उन्हाळा लहानपणी चा

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
28 Nov 2020 - 4:18 pm

     उन्हाळा लहानपणीचा .

इक रितु आये... इक रितू जाये...

खूप वर्षे झाली आडगाव सोडून.गाव आहे तिथेच आहे.ऋतू नेमाने येतात जातात.पण लहानपणच्या आठवणीतले उन्हाळे,पावसाळे पाठ सोडत नाहीत.
   रब्बी पिकांचा हंगाम संपला की शेते उजाड उदास दिसू लागतात.उभी पिके निघून गेलेली.मळणी होऊन ज्वारी,गहू इ.धान्य घरी येते .मागे उरतात पिकाची धांडे बुडखे ,पाला पाचोळा,भूसकट.गायी, म्हशी ,शेळ्या तिथे तोंड लावीत चरतात .हंगाम संपला तरी शेतीची कामे पूर्णपणे संपत नाहीतच.
कडब्याच्या गंजी लावण्याचे काम सुरू असते.मोठे कौशल्याचे काम.सर्वांना जमत नाही .गंजी रचणारे माणसाला मागणी असते.पूर्वी त्याला मोबदला म्हणून ज्वारी दिली जाई. गावातील उकिरड्यातील खत शेतात नेऊन पसरले जाते.पडलेली धांडे,पाला पाचोळा उचलून,शेत नांगरलेजाते.
आता ट्रॅक्टरचा वापर होतो.पूर्वी बैलाचे नांगर असत.फाळ लोहाराकडून
शेवटून (धार लावून) घ्यायचा. नांगरणीचे काम कष्टाचे .बैलासाठी अन नांगर धरणारेंसाठी पण.जमीन मऊ असेल तर चार बैली आणि कठीण असेल तर ,सहा बैली,आठ बैली नांगर.काम लवकर उरकावे यासाठी रात्री पण नांगरणी व्हायची.देखरेखीसाठी वडील,दूपारी घोड्यावरून शेताकडे चक्कर मारायचे. त्यांच्यासोबत कधी मीही जायचो.काही शेते गावापासून
दूर अंतरावर होती. तेव्हा गड्यांचा (शेतमजूर)शेतातच मुक्काम.एखादा गडी संध्याकाळी गावात येऊन इतरांच्या 'भाकरी'घेऊन जाई. किती काम झाले,किती राहिले ,याची  आजोबांना माहिती द्यायचा.त्याच्याजवळ रात्रीचे चहासाठी साखर/गुळ चहापत्ती दिली जात असे.नांगरणीने झालेली
ढेकळे फोडून शेत सम पातळीत आणण्यासाठी औताने  पाळी घालायची.
पुढे ,दोन तीन महिन्यानी, होणारे खरीपाचे पेरणीसाठी शेते तयार करून ठेवले जात.
  पाडवा जवळ आला की सालगड्यांचे हिशोब केले जात.महिन्याला किती ज्वारी व किती रुपये मजूरी याचे दर ठरत.गड्याचे वय ,अनुभव,शक्ती,
कामाचा उरक या नुसार दर कमी जास्त होत. काही सालगडी राहायचे. काही सोडून दुसरीकडे जायचे. त्यांचे जागी नवे यायचे.जुने गडी सोडून गेले की उगीच वाईट वाटायचे.
पाडव्या नंतर उन्हाळ्याची जाणीव होउ लागे.संध्याकाळी गरम वारे सुटायचे.वावटळ यायची.पालापाचोळा आकाशात उडायचा.डोळ्यात धूळ जायची.वावटळ मोठीअसली की कुणाकुणाचे घराचे पत्रे उडून जात.ढग जमायचे.वीजांचा कडकडाट.पाठोपाठ पाऊस.वळीवाचा.जमिनीवर थेंब पडले की मातीचा सुवास पसरे.मृदगंध.वादळाने झाडांना लागलेल्या कैर्या पडत.खराब व्हायच्या.पण मुलांना काय त्याचे? आंबट तोंड करत खायचे.
  रामनवमीला राममंदिरात रामजन्म होई.त्या दिवशी घरी फोडणीची डाळ व कैरीचे पन्हे असे.एकादशीच्या रात्री,गावात,टाळ मृदंगाच्या तालात,
"ग्यानबा तुकारामाचे"गजरात, रामाची पालखीतून मिरवणूक निघे.
चैत्री पोर्णिमेला कुलाचार आणि हनुमान जयंती.आई,आजी पहाटेच उठून पूरणाचा स्वैपाक करीत.उजाडण्याचे वेळी,वडील सोवळ्यात,मारोती मंदिरात नैवेद्य दाखवायला जात.आम्हाला नारळाखडीसाखरेचा प्रसाद मिळे.जेवणात पुरणपोळी.
  परिक्षा संपून शाळांना सुट्या लागलेल्याअसत.नात्यातील बहिणी भावंडे गावी यायचे.बहुतेक भावंडे माझ्या हून मोठे.त्यांचे समवयस्क असलेले दोन मामा पण येत. ते असेपर्यंत मज्जाच मज्जा,धिंगाणा.
उन्हाळा वाढलेलाअसे.गावातील आडांचे पाणी आटायचे.
पण पिंपळाच्या मळ्यातल्या विहिरीला मात्र चांगले पाणी असे.सगळी मुले सकाळी नऊ,दहा वाजता पोहायला तिथे  जायचो.तिथली विहीर आकाराने मोठी.बांधलेली.दगडी कपारींना धरून चढायचे,उतरायचे.उतरणे क्वचितच.वरूनच उड्या मारायच्या.सुळका,मुटका हे उड्याचे प्रकार.दुपार पर्यंत विहिरीत मनसोक्त डुंबायचे.सूरमारणे,शिवणापाणी,जास्तीत जास्त वेळ बुडी घेणे,एकमेकाला पाण्यात बुडवणे,तळास जाउन तिथले दगड पुरावा म्हणून आणणे,असले प्रकार चालत. 
मळ्यात उस,माळवे(भाजीपाला),बैलासाठी घासचारा लावलेला असे.
इंजिनाने भिजवला जायचा.आम्ही विहिरीत असे पर्यंत इंजिन सुरू करता येत नसे.शेवटी कामावरचा गडी ओरडायचा.तेव्हाच सगळे बाहेर येत.
मळ्यात खूप जुने मोठे पिंपळाचे झाड होते.म्हणून तो पिंपळाचा मळा. त्या पिंपळावर मोठा साप आहे,असे गडी सांगत.मला कधी दिसला नाही.झाडा खाली शेंदुराच्छादित'मुंजाबा',मळ्याचा रक्षणकर्ता.ओलेत्याने मुंजाबाला पाणी घालायची प्रथा होती.ती सगळे पाळत.
पोहण्यामूळे सपाटून भूक लागलेली असे.जेवणाचे डबे घरुन आणलेले असायचे. झाडाखाली वनभोजन होई.मळ्यातलेच ताजे कांदे,मेथी ,गाजर,
काकडी,तोंडी लावायला.तिथेच,एका दगडावर, दुसरे दगडाने हिरव्या मिरच्या अन खडेमीठ  ठेचून केलेला इंस्टंट'ठेचा'अनभाकरी.आणखी काय हवे?भरल्या पोटी डोळे जड व्हायचे.उन जरी असले तरी आजूबाजूच्या हिरवाईने झाडाचे सावलीत थंडावा असे.डोळे केव्हा लागत कळत नसे.
झोपा झाल्यावर गप्पा,गाणी, खेळ,यात वेळ भराभर जायचा.पंखांवर विलोभनीय नक्षी असलेली विविध रंगी,फुलपाखरे सर्वत्र बागडायची.त्यांचे मागे धावायचे.उन्हे कलल्यावर,मस्ती करत घरी परतल्यावर पापड्या,
पोहे,चुरमुरे खारवड्या असे चारीमुरी खाणे होई.
  वाड्या समोरचे  उन्हाने तापलेले,दगडी ओटे  पाणी टाकून थंड केले जात.संध्याकाळी आजोबा तिथे बसायचे.बाजूच्या ओट्यावर वडीलव गल्लीतली ईतर माणसे.गप्पा व्हायच्या.शेतातली कामे आटोपून गडी आले, की समोरच्या मोकळ्या जागेवर बसून कामाची माहिती देत.गड्यांचे धुम्रपानही चाले.आपापसात बिड्यांची देवाणघेवाण होई. आजोबा,वडील ,त्यांना दुसरे दिवशीचे कामाचे नियोजन सांगत.मग बैठक बरखास्त होई.
   रानात चरायला गेलेली गुरे संध्याकाळी परत येत. गायवाड्यात बांधलेल्या वासरांना भेटण्यासाठी गायी पळत जात. गायी म्हशींच्या धारा काढण्याआधी, गुराखी दूध पिण्यासाठी  वासरांना सोडायचा.ती न चुकता  आपापल्या आयांकडे जात. दिवेलागणीची वेळ झालेली असे.वीज नव्हती. कंदील लावले जात.रात्रीची जेवणे लवकर आटोपत.
आठ साडेआठ पर्यंत सगळीकडे सामसूम झालेली असे.
माडीवर पत्रे आहेत.जाण्यासाठी माडीतून जिना आहे.
झोपायला बहुतेक सगळे पत्र्यावर.तिथे गप्पागोष्टींना भर येई.कधी गाण्याच्या भेंड्या व पत्त्याचे खेळ पण. कुणीतरी पाहिलेल्या सिनेमाची 'स्टोरी'सांगे. सिनेमातील मारामारी चे प्रसंग प्रात्यक्षिकासह सांगितले जात.गाणी कंटाळा येई पर्यंत गाऊन ऐकविली जात.संवादाचे प्रसंग मात्र,"दिलीपकुमार प्राणला काहीतरी बोलतो ,मग  तो त्याला काहीतरीसांगतो" या पध्दतीने वर्णन केले जात.
  अंथरुणावर पसरले की वर आकाशभर चांदण्या दिसत. अमावस्या जसजशी जवळ येई तसतसे चांदण्यांची रांगोळी  ठळक होत जाई.अंदाजाने तारे ओळखायचा खेळ सुरू होई.अंधारलेल्या रात्री कुणी तरी भुताच्या गोष्टी सांगे.माळावर भुतांची जत्रा भरते,दूरवर दिसणारे दिवे म्हणजे ,भुतांच्याहातातील दिवट्या,मशाली आहेत,असे सांगून घाबरवत.
लहान मुले डोक्यावर पांघरूणे घेऊन रामाचा जप करत. पोर्णिमा जवळ येई तसतसे चांदणे फुलत जाई.चांदण्यांचाखेळ पाहात,केव्हा डोळे लागत कळत नसे.
     उन्हाचे चटके बसु लागले की जाग येई.अंथरुणे,पांघरुणे गोळा करून जिन्यात ठेवली जायची.दात घासायला  राखूंडी( चुलीत जळालेल्या गोवरीची राख) असे. दुध,चहा पिणे झाला की पोहायला जायचे वेध लागायचे.
   गावापासून चारपाच किलोमीटर अंतरावर पुरुषोत्तमपुरीला
गोदावरी नदी.तिथे काकडी,खिरे,टरबूज खरबूजाच्या वाड्या असत.तिथून मोठे कलिंगडे, विविध आकार,चव अननावाच्या ,खरबूजांच्या डाली घेऊन ,लोक विकायला येत.आजोबा पूर्ण डालच( टोकरी) विकत घेत.थंड  राहाण्यासाठी टरबूज न्हाणीघरातल्या हौदात टाकायचीसंध्याकाळ पर्यंत  सगळ्या फळांचा फन्ना उडायचा.
   रावजीचे शेत नावे दूरचे शेतात आमराई होती.गावरानआंबे.
वेगवेगळ्या प्रकारचे.कधीतरी सगळ्यांचा मोर्चा तिकडे वळे.पाडाचे आंबे,कैर्या खायच्या.झाडे हिश्श्याने राखायला दिलेले असत.राखणदार गाड्यांतून आंबे घरी पोहचवे.ते गवतात घालून पिकवले जात.
माडीवर,खोल्यांमधे आंबेच आंबे.घरभर वास पसरलेला.आंबे फक्त खाण्यासाठी.विकणे नाही.मग आंब्याचे आढ्यांजवळच वेळ जाई.पाहुणे आले की  टोपल्यातून आंबे समोर ठेऊन पाहुणचार केला जाई. जेवणात आमरस असणारच.करायची जबाबदारी मुलांवर.ती आनंदाने पार पाडली जाई.रस करताना चाखणे ही होई.
जेवणात भरभरून आग्रह व्हायचा.कॉम्पिटिशनने वाट्याचे वाट्या रिचवल्या जायच्या.मनसोक्त.सोबत पापड्या कुरडया.
बहात्तरचे दुष्काळात आमराई नष्ट झाली.लोकांनी झाडे तोडून नेली.नंतर तसे आंबे खायला मिळाले नाहीत.
  या काळात  घरातील स्त्रियांना मात्र कामातून उसंत मिळत नसे.घरातील माणसे आलेली मुले,पाहुणे यांची दोन्ही वेळेची जेवणे,मधल्या वेळातली खाणे,दुध तापवणे ,विरजण लावणे चहापाणी,उखळ,मुसळ, रवी यांचे साहाय्याने करायची ,चटण्या करणे ,ताक करणे,ही कामे,जेवणासाठी ताटे,पाट,मांडणे, पाहूणे असल्यास रांगोळी काढणे,जेवायला वाढणे,
पुरुषांचे आंघोळीचे पाणी काढणे,न्हाणीघरात त्यांचेे कपडे ठेवणे, देवपूजेची तयारी करून ठेवणे.या शिवाय खास उन्हाळ्यात करायची पापड्या,
खारवड्या,कुरडया,लोणचे घालणे,अशी अतिरिक्त कामेही असत. घराची झाडलोट सारवण,धुणी भांडी यासाठी बायका व बाहेरचे पाणी भरणे व इतर कामासाठी माणसे होती.पण पिण्याचे व स्वयपांकाचे पाणी मात्र घरातील स्त्रियांना भरावे लागे.घरी हातपंप होता.पण उन्हाळ्यात आटायचा.गल्लीतील दुसरे हातपंपावरून, किंवा आडावरून शेंदून पाणी आणावे लागे.
स्त्रियांनी करायची किती सारी कामे !
आजी  बीडला काकांकडे असत त्या अन विधवा काकू अधून मधून गावी येत.वडिलांच्या बालविधवाआत्या घरी  असत .मुलीही मदतीला.पण मुख्य भार आईवरच.या सगळ्या कामात दिवस कधी सुरू होई व कधी संपे,हे त्यांना कळत नसे.त्यांचे कष्ट दिसत.पण त्याचे मोल कळायचे ते वय नव्हते.
आमचे दिवस मजेत भराभर कसे जात कळत नसे. काही दिवसांनी ;आलेली मुले, पाहुणे आपापल्या गावी परत जात.घर रिकामे होई .करमायचे नाही.काही दिवसात शाळा सुरु होणार हे लक्षात येई.मग आणखी उदासी.मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात,उन रणरणते असे.. क्वचित रोहिण्या पडत. म्हणजे रोहिणी नक्षत्रातला मान्सूनपूर्व पाउस.उन्हाळा संपत आला हे ध्यानात येई.शेतीच्या पेरणीपूर्व कामाची तयारी सुरू होई. पेरणीसाठी लागणारे अवजारांची दुरुस्ती,कुठल्या शेतात काय पेरायचे ते नियोजन,खते बी बियाणे खरेदी .एक ना अनेक.
रेडिओवर,मान्सून केरळात धडकला,कोकणात दाखल झाला, अशा बातम्या येत. गावाकडेही वातावरणात हळूहळू बदलू लागे.आणि उन्हाळ्याचे साम्राज्य खालसा करुन,पावसाळ्याचा अंमल सुरू होई.
     (ज्यांच्या कष्टांमुळे तेव्हाचे तापदायक उन्हाळेच नाही तर जगणे सुसह्य झाले ती माझी आई व कुटुंबातील सर्व महिला वर्गास हा लेख समर्पित..)
                         नीलकंठ देशमुख
      

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

उन्हाळ्याचे छान समग्र वर्णन. सर्व महिला वर्गास लेख समर्पित करणे हा तर सगळ्याच लिखाणाचा उत्तम समारोप.

नीलकंठ देशमुख's picture

29 Nov 2020 - 9:43 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

मराठी_माणूस's picture

29 Nov 2020 - 9:10 am | मराठी_माणूस

मस्त लेख . महीलांच्या कष्टांची दखल घेणे खुप आवडले.

नीलकंठ देशमुख's picture

29 Nov 2020 - 9:43 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

बाप्पू's picture

29 Nov 2020 - 12:08 pm | बाप्पू

छान लेख. मनापासून आवडला. जवळपास सर्व गोष्टी माझ्या लहानपणी देखील घडल्यात.. खूप वर्षे मागे गेल्यासारखं वाटल.

नीलकंठ देशमुख's picture

29 Nov 2020 - 2:37 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

सिरुसेरि's picture

3 Dec 2020 - 5:51 pm | सिरुसेरि

सुरेख आठवणी . +१

प्रमोद देर्देकर's picture

5 Dec 2020 - 9:31 pm | प्रमोद देर्देकर

मस्त आठवणी. नेहमी प्रमाणे तुमचं हे पण सगळं लिखाण मी माझ्या लहानपण कोकणातल्या मातीत घालवलेल्या माझ्या आई वडिलांना वाचून दाखवलं.
त्यांनाही आवडलं.

नीलकंठ देशमुख's picture

6 Dec 2020 - 10:03 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. माझ्या लिखाणाचे कुणाला तरी छान वाटते. भुतकाळ च्या आठवणी जाग्या होतात. हे वाचून खूप छान वाटलं.

गोरगावलेकर's picture

8 Dec 2020 - 2:57 pm | गोरगावलेकर

"पाडवा जवळ आला की सालगड्यांचे हिशोब केले जात"
आमच्याकडे म्हणजे खान्देशात अक्षय्य तृतीयेला (आखाजीला) सालदारांचे साल बदलते. आठ-दिवस आधीपासूनच त्यांची सुट्टी सुरु होते. फक्त दूध काढणे वगैरे जरुरीच्या कामांपुरतेच येतात.

नीलकंठ देशमुख's picture

8 Dec 2020 - 3:14 pm | नीलकंठ देशमुख

आता ही पध्दत जवळपास संपलीच आहे म्हणायला हरकत नाही