चहा वालं प्रेम

सहज सिम्प्लि's picture
सहज सिम्प्लि in जनातलं, मनातलं
25 Jun 2020 - 10:38 pm

अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आलेली ऋतु लॉकडाऊन मुळे भारतातच अडकली होती. आपलं तिकडचं सगळं काम अर्धवट सोडून आल्यामुळे घरी राहूनही तिचा अर्धा जीव सतत सातासमुद्रापलीकडे लागून राहिला होता. ऋतु ही पंचविशीच्या उंबरठ्यावरची एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मोहन काका आणि अरुणा काकूंची एकुलती एक लाडकी कन्या. काकूंची आई सुध्दा सोबतच राहायची. खूप वयस्क असूनही आजीबाई बोलण्यात अगदी ताठ होत्या. इन्जिनीअर झालेली ऋतु काही वर्षापूर्वी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. काका काकूंनी मोठ्या हिमतीने, आपल्या काळजावर दगड ठेऊन आपल्या लेकीला दूर पाठवलं खरं पण तेव्हापासून काकू मात्र हरवल्यागत वागायच्या. त्यांची लेकच त्यांचं विश्व होती. गंमत म्हणजे एरवी अगदी खंबीर असणाजे काका सुध्दा लेक दूर गेल्यापासून हळवे झाले होते. पोरीने आमच्या कष्टाचं चीज केल हे सांगताना त्या दोघांना वाटणारा अभिमान लोकांना दिसायचा पण आतली घालमेल मात्र फक्त ते दोघंच समजू शकत होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर लेक घरी आल्यामुळे काका, काकू आणि आजी फारच खूष होते. त्यात लॉकडाऊन हा त्यांच्यासाठी जणू इष्टापत्तीच ठरली. नाहीतर ठरवूनही लेकीचा एवढा सहवास काही मिळाला नसता. सगळेच मजा-मस्ती करत आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत होते. सुरुवातीला फारच लाड होत होते. पण जसजसा लॉकडाऊन वाढत गेला तसतसे सगळेच चिंतेत पडले होते. प्रत्येकाचे आपापल्या परीने वेगवेगळे विचार चालू होते आणि त्यातून होणारी चिडचीड शेवटी काही वेळा एकमेकांवर निघायला लागली होती.

अशाच एका दिवशी ऋतु सकाळी काका काकूंबरोबर चहा पित बसली होती. काही वेळाने लक्षात आलं की काकूंना बर वाटत नव्हतं. दीड-दोन महिने सगळं काम एक हाती असल्याने त्यांना भागवटा आला होता. तिने काकूंना आराम करायला लावला आणि त्या दिवशी अख्खं घर तिने आणि काकांनी सांभाळलं. पण दोन दिवस उलटल्यावर देखील काकूंचा थकवा जाईना, उलट आणखी अशक्तपणा आणि कणकण वाटू लागली. रोज वाचलेल्या बातम्यांमुळे काकू आपल्यला काहीतरी झालं या कल्पनेनेच घाबरून गेल्या होत्या. कसंबसं समजावून काका त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. निदान हे झालं की त्यांना कामाचा खूप ताण आला असल्याने काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. आपण अंथरूणावर बसलो तर घर कोण सांभाळ्णार हा विचार काही केल्या काकूंच्या मनातून जाईना. पण ऋतुने संपूर्ण जबाबदरी घेतली आणि पूर्ण बरं वाटेपर्यंत घरकामात अजिबात लुडबुड करायची नाही अशी सक्त ताकीद काकूंना देण्यात आली. दोन महिने घरी राहून घरकामाचा किती पसारा असतो हे एव्हाना काकांना पुरतं जाणवलं होतं. त्यामुळे याआधी स्वयंपाकघराचा उंबरठा न ओलांडणारे काका आजकाल काकूंना अगदी भांडी घासण्यापासून ते केर-लादी करण्यापर्यंत जमेल ती सगळी मदत करू लागले होते. आणि आता तर लाडकी लेक एकटी घर सांभाळणार म्हटल्यावर काका कामात अजूनच लक्ष घालू लागले.

ऋतु साठी हे सगळ जरा नवीन होतं. म्हणजे एवढ्या वर्षात आपले बाबा आता हळवे होऊ लागले आहेत हे जरी तिला जाणवलं असलं तरी असा बदललेल्या बाबांचा एवढा सहवास हा तिच्या साठी वेगळाच अनुभव होता. पण हा चांगला बदल तिला आवडला होता. आजीचा जीव सुध्दा घरात चाललेली धावपळ बघून कोपर्यातच तुटत होता. पण वयाने हातपाय थकल्याने उघड्या डोळ्याने बघण्यावाचून तिच्या कडे काही पर्याय नव्हता. बाबांच्या मदतीने ऋतु तिला जमेल तसं सगळं सांभाळत होती. पण कधीही स्वस्थ न बसणार्या काकूंना मात्र हा आराम काही केल्या पचत नव्हता. त्यांना सतत अस वाटत होतं की आपल्यामुळे सगळ्यांना काम पडतंय. त्याही पेक्षा आपल्या चुलीला आपला हात लागत नाहीये हे त्यंना राहून राहून खात होतं. शेवटी जरा बरं वाटू लागताच काकूंनी कामात लुडबूड करायला सुरूवात केली आणि हळूहळू सगळी सूत्र आपल्या हाती घेतली. ऋतुने मात्र पक्कं ठरवलं होतं की आईला आराम करायला लावायचा. पण काकू काय कोणाला बधणार्या नव्हत्या. अखेर तिलाच पडती बाजू घ्यावी लागली. काका सुध्दा दुरून हा सगळा प्रकार बघत होते. “आम्हाला काय हौस आहे का गं? पण तुला आत्ता आमची गरज आहे ना, मग का ऐकत नाहीस तू आमचं?” पण सामन्यतः गृहमंत्र्यांपुढे कोणाचं चालत नाही हा निमय त्यांनाही लागू होताच.
हे उस्नं आणलेलं अवसान फार टिकलं नाही आणि काकू पुन्हा दमल्या. आता मात्र ऋतु आई वर चिडली आणि तिने अखेर बाबांना पाचारण केलं. इतके दिवस शांत असलेल्या काकांनी सुध्दा आता सूर बदलला. “तू ठरवलंच आहेस का आता आमचं ऐकायचा नाही म्हणून."
काकू म्हणाल्या “पण तुम्ही लोक मला का ओरडताय? तुम्हाला काम पडतंय ते बघवत नाही मला. म्हणून मी जाते आपली मदतीला. त्यात एवढा चिडण्यासारखं काय आहे? आणि तसंही मी नसले की सगळा पसारा होतो स्वयंपाकघरात”
“अत्ता काम होणं महत्वाचं की पसारा? आणि आम्ही प्रयत्न करतोय नं सगळा आवरायचा. आता तुझ्यासारखं आम्हाला जमेल अशी अपेक्षा नको करूस.”
वाद वाढला. ऋततुला आता आपण बाबांना सांगून चूक केली असं वाटू लागलं. “जाऊदे न बाबा. बघू आपण काय ते.”
“तू थांब जरा. तुला माहीत नाही. नेहमीच आहे हे हीचं. अजिबात काळजी नाही घ्यायची. ऐकायचं नाही कोणाचं”

ऋतुला आता मात्र खरंच चिंता वाटू लागली. आपण उगाच बोललो. आपल्यामुळे वाद झाले याची खंत वाटू लागली. त्यानंतर दिवसभर वातावरण जरा गरमच राहिलं. काकू त्या दिवशी अजिबात फिरकल्याही नाहीत स्वयंपाकघरात. गुपचुप आपल्या सोफ्यावर बसून होत्या. काका सुध्दा रात्री काही न बोलता लवकर झोपी गेले. आता हे काही लवकर संपत नाही असं ऋततुला वाटलं.
एरवी दहा हाका मारूनही न उठणारी ऋतु दुसर्या दिवशी सकाळी स्वतः वेळेत उठली. आई बाबांची समजूत काढायची असं तिने ठरवलं. सकाळी सकाळी सगळ्यांचा मूड फ्रेश करायचा रामबाण उपाय म्हणजे कडक गरम गरम चहा. ती स्वयंपाकघरात गेली. पण तिथे चित्र वेगळंच होतं. काका काकू अजूनही एकमेकांशी बोलत नाहीत हे तिने पाहिलं. पण काकू गॅस जवळ उभ्या होत्या. चहाचा भांडं गॅस वर होतं. काकांनी काही न बोलता पाणी आणून दिलं. काकूंनी नेहमीच्या अंदाजाने पाणी घातलं आणि गॅस लावला. काकांनी एकीकडे दूध तापत ठेवलं. आणि चहा आणि साखरेचा डबा आणून काकुंपुढे ठेवला. काकूंनी पुन्हा आपल्या अंदाजाने सगळं घातलं.

काकांनी डबे उचलून ठेवले आणि चहा उकळण्याची वाट पाहू लागले. काकू काही न बोलता मुकाट्याने बाहेर पडल्या आणि पुन्हा पलंगावर जाऊन बसल्या. ऋतु आपल्या बाबांजवळ गेली “अहो बाबा मी केला असता न चहा”.
“अग असूदे. मी रोज नाही का करत गेले काही दिवस. तू बस. मी आणतो चहा घे आणि मग लाग कामाला.”
ऋतु बाहेर गेली. पण तेव्हा तिला अचानक एक गोष्ट जाणवली. इतके दिवस काकूंना बरं नसूनही सकाळच्या चहाची चव बदलली नव्हती. दिवसभराचं काम जरी ती करत असली तरी तिला सकाळी उठल्यावर चहा गेले काही दिवस काका देत होते. पण आज तिला कळलं हा सकाळचा चहा कसा बनतो. न राहवून ती थेट आपल्या आई जवळ गेली. तिला बघून काकू म्हणाल्या, “आज लवकर उठलीस बाळा. बस. बाबा चहा आणतील.”
“आई. खरं सांग. चहा तू केलास ना. आणि इतके दिवस बरं नसताना सुध्दा चहा मात्र तूच करत होतीस. बाबा फक्त तो आणून द्यायचे. आणि त्यांनी तुला करू कसं दिलं. आमचं ठरलं होतं की तुला काही काम करू नाही द्यायचं म्हणून.”
काकू हसल्या आणि म्हणाल्या, “त्याचं काय आहे नं बाळा, तुझ्या बाबांना माझ्या हातच्या चहाशिवाय सकाळ झाल्यासारखी वाटत नाही. सगळ्यांना सवय आहे तशी. आणि बाकी दिवस काढता गं तुम्ही. पण सकाळ चांगली झाली पाहिजे ना. म्हणून त्यांनी सुध्दा मला अडवलं नाही.”
तेवढ्यात काका चहा घेऊन आले. काकू हसल्या आणि त्यांनी चहा घेतला. कोणी काही बोललं नाही. चहा झाल्यावर काका कप बशी घेऊन आत गेले. काकू ऋतुला म्हणाल्या, “अगं यांचं बोलणं फार मनावर नाही घ्यायचं. मला माहित आहे गं की तुम्ही सगळे माझ्याच काळजीपोटी बोलता मला. पण राहवत नाही गं. काय करणार. असच असतं हे. यातच गंमत असते.”

आपल्या आईचे ते शब्द ऋतुच्या मनाला भिडले. अमेरिकन कल्चरची सवय होऊ लागलेल्या ऋतुला हे असं मूक प्रेम पहिल्यांदाच दिसलं होत. ती भारावून गेली. आपल्या आई बाबांची लव स्टोरी ती लाइव पाहत होती. या आधी ते समजण्यासाठी ती लहान होती आणि जेव्हा कळतं वय झालं तेव्हा ती लांब गेली. हि पहिलीच संधी मिळाली होती तिला आपल्या आई-बाबांमधले गोड नातं समजून घ्यायची. दर वेळी प्रेम व्यक्त करण्यासाठी काही विशेष करायची गरज नसते. चहा वालं प्रेम सुध्दा पुरेसं असतं गोडवा जपायला.
-ऋतु

मुक्तक

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

25 Jun 2020 - 11:47 pm | विजुभाऊ

छान आहे कथा

सहज सिम्प्लि's picture

26 Jun 2020 - 12:05 pm | सहज सिम्प्लि

धन्यवाद विजुभाऊ!

रातराणी's picture

26 Jun 2020 - 12:30 pm | रातराणी

सुरेख, आवडली कथा!

चौथा कोनाडा's picture

26 Jun 2020 - 1:34 pm | चौथा कोनाडा

व्वा, क्या बात है ! कथा आवडली !
ही आई-बाबांची लाइव लवस्टोरी महण्जे साधेपणाची सुंदरता घेऊन आलेली सुरेख कथा !

dhananjay.khadilkar's picture

26 Jun 2020 - 2:10 pm | dhananjay.khadilkar

फार छान कथा

कथा छान. सगळ्यांनीच थोडीनथोडी अनुभवली आहेच.

सिरुसेरि's picture

26 Jun 2020 - 4:59 pm | सिरुसेरि

सुरेख कथा . +१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2020 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नव्या काळातली चहाची कथा आवडली.

-दिलीप बिरुटे

वीणा३'s picture

26 Jun 2020 - 9:05 pm | वीणा३

आवडली गोष्ट.

Cuty's picture

27 Jun 2020 - 5:54 pm | Cuty

आवडली.

सहज सिम्प्लि's picture

28 Jun 2020 - 10:13 am | सहज सिम्प्लि

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद!

रीडर's picture

29 Jun 2020 - 5:30 am | रीडर

खूप छान

महासंग्राम's picture

1 Jul 2020 - 2:19 pm | महासंग्राम

भारी कथा पण एकच प्रश्न आहे ऋतू ला वर्क फ्रॉम होम नव्हतं दिलं का कंपनीने

सहज सिम्प्लि's picture

2 Jul 2020 - 2:06 pm | सहज सिम्प्लि

वर्क फ्रॉम होम सोबत 'होम-वर्क' करावंच लागतं की.