गावाच्या गोष्टी : वडिलांचे प्रेम

साहना's picture
साहना in काथ्याकूट
25 Feb 2021 - 1:04 pm
गाभा: 

साने गुरुजी हे शाळेंत कंपलसरी वाचन होते. साने गुरुजी कथामाला नावाचा जो प्रकार होता त्याची मला विलक्षण धास्ती होती. शिक्षक मंडळी धाक दाखवून साने गुरुजींचे "संस्कार क्षम" असे साहित्य पाठ करून घ्यायचे आणि स्टेजवर पाठवून सर्वाना मग "कथा" सांगायला लावायचे. हे मला सर्व बेगडी वाटायचे. ज्या मुलांचा जीव अलिफ लैला आणि चंद्रकांता मध्ये गुंतला आहे त्यांना श्यामची आई कशी बरे भावणार ? आणि घोकून घेतलेली कथा कृत्रिम हावभाव करत सांगण्यात कसले आहे कथाकथन ? "सहाने, आवाजांत थोडी कातरता आण, उजवा हात असा वर करून स्पष्ट उच्चारांत आईचे शब्द म्हण" अश्या सूचना देशपांडे मास्तर करायचे. शाळेंत एक दोनच पुस्तके होती, त्यामुळे पहिल्यांदा ती कथा कागदावर लिहायची, मास्तर मग लाल शाईने कुठे पोज घ्यायचे, कुठे आवाज वाढवायचा इत्यादी मार्क करायचे. मग ती घोकायची. घोकून मग ती सतेज वर ओकायाची. मी हुशार विद्यार्थ्यांपैकी असल्याने माझ्यावर जी जबादारी शिक्षक ढकलायचे पण मी आज पर्यंत बक्षीस सोडाच पण कथा स्टेजवर जाऊन पूर्ण सुद्धा करू शकले नाही. "हिला कथाकथन जमत नाही" शिक्षकांनी मग असे म्हणून हात टेकले.

मला साने गुरुजींचे लेखन अजिबात आवडले नाही. श्यामची आई पुस्तकाचा मला विशेष तिटकारा होता. त्यांत ह्या कथाकथनाच्या टॉर्चर चा हात असावा पण मला श्याम हे पात्र आवडले नाही. हि पांडुरंग सदाशिव साने ह्यांची वैयक्तिक टीका असे समजू नका पण श्याम हे पात्र बावळट आणि बहुतेक कथा ह्या ओढून ताणून स्वप्नाळू वृत्तीने लिहिल्या आहेत असे वाटायचे. साने गुरुजींचा अंत शोकपूर्ण होता. पण शोक ह्या विषयावर साने गुरुजींचे प्रभुत्व निर्विवाद होते. श्यामची आईचा देहांत त्यांनी अत्यंत चांगला मांडला आहे. आपण पोरके झालो हि त्यांची भावना पुस्तकांतून बाहेर उडी मारून आपल्याशी बोलते. मातृशोकाचे दुःखच कुठल्याही लहान मुलाच्या भाग्याला येऊ नये आणि हि ट्रॅजेडी लहान मुलांना "संस्कारक्षम" म्हणून वाचायला देणे सुद्धा मला चुकीचे वाटते. "ती गेली तेंव्हा रिम जिम पाऊस निनादात होता ... " ह्या ओली मी पहिल्यांदा ऐकल्या तेंव्हा मला ते प्रेमगीत वाटले पण "ती आई होती म्हणुनी ... " ह्या ओळी आल्या तेंव्हा अचानक काळजांत वर खाली झाले. शयामची आई पुस्तकाचे शेवटचे दोन अंक वाचताना अगदी तसेच होते.

साने गुरुजींच्या सर्व लेखनातून जर दोन उत्कृष्ट बिंदू मला निवडायचे झाले तर त्यांचे वडील शाळेंत खरवस घेऊन येतात हि कथा आणि यांचे "दुःखी" हे पुस्तक मला निवडावे लागेल. दुःखी मला प्रचंड आवडली होती, नंतर समजले कि ले मिसेरेबल्स ह्या फ्रेंच सुप्रसिद्ध पुस्तकाचा तो अनुवाद आहे. पण आज गावाची कथा आहे ती श्यामच्या आई पुस्तकांतील खरवस ची जी कथा आहे त्याच्यासही साधर्म्य बाळगणारी आहे.

मी मराठी शाळेंत जायचे. पण घराला जवळ होती एक मिशनरी इंग्रजी शाळा. इथे पटसंख्या कमी असली तरी शिक्षण चांगले होते. गावांत ख्रिस्ती मंडळी कमी होती आणि बहुतेक मुले हिंदूच होती. इथली शिस्त वगैरे फार छान असायची आणि मुलांना इंग्रजी येत असे. मराठी शाळा माझ्यासारख्या उनाडांची होती. इथे शिस्त कमी पण ज्ञानार्जन भरपूर होत असे आणि व्यवस्थापन आणि आमचा परिवार ह्यांचा संबंध असल्याने मला इथेच जाणे भाग होते. साधारण दोन किलोमीटर चालून शाळेंत जायचे तर वाटेवर हि इंग्रजी शाळा लागायची. आमचा संपूर्ण परिवार एक होनोरारी शिक्षक परिवार होता. आई वडील, आजी सर्वानाच शिक्षणाचे भारी प्रेम. गांवांत कुठल्याही लहान मुलाने शाळा सोडू नये ह्यावर ह्यांचा भर असायचा. शाळा सोडलेल्या मुलांना घरी बोलवून त्यांच्या वैयक्तिक अभ्यास घेऊन त्यांना पास करण्याचे पुण्य माझ्या आई वडिलांनी अनेकदा केले आहे. त्याशिवाय कुठल्या शाळेंत कुठली मुले हुशार आहेत हे त्यांना ठाऊक असायचेच.

तर ह्या इंग्रजी शाळेंत एक मुलगी शिकत होती. नाव आता आठवत नाही. पण माझ्या पेक्षा ती साधारण ४ वर्षांनी मोठी होती. मी चालत शाळेंत जायचे तेंव्हा वाटेवर ती सुद्धा भेटायची. बहुतेक वेळा तिचे वडील तिला आपल्या सायकल वरून सोडत त्यामुळे आमचे बोलणे वगैरे कमीच होते. इंग्रजी शाळेच्या बाहेर एक दोन गाडे होते जिथे काही मंडळी लहान मुलांना खाऊ, पेन, पेन्सिल वगैरे विकत असत. सकाळच्या वेळी पालक आणि मुलांची गर्दी जमलेली असायची. आणि पालक मंडळी मग आपल्या पाल्याना पेन्सिल घेऊन दे, चॉकलेट घेऊन दे किंवा आणखीन काही हट्ट पुरवत असायची किंवा दमदाटी करून काहीही मिळणार नाही म्हणून आंत पाठवण्यात गुंग असायची.

तर ह्या मुलीला आणि तिच्या वडिलांना मी नेहमीच तिथे गेटवर पाहत असे. ह्यांचा व्यवसाय होता टायर पंचर वाल्याचा. त्यामुळे परिस्थिती बेताचीच. तरी सुद्धा हिला गेट वर सोडून ते नेहमी, "काही पाहिजे का ? पेन पेन्सिल वगैरे ? खाऊ ? " असे दररोज विचारत. ती नेहमीच थोडी ओशाळून "नको बाबा तुंम्ही जा" म्हणून घाई घाईने शाळेंत धूम ठोकत असे. हिचे वडील मग तिथे असलेल्या सर्व पालकांना स्मितहास्य देऊन रामराम करूनच पुढे आपल्या कामाला जात. दररोज शाळेंत जाताना "मी चालत जाते ना बाबा." हा हिचा हट्ट पण वडील ऐकायचे नाहीत. तिला सायकल वर बसवूनच जात.

आता मूळ मुद्दा सांगते. हिचे वडील बुटके होते. म्हणजे अगदीच ३ फूट वाले नसले तर बुटकेपणाची लक्षणे त्यांच्यात होती. आपल्या मुलीपेक्षा ते थोडे छोटेच असावेत. त्यांची सायकल सुद्धा म्हणून थोडी छोटी होती. ते स्वतः निरक्षर होते. पण आपली मुलगी चांगल्या शाळेंत जाते, इंग्रजी शिकते ह्याचा त्यांना प्रचंड अभिमान. ती चांगले मार्क सुद्धा आणायची. मोठया मोठ्यांच्या मुलांना अभ्यासांत मागे टाकायची. त्याशिवाय सुदैवाने ती बुटकी नाही झाली ह्याचा सुद्धा त्याना खूप अभिमान. आपली कन्या त्यांच्या साठी बेज ऑफ होनर होती. त्यामुळे हि आपली कन्या आहे ह्या अभिमानाने तीला ते शाळेंत घेऊन जायचे आणि सर्वांशी ओळख सुद्धा करून द्यायचे.

मी आपली दुरून हा सर्व प्रकार न्याहाळत असे. त्यांचा अभिमान मला दिसायचा. पण त्याच वेळी त्यांच्या कन्येची भावना उलट होती. तिला वडिलांची लाज वाटायची. म्हणजे त्यांची वडील म्हणून लाज वाटत नसली तरी कदाचित इतर विद्यार्थी आपली थट्टा करतील वगैरे म्हणून ती त्यांना टाळायची. आपली कन्या आपल्याला का टाळते आहे, शाळेच्या गेटवरून लवकर का आंत पळते हे सर्व वडिलांना समाजायचेच नाही. मला हे समजायचे. मी तिला इथे जज करत नाही. त्या वयांत असले गंड हे स्वाभाविक असतात. श्यामचे वडील खरवस घेऊन येतात तेंव्हा श्यामला सुद्धा थोडे अवघडल्यासारखे होते पण वडिलांच्या प्रेमाला कुठे सीमा असते ?

मग माझ्या मनात कधी कधी विचार यायचा. हिच्या वडिलांना तिच्या भावना समजल्या तर त्यांना दुःख होईल का ? त्यांचा हार्ट ब्रेक होईल का ? पण नंतर हा सुद्धा विचार यायचा कि एक दिवस ती मोठी होईल, परिपक्वता येईल आणि वडिलांचे ते निर्भेळ इनोसंट प्रेम तिला तिच्या खाजगी क्षणात आठवेल, त्यांची आठवण येईल आणि तिच्या मनात जे गिल्ट येईल तिला ती कशी बरी सामोरे जाईल ?

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Feb 2021 - 1:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्या मुलीच्या मनात काय चालले असेल ते अचूक टिपले आहे.


साने गुरुजींच्या सर्व लेखनातून जर दोन उत्कृष्ट बिंदू मला निवडायचे झाले तर त्यांचे वडील शाळेंत खरवस घेऊन येतात हि कथा आणि यांचे "दुःखी" हे पुस्तक मला निवडावे लागेल.

त्यांचे अजून एक भारी पुस्तक म्हणजे "पश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी" विल ड्युरंट यांच्या Story of Philosophy या पुस्तकाचा हा अनुवाद आहे.

पैजारबुवा,

कंजूस's picture

25 Feb 2021 - 2:02 pm | कंजूस

ते उत्तम झाले आहे. शाळेत वाचवले नाही ते पुस्तक. ते आता वाणले. कथारूप समाजचित्रण.

Bhakti's picture

25 Feb 2021 - 3:10 pm | Bhakti

सुंदर लिहिलंय.

तुषार काळभोर's picture

25 Feb 2021 - 5:53 pm | तुषार काळभोर

या पुस्तकाबद्दल माझी मते बर्‍यापैकी अशीच आहेत!

बहुत साल पहले, मिपावर एक काथ्याकूट झाला होता या विषयावर/पुस्तकावर -

साहना's picture

26 Feb 2021 - 6:27 am | साहना

श्यामची आई पुस्तक मराठी साहित्यासाठी मैलाचा दगड आहे. साने गुरुजींची लेखणी सुद्धा सिद्धहस्थ आहे. पण त्याच वेळी पुस्तकांत नैराश्यचा सूर आहे, दुबळेपणा आणि आगतिकपणा आहे. भविष्याकडे आत्मविश्वासाने आणि सकारात्मक पद्धतीने पाहणाऱ्याचे लेखन नाही. कदाचित कोकणातील तो कालावधी तसा असेलही आणि साने गुरुजींचा आपला अनुभव म्हणून मला त्याचा आदर सुद्धा आहे पण लहान मुलाना हे पुस्तक देणे म्हणजे माझ्या मते चुकीची गोष्ट आहे. त्यांतून संस्कार बिन्स्कार काही होत नसून विनाकारण त्या नैराश्याला सामोरे जावे लागते. माझ्या मते हे पुस्तक लहान मुलाना देऊच नये.

त्या काथ्याकुटाचे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.

पाथेर पांचाली माझी आवडती ट्रिलॉजी आणि इंग्रजी पुस्तके वाचली सुद्धा आहेत. अपू जेंव्हा शहरातून आईला भेटण्यासाठी येतो तेंव्हा तो मोठा झालाय पण आईचे प्रेम तसेच आहे. त्याचा स्वभाव तुटक असला तरी आई मात्र अत्यंत आनंदित आहे. तो जसा वागतो ते पाहून काळीज अक्षरशः तुटते.

पिनाक's picture

25 Feb 2021 - 10:09 pm | पिनाक

अतिशय छान लेखन. प्रत्येक लेखनाला हिमालयासारखे उत्तुंग विषयच लागतात असं नाही, तर अगदी छोट्या प्रसंगबद्दल ही लिहून लेखन फुलवता येते हे तुमचे लिखाण वाचले की जाणवते.

बाकी सानेगुरुजी या व्यक्तीबद्दल आदर होता/आहे पण त्यांची काही समाजवादी मते अतीकनवाळू या सदरात येतात हे अलीकडेच ऐकले. असो. माझ्या घरी ते पुस्तक विकत घेऊन पडून आहे. अलीकडच्या पिढीला वाचायला लावणे हे महा कर्मकठीण काम आहे.

सिरुसेरि's picture

25 Feb 2021 - 11:40 pm | सिरुसेरि

छान आठवणी . खरवस घेउन आलेल्या वडीलांमुळे अवघडलेपणा येणे अशा प्रसंगाचे लेखातील आठवणींशी असलेले साधर्म्य सुरेख मांडले आहे . साने गुरुजी / शामचे विचार , जीवन आणी शामच्या आईची शिकवण हे त्या काळाशी सुसंगत होते . म्हणुनच आचार्य अत्रे यांना "शामची आई" हि चित्रपट निर्मिती कराविशी वाटली .

कानडाऊ योगेशु's picture

26 Feb 2021 - 8:01 pm | कानडाऊ योगेशु

जी.एंची पण अशी कल्पना असलेली कथा आहे. काहीतरी कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरी लागलेल्या मुलाचे वडील त्या ऑफिससमोरच भजे वगैरे विकत असतात.मुलगा मोठा होतो व कुठलीशी परिक्षा पास होऊन त्याच ऑफिसात नोकरीला लागतो. तर हा बाप त्याच्या मुलाच्या साहेबाला इम्प्रेस करायच्या हेतुने कळकट अवतारात ताजी तळलेली भजी घेऊन येतो असा काहिसा प्रसंग होता त्यात.

शाळेत असताना झाडू वाल्या आईचा एक धडा होता , ( 3 री ) मी अभिमानाने सांगेन माझी आई झाडूवाली आहे , असा काही तरी , तेव्हा बाळासाहेब सरांनी तो धडा आई वडिलांची लाज , आणि त्या वयात येणारा न्यूनगंड ह्याला धरून असा छान समजावून सांगितला , कि बास ,
कॉलेज मध्ये सुद्धा पालक मेळावा किंवा इतर कारणासाठी आलेल्या फाटलेल्या कपड्यामध्ये आणि तुटलेल्या चप्पल मध्ये आलेले वडील मी अभिमानाने घेऊन मिरवत असे , कॅन्टीन ला चहा वैगेरे , हसत खेळत चहा पिताना इतरांची जळताना पाहून मनाला खूप आनंद व्हायचा ,
शिक्षकांना घातलेला नमस्कार आणि त्यांच्या डोळ्यातील चमक पाहून शिक्षकांच्या डोळ्यातही चमक पाहायला मिळायची , आणि वर्षभर आपल्याबद्दल शिक्षक सुद्धा प्रेमाने असायचे.