मनाचिये गुंती

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
9 Nov 2020 - 6:27 pm

नमस्कार मागील काही महिन्यात जी उलथापालथ माझ्या जीवनात झाली,ती या चार छोट्या लेखात मांडली. त्यामालिकेतील हा शेवटचा भाग.
आपल्या प्रतिक्रिया वरून आपल्या ला हे लिखाण भावले आवडले असे दिसते.छान वाटले.धन्यवाद.हा भाग कसा वाटला कळवावे.

मनाचिये गुंती..

गणेश चतुर्थीच्या दिवशी रुग्णालयात गेलो.एंजिओप्लास्टी होऊन,सहा दिवसांनी ,महालक्ष्मीचे शेवटचे दिवशी, घरी परतलो.
    माझी जीवनशैली ,प्रकृती ,सवयी इ.लक्षात घेता मला हार्ट एटॅक  यावा हा मलाच नाही तर मला ओळखणारे सर्वांसाठी धक्काच.अगदी शिस्तबद्ध  नसलो तरी मी बेशिस्त ही नाही. वयाचे चौसष्टावे वर्षीही प्रकृती ठणठणीत.मधुमेह वा  रक्तदाब नाही.अस्थम्यासाठीचा इनहेलर सोडता कुठलेही औषध चालू नाही. कुठलेही व्यसन नाही.आहार ही साधाच.
हॉटेल वा बाहेरचे चमचमीत मसालेदार खाणे क्वचित.वीस वर्षापासून  नियमितपणे योगासने ,फिरणे असते.वजन पण नियंत्रणात आहे .मागील नोव्हेंबर मधे आरोग्य तपासण्या
केल्या होत्या .त्या पाहून डॉक्टरांनी अभिनंदन केले  व 'तरुणाला  लाजवेल असे रिपोर्ट आहेत 'असा शेरा मारला.
  मित्र परिवार असा नाही. पण वाचन ,संगीत ऐकणे या  छंदामुळे ती कमी जाणवत नाही. गृहसौख्य चांगले. कुठली
जबाबदारी नाही.आर्थिक आघाडी समाधान कारक.
जे आहे ते खूप भरभरून मिळाले हीच भावना आहे .

  करोना मुळे घरी काम करणारी माणसे येणे बंद झाली, तेव्हा  घरातील कामे ,अगदी स्वयपांकापासून,घराची स्वच्छता ,भांडे धुणे इ.कामात मनापासून सहभागी असायचो.बाहेरची कामें खरेदी वगैरे पण मीच करत असे.
करोना काळात एक  शिस्तही  लागली.रोज सकाळी  गच्चीवर कोवळ्या सुर्यप्रकाशात योगासने,सूर्यनमस्कार ,
ध्यान इ.मग घरातील कामे. नातू मैत्रू त्या काळात चार महिने सोबत होता.त्याच्यासोबत  खेळणे मस्तीमधे वेळ जाई.संगीत ऐकणे तर आहेच , अवांतर वाचना सोबत दुपारी ज्ञानेश्वरी,दासबोध,भागवत ई.चे घरी सामुहिक वाचन होत होते .संध्याकाळी अर्धा तास घराचे गच्चीवर फिरणे हा नीत्यक्रम होता. टिव्ही वर  सिनेमे, अधून मधून वेब सीरीज पाहाणे,कॉम्प्युटर वर गाणी ऐकत पत्त्यांचा खेळ, शिवाय
वाटसएप, फेसबूक यूट्यूब.इ.मधे वेळ जात असे.कधीतरी थकवा जाणवायचा. धाप लागायची.पण ते जुना मित्र 'अस्थम्याशी' संबंधीत असणार हेच मनात. एकंदरीत आपण साठीचे मध्यावर आलो तरी पूर्णपणे तंदुरुस्त आहोत हा विश्वास वअभिमान पण असे.या वयात ही अगदी मुंबई, पूण्याहून औरंगाबाद पर्यंत एकटा गाडी चालवत असे.पण
हा झटका बसलाअन स्वतः विषयीचा अभिमान हे अज्ञान होते,हे ज्ञान झाले .
  डॉक्टरांशी बोलण्यातून कळले की वरवर तंदुरुस्त  दिसणारे शरीर ,आपल्याला वा इतरांना'आदर्श 'वाटणारी आपली जीवन शैली,यावरून आपल्याला हृदयरोग होणारच नाही हा गैरसमज आहे .आनुवंशिकता,अति काळजी करणे,
भावनाप्रधान,अति संवेदनशील,स्वभाव हे पण ह्रदरोगास कारणीभूत होऊ शकतात .
एकतीस वर्षापूर्वी वडील हार्ट एटॅक ने गेले होते. ही बाब तर खरी. पण त्याचा काही परिणाम माझ्या वर असा होईल असे कल्पनेतही वाटले  नव्हते.
स्वभाव निश्चित संवेदनशील आहे. स्वतः व कुटुंबच नाही, तर इतरांची पण काळजी करण्याचा आहे.करोनाआल्या पासून, लोक नियम पाळत नाहीत याचा त्रास व्हायचा. त्यापायी अनेकांशी वाईटपणा ही घेतला.त्याचे पडसाद मनःपटलावर उमटले असावेत.
  जीवनात,बरेवाईट प्रसंग तर येतातच.मागच्या काही वर्षात अनेक अनपेक्षित धक्के बसले.परिस्थितीत बदल झाले.
"सुख सुख म्हणता हे दुःख दाटुन आले"असे प्रसंग आले. नोकरीत मान सन्मान मिळाला. पण शेवटी अपेक्षाभंग,
उपेक्षा,अपमानासही तोंड द्यावे लागले. अर्थात निवृत्ती नंतर अनेक चांगली, सामाजिक कामे हातून झाली.त्याचे कौतुकही झाले.हे समाधान आहे.
तरीही गलिच्छ राजकारणामुळे जे मिळायला हवे होते ते मिळाले नाही,हातून निसटले.लायकी असूनही जे हवे ते आपल्याला न मिळता इतरांना मिळाले,याची रुखरुख कुठेतरी खोलवर आत दडून बसलेली असावी .
अगदी जवळची माणसेअनपेक्षितपणे गेली.सोडून गेली.
नकळत त्याचा परिणाम पण प्रकृती वर झालाअसावा.

चंचल मन ,सतत निरर्थक विचारात भटकत असते.काय काय दडवून ठेवलेले असते आत ;आपणच,तिथे आपल्याही नकळत ते कळत नाही.दिसतही नाही. मनाच्या अंधार कोठडीत,भूतकाळातील बंदिस्त असलेली भुतावळ ,काही तत्कालीन कारणांनी मुक्त झाली,अन त्यांनी  हल्लाबोल केला असे घडलेअसेल?
  हार्ट एटॅक कारणांचे शोध घेण्याचे प्रयत्नांत,हाती लागले ते असे  विखूरलेले तुकडे.एकसंघ चित्र गवसत नाही.जे गवसलेली वाटते ते खरे ऊत्तर आहे का माहिती  नाही.
खूप विचारांती शेवटी वाटले; अहंकार,त्या पोटी उद्भवणारे गैरसमज,रागादी अनेक विकार, विखार,या सगळ्यांचा गुंता मनात झालेला असतो. तोच याच्या मुळाशी असेल का?.
  ज्ञानेश्वर माऊली सारखा एखादाच महामानव ,
"मनाचिये गुंती गुंफियला शेला "ही किमया करू शकतो.
माझ्या सारखा एक सामान्य माणूस काय करू शकतो?
स्वतःलाच प्रश्न.मग मीच मला दिले उत्तर आणि आश्वासनही ,स्वतःला. .
मनाच्या गुंत्यातील किमान काही धागे उकलण्याचा प्रयत्न करीन .एंजिओप्लास्टी नंतरचे आयुष्य,हा देवाने दिलेला बोनस /प्रसाद आहे, म्हणून स्विकारून आनंदाने जगेन.आपण समाजाचे काही देणे लागतो .ते फेडण्याचा प्रयत्न करीन.हे जग सुंदर आहे.जाताना ते आणखी सुंदर करायचा प्रयत्न करीन.
                        नीलकंठ देशमुख .   

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

आत्ताच हा भाग वाचला. खूपच चांगले लिहीले आहे. आता आधीचे भाग शोधून वाचतो, त्यानंतर आणखी प्रतिसाद देईन.
उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 8:58 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

प्रकाश घाटपांडे's picture

9 Nov 2020 - 8:45 pm | प्रकाश घाटपांडे

संवेदनशील मनाला अनेक गोष्टी खटकतात. अनुत्तरीत प्रश्न आ वासून उभे राहतात. मी ही तुमच्यासारख्या अनुभवातून तरुणपणात गेलो आहे.डॉक्टरांनाच समजले नाही सुरवातीला. नंतर अँजिओग्राफी झाली व औषधावर भागले.. प्रतिबंधात्मक औषधे ही नेहमीकरता आहेत. चिकित्सा केलेली वा प्रश्न विचारलेले बर्‍याच डॉक्टरांना आवडत नाही हा अनुभव नंतर अनेक बाबतीत आला.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 9:01 pm | नीलकंठ देशमुख

माझ्या सुदैवाने डॉक्टर महेश देशपांडे कार्हेडिओलॉजीस्डट हेडगेवार रुग्णालय औरंगाबाद चांगले व सर्व प्रश्नांची सविस्तर घाई न करता उत्तर देणारे आहेत. ईतर डॉक्कटर व कर्मचारी पण

दिसता म्हणून प्रतिसाद देतो.

इमोशनॅलिटीचा आयुष्यात शून्य उपयोग आहे.

वास्तविकात भावना हे बिचारांचंच जास्त सघन झालेलं रूप आहे आणि त्यामुळे मानसिक ताणाचा जसा मेंदूवर परिणाम होतो तसा भावनांचा हृदयावर होतो. हृदय मेंदूपेक्षा नाजूक आहे त्यामुळे तुम्ही वर्णन केलेली परिस्थिती उद्मवते, म्हणजे अदर वाईज एकदम फिट असणारा सुद्धा कार्डिअॅक प्रॉब्लममधे सापडतो.

यातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे विचारांचं रूपांतर भावनेत न होऊ देणं.

विचारांचं भावनेत रूपांतर होतंय हे लक्षात येण्याचा एकमेव उपाय म्हणजे : ते होतांना हृदयाला एक अत्यंत सूक्ष्म कंप जाणवतो ! बास, त्या क्षणी सावध व्हा आणि तो विचार पुढे रेटू देऊ नका (त्या वेळी कितीही योग्य आणि भारी वाटला तरी).

फक्त एका आठवड्यात तुम्ही या भावनिक लफड्यातून कायमचे मोकळे व्हाल आणि पुढे एकदम फिट राहाल.

संजय क्षीरसागर's picture

10 Nov 2020 - 12:46 am | संजय क्षीरसागर

वास्तविकात भावना हे विचारांचंच जास्त सघन झालेलं रूप आहे

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2020 - 10:42 am | नीलकंठ देशमुख

हे खूप छान आहे

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2020 - 10:00 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2020 - 10:41 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. देशमुख

धन्यवाद. बरोबर आहे. मी फक्त का झाले कसे झाले याचे मनाला वाटले तसे विश्लेषण केले. त्यामूळे मन मोकळं झालं. ताण गेला. आता तो विषय ही डोक्यात नाही. शेअर करावे वाटले कदाचित कुणाला उपयोग झाला तर व्हावे म्हणून. बाकी काही नाही.बाकी आपलं आपलं जगणं आपले आपणच जगत असतो.इतर कुणाला ती जीवनशैली विचार कृती योग्य अयोग्य वाटल्याने फरक पडत नसतो. लिखाण आवडले हे पाहून. बाकी मी साधा सरळ आहे हे निरीक्षण बरोबर. आजचे काळात मिनिट.
सबकुछ सिखा हमने ना सिखी होशिरारी...
धन्यवाद.

होशियारी शिकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी इमोशनॅलिटी सोडणं अत्यंत उपयोगी आहे.

सुरुवातीला लोक कोरडा वगैरे म्हणतात पण नंतर आपण वाट्टेल तो इमोशनल प्रसंग लिलया हँडल करु शकतो.

माझे सासरे ही तुमच्यासारखेच सरकारी नोकरीत उच्च पदावर होते आणि अगदी तुमच्यासारखेच सरळ-साधे. मला सांगायचे " आमचं नशीब म्हणजे रांगेत बराच वेळ ताटकळत उभं राहून खिडकी जवळ पोहोचलो की, वेळ संपली म्हणून खिडकी बंद व्हायची " (प्रमोशन हुकणं, नको त्या वेळी आडगावी बदली होणं, झक्कड आणि मंद वरिष्ठांनी चांगल्या चाललेल्या कामात खो घालणं, वगैरे). मुलगी देऊन त्यांनी तो इमोशनल वारसा मला सोपवला.

एकदा रात्रीचे आइस्क्रीम खायला बाहेर पडलो, मस्त दुकानाच्या कट्ट्यावर बसलो होतो तिथे भिकारी मुलं डोळ्यात व्याकूळ भाव घेऊन, येऊन उभी राहिली. गरीबी हटवणं सरकारचं काम आहे आपलं नाही हे मला ओशोंनी पूर्वीच सांगितल्यानं मी त्यांची दखल घेतली नाही पण प्रियतमेला गहिवर आवरेना. मी तिला शंभर रुपये दिले आणि सांगितलं याची येतील तेवढी घे आणि तुला फारच असह्य होत असेल तर तुझं पण त्यांना दे. तीनं तीचं आइस्क्रीम माझ्याकडे सोपवलं आणि मोठ्या आनंदानं आइस्क्रीम्स घेऊन पोरांना वाटून आली. दोनच मिनीटं झाली असतील, त्या पोरांनी ती बातमी तिथे वार्‍यासारखी पसरवली आणि आणखी पाच मुलं येऊन तिच्याकडे बघायला लागली ! तेंव्हापासून तिला योग्य तो धडा मिळाला, मी बरोबर असतांना इमोशनल होऊन श्या* उपयोग नाही ! अशाप्रकारे संभाव्य हृदयरोगातून एक व्यक्ती कायमची मुक्त झाली !

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2020 - 1:05 pm | नीलकंठ देशमुख

आईसक्रीम सारखे प्रसंग नेहमी येतात. दान सत्पात्री असावे म्हणतात. संवेदनशील माणसांची अनेकदा फसवणूक होते व अपेक्षाभंग होतो व त्याला त्याचा त्रास होतो. अनुभवाने कुठे लक्ष घालायचे कुठे दुर्लक्ष करायचे हे ठरवता येते. आपण सर्वांचे भले करू शकत नाही सर्वांना आनंद देउ शकत नाही हे महत्वाचे. खूप मोठा विषय आहे. त्या वर सविस्तर लिहिता येईल

त्यामुळे इतर वाचकांच्या जीवनातली इमोशनॅलिटी जाईल, तुम्ही तो वाचून सोडून दिलात तरी हरकत नाही.

दान सत्पात्री असावे म्हणतात. संवेदनशील माणसांची अनेकदा फसवणूक होते व अपेक्षाभंग होतो व त्याला त्याचा त्रास होतो. अनुभवाने कुठे लक्ष घालायचे कुठे दुर्लक्ष करायचे हे ठरवता येते. आपण सर्वांचे भले करू शकत नाही सर्वांना आनंद देउ शकत नाही हे महत्वाचे. खूप मोठा विषय आहे. त्या वर सविस्तर लिहिता येईल

दान सत्पात्री असावे, भाव तोची देव या पूर्वापार संकल्पना साफ चुकीच्या आहेत, तो मोठा विषय नाही. कारण त्या संकल्पना इमोशनॅलिटी प्रमोट करतात आणि इमोशनॅलिटी हाच हृदयाला सर्वात मोठा धोका आहे. इमोशनॅलिटी प्रसंग अनावर करते आणि परिणामी हृदयाला त्रास होतो. भक्तीमार्गी इतरांना कितीही चांगले वाटले तरी ते कायम (आणि नाहक) दुसर्‍याचा विचार करतात; आणि मग भावनिक गुंतवणूकीत अडकून स्वतःचं आयुष्य दुर्धर करुन घेतात.

मी म्हटल्याप्रमाणे विचारांचं भावनेत रुपांतरण होण्यापूर्वीच सावरणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्ती वस्तुनिष्ठ होऊन प्रत्येक प्रसंग व्यवस्थित हाताळू शकते. विषय मोठा होण्याऐवजी सोपा होतो आणि तो जगण्याचा सुलभ मार्ग आहे.

मराठी_माणूस's picture

12 Nov 2020 - 11:30 am | मराठी_माणूस

विचारांचं भावनेत रुपांतरण होण्यापूर्वीच सावरणं आवश्यक आहे.

कालच खालील बातमी वाचली आणि तुमचा प्रतिसाद आठवला.

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/pmc-scam-depositors-det...

इथे लोकांचा काही दोष नसताना त्यांना त्रास होत आहे. ह्यात काही ज्येष्ट नागरीक असतील,कींवा इतरही. ज्यांचे पैसे अडकले आहेत आणि त्यामुळे त्यांना अनंत अडचणीना तोंड द्यावे लागत असेल. ते तर त्याच गोष्टीचा सतत विचार करत असतील (काहींनी जीव देखील गमावला आहे).

प्रसाद गोडबोले's picture

10 Nov 2020 - 1:54 am | प्रसाद गोडबोले

सर्वप्रथम , हार्ट अ‍ॅटॅक सारख्या भीषण संकटातुन सुखरुप बाहेर पडल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा !

माझ्या जवळच्या दोन व्यक्तींना मी हार्ट अ‍ॅटॅक मधुन सुखरुप बरे होताना पाहिले आहे आणि आता सर्वसामान्य आयुष्य जगताना ही पहात आहे. आपणही शतायुषी व्हा , आमच्या शुभेछ्हा आणि शुभाषिर्वाद आहेत !

आपण समाजाचे काही देणे लागतो .ते फेडण्याचा प्रयत्न करीन.हे जग सुंदर आहे.जाताना ते आणखी सुंदर करायचा प्रयत्न करीन.

आपण लेखनमालिका मात्र अत्यंत चुकीचा नोट वर संपवलीत असे अत्यंत विनम्रपणे नमुद करु इछितो.
आपण कोणाचे काही देणे लागत नाही. एखादे दिवशी असे फट्ट दिशी मेलो कि विषय संपला . बायका पोरं चार दिवस रडतील नंतर परत रुटीन ला लागतील. आपल्या वाचुन कोणाचेही काही अडुन रहाणार नाही जग जसं होतं आपल्या जन्माच्या आधी तसंच आहे अन नंतर तसेच रहाणार आहे , आपण अक्क्षरशः इन्सिग्निफिकन्ट आहोत ह्या जगात . त्यांमुळे जग सुंदर वगैरे करु असे म्हणणे म्हणजे आपण अजुन स्वप्नातुन जागेच झालो नाहीये अन झोपेतच बरळतो आहे असे काहीसे आहे.
आपल्या असण्याने किंव्वा नसण्याने ह्या दुनियेला शट्ट काही फरक पडत नाही, आणि दुनियेला म्हणजे अलम दुनियेला , अगदी आई बाप बायका पोरं मित्र मैत्रिणी पासुन ते अगदी किम कार्डेशियन , सनी लिऑनी पप्पु अन मोदी अन ज्यो बायडेन पर्यंत कोणालाही !

इये विषयी " लॅन्डस्केप विथ फॉल ओफ इक्रस " नावाचे एक अप्रतिम पेंटिंग आहे -
i
शेतकरी मस्त शेत नांगरत आहे, मेंढपाळ मेंढ्या पाळत आहे , दुरवरच्या शहरात बोटी ये जा करत आहे , अन ह्या सगळ्या प्रकारात कुठे तरी इक्रस आकाशातुन पडुन पाण्यात बुडुन मरत आहे, अगदी मासे पकडणार्‍यालाही बुडणार्‍या इक्रसची काही येक पडली नाही . इक्रसच्या असण्या नसण्याने दुनियेचे शश्प काही अडौन रहात नाही .

आहे हे असं आहे. आपण केवळ साक्षीस्वरुप बनुन आसपासच्या लोकांचे निरिक्षण करायला लागत तर आपल्यालाही हे लक्षात येईल - जग हे अखण्ड चाललेल्या नदीच्या प्रवाहासारखे आहे अन आपण बस त्यात वहात चाललो आहोत . जग सुंदर करेन अन कोणाचे काहीतरी देणे फेडेन वगैरे म्हणले काय अन न म्हणले काय , त्याने ह्या नदीच्या प्रवाहाला काहीही फरक पडत नाही . ३०व्या वर्षी मेलो काय कि साठाव्या काय कि शंभराव्या काय !

असो.

भावी लेखनासाठी शुभेच्छा! हसत रहा खुष रहा अन महत्वाचं म्हणजे मिपावर येत रहा. लिहित रहा इथे फुल्ल टाइमपास चालु असतो , मजा येते !

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2020 - 10:37 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. देशमुख

धन्यवाद. बरोबर आहे. मी फक्त का झाले कसे झाले याचे मनाला वाटले तसे विश्लेषण केले. त्यामूळे मन मोकळं झालं. ताण गेला. आता तो विषय ही डोक्यात नाही. शेअर करावे वाटले कदाचित कुणाला उपयोग झाला तर व्हावे म्हणून. बाकी काही नाही.बाकी आपलं आपलं जगणं आपले आपणच जगत असतो.इतर कुणाला ती जीवनशैली विचार कृती योग्य अयोग्य वाटल्याने फरक पडत नसतो. प्रत्येक व्यक्ती ची आपापली जडणघडण असते. संस्कार शिक्षण भवताल सहवास अनुभव इ.अनेक घटक कारणीभूत असतात त्यास. ती जडणघडण वा स्वभाव बदलणे अवघड असते. आपल्या विचार व कृतीचे आफण समर्थनच करत असतो. असो.
असाहाय्य अनाथ गरजू व्यक्तींनाव त्याचेसाठी काम करणारे लोकांना जमेल तशी तेवढी मदत करणे डोळसपणे व निरपेक्ष,मग त्याला मदत म्हणा की समाजाचे देणे फेडणे म्हणाहे मला भावते व त्यात मानसीकसमाधान मिळते. अशा व्यक्ती वत्यांचे खडतर जगणे मला अस्वस्थ करते. म्हणून जमेल तसेच जमले तेवढे जमेल त्या पध्दतीने करणे आवश्यक वा कर्तव्य वाटते. सुदैवाने काही अंशी सफल होतो. अर्थात त्यायासाठी सर्वस्व सोडायची गरज नसते. त्यामूळे सगळे आलबेल होउन आबादीआबाद होइल हा दावा नाही. मी क्षुल्लक आहे याची जाणीव आहेच. अफाट जगती जीव रज्जकण,याची जाणीव आहेच. मी गेल्रावर काही राहणार नाही हेही खरेच. जन पळभर म्हणतील हाय हाय. काही वेळा फसवणूक ही होते असो
आपण दिलेल्रा प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. विशेष करून त्या चित्रातून तर खूप मोठा महत्वाचा संदेश अथवा तत्वज्ञान मांडले आहे. आवडले. आपल्या सुचनाचा विचार करीन

Bhakti's picture

10 Nov 2020 - 6:58 am | Bhakti

*
एंजिओप्लास्टी नंतरचे आयुष्य,हा देवाने दिलेला बोनस /प्रसाद आहे, म्हणून स्विकारून आनंदाने जगेन.
चारही भाग वाचले सुंदर लिहलय साधं सोपं.. पहिला भाग उत्कंठावर्धक होता ,तिसरा भाग बराच अध्यात्मिक बाजूचा ,चौथा उहापोह करणारा..दुसरा भाग थोडा छोटा वाटला पण छान!!
आपले अभिनंदन आणि बोनस म्हणताय तर गरज नाहीये
मनाच्या गुंत्यातील किमान काही धागे उकलण्याचा ..

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2020 - 10:22 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
मी फक्त का झाले कसे झाले याचे मनाला वाटले तसे विश्लेषण केले. त्यामूळे मन मोकळं झालं. ताण गेला. आता तो विषय ही डोक्यात नाही. शेअर करावे वाटले कदाचित कुणाला उपयोग झाला तर व्हावे म्हणून. बाकी काही नाही.बाकी आपलं आपलं जगणं आपले आपणच जगत असतो.इतर कुणाला ती जीवनशैली विचार कृती योग्य अयोग्य वाटल्याने फरक पडत नसतो. आपणाला लिखाण आवडले. छान वाटले. धन्यवाद

सोत्रि's picture

10 Nov 2020 - 8:28 am | सोत्रि

नीलकंठ,
सर्वप्रथम बरे झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

हा भाग अतिशय समर्पक आणि मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणारा झाला आहे. तुम्ही केलेले चिंतन आणि मनन हे योग्य दिशेने झालेले असून 'आपण समाजाचे काही देणे लागतो .ते फेडण्याचा प्रयत्न करीन.हे जग सुंदर आहे.जाताना ते आणखी सुंदर करायचा प्रयत्न करीन.' ह्या अतिशय महत्वाच्या विचाराकडे जाऊन थांबले आहे.

आपण कोणाचे काहीही देणे लागत नसतो असे वाटत असले तरीही आपल्या असण्याचे काहीतरी प्रयोजन असते, मोठ्या जीग-सॉ पझलचा आपण एक तुकडा असतो. तो कसा फीट करायचा पझल मधे ते आपल्याला माहिती नसते पण 'आपण समाजाचे काही देणे लागतो .ते फेडण्याचा प्रयत्न करीन' हा विचारच आपल्याला योग्य दिशेकडे नेतो आणि आपल्या असण्याचा हेतू साध्य करतो आणि आपण पझलमधे फीट बसतो.

चंचल मन ,सतत निरर्थक विचारात भटकत असते.काय काय दडवून ठेवलेले असते आत ;आपणच,तिथे आपल्याही नकळत ते कळत नाही.दिसतही नाही. मनाच्या अंधार कोठडीत,भूतकाळातील बंदिस्त असलेली भुतावळ ,काही तत्कालीन कारणांनी मुक्त झाली,अन त्यांनी हल्लाबोल केला असे घडलेअसेल?

खूप विचारांती शेवटी वाटले; अहंकार,त्या पोटी उद्भवणारे गैरसमज,रागादी अनेक विकार, विखार,या सगळ्यांचा गुंता मनात झालेला असतो. तोच याच्या मुळाशी असेल का?.

&#127919

अखंड आणि अविरत विचारप्रवाहच सर्व भावनांचे आणि पर्यायाने विकारांचे कारण आहे. त्या विचारांना थांबवून विकारमुक्त होणं ही साधना तुम्ही आता बोनस मिळालेल्या आयुष्यात जोमाने करा. तसं करतना समाजाचे देणं आपसूकच फेडलं जात राहिल.

- (मनाच्या गुंत्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2020 - 10:20 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. देशमुख

धन्यवाद. बरोबर आहे. मी फक्त का झाले कसे झाले याचे मनाला वाटले तसे विश्लेषण केले. त्यामूळे मन मोकळं झालं. ताण गेला. आता तो विषय ही डोक्यात नाही. शेअर करावे वाटले कदाचित कुणाला उपयोग झाला तर व्हावे म्हणून. बाकी काही नाही.बाकी आपलं आपलं जगणं आपले आपणच जगत असतो.इतर कुणाला ती जीवनशैली विचार कृती योग्य अयोग्य वाटल्याने फरक पडत नसतो. तुम्हाला बहुतेक माझेविचार योग्य दिशेने आहेत असे वाटले. धन्यवाद.

बाप्पू's picture

10 Nov 2020 - 8:54 am | बाप्पू

छान वाटले हा भाग वाचून. तब्येतीची काळजी घ्या..

बाकी हा आजार का झाला त्याचा जास्त उहापोह करू नका. माझी जीवनशैली खरंच खूप छान आहे पण तरीही मलाच का हा आजार असा विचार करून आपण पुन्हा त्याच आजाराला निमंत्रण देताल. आजारावर ( किंबहुना अचानक आलेल्या शारीरिक संकटावर ) यशस्वीरीत्या मात करून तुम्ही वॉरियर आहात हे सिद्ध केलेय. कदाचित ह्यामध्ये तुमचे काही बरे वाईट देखील होऊ शकले असते पण तुमच्या चांगल्या लाईफ स्टाईल मुळे तुम्हाला काहीच झाले नाही असे देखील असू शकेल ना.!

मानसिक अडचणी प्रत्येकाला असतात आणि बऱ्याच वेळेला त्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे किंवा परिस्थितीमुळे येतात. पण बऱ्याच वेळेला या सर्व गोष्टी या आपल्या कंट्रोल च्या पलीकडे असतात. कदाचीत नशीब नशीब म्हणतात ते हेच. त्यामुळे जास्त भावनिक, सवेंदनशील न राहता जितके आयुष्य वाट्याला आलेय तितके बिन्दास्त आणि मनमोकळे पणाने जगणे हेच योग्य.

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2020 - 10:12 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. बरोबर आहे. मी फक्त का झाले कसे झाले याचे मनाला वाटले तसे विश्लेषण केले. त्यामूळे मन मोकळं झालं. ताण गेला. आता तो विषय ही डोक्यात नाही. शेअर करावे वाटले कदाचित कुणाला उपयोग झाला तर व्हावे म्हणून. बाकी काही नाही