तळ कोंकण २०१८ : भाग 2

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
31 Dec 2020 - 12:27 am

तळ कोंकण : भाग १

गोव्याच्या हरमळ (अरंबोल) किनाऱ्याहून निघून तासाभरात (२७ किमी) वेंगुर्ल्याच्या सागर किनारी असलेल्या श्री सागरेश्वर मंदिरात पोहचलो.
उभादांडा येथील या मंदिराला चहुबाजूने तटबंदी आहे. प्रवेशद्वारापाशी चौकोनी दीपमाळ असून मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत स्वयंभू शिवलिंग आहे. दर्शन घेऊन समुद्र किनारी आलो. खूप सुंदर असा लांबलचक किनारा आहे. शिरोडा बीचप्रमाणेच येथील वाळूही सोनेरी दिसत होती व किनाऱ्यावर दाट सुरूचे बनही आहे.

उजवीकडील टेकडीवर शासकीय विश्रामगृह व दीपगृह आहे. दोन्ही ठिकाणाहून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय रमणीय दर्शन होते.

दुपार टळत आली होती आणि आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायचे असल्याने आम्ही हे न बघताच पुढे निघालो.आज आमचा मुक्काम होता वेंगुर्ल्यापासून २०-२२ किमीवरील खवणे बीचला. वेंगुर्ला -मालवण सागरी महामार्गाने साधारण २० किमीवर म्हापण येथे डावीकडे वळल्यावर खवणे बीचकडे जाणारा रस्ता आहे. या वळणापासून १५-२० मिनिटात आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. दोनच रूम असलेले हे हॉटेल निवांतपणा अनुभवण्यासाठी मस्त ठिकाण. हॉटेलच्या खोल्या म्हणजे दोन सुंदर लाकडी कॉटेज, व्हरांडा , त्यापुढे छोटीशी बाग. लाकडी कुंपणाच्या बाहेर पाय टाकला म्हणजे आपण सरळ बीचवरच. कॉटेजला समोरून संपूर्ण काच असल्याने नुसता पडदा बाजूला सारला की बेडवर बसल्या बसल्याच सागर दर्शन होते.

संध्याकाळ झाली होती. पटकन ताजेतवाने होऊन बीचवर फेरफटका मारण्यास निघालो. फेसाळत्या लाटा, मुलायम वाळू, स्वच्छ किनारा व बाजूला हिरवेगार डोंगर असा मस्त अनुभव.
समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्या वरील वाळूत तयार झालेले माशाच्या आकाराचे सुंदर नक्षीकाम.

लांबवर फिरून येऊन हॉटेलच्या समोरच्या बीचवर बसलो. सूर्य अस्ताला जात होता त्यामुळे आकाशात क्षणा क्षणाला विविध रंगांची उधळण बघायला मिळत होती.

स्थानिक मच्छिमार सोडले तर बीचवर दूर दूरपर्यंत आमच्या चौघांशिवाय कोणीही नव्हतं. सूर्य अस्ताला गेला तरी उठावेसे वाटत नव्हते. शेवटी अंधार पडायला लागल्यावर रूमवर आलो. भूक चांगलीच लागली होती. फिरायला जायच्या आधीच जेवणाची ऑर्डर दिलेली होती त्यामुळे जास्त वेळ न जाता पटकन जेवण मिळाले. शाकाहार/मत्स्याहार दोन्हीही प्रकारच्या जेवणाची चव अप्रतिम होती . जेवणानंतर बाहेरच हिरवळीवर खुर्च्या टाकून गप्पा मारत बसलो. हॉटेल मॅनेजरने गाणे ऐकण्यासाठी म्युझिक सिस्टीम लावून दिली होती पण त्याऐवजी आम्ही शांत वातावरणात लाटांचा आवाज ऐकत गप्पा मारणेच पसंत केले.

दिवस तिसरा
आज सकाळी लवकर उठून किनाऱ्यावर भटकंतीला बाहेर पडलो. काही कोळी लोक त्यांच्या कामात व्यस्त होते. थोड्या अंतरावर समुद्राचे नदीत शिरलेले पाणी (बॅक वॉटर)आणि त्याच्या दोन्ही तिरांवरील नारळीच्या बागा, तिवरे यांचे विलोभनीय दृष्य बघावयास मिळाले.

हॉटेलवर परत येऊन नाश्ता केला. येथील घावण तर खूपच मस्त होते चवीला.
खवणे बीच हे आमच्या सहलीतील सगळ्यात शांत, निसर्गरम्य ठिकाण.

आवराआवर केली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. सुरुवात २० किमीवरील भोगवे बीच पाहून करावयाची होती. वाटेत 'पाट' चा माऊली तलाव लागला. येथे नोव्हेंबर ते एप्रिल या काळात खूप स्थलांतरित पक्षी दिसतात. तसेच या तलावात असंख्य कमळ फुललेली दिसतात त्यामुळे याला 'लोटस' तलाव असेही म्हटले जाते.

थोड्याच वेळात भोगवे बीचला पोहचलो. हा सुद्धा अगदी कमी गर्दीचा सुंदर, स्वच्छ असा किनारा. त्यातच आम्ही शनिवार रविवार सोडून सहलीला आलेलो. त्यामुळे आम्हाला अगदी शांत आणि निर्जन किनारा पाहावयास मिळाला. भोगवे येथे कर्ली नदी समुद्राला मिळते. पांढरी स्वछ वाळूची चौपाटी , लांबचा लांब किनारा व किनाऱ्याने माडांच्या बागा हे या बीचचे वैशिष्ठ. कालची संध्याकाळ आणि आजची सकाळ किनाऱ्यावरच घालवली असली तरी परत इथे भिजण्याची इच्छा आवरता आली नाही.

येथून जवळच निवतीचा किल्ला व किनारा आहे. पण भोगावे किनाऱ्याने गाडी येथे जात नाही. थोडेसे मागे आल्यावर एक फाटा आहे तेथून निवतीला पोहचलो.

गावातील एका कोंकणी घराच्या पडवीत पहुडलेल्या या गोंडस मांजरी

गावात विचारणा केल्यावर किल्ल्याची वाट मिळाली. गावच्या शेवटच्या बस थांब्यापासून ५-१० मिनीचांच्या चढतीवर किल्ला आहे. आमच्या गाडीनेच तेथपर्यंत पोहचता आले.शिवाजी महाराजांनी निवतीचा किल्ला बांधला. मालवणजवळ असलेली कर्ली खाडी ते वेंगुर्ला ह्या सागरी भागावर निवतीच्या किल्ल्यातून लक्ष ठेवता येते. किल्ल्याच्या बाजूने खंदक आहे. सध्या किल्ल्याची थोडीशी तटबंदी व काही भग्न अवशेषच शिल्लक आहेत.

करवंदाच्या जाळीतून मिळालेला रानमेवा

या किल्ल्याच्या जवळून निवती/भोगवे बिचचा अप्रतिम परिसर नजरेस पडतो.

दुपार झाली होती. ऊन चटके देत होते. जास्त वेळ न थांबता निघालो सिंधुदुर्गचा किल्ला पाहण्यासाठी.
चिपी विमानतळाच्या जागेला वळसा घालून मालवणकडे निघालो. वाटेत कर्ली नदीवरील पूल ओलांडल्यावर एक लहानसा ढाबा लागला. कोकणी पद्धतीचे साधेच पण चांगले जेवण मिळाले. मालवण बंदरापासून दीड किलोमीटरवरील कुरटे बेटावर बांधलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी फेरी बोटीतून जावे. लागते. किल्ल्याचे महत्व आणि त्याचा इतिहास हा एक खूप मोठा विषय आहे. त्यामुळे येथील फक्त काही फोटोच.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर व तोफ (मंदिरात फोटो काढू देत नाहीत)

भवानी मंदिरातील मातेची सुंदर मूर्ती

किल्ला बघून परत सावंतवाडीची वाट धरली. अंधार पडता पडता सावंतवाडीला पोहचलो. मोती तलावाच्या बाजूला मुक्कामापुरत्या खोल्या घेतल्या . सावंतवाडी लाकडी खेळणी व हस्तकलेच्या वस्तूंकरिता प्रसिद्ध आहे. आमच्याकडे वेळ होताच त्यामुळे बाजारपेठेत फेरफटका मारला. घर सजावटीसाठी काही वस्तू खरेदी केल्या.
एका खानावळीत सहलीतील शेवटचा कोकणी जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर बराच वेळ येथील प्रसिद्ध मोती तलावाच्या बाजूला कट्टयावर बसून सहलीतल्या आठवणी उगाळत बसलो. दुसऱ्या दिवशी पहाटेच परतीचा रेल्वे प्रवास सुरु करायचा असल्याने सावंतवाडी रोड स्टेशनपर्यंत जाण्यासाठी गाडी ठरवली व रूमवर येऊन झोपी गेलो.

खवणे बीच-पाटचा तलाव-भोगवे बीच-निवतीचा किल्ला-मालवण-सिंधुदुर्ग किल्ला व परत सावंतवाडी रोड नकाशा

समाप्त

प्रतिक्रिया

सुरेख लिहिलंय. खवणे बीचवरच्या कॉटेज लैच भारी आहेत. भोगवेचा किनारा तर अप्रतिम.
सागरेश्वर मंदिर सुरेख. कोकणातली मंदिरे अतिशय छान आणि स्वच्छ असतात.

Bhakti's picture

31 Dec 2020 - 11:12 am | Bhakti

मस्तच लिहिलंय.कोकणातले घावण :) :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Dec 2020 - 12:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

कोकणात फिरायला जाताना नक्की उपयोगी पडेल ही माहिती.
पैजारबुवा,

आंबट चिंच's picture

31 Dec 2020 - 12:59 pm | आंबट चिंच

सगळे फोटो भारी आलेत.
तुम्ही माहिती देत चला पुढे आम्हा लोकांना उपयोगी पडेल.

स्वराजित's picture

31 Dec 2020 - 1:53 pm | स्वराजित

मस्त भटक॓ती

गोरगावलेकर's picture

31 Dec 2020 - 3:50 pm | गोरगावलेकर

आवडल्याची पोच दिल्याबद्दल प्रचेतस, Bhakti, ज्ञानोबाचे पैजार, आंबट चिंच, स्वराजित
सर्वांचे धन्यवाद!

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 6:21 pm | पॉइंट ब्लँक

मेंगलोर सोडलं तर कोकणाला भेट द्यायचा योग काही आला नाही. तसच गोवा, गोकर्ण आणि गणपतीपुळे अशी मोजकी ठिकाणे सोडली तर कोकणाबद्दल फारशी माहिती नव्हती. तुमच्या लेखामुळे नवीन नवीन जागांची छान माहिती मिळते आहे वाचायला.

MipaPremiYogesh's picture

1 Jan 2021 - 12:50 am | MipaPremiYogesh

वाह छान झाली आहे भटकंती. हॉटेल्स ची नावे आणि डिटेल्स देत येतील का

प्राची अश्विनी's picture

1 Jan 2021 - 8:49 am | प्राची अश्विनी

फोटो भारी! आणि आमचं कोकण तर लय भारी!

सुखी's picture

2 Jan 2021 - 8:33 am | सुखी

मंदिराची रंगसंगती आणि तो छोटा नंदी कसला क्युट आहे 😍 घावन-चटणी पण मस्तच!
लेखन आणि सर्व फोटो आवडले. खाण्यापिण्याच्या व्यवस्थेत सुधारणा झाली असेल तर हा परिसर फिरण्याचे लवकरच मनावर घ्यावे लागणार आता.

एक_वात्रट's picture

2 Jan 2021 - 3:13 pm | एक_वात्रट

प्रवासवर्णन सुंदर! अनेक नवी ठिकाणे कळली. तळ कोकण फिरणे अजून बाकी आहे, पाहू कधी योग येतो ते... खवणे बीचचे हॉटेल तर भलतेच गोड दिसते आहे, नाव कळेल का? आपण वेलावलला गेला नाहीत? कौलारू, वेगळ्या धाटणीचे असे ते मंदिर विलक्षण देखणे आहे , मला तर जाम आवडले.

(का कोण जाणे छायाचित्रांमधले रंग नैसर्गिक वाटत नाहीत, निळी/पिवळी अशा रंगाची झाक प्रत्येक फोटोत दिसते आहे. पोस्ट प्रोसेसिंग थोडे जास्त झालेय की काय?)

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2021 - 8:33 pm | चौथा कोनाडा

अतिशय सुंदर फोटो़ज आणि सुरेख वर्णन !
काय काय बघायचं राहून जातंय हे पाहून हुळहुळायला झाल्लं !

पॉइंट ब्लँक, MipaPremiYogesh, प्राची अश्विनी, सुखी, टर्मीनेटर, एक_वात्रट, चौथा कोनाडा यांना धन्यवाद.
काहींनी हॉटेलची नावे विचारली त्यांच्यासाठी :
सावंतवाडीत आराम करणे उद्देश नव्हता. पोहोचायच्या व निघायच्या दिवशी केवळ सोयीच्या ठिकाणी व मूलभूत सुविधा असलेले हॉटेल मिळणे इतकेच गरजेचे होते. त्यामुळे सर्वसाधारण हॉटेल. नाव हवेच असेल तर "हॉटेल मँगो व "हॉटेल पर्ल"

खवणे येथील हॉटेल: "क्लब खवणे". ऐनवेळी बुकिंग केले. आम्ही सुटीचे दिवस सोडून येथे गेलो होतो तसेच त्यांच्या दोनही रूम घेतल्या. त्यामुळे दरात सवलत मिळाली होती.