श्री गणेश लेखमाला २०२३

1

सय...

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
25 Feb 2021 - 3:17 pm

पाहुणचार बरेचदा औपचारिकता,आपली संस्कृती आहे.पण आपल्याच माणसांकडे खेळीमेळीचा पाहुणचार न राहता ती होती आपुलकीची सय..मऊ,कोमल.
आत्याच्या गावी निवांत जायचे.. किती दिवस ...नाही वर्षांपासूनचा अपूर्ण राहिलेला बेत.जगाच्या गोल गोल रिंगा या चक्रात अडकल्यामुळे ,पुढल्या वेळी पुढल्या वेळी असच होत राहिलं.शेवटी मुहूर्त लाभला,आणि भराभरा आम्ही बेगा भरत एक रात्र मुक्कामाचा बेत ठरवत सुसाट घराबाहेर पडलो.चेहऱ्याला मुसक्या बांधत,गर्दीतून वाट काढत मोकळ्या रस्त्याला लागलो.
हळूहळू रस्त्यांच्या बाजूचे हिरवेगार शेत गहू ,ज्वारी,कांदा इत्यादी इत्यादी अजूनही “काळ्या मातीला पडलेल्या हिरव्या स्वप्नाच” रूपड आनंद देत होत आणि चेह्र्यावरल्या मुसक्या बाजूला सारून मोकळा श्वास आत खोल भरला.रस्त्यावरच्या प्रत्येक खुणा..जुनी घर,गावाच्या पाट्या भुतकाळात नेत होत्या.लहानपणीचा प्रवास,उन्हाळी सुट्टीतल्या भावंडासोबतच्या गमती ,शेतातली मौज सगळ सगळ डोळ्यासमोर तराळत होत.आठवणींची फुलपाखर तळहातावर बसली होती.आता जीपीस असल तरी वडीलधारी थांबत ह्याला त्याला पत्ता विचारणारच ...दर मजल करत एकदा ती पाण्याची टाकी दिसली ,जी पूर्ण भरल्यावर धबाधबा त्यातून वाहणाऱ्या पाण्याची आम्ही वाट पाहायचो त्याचाखाली मनसोक्त भिजायचो.शेवटी पोहचलो आत्याच्या घरी..घरात शिरल्या शिरल्या ...अहाहा..तो लोणी कढावल्या नंतरचा तुपाचा मंद दरवळ घरभर पसरला होता...तेव्हाच डायट देवताला मनोमन दोन दिवसांसाठी माफी मागितली आणि तिचे कपालं बंद ठेवले.
आत्याचा माहेरची माणस पाहून आनंद चेहऱ्याहून ओसांडत होता.स्वयंपाक घरात डोकावलं तर बासुंदी ,बटाट्याची भाजी,स्पेशल फोडणीचे वरण ..चंगळच सारी.आपल्या लोकांच्या घरी गेल्यावर बाईने अन्नपूर्णेचे रूप धारण करावे या संस्कारानुसार आम्हीही पोळ्या ,कोशिंबिरी, पान वाढण हा थोडा कार्यभार लावला.बासुंदी ...अग बाई मी तर तुटूनच पडले..मग काय लागलीच पेंगले..आत्या म्हणाली जायफळ चांगलीच मानवली .ज्या खोलीत आराम तिथे तर नुकत्याच झालेल्या गुऱ्हाळाच्या गुळाच्या ढेपिंचा आणि काकवीचा गोड गोड सुवास होता....जिंदगी ‘गूढ’ गूड समजके जी ले...उगा कविता सुचू लागली...पण गोड झोपेने घात केला.:)
संध्याकाळी लगबगीने शेतात जाण्याची आतुरतेने झपाझप पावले चालत होती.पहिल्यांदा मंगळवार होता तेव्हा शेतातच बांधलेल्या भव्य मंदिरात सुरेख अशा तुळजापूर देवीची ओटी भरत दर्शन घेतलं.गुऱ्हाळच सगळ तंत्र,मशीन यांची मामांनी मनापासून समजून सांगितली.पूर्वी आम्ही अनुभवलेलं गुऱ्हाळ आठवलं...समोरच्या भव्य कढईत उसाचे चिकटे ताज्या ताज्या गुळात बुडवून लोलीपोप खाणारी लहानपणीची मी डोळ्यासमोर उभी राहिली.आता आतेभावाने यात अनेक प्रकारे केलेले स्तुत्य बदल पाहून अभिमान वाटला.
मग शेतात फेरफटका मारायला गेलो...कसलेल्या काळ्या ढेकळात चालतांना पायालाच स्पंदने फुटू लागले होते...तर आमचा ५ वर्षीय छोटा धमाका “आई माझ्या बुटात माती जातेय ...कडेवर घे ना” असे म्हणू लागली तेव्हा हि जणू लंडनला जन्मली असा हास्यकल्लोळ झाला.चिकूच्या बागेत फिरताना फोटोसेशन झाले.लिंबू,उस ,लसून,कांदे बागायती शेती पाहून मन समाधानी झाले तोच काळ्या पडलेल्या ज्वारी दिसल्या ..नुकत्याच आलेल्या पावसाने केलेले हे नुकसान हातातोंडाशी आलेला घास काढलेला....शेतीत असे आता हे नेहमीचच झालय...तरीही तो राजा पुन्हा उभा राहतो.
घरी आलो रम्य दिवसाच्या आठवणी उशाशी घेत होते आणि तोच जवळच असलेल्या मंदिरात पखवाज मृदंगाचा नादस्वर घुमू लागला होता .भजन ऐकता ऐकता कधी डोळा लागला समजलेच नाही.
दुसऱ्या दिवशी झुंजूमुंजेला दार उघडताच समोर सुर्यनारायणाचे पहिले दर्शन घेतले,तर दुरूनच दिसणाऱ्या तळ्याच्या पाण्यात प्रसन्न सूर्याचे तांबूस प्रकाशरंग विखुरलेले होते...आणि पुन्हा स्वत:च्या आळशीपणाचा राग आला...लवकर उठून तळ्यापाशी जायला हवे होते....पुढच्या वेळी...
नुकत्याच आमच्या कुटुंबात विदर्भकन्येने आगमन केले आहे तेव्हा झणझणीत जळगावी भरीत आणि आत्याच्या स्पेशल पाकपुर्यांची फर्माईश झाली.आज ताज्या ताज्या ताकाच्या वाटीच वाटी रचावल्या होत्या. पोटाची व्यवस्था लावत तळ्याकडे धाव घेतली..आमचा छोटा धमाका अशा पाण्याच्या ठिकाणी फार सांभाळाव लागतं .....रडारड करत बाहेर काढव लागतं....तिला घरी यायचाच नसतजलपरी..
आता पुन्हा परतायची वेळ झाली होती.पाय निघताच नव्हता...मन रेंगाळू लागल ...मोकळी हवा,निवांत क्षण मुक्त अनुभवून जड आसवांनी पुन्हा निघालो ...निरोपाचे हात हलतच राहिले.
-भक्ती

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

खेडूत's picture

25 Feb 2021 - 6:01 pm | खेडूत

छान.
गावाकडे गेल्यावर परत यायला मन तयार होत नाही!
लहान गावाचे केलेले वर्णन आवडले. तिथले वातावरण, निसर्गाचे थोडे फोटो असते तर अजून आवडले असते.

Bhakti's picture

25 Feb 2021 - 9:29 pm | Bhakti

हो ना..
एक लिहायचं राहिलं.मामांनी बिबट्या वगैरे प्राण्यांना घाबरवण्यासाठी घरी देशी तोफ बनविली.त्या तोफेचा बार ऐकून आमचा छोटा धमाका अजून आश्चर्य चकित झाला.
ती तोफ कशी बनवायची याची एक तूनळी.
https://youtu.be/Rh3XTpxCUc8

तुषार काळभोर's picture

25 Feb 2021 - 10:29 pm | तुषार काळभोर

पहिल्यांदा कुणीतरी ' आत्या" या नात्याविषयी लिहिल्याचे वाचतोय.

Bhakti's picture

25 Feb 2021 - 10:48 pm | Bhakti

:)

सिरुसेरि's picture

25 Feb 2021 - 11:41 pm | सिरुसेरि

मस्त लेखन . +१

गणेशा's picture

26 Feb 2021 - 9:08 am | गणेशा

एकदम भारी लिहिले आहे..

आवडले खूप

सर्वांचे आभार ...अजूनही काही गमती लिहायच्या राहिल्या ...आता एक एक आठवतंय
तळ्यावर पाण्यात आम्ही छोट्या धमाक्याला वेगवेगळे आवाज दाखवण्यासाठी सगळ्यांनी दगडे मारून दाखवले....पण तो ४-५ टप्प्यात दगड मारण्याची कला फक्त वय वर्षे ६२ या मनाने तरुणांनाच जमली 