पाती..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
12 Sep 2020 - 8:14 pm

आज घरी नारायण दशमी आहे. विदर्भातल्या एक-दोन जिल्ह्यात फारच कमी कुटुंबांमध्ये हा सण असतो. 90 टक्के विदर्भात हा प्रकार माहितीसुद्धा नसेल. आमच्या मूळ गावातल्या घरी आज सूर्यनारायणाची पूजा असते.कित्येक पिढयांपासून हे अखंड सुरू आहे. हळूहळू कुटुंब रुंदावलं, लेकरं गावाबाहेर पडलीत, संबंध कमी झालेत, तरी बहुतांश कुटुंबीय आपापल्या घरी नारायण दशमी करतात. हे व्रत तसं कडक आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला कूळ बदललं तरी हे व्रत करावं लागतं.वडिलांच्या आत्याबाईंना वयाच्या पंच्यात्त्तरीपर्यंत नारायण दशमी करताना मी बघितलेलं आहे. घरातले अतिवृद्ध, गर्भवती स्त्रिया,पेशन्ट्स आणि लहान मुलं ह्यांना नैसर्गिक सूट मिळते.

देवावर श्रद्धा असली तरी देवाधर्माचं मी फार काही करत नाही. पण पिढ्यांपिढ्या सुरू असलेली नारायण दशमी कळत्या वयापासून मी आणि इतर भावंडं इमानेइतबारे करतो.

आता ह्यात काय विशेष असा प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तर पुढं दिलंय..

जोपर्यंत पोटोबा व्यवस्थित सुरू आहे तोपर्यंत आपल्याला कशावरही आक्षेप नसतो. भरल्यापोटी मी प्रतिगामी,पुरोगामी,संघी,सनातनी,धर्मनिरपेक्ष,अंनिस समर्थक असा सर्वकाही आहे. पोटातल्या भुकेवर काही आलं की भूमिका बदलते.

आणि नारायण दशमी करताना नेमकं तेच होतं.

आज घरी नॉर्मल भाजी पोळीचा स्वयंपाक नसतो. तवा,कढई वापरता येत नाही. तेल,तिखट,मसाला इतकंच काय तर मिठसुद्धा चालत नाही.

मग खायचं काय??

"पाती"

पाती कशी करतात?

कणकेत फक्त पाणी टाकून गोळा भिजवायचा. त्याला पोळीसारखं लाटून पाण्याच्या वाफेवर उकडायचं. ह्यातून जे काय तयार होईल त्याला पाती ऐसें नाव!

ही पाती मग सकाळ-संध्याकाळ दूध,दही,तूप आणि साखर ह्यासोबत खायची. सोबत फळं खाता येतात. पात्या किती खायच्या ह्यावर बंधन नाही. पण मुळात तीनपेक्षा जास्त पात्या आत ढकलणे शक्य नाही.आणि कितीही ढकलल्या तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही!

नारायण दशमी आहे!
वर्षातून एकदाच तर येते!
परंपरा! प्रतिष्ठा!
वगैरे बोलून दिवस ढकलल्या जातो.
पण संध्याकाळ?

दिन ढल जाये हाय संध्याकाळ ना जाये..
रोटी ना आये, उसकी याद सताये...

अशी अवस्था होते.

रात्री नऊ वाजेपर्यंत मी नास्तिकतेकडे झुकलेला असतो.पण पूर्ण नास्तिकात रूपांतर होण्याआधी निग्रहाने चार पात्या खाऊन मी अंधारगुडुप होऊन जातो..!

झोपेत दचकून उठतो. घरात एखादी पाती शिल्लक तर नाहीये ना अशी शंका येते. कारण नियमाप्रमाणे पाती संपल्याशिवाय दुसरा स्वयंपाक करता येत नाही. मग पाती गाईला चारावी लागते. त्यासाठी सकाळी उठून शहरात गाय शोधा! अश्यावेळी गायी पण लपून बसतात.चुकून सापडल्याच तर पाती बघून तोंड फिरवतात. शेवटी त्यांनाही चॉईस आहेच ना!

मला दरदरून घाम फुटतो. मग आठवतं. शेवटची पाती आपणच कोंबलीये.

परत अंधारगुडूप होतो.

आणि स्वप्नात गुणगुणतो,

तू किसी दशमी सी गुजरती हैं..
मैं किसी पाती सा..उकडा जाता हू !!

समाप्त

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2020 - 8:37 pm | प्रकाश घाटपांडे

मस्त.यावज्जीवेत सुखं जीवेत बाकी सब झुट

रातराणी's picture

13 Sep 2020 - 4:32 am | रातराणी

हाहा माहितीये हा प्रकार. आज्जी लोकांचा आवडता पदार्थ. पोळी लाटुन तिची घडी करुन वाफवायची आनि त्यावर गरम गरम वरण घालुन खायचं. महान! कसे खातात देव जाणे.

टवाळ कार्टा's picture

13 Sep 2020 - 4:36 am | टवाळ कार्टा

=))

कठीण आहे हो. पण पाती वाफेवर शिजवायला सूर्यनारायणाने अनुमति दिली याबद्दल आभार मानायला हवेत.
( या पाती आमटीत शिजवल्या की चकोल्या/दाळढोकळी/वरणफळं. थोडे सुसह्य आणि चविष्ट ?)

Gk's picture

13 Sep 2020 - 7:41 am | Gk

छान