भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: - प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
17 Jun 2020 - 5:26 pm

या प्रकरणात भगवान रमण महर्षींचे योगिक प्रक्रियेविषयीचे मार्गदर्शन आपण जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

ढोबळमानाने पाहता आत्मा किंवा ईश्वरी सत्तेपासून आपण विभक्त झाल्याचे (वियोग) जाणवत असल्यामुळे देह आणि मनाला वळण लावण्यासाठी नानाविध पद्धतींचा अवलंब करून आत्मतत्वाशी किंवा ईश्वरी सत्तेशी पुन्हा एकदा संलग्न होणे किंवा 'योग' साधणे हे योगमार्गी साधकांचे ध्येय असते. अंदाजे २००० वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी रचलेल्या योगसूत्रांवर आधारित योगपद्धती 'राजयोग' या नावाने प्रसिद्ध आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे आठ टप्पे असलेला अष्टांगयोग तसा सर्वज्ञातच आहे. या पैकी कित्येक टप्प्यांचा इतर साधनपद्धतींमधेही अंतर्भाव होत असला, तरी हठयोग आणि प्राणायामामुळे राजयोगाला त्याची वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. हठयोग साधत असताना देहशुद्धीविषयक अतिरंजित कल्पना साधकाला पछाडून टाकत असल्याने योगविषयक प्रश्नांची उत्तरे देताना भगवान श्री रमण महर्षी हठयोगाविषयी नापसंती व्यक्त करत असत. अध्यात्मिक प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी मनावर ताबा मिळवणे ही एकमेव गोष्ट अत्यंत आवश्यक आहे हे महर्षींंच्या उपदेशामागचे मुख्य सूत्र होते. शारिरीक आरोग्य प्राप्ती किंवा देहशुद्धीवर फाजील भर देत असलेल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्यासाठी ते आपल्या अनुयायांना कधीच प्रोत्साहन देत नसत. प्राणायामाबद्दल मात्र त्यांचे मत अनुकूल होते. महर्षी सांगत असत की इतर पद्धतींनी मनःसंयम साधता येणे ज्यांना अवघड वाटते, अशा साधकांसाठी प्राणायामाची मदत घेणे उपयुक्त ठरू शकते. मात्र एकंदर पाहता प्राणायाम ही साधनेच्या अगदी प्रारंभिक टप्प्यातली, मर्यादित उपयुक्तता असलेली तसेच अनिवार्य नसलेली साधनपद्धती आहे असेच महर्षींचे मत होते.

(नैतिकता, ध्यान तसेच समाधीबद्दलची महर्षींची मते पारंपारिक राजयोग्यांपेक्षा वेगळी होती, त्यांचा उहापोह या प्रकरणात केलेला नाही.)

राजयोगाव्यतिरिक्त कुंडलिनी योग ही आणखी एक साधनपद्धती प्रसिद्ध आहे. शरीरात असलेल्या वेगवेगळ्या चक्रांवर ध्यान करून कुंडलिनी शक्तीला चेतवण्याचा प्रयत्न करणे हा कुंडलिनी योगाच्या साधकांचा मार्ग आहे. मूलाधार चक्रापासून सुरूवात करत मणक्यात असलेल्या सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्तीला उर्ध्वगामी करत मस्तकात स्थित असलेल्या सहस्त्रार चक्रापर्यंत नेणे हे साधकाचे ईप्सित असते. कुंडलिनी शक्ती सहस्त्रार चक्रापर्यंत पोचली की साधकाला आत्मसाक्षात्कार घडतो अशी कुंडलिनी योगाची धारणा आहे. महर्षींना कुंडलिनी शक्ती तसेच चक्रे अस्तित्वात आहेत हे मान्य होते. महर्षी मात्र असे प्रतिपादन करत असत की सहस्त्रार चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती पोचल्याने आत्मसाक्षात्कार घडत नाही. सहस्त्रार चक्राला ओलांडून अमृतनाडीमधून (अमृत नाडीलाच परा नाडी किंवा जीवन नाडी ही नावे दिलेली आहेत) कुंडलिनी शक्ती छातीत उजव्या हाताच्या बाजूला असलेल्या हृदयचक्रापर्यंत पोचली की आत्मसाक्षात्कार घडतो असे महर्षींचे मत होते.

(टीपः हृदय या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथे उल्लेख केलेले चक्र हा शारिरीक अवयव नाही. शारिरीक अवयव डाव्या बाजूला असतो. हृदयचक्र हा एक चैतन्य स्त्रोत आहे. महर्षी या चक्राविषयी अगदी सुलभ असे स्पष्टीकरण देत असत. कुठल्याही व्यक्तीला आपण अंतःकरणापासून अभिव्यक्त होतो आहोत असे दर्शवायचे असेल, किंवा एखादी गोष्ट आपल्या अंतःकरणात खोलवर परिणाम करून गेलेली आहे असे दर्शवायचे असेल, तर नकळत तिचा हात छातीच्या उजव्या बाजूकडे जातो. एखादी गोष्ट छातीठोकपणे सांगतो असे म्हणताना आपली मूठ छातीवर उजव्या बाजूलाच आपटली जाते. आत्मतत्व जरी स्थानबद्ध किंवा कालबद्ध नसले, तरी त्या तत्वाचे प्रत्येक व्यक्तीला जन्मजात जाणवत असलेले किंवा सहजस्फूर्तिने कळणारे अधिष्ठान हृदयचक्रच आहे. असो.)

कुंडलिनी योग अनावश्यक तसेच संभाव्यतः धोकादायक असल्याने आपल्या अनुयायांना या मार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश महर्षी कधीच देत नसत. आत्मविचाराने तसेच भक्ती आणि समर्पणभावाने कुंडलिनी शक्ती साधकाच्या नकळत अंतिम टप्प्यापर्यंत पोचत असल्याने त्या दृष्टीने अन्य साधनपद्धतींचा अवलंब करणे अनावश्यक आहे या मतावर महर्षी ठाम होते.

कर्मयोग ही आणखी एक साधनपद्धती हिंदू जनमानसात प्रचलित आहे. निस्वार्थ भावनेने गरजूंची सेवा करून तसेच कर्मफलावर आपला अधिकार नाही हे माहित असल्याने पूर्वनिर्धारित फलाकांक्षेचा अट्टाहास न धरता (फळाची अपेक्षाच न धरता नव्हे!) आपल्याच चित्तशुद्धीसाठी परोपकार करून आपली अध्यात्मिक उन्नती साधणे असे या योगाचे स्वरूप आहे. भगवद्वीतेत देखील या योगाची महती सांगितलेली आहे. महर्षी मात्र शक्यतो आपल्या भक्तांना या मार्गाचा अवलंब करण्यापासून परावृत्त करत असत. सत्कृत्ये करू पाहणारा 'मी' तसेच माझ्या मदतीची गरज असलेले असहाय्य 'इतरेजन' निरंतर अस्तित्वात आहेत या गृहीतकावर हा मार्ग आधारलेला असल्याने तथाकथित 'मी' बलवान होण्याची तसेच साधक द्वैतभावात कायमचा अडकून पडण्याची शक्यता या मार्गाचा अवलंब करत असताना बळावते. ज्ञान, भक्ती किंवा राजयोग या तिन्हीपैकी कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्यासाठी एखादा साधक असमर्थ आहे असे दिसले, तर महर्षी त्याला/ तिला चित्तशुद्धी साधण्यासाठी कर्मयोगाची उपासना करण्यासाठी प्रोत्साहन देत असत. एखाद्या व्यक्तीचा पिंड ज्ञानमार्ग किंवा भक्ती/ समर्पणभावासाठी अनुकूल नाही, तसेच वृद्धत्व किंवा शारिरिक दुर्बलतेमुळे राजयोगाचा अवलंब करण्यासाठी देखील ती सक्षम नाही असे महर्षींच्या ध्यानात आले, तर अशा एखाद्या विरळ्या साधकासाठीच त्यांनी कर्मयोग राखून ठेवलेला होता. 'प्रयत्नांती परमेश्वर' या न्यायाने कर्ममार्गाचा अवलंब करताना चित्तशुद्धी होत जाते. त्या योगे हळूहळू अहंता आणि वासना रहित निर्भेळ आनंदाचा अनुभव मिळायला सुरूवात होते. असे घडले की साधक आपोआप आत्मविचार किंवा भक्ती/ समर्पणासाठी पात्र होत जातो.

कर्मयोग यथास्थितपणे साधायचा असेल तर 'मी' इतरेजनांवर उपकार करतो आहे अशी भावना लेशमात्रही न ठेवता आपण करत असलेल्या सत्कृत्यांचे आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर असलेले अवांछित परिणाम तसेच सत्कृत्यांमधून होणारी अपेक्षित/ अनपेक्षित फलप्राप्ती याविषयी तटस्थ राहून कर्ममार्गाचे आचरण करावे लागते असे महर्षी ठामपणे सांगत असत. 'मी कर्ता आहे' ही भावना हळूहळू लोप पावल्याने उपरनिर्दिष्ट दोन्ही गोष्टी साध्य होतील हे महर्षींना मान्य असले तरी एकंदर पाहता कर्मयोग या विचारसरणीला ते मनःपूर्वक पाठिंबा देत नसत असेच दिसून येते.

प्रश्नः योग या शब्दाचा अर्थ होतो 'जोडले जाणे'. मला नेहेमी प्रश्न पडतो की काय जोडले जाते आणि ते कशाशी जोडले जाते?
रमण महर्षी: अगदी बरोबर. योगात आधी विभक्तपणा असणे आणि नंतर एखादी गोष्ट (उदा. जीव) आधी पृथकतेने नांदत असलेल्या अन्य गोष्टीशी संलग्न होणे (उदा. शिव) या धारणेचा अंतर्भाव असतो. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. तो असा की साधकाने नेमक्या कोणत्या दोन विभक्त गोष्टींचा 'योग' साधण्यासाठी साधना करावी? तुम्ही साधक आहात आणि कुठल्यातरी वेगळ्या गोष्टीशी तुम्हाला संलग्न व्हायचे आहे; हे गृहीतक मानून तुम्ही पुढे जात असाल तर तुमच्यापेक्षा वेगळी, विभक्त आणि पृथकतेने नांदणारी अशी एखादी गोष्ट अस्तित्वात असायला हवी. तुमचे स्वरूप मात्र तुमच्या अगदी निकट असते आणि तुम्हाला सतत त्याची सजग नसली तरी कळात नकळत जाणीवही असते. त्याचा अंतर्यामी शोध घ्या आणि त्यात विलीन होऊन जा. तुमचे स्वरूपच अनंताला व्यापून टाकणारे आहे अशी प्रचिती तुम्हाला येईल, मग विभक्त असण्याची जाणीव असेलच कुणाला? त्यामुळे योग साधण्याचा प्रश्नच उरणार नाही.

प्रश्नः प्राणायामाचे तीन टप्पे असतात - श्वास घेणे, श्वास सोडणे आणि श्वास रोखून धरणे. श्वासाचे या प्रकारे नियमन कसे करावे?
रमण महर्षी: देहतादात्म्याचा पूर्णपणे त्याग करणे हेच खरे श्वास बाहेर सोडणे (रेचक), "मी कोण आहे" या सनातन प्रश्नाचे उत्तर शोधत अंतर्यामी लीन होऊन जाणे हेच खरे श्वास घेणे (पूरक) तसेच 'तत्वमसि' भावाने आपल्या सच्चिदानंद स्वरूपात स्थिर होऊन जाणे हेच श्वास रोधून धरणे (कुंभक) आहे. हाच खरा प्राणायाम आहे.

प्रश्नः शक्ती जागृत करण्यासाठी योगमार्गाने प्रयत्न करत असलेल्या साधकांमधेच कुंडलिनी शक्तीची जागृती घडून येते, की (नवविधा) भक्ती आणि प्रेमाच्या मार्गाचा अवलंब करत असलेल्या साधकांना देखील ते साध्य करता येते?
रमण महर्षी: कुंडलिनी शक्ती कोणाकडे नसते? तिचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर तिलाच 'अखंडाकार वृत्ती' किंवा 'अहं स्फुरणा' असे म्हणतात. तुम्ही कुठल्याही मार्गाचा अवलंब केला तरी कुंडलिनी शक्ती किंवा जगदंबा सतत तुमच्या सोबत असते. फरक असेलच तर तो तुम्ही तिला कुठले नाव देता यात असतो.

प्रश्न: ज्ञानी व्यक्ती फक्त तिच्याच मार्गाचे अनुसरण करत असलेल्या साधकांना मदत करू शकते की योगासारख्या अन्य मार्गांचा अवलंब करत असलेल्या साधकांनाही ती मदत करू शकते?
रमण महर्षी: 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या न्यायाने अध्यात्मिक साधकांनी कुठल्याही मार्गाचा अवलंब करायचे ठरवले तरी ज्ञानसिद्ध व्यक्ती सगळ्यांनाच मदत करू शकते. या बाबतीत शंकेला जागाच नाही! एक दाखला दिल्याने हे स्पष्ट होईल. समजा एखादा पर्वत आहे. त्या पर्वताच्या शिखरावर चढाई करण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्ञानी ज्या मार्गाने शिखरावर पोचला त्याच मार्गाने लोकांनी यावे असे तो सांगेल, तर काहींना ते रूचेल. काही जणांना ते अवघड वाटेल तर काहींना ते मुळीच रूचणार नाही. ज्ञानी स्वतः ज्या मार्गाने गेला त्या आणि त्याच एकमेव मार्गाने मार्गक्रमण करायचा आग्रह ज्यांना तो मार्ग रूचत नाही अशा साधकांपाशी धरला, तर त्यांना पर्वतारोहण करणे अशक्यप्राय होऊन जाईल. साहजिकच नानाविध मार्गांनी मार्गक्रमण करत असलेल्या साधकांना, मग तो मार्ग कुठलाही असो, ज्ञानी मात्र नक्की मदत करू शकतो. त्याचे कारण असे की अर्धा रस्ता पार करून आलेल्या वाटसरूंना इतर मार्गातल्या गुणदोषांची आणि खाचखळग्यांची इत्यंभूत माहिती नसली, तरी शिखरावर आसनस्थ झालेल्या ज्ञान्याच्या नजरेच्या टप्प्यात चहूबाजूंनी मार्गस्थ झालेले साधक सहजगत्या येत राहतात. त्यामुळे वाटेत फसगत होऊ नये या दृष्टीने चकवे चुकवण्यासाठी किंवा दुखापत होऊ नये या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी यथायोग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता ज्ञानी व्यक्तीमधे असते. पर्वताचे शिखर किंवा सगळ्या साधकांचे ध्येयदेखील 'एकच' तर असते!

प्रश्नः भगवान नेहेमी कुठल्या आसनात बसलेले असतात?
रमण महर्षी: कुठल्या आसनात? (स्मितहास्य करून) हृदयात स्थित असणे या आसनात. ज्या आसनात चित्तवृत्ती प्रफुल्लित राहिल आणि जे सुखावह वाटेल असेच माझे आसन आहे. यालाच सुखासन असे म्हणतात. हृदयस्थ आणि सहजसिद्ध असलेले हे आसन शांतीस्वरूप आहे. ते मन सतत प्रसन्न ठेवते. (मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण). या आसनात स्थित झालेल्या व्यक्तीला अन्य कुठल्याही आसनाची गरज पडत नाही.

प्रश्नः अर्जुनाला युद्धाला सामोरे जाण्यासाठी प्रवृत्त केलेले असल्याने भगवद्वीतेत कर्मयोगावर भर दिलेला दिसतो. सतत कर्तव्यतत्पर राहून तसेच्ग कित्येक आव्हाने परतवून लावत अत्यंत अवघड गोष्टी साध्य करून श्रीकृष्णाने स्वत:च कर्मयोगाचा एक जिवंत आदर्श सगळ्यांपुढे उभा केलेला दिसतो.
रमण महर्षी: भगवंताच्या उपदेशाची सुरूवातच देह हे तुमचे खरे स्वरूप नाही आणि त्यामुळेच कुठल्याही कर्माचे कर्तृत्व तुमच्याकडे येत नाही असे सांगून होते हे अवश्य लक्षात घ्यायला हवे.

प्रश्नः या उपदेशाचा अर्थ काय होतो?
रमण महर्षी: याचा असा अर्थ होतो की मी कर्ता आहे हा भाव न ठेवताच प्रत्येकाने आपले विहित कर्म केले पाहिजे. अहंता शून्यवत असलेल्या अवस्थेतही कर्म सहजतेने घडतच राहते. विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठीच प्रत्येक व्यक्तीचे देहस्वरूपात प्राकट्य झालेले असते; आणि ती व्यक्ती स्वत:ला कर्ता मानत असो अथवा नसो तिच्या जीवनामागचा मूळ उद्देश प्रारब्धवशात साध्य करून घेतला जातो.

प्रश्नः मग कर्मयोगाचा अर्थ काय आहे? कर्मफलाचा त्याग करणे की कर्ताभावाचा त्याग करणे?
रमण महर्षी: कर्मयोगाचा खरा अर्थ असा आहे की हा योग साधत असताना साधक आपल्या हातून घडत असलेल्या कर्माचे कर्तृत्व स्वतःवर ओढवून घेत नाही. सगळी कृत्ये (त्याच्या स्वधर्मानुसार) आपोआप घडत जातात.

प्रश्नः कर्म करताना फलप्राप्तीविषयी उदासीन असणे असा त्याचा अर्थ होतो का?
रमण महर्षी: कर्म करत असताना कर्ताभाव जागृत असेल तरच कर्मफळाविषयीचा प्रश्न उपस्थित होतो. सगळे अध्यात्मिक ग्रंथ एकमुखाने सांगतात की मी कर्ता आहे या भावनेचाच तुम्ही समूळ त्याग करायला हवा.

प्रश्नः मग कर्मयोगाचा अर्थ 'कर्तृत्व बुद्धी रहित कर्म' असा होतो का?
रमण महर्षी: होय. अगदी बरोबर आहे.

प्रश्नः गीता शिकवते की साधकाने अथ ते इति सक्रिय आणि कर्तव्यतत्पर जीवन जगायला हवे.
रमण महर्षी: होय, बरोबर आहे. मात्र ते कर्म कर्तृत्वभावना रहित असेल तरच तो कर्मयोग ठरतो.

प्रश्नः मला कर्मयोग साधायचा आहे. मी इतरेजनांना मदत कशी करू शकेन?
रमण महर्षी: तुम्ही ज्यांना मदत करावी असे 'इतरेजन' कोण आहेत? मुळातच हा 'मी' कोण आहे जो इतरेजनांना मदत करणार आहे? आधी 'मी' कोण आहे या गोष्टीचा नीट उलगडा करून घ्या. मी खात्रीने सांगतो की त्याने बाकी सगळ्या समस्यांचे निराकरण होऊन जाईल.

प्रश्नः दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर तसेच खूप मोठे बलिदान दिल्यानंतर स्वराज्य मिळाले तर स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या व्यक्तीला हर्ष वाटला किंवा ती बाब अभिमानास्पद वाटली तर ते (पारमार्थिक दृष्ट्या) योग्यच ठरणार नाही का.
रमण महर्षी: कुठलेही काम करत असताना त्या ओघात ईश्वरी शक्तीला स्वतं:ला समर्पित करता येणे साधकासाठी क्रमप्राप्त आहे. ईश्वरी सत्तेचा क्षणभरही विसर पडू न देता तिच्या सामर्थ्याची जाणीव साधकाने मनात सतत जपली पाहिजे. ही भूमिका असेल तर हर्षित होण्याचा प्रश्न येतोच कुठे? साधकाने तर त्याच्या हातून घडत असलेल्या कर्माच्या परिणामांविषयी देखील मुळीच क्षिती बाळगू नये. असे असेल तरच त्याच्या हातून घडलेले कर्म नि:संगपणे आणि निस्वार्थ भावनेने घडले आहे असे म्हणता येईल.

पुरवणी:
भगवान श्री रमण महर्षीं प्रामुख्याने आत्मविचार आणि भक्तीभावपूर्ण समर्पण या दोन गोष्टींवर भर देत असत. ते नेहेमी 'भक्ती ही ज्ञानमाता आहे' असे सांगत असत. भक्ती आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे स्पष्टपणे दाखवून देणारे स्वामी स्वरूपानंद यांचे एक कवनः

वेदांती तो बोले सृष्टि मिथ्या ऐसे
भक्ता ती चि दिसे हरि-रूप

वेदांती ओळखे मिथ्या मायाभास
हरिचा विलास भक्त म्हणे

दोहींचा भावार्थ सारखा तत्वता
एक चि हरि-सत्ता सर्वा ठायी

भक्त तो चि ज्ञानी ज्ञानी तो चि भक्त
जाणावा सिद्धांत स्वामी म्हणे
- प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस)

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

मूकवाचक's picture

25 Jun 2020 - 4:08 pm | मूकवाचक

आपण दिलेले रूपक समर्पक आहे. महर्षींनी "ज्ञानी व्यक्ती फक्त तिच्याच मार्गाचे अनुसरण करत असलेल्या साधकांना मदत करू शकते की योगासारख्या अन्य मार्गांचा अवलंब करत असलेल्या साधकांनाही ती मदत करू शकते?" या प्रश्नाचे उत्तर देताना साधर्म्य असलेले एक रूपकच वापरले आहे.
(संदर्भः http://misalpav.com/node/47080)

राघव's picture

25 Jun 2020 - 4:48 pm | राघव

धन्यवाद! महर्षींचा विचार फार व्यापक आहे. आपली विचारशक्ती तेवढी नाहीच.
पण शामकाका तेच सांगताहेत. शिखरावर असलेला इतरांना मदत करू शकतो. :-)