अज्ञात ज्ञात पंढरपूर १
चंद्रभागा मंदिर
पवित्र अशा पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना नदीमध्ये वंदन करून झालेवर चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० हुन अधिक टाळकरी गोलाकार उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर.
मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार?
मोठ्या जोत्यावर ४ सुरूदार दगडी खांब त्यावर ३ कमानी प्रत्येक कमानीला उठावाची २ कमळे कोरलेली त्या खांबामागे लहानसा दगडी मंडप आत गाभारा ज्यात सिंहासनावर अडीच फूट अशी माता चंद्रभागेची सुबक देखणी काळ्या पाषाणातली द्विभूज मूर्ती असलेले असे हे या मंदिराचे स्वरूप. मंदिरात दिवे ठेवण्यासाठी ४ लहान कोनाडेही आहेत. याचे विटाचे शिखरावर ब्रह्मा विष्णु महेश याच्या सह अनेक रेखिव मुर्ती असून मंदिराचे दक्षिणेकडे २ लहान महादेव मंदिरही आहेत. हे महादेव मंदिरे चंद्रभागा मंदिराच्या आधीची आहेत.
वाई, कराड आदि ठिकाणी जशी कृष्णा नदिचे काठी कृष्णामाईची मंदिरे आहेत तद्वत हे चंद्रभागा मातेचे मंदिर. "चंद्रभागे स्नान तुका मागे हेचि दान " या संतोक्तीमुळे जी चंद्रभागा समस्त वारकऱ्यांचा प्राण आहे. तिचे वाळवंटी "बाराही सोळा गडियांचा मेळा सतरावा बसवंती" म्हणत खेळिया करण्यात आनंद आहे तसे खेळताना "तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे" चे यौवन प्रप्त होते. हि चंद्रभागा गावकऱ्याचे जीवन आहे. कारण तिचेच जलपानाने पंढरीकरांचा पिंड पोसला जातोय. शिवाय तिचे वाळवंटी खेळण्यात पंढरपूरकरांची आयुष्ये नव्हे पिढ्यान् पिड्या गेल्यात. त्यामुळेच तिचे प्रति भक्तिभाव, प्रेम, कृतज्ञता म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी नदि तटाचे बांधकाम करताना खानदेशातील विठ्ठलभक्ती परंपरा असणारे हभप गोविंदबुवा चोपडकर महाराज यांनी मोठ्या यत्नांनी मोठा खर्च करून हा घाट आणि चंद्रभागा मंदिर बांधले. देवाचे पुजा अर्चेची व्यवस्था केली. त्यामुळेच या घाटाला चंद्रभागा घाट म्हणतात. चोपडेकरांची भक्तिपरंपरा, घाट, मंदिर, त्या पुढील दगडी चौरस सप याचा विचार करता इथे काही उत्सव समारंभ व्हावा असा विचार त्यांचा असावा. अशा समारंभाबाबत इतिहासातले ज्ञात नाही पण आजकाल सगळा उल्हास दिसतोय. आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याच्या नादात या मंदिराकडे कुणाचेच लक्ष नाही. ना गावकऱ्याचे. ना वारकऱ्याचे. ना शासनाचे. ना नगरपरिषदेचे. मध्यंतरी भुमिअंतर्गत गटारीचे कामी नगरपरिषदेने देवळापुढचा दगडी सपच फोडला विचारणा करता गटारीचे काम होताच परत बांधु म्हणाले. पण १५ ते २० वर्षे होवूनही अजून काही नाही. नंतर सरकारनेच लोखंडी कठडे बसविण्याचे नावाने घाटाची फोडाफोड केली. मंदिर समितीने दर्शन रांगेसाठी इथेच लोखंडी जिना करून मंदिराचे आणि घाटाचे सौंदर्य बिघडविले आहे. अपवाद आहे ते केवळ नरेंद्र कवडे अण्णांचा. ते गेल्या काही वर्षांपासून प्रतिवर्षी चंद्रभागा मातेची साग्र संगित पुजा करतात. भजनादी कार्यक्रमही घडवितात ज्याला आमचे पिताश्री अनिलकाका बडवे, मा. सुधाकरपंत परिचारक, हभप शिऊरकर महाराज, आणि अन्य तुरळक जनांची उपस्थिती असते. अनेक मान्यवरांना आमंत्रित करूनही प्रतिथयश लोक येत नाहीत.
आपल्या वैभवशाली सांस्कृतिक वारश्याकडे जतन करण्याच्या चांगल्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन तयार होइल तो खरा सुदिन. नाहि तर आपली संस्कृति काय आहे? आणि ती कशी रक्षावी? हे सांगण्याला युरोपियनांना यावे लागेल.
© अधिवक्ता आशुतोष अनिलराव बडवे पाटील. पंढरपूर
अज्ञात ज्ञात पंढरपूर १ चंद्रभागा मंदिर
वाचने
8357
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलंय. अशीच अनवट
छान लिहिलंय. अशीच अनवट मंदिरांची ओळख येऊ द्यात.
फोटो मात्र हवेतच.
हेच म्हणतो, फोटोचे मनावर घ्या
In reply to छान लिहिलंय. अशीच अनवट by प्रचेतस
हेच म्हणतो, फोटोचे मनावर घ्या.
मस्त लिहिलंय बडवेसाहेब
मला फोटो कसे टाकायचे अजून
In reply to छान लिहिलंय. अशीच अनवट by प्रचेतस
मला फोटो कसे टाकायचे अजून जमलेले नाही
धन्यवाद
In reply to छान लिहिलंय. अशीच अनवट by प्रचेतस
धन्यवाद
मला अजून फोटो कसे टाकायचे ते जमलेले नाही
पण.. .
वाई, कृष्णा नदिचे काठी कृष्णामाईची मंदिरे आहेत
काय म्हणता? मोठ्या गणपतीजवळच्या घाटावर उत्सव होतो तिथे स्वतंत्र कृष्णामाईचं मंदिर आहे?
कराडच्या घाटावर कृष्ण माईचे
In reply to पण.. . by कंजूस
कराडच्या घाटावर कृष्ण माईचे मंदिर आहे
हे आधी कुठेतरी वाचल्या सारखे वाटतंय!
हे आधी कुठेतरी वाचल्या सारखे वाटतंय! whatsapp किंवा फेसबुक वर.
फेसबुकवर असेल
In reply to हे आधी कुठेतरी वाचल्या सारखे वाटतंय! by अथांग आकाश
फेसबुकवर असेल
फोटोसोबत गुगल मॅप लोकेशन दिले
फोटोसोबत गुगल मॅप लोकेशन दिले तर बरे होईल. त्या लोकेशनवर जाऊन इच्छुक लोक भेट तरी देऊ शकतील.
छान.
माहितीपूर्ण. छायाचित्र हवेच. :)
-दिलीप बिरुटे
आशुतोषजी, आपले मिपावर हार्दिक
आशुतोषजी, आपले मिपावर हार्दिक स्वागत !
खुप सुंदर माहिती. कित्येक ठिकाणे अजून अशी अज्ञातच आहेत.
हे आधी वाचल्याचं आठवतं, बहुधा तुमच्या फेसबुक पेज वरच !
पुढील लेखात फोटो जरुर टाका.
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत !
धन्यवाद हो लिहितोय
In reply to आशुतोषजी, आपले मिपावर हार्दिक by चौथा कोनाडा
धन्यवाद
हो लिहितोय
हे मंदिर माहिती नव्हते
खुप छान माहिती ! असंख्य वेळा पंढरपुरला जाउन हे मंदिर माहिती नव्हते.बाकी नद्यांनाही आपण देवतास्वरुप मानत असल्याने बर्याच नद्यांची मंदिर आहेत.फोटो असते तर अधिक बरे झाले असते.
फोटो टाकायला अजून जमलेले नाही
In reply to हे मंदिर माहिती नव्हते by दुर्गविहारी
फोटो टाकायला अजून जमलेले नाही मिसळ पाव वर