घर..
माझे वडील डॉक्टर होते. सरकारी नोकरी होती. त्यांच्या दर दोन,तीन वर्षांनी बदल्या होत. प्रत्येक गावात राहायला सरकारी क्वार्टर्स असत. त्यामुळं वेगवेगळ्या खूप घरांतून राहायचा मला अनुभव मिळाला. घरे मोठी,ऐसपैस. वडील रिटायर झाले. तेव्हा मी पाचवीत होते. मी माझ्या आईवडिलांना उशीरा झालेली मुलगी आहे. माझ्या भावंडांच्यात आणि माझ्यात वयाचं खूपच अंतर आहे.
वडील रिटायर झाल्यावर आम्ही भाड्याच्या घरातही राहिलो. मग लगेचच आम्ही थोडंसं गावाबाहेर स्वतःचं घर बांधलं. ते घर चौदा हजारांत बांधून झालं. त्यावेळी मी सहावीत शिकत होते. त्या घरात आम्ही राहायला आलो. घराला तीन मोठ्या, दोन लहान खोल्या आणि एक स्वयंपाकघर होते.
बाहेर बाग करायला जागा होती. माझी आई खूप हौशी होती. तिनं आणि आम्ही सगळ्यांनी खूप श्रम करून घराभोवती बाग केली. त्या बागेत गुलाब,जाई,जुई,मोगरा,शेवंती,अबोली,जास्वंद अशी खूप फुलझाडं आणि पेरु, सीताफळ, आवळा,आंबा अशी खूप फळझाडं होती. मी हौसैनं बागेला पाणी घालायची. पाण्यात खेळायची. पाणी पडलं की अबोलीच्या बिया फुटायच्या त्याचा चुट्,चुट् असा आवाज यायचा. तो ऐकायला मजा वाटायची. त्या बिया जमिनीवर पडायच्या आणि अबोलीची असंख्य रोपं यायची.अबोलीचे, कोरांटीचे गजरे घालून रोज मी शाळेत जायची.
बागेत कढीलिंबाची दोन झाडं होती. त्याचा कढीलिंब आम्ही एका भाजीवाल्याला विकायचो. त्याचे पैसे यायचे.
वडील रिटायर झाल्यावर त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरु केली. त्यांच्या दवाखान्यात गरीब पेशंटस् येत. कुणी पैसे द्यायचं,कुणी नाही द्यायचं. पैसे दिले नाहीत तरी वडील गरिबांवर उपचार करीत. त्या काळच्या पद्धतीनुसार माझी आई आठवी, नववी शिकली होती. पण तिचं वाचन खूपच होतं. रोजचा पेपर ती नीट वाचे. बातम्यांवर चर्चा करे. तीही घराला मदत म्हणून पैसे मिळवायची. घरात कोंबड्या होत्या. कोंबड्यांची अंडी विकून आईला पैसे मिळत. ती शिवणकाम करी. त्याचे पैसे मिळत. घरात बालकमंदिर होते. त्या मुलांचे फीचे पैसे मिळत. आई काॅलेजच्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे द्यायची. त्याचे पैसे मिळत. आईनं कुठलंच काम हलकं मानलं नाही. तिला जन्मभर इतक्या कष्टांची सवय नव्हती. पण तिनं ते आनंदाने केले आणि वडिलांना आर्थिक मदत केली. आमच्यावर ह्या सगळ्याचे उत्तम संस्कार झाले ,जे आयुष्यभर उपयोगी पडले.
घरात पोपट होता. मांजर होतं आणि कुत्राही होता. आम्ही शेळीच्या दुधाचा चहा प्यायचो.
मोठा भाऊ डाॅक्टर होता. त्याचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगी होती. तोही मुंबईहून पैसे पाठवायचा. माझी ताई शिकवण्या करायची. आम्ही सगळ्यांनी मिळून ते घर तोलून धरले. उपासमार मुळीच झाली नाही, पण चैनही करायला मिळाली नाही. पाणी ,वीज सगळंच काटकसरीने वापरायचं. आजही मला पाणी वाया गेलं,दिवे उगीच जळले तर सहन होत नाही.
पण त्या घरात आम्ही सुखी होतो. आम्ही भावंडं जे मिळेल ते वाटून खायचो. खेळायचो, हसायचो. आई गरम गरम भाकऱ्या करुन वाढायची. भाकरीबरोबर खायला गरम आमटी असायची. गोडधोड सणावाराला व्हायचं. पण आमच्या तोंडातच अमृत होतं. जे पानात पडेल ते आम्ही आनंदाने, मजेने खायचो.
मी पौगंडावस्थेत होते. मनात जगाबद्दल खूप कुतूहल होतं. खूप शिकायचं होतं. घरातलं वातावरण शिक्षणाला अनुकूल होतं. मी मॅट्रीकला होते तेव्हा वडील मला अभ्यासासाठी उठवायचे आणि मला गरम गरम चहा करून द्यायचे. आईनंच मला गोष्टी सांगितल्या. वाचायला पुस्तकं उपलब्ध करून दिली. वाचनाची गोडी लावली. निबंध लिहायला शिकवले. ती कविता करायची. मी सहावीत शिकत असताना तिच्या मदतीने मी एक कविता केली. माझ्या त्याच घरावर. ती मला आजही आठवते.
"आहे माझे घर कसे
इवले इवले छान।
आहे येथे राघू मैना
रंभा(मांजरी) आणि टिपूनाना
गाय आणिक शेळी खाशी
पद्मा,श्यामा नावे त्यांची
गोजिरवाणे बालक धावे
दुडूदुडू सान।
ह्या घरात मी खूप वर्षं राहिले. सहावी ते बी.ए.! पुढे शिकायला पुण्याला गेले आणि..... वो किस्सा फिर कभी!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त आजी!
पाण्यात टाकल्यावर फुटणा-या
तुमचे बालपण मस्तच गेले
का हो मुविशेठ?
शिक्षण डोंबोली
किती मस्त
रम्य ते बालपण
चौदा हजारात
सुखाचे दिवस.
घराच्या आठवणी आवडल्या . +१
मस्त...
छान लेख आणि आठवणी,
धन्यवाद.