातला काटा काढणारा तिचा नोकर, पावा वाजवणारा युवक, आकर्षक केशरचना केलेली आणि मधाळ हास्यानं आपल्याला घायाळ करणारी कमनीय बांध्याची स्त्री, हातात आंब्याची डहाळी घेतलेली लावण्यवती आणि आंबा समजून तिच्या उरोजावर चोच मारणारा पोपट अशा अनेक एकाहून एक सरस मूर्त्या इथे आहेत. कदाचित कठीण दगडात बनवल्यामुळे असतील, पण बहुतांश मूर्त्या आजही सुस्थितीत आहेत.

ह्या खालील चित्राचे वर्णन करताना विकिपिडीया म्हणतो:
येथील एका पत्रलेखिकेचे शिल्प विलक्षण सुंदर आहे. हे चिरतारुण्ययाने मुसमुसलेले मोहक सौंदर्य पाठमोरे उभे आहे. या शिल्परचनेची कल्पना मोठी काव्यमय आहे. एक सौंदर्यसंपन्न अप्सरा पाठमोरी उभी राहून शिलालेख लिहीत आहे. अशा या मोहक शिल्परचनेच्या चार ओळी पूर्ण झाल्या असून पाचव्या ओळीवर हात थबकला आहे. हा क्षण येथील शिल्पीने आपल्या कलासामर्थ्याने गोठवून ठेवला आहे.


चावट पोपटः


ही सुंदर शिल्पकला सोडून जावेसे वाटत नव्हते, पण अजून जेवण व्हायचे होते आणि दूरचा पल्लाही गाठायचा होता, तेव्हा निघालो. वाटेत जेवणासाठी जागा शोधताना झाडांमध्ये लपलेले धर्मापुरीचे मरळसिद्धेश्वर मंदिर (https://www.youtube.com/watch?v=0ueQwXyhjE0) दिसले. हे छोटेसे मंदिरदेखील जुने, दगडी आणि सुंदर आहे. जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तेव्हा उन्हे परतीला लागली होती. आम्ही बार्शीत पोचलो तेव्हा सात वाजून गेले असावेत.
एखादी जुनी वास्तू पाहिली की ती वास्तू ऐन भरात होती त्या काळाची कल्पना करणं हा माझा आवडता छंद आहे. धर्मापुरीच्या बाबतीतही हे झालं. किती वर्षं लागली असतील हे मंदिर बांधायला? ७/८ वर्षं तरी सहज. मंदिर बांधणा-या शिल्पकारांनी तेव्हा इथंच मुक्काम ठोकला असेल - इथंच कुठेतरी बांधलेल्या कच्च्या झोपड्यांत ते राहिले असतील. त्यांची लहान मुलं मंदिराशेजारी खेळली असतील आणि त्यांच्या बायकांनी तिथेच बसून भाक-या रांधल्या असतील. आणि मंदिर पूर्ण झाल्यावर? त्याच्या उद्घाटनाचा सोहळा मंदिराइतकाच भव्य आणि डोळे दिपवणारा झाला असेल. हे मंदिर बांधणारा शिवभक्त राजा मग रोज सकाळी आपल्या घोड्यावर बसून इथं येत असेल आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरूवात करत असेल. आणि धर्मापुरी? कसे असेल हे धर्मापुरी गाव तेव्हा? विकीपिडिया म्हणतो की “चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. या राजाला साहित्याची आवड होती. त्याने 'अभिलषितार्थ चिंतामणी' (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. या धर्मापुरीत सर्व सोयी होत्या. भव्य राजप्रासाद, नृत्यशाळा, तलाव, मनोहारी उद्याने, सुंदर वनराई, उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती.” आज भारतातल्या मोठ्या शहरांचा जो दिमाख आहे, शान आहे, ती कदाचित धर्मापुरीनं तेव्हा अनुभवली असेल. आणि मी राहतो ते पुणं? पुनवडी तेव्हा कदाचित १५/२० झोपड्यांचं छोटंसं गाव असेल. १०० एक लोकसंख्या असलेलं. आज धर्मापुरी कुणाच्या खिजगणतीतही नाही - पण कोण जाणे, ते पुन्हा एकदा उभारी घेईल. राज्यं, माणसं यांबरोबरच शहरं आणि गावं यांचीही नशिबं सतत बदलत असतात. ते म्हणतात ना, Change is the only constant thing in life. कोण जाणे, अजून आठशे वर्षांनी कदाचित धर्मापुरी पुण्याच्या जागी असेल आणि पुणे धर्मापुरीच्या!

प्रतिक्रिया

एक_वात्रट's picture

2 May 2021 - 7:18 pm | एक_वात्रट

या मंदिराचा अगदी अलीकडचा व्हिडिओ इथे पहाता येईल.

खेडूत's picture

2 May 2021 - 7:21 pm | खेडूत

अतिशय सुंदर ओळख.
सर्व ठिकाणे आवडली. बरीच अपरिचित होती.
धन्यवाद!

सौंदाळा's picture

2 May 2021 - 7:43 pm | सौंदाळा

अप्रतिम
वल्ली आणि तुमचा लेख लागोपाठ वाचला, डोळे निवले.
वर्णन, फोटो आणि लिहिण्याची पद्धत सुंदर आहे.
पुलेशु

आजुबाजूच्या ठिकाणांचा तो अगदी सत्कारणी लागला हे सिद्ध झाले. धर्मापुरी पाहायलाच हवं. हळेबिडुची आठवण झाली.
विहिर भारीच.

कूणी तिर्थंकर वाटतोय. दोन हात पण डोक्यामागे चक्र दिसतंय.

प्रचेतस's picture

3 May 2021 - 3:28 pm | प्रचेतस

भैरव आहे तो, नग्न, सर्पाची मेखला वगैरे.

गोरगावलेकर's picture

3 May 2021 - 8:30 am | गोरगावलेकर

छान ओळख नवीन ठिकाणांची.
वर्णन आणि फोटो मस्तच.

Bhakti's picture

3 May 2021 - 10:08 am | Bhakti

छान ,
विहीर खरोखर सुंदर आहे.विहीरींच्या दगडांवरही शिल्प कोरलेली दगड वापरल्याने वेगळीच वाटते.

मराठी_माणूस's picture

3 May 2021 - 10:54 am | मराठी_माणूस

छान, आवडले

प्रचेतस's picture

3 May 2021 - 3:27 pm | प्रचेतस

लेखन खूपच आवडले.

तळाशी उघडणा-या झरोक्याजवळ एका दगडात कोरलेले व्यालाचे शिल्प

हे व्याल नसून किर्तीमुख आहे. व्याल हा पूर्ण रूपात असतो (पाय उंचावलेल्या स्थितीत) असतो. किर्तीमुख हे नेहमी मुखच असते.

मंदिर खूपच सुरेख, अष्टदिक्पाल, भैरव आणि जवळपास सर्वच प्रकारच्या सुरसुंदर्‍या येथे दिसत आहेत. चावट पोपट असलेली सुरसुंदरी म्हणजेच शुकसारिका. आलस्यसुंदरी पुत्रवल्लभा, अभिसारिका, पत्रलेखिका, मर्कट आणि सुंदरी, मुंगूस, नाग आणि सुंदरी आदी सर्वच येथील छायाचित्रांत दिसत आहेत. जायलाच हवे असे ठिकाण.

चौथा कोनाडा's picture

3 May 2021 - 5:31 pm | चौथा कोनाडा

हा भाग ही म्हंजे सुंदर वर्णन आणि अप्रतिम फोटोंची मेजवानी !
विहीर खरोखर सुंदर आहे. शिल्पकला आणि मंदिर पाहताना डोळे निवले.
💖
असाच जर जुन्या मंदिर / किल्यांचा उद्धार होत राहिला तर खरोखरच आपल्या संस्कृतीचे भले होईल.
शहरातील तकलादू सुशोभीकरणापेक्षा असे संवर्धन इन्क्रेडिबल इंडियाला पुढे नेत राहिल !

वात्रट साहेब, पुढील भटकंतीच्या प्रतिक्षेत !