भाग २ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - अफ़झलखानाचा पुर्व परिचय -

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
10 Mar 2020 - 8:04 pm
गाभा: 

प्रतापगडाची उलटवलेली बाजी - अफ़झलखानाचा पुर्व परिचय -

भाग २

मुगलसत्तांतर


मुगलांची सत्तास्पर्धा

१६३६ साली मुगलांनी अहमदनगरची निजामशाही बुडवली. त्यांचा मुलुख आदिलशाहीशी वाटून घेतला. १६५६ साली आदिलशाही संपवण्यासाठी दिल्लीहून शहाजहान काही कारवाई करत होता. औरंगजेब तेंव्हा दख्खनचा सुभेदार होता. १६५७ सालापासून शहाजहान आजारी पडत असल्याने दिल्लीतील तख्तावर अधिकार मिळवायला ४ भावात वैर वाढून इतर राज्य कारवायांना दुय्यम स्थान दिले जाऊ लागले. भावांचा बंदोबस्त करून शहाजहानला आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात नजरकैदेत करून औरंगजेबाने दिल्लीतील लालकिल्यातून स्वतः बादशहा झाल्याचे फर्मान काढले. त्याच्या लेखी शिवाजी हा आदिलशाह विरुध्द बंड करणारा एक छोटा जमीनदार होता.

आदिलशाहीतील कमकुवतपणा


अदिलशाहीची व्याप्ती

१६५६ साली मुहम्मद आदिलशाह वारला. त्याच्या कारकीर्दीत बांधलेल्या गोल घुमट (१६२७ ते १६५५) वास्तूत नंतर त्याची कबर बनवली गेली. त्याची बेगम साहेबा (गोवळकोंड्याच्या मुहंमद कुतुबशाहची मुलगी - मराठीत बडी साहेबीण म्हणायचा प्रघात आहे.) ने अलि आदिलशाह या कोवळ्या सावत्र मुलाला गादीवर बसवले आणि तीच पुढाकार घेऊन राज्य करू लागली. आदिलशाही शिया पंथीय होती. त्यात उत्तरेतील सुन्नी पठाणी सरदारांचा भरणा होता. मराठ्यांच्या जहागीरदारांचा एक गट होता. शहाजीराजे शिया पंथीय गटात तर बाजी घोरपडे सुन्नी पठाणांच्या गटात असल्याने ते एकमेकांत वैर धरून होते. शिवाय सिद्दी आफ्रिकन गुलाम वंशाचे सरदार आपापल्या सैन्यासह आपला वेगळा दबाव गट करून होते. इखलासखाना सारखे काही सरदार तोफा बाळगून त्यांना लागणारे गोळे, स्फोटक दारूचे कारखाने, अवजड सामान वाहून न्यायला चाकांचे लाकडी गाडे, बळकट बैल, उंट, हत्ती अशी जनावरे व त्यांच्या वर देखरेख करणारे कामगार, शिक्षित तोफची गोलंदाज असे त्या काळात पुढारलेली शस्त्रे, ती चालवणारे तज्ज्ञ बाळगून असत. ते दोन्ही गटात गरजेनुसार सामिल होत. आदिलशाहीत कामकाज स्थानिक भाषेत चालत असे. सरमिसळ झाल्याने इतरांना मराठी, कानडी, तेलुगू निदान समजत असे. बाकीच्या गैर मुस्लिम सरदारांना दख्खनी इराणी पर्शियन मिश्रित भाषेतून बोलायचा सराव असे. घरी मराठीत, ऑफिसात इंग्रजीत, बाहेर हिंदीतून बोलण्याचा प्रघात सध्या आहे तसेच काहीसे.

आपल्या भागातील शेतीमालाचे, उद्योग व्यवसाय साधनातील उत्पन्नाचे काही भाग सरकारात जमा करून उरलेल्यात आपल्या भागातील तरुणांना शेतातील कामे संपल्यावर शस्त्रे चालवायचे शिक्षण देऊन, घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारीचे हात, भाले, बरचा नेम धरून फेकून मारायची कला शिकून प्रवीण करत असत. वेळोवेळी शत्रूच्या पराभवानंतर त्यांनी टाकलेली जनावरे, शस्त्रे याचा वापर करून ३ -४ महिन्याच्या शिक्षणासाठी - (पूर्वी मोठ्यांच्या हाताखाली काम करत राहून शिकायची प्रथा होती.) सैन्य भरती केली जात असे. त्यातून स्वतःचे सैनिक, घोडे, वाहतूक जनावरे, शस्त्रे व हाताखालची गडी माणसे राखून असलेले शिलेदार होते. तर काही तरूण वेळ आली की जहागीरदारांची घोडी, हाताखालची माणसे, शस्त्रे घेऊन सैन्यात दाखल होत.

आदिलशाहीतील वर्चस्वासाठी कारस्थाने होत होती. रणदुल्लाखान सरदारांच्या गटाचे वर्चस्व त्यांनी जिंकलेल्या लढायांमुळे, प्रदेशामुळे वाढले होते. शहाजी राजांच्या दलबदलू प्रकारामुळे त्यांना कर्नाटकात सुभेदार बनवून मुगल, निजाम यांच्यापासून दूर ठेवून सन्मान ही दिला गेला. वसई, भिवंडी, कल्याण, चौल, उत्तर कोकण भाग, दाभोळ, राजापुरी, अगदी मालवण, सावंतवाडी पर्यंतच्या किनारपट्टीवर मुगलांच्या दुर्लक्षाची संधी साधून जबरदस्त सरदारांची नेमणूक गरजेची होती. शिवाजी महाराजांकडून मार खाल्ल्यामुळे पुरंदर किल्ला फतेहखानाला न घेता माघारी यावे लागले. या पार्श्‍वभूमीवर विजापूरच्या सत्तावर्तुळात विचार करून अफ़झलखानाला सिवाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. कोकणातील किल्ले ताब्यात ठेवणे, बंदरातील विदेशी जहाजांवर धाक जमवणे, व्यावसायिकांकडून जकात वसुली, भूधारकांकडून शेतसारा वसूली अशी कामे तातडीने करून आदिलशाहीतील मावळ, बालाघाट, जाहगिऱ्यातील विस्कळीतपणा घालवायला अफ़झलखानापेक्षा सुयोग्य सरदार कोणी नव्हते हे लक्षात येते.

अफ़झलखानाचा पूर्व परिचय

अफ़झलखानाची देहयष्टी भक्कम होती. ४० पेक्षा जास्त वयात पोट सुटलेले असूनही त्याच्या हालचालीत चपळता होती. दररोज शस्त्रे चालवायचा सराव, व्यायाम, भरपूर आहार, यामुळे त्याला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान होता. दरबारात वयोवृद्ध वरिष्ठ पदाधिकारी, इतर सेनानी त्याला टरकून असत. त्या काळातील प्रथेप्रमाणे अनेक बायका त्याच्या जनानखान्यात असत. मुलकी शासनात बारकाईने विचार करून तो न्यायनिवाडा करत असे. प्रजेत त्याचा दरारा मोठा होता.
सध्याच्या काळात समांतर शरीरयष्टीचा म्हणून ब्रॉन स्टोव्हमन किंवा ग्रेट घाली ह्या व्यक्तिरेखा आठवतात. त्याच्या समोर रे मिस्टीरिओचा खुजेपणा प्रकर्षाने दिसतो.

त्याच्याशी सलोख्याने वागणे हाच पर्याय उरतो असा निष्कर्ष काढला तर तो चुकीचा नव्हता.

त्याची आधीच्या काळातील लष्करी कामगिरी प्रशंसनीय होती. त्याच्या हातात दिलेली प्रत्येक मोहीम त्याने फत्ते केली होती. १६५६ मधे कुतुबशाहला मदत म्हणून लढताना औरंगजेबाला त्याने कचाट्यात धरले होते. पण मग वरून 'ऑर्डर' आल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. बडी साहेबाच्या कानाशी लागून संतापून त्याने आपला राग व्यक्त केला होता. आपल्या सरसेनापती खान महंमदाची हत्या करायला मागे पुढे पाहिले नव्हते.

कोकणपट्टी, देशावरील जागिऱ्यांचे मो(मु)कासे त्याचे होते. वाईचा *मुकासा त्याच्या नावाने गेली दहा वर्षे होता. दाभोळ बंदरात त्याच्या मालकीची मालवाहू तीन जहाजे होती. त्यामुळे त्याच्याकडे स्वतःची साधन संपत्ती भरपूर होती. मुले, पुतणे, इतर नातलगांना त्याने जागोजागी आपली माणसे म्हणून नोकरदार केले होते. स्थानिक मराठीत त्याच्याशी संवाद साधला जात होता. तो कसा ते त्याच्या एका पत्रावरून समजायला मदत होते.
** चंद्रराव मोरेच्या जावळी संस्थानातील बखेडे सोडवायला १६४९ मधे एक पत्र मराठीत कान्होजी नाईक जेधेना पाठवले होते. "चंद्रराऊ कदीम(पुर्वीचा) मयत झाल्यावरी जावलियावरि (जावळी संस्थान) गैरलोकी (भलत्याच नातलग लोकांनी) पैस (घुसखोरी) करून बलकावले आहे. या बद्दल त्यावरी नामजादी (स्वारी) केली आहे."

जून ते ऑक्टोबर किनारपट्टीवर, सह्याद्रीच्या डोंगर दर्ऱ्यात तुफान पावसाळी हवामान, मराठवाडयातील कोरडी भीषण गरमी, अवर्षणे वगैरे त्याला अंगवळणी पडले होते. चिंचोळ्या घाटातून जाताना मालवाहू जनावरांची, सैनिकांची काय दैना होते हे अनुभवाने त्याला पुरेपूर माहित होते. कोणाला धाकाने, तर काहींना पैसे चारून आपल्याकडे वळवून घेण्यात तो हुशार होता. नद्यानाले, डोंगर घाट, चढउतार, आपल्याकडील कोट, गढ्या, तिथली व्यवस्था वगैरे सर्व बाबी लक्षात घेऊन मोहिमेची आखणी तो करत असे. अशा कसलेल्या, शूर, बलवान, धूर्त आणि क्रूर सरदारांची नेमणूक म्हणजे यशाची खात्री होती. विजापूरच्या दरबारात या मोहिमेची अधिकृत जबाबदारी विडा उचलून त्याने घेतली होती.

महाराजांच्या कानावर सतत पडावे म्हणून खानाच्या स्वभावानुसार हिंदू मंदिरे, धनवान व्यापारी, पेढ्या चालक, सराफांना त्रास देत राहणे, जे जहागीरदार त्याच्या बाजूने मान तुकवून तयार होत नव्हते त्याच्या मुंड्या मुरगाळून तयार केले जाणे चालू होते. वाट वाकडी करून तो स्वतः किंवा आपल्या कर्तबगार सरदारांना दूर वरच्या मंदिरांची नासधूस, बाजारपेठा, करायला पाठवून रयतेला दहशतीत ठेवणे चालू होते.

सामान्य जनतेला छळून नाईलाजाने सैन्याला राहायला, खायला प्यायला सोय करायला भाग पाडले जात होते. परंपरेने चालत आलेल्या धार्मिक यात्रा, वाऱ्या यांच्यात खंड पाडून, मूर्तींचे पावित्र्य नष्ट करून गैरमुस्लिम धर्म किती तकलादू आणि कुचकामी आहेत हे मुद्दाम बिंबवले जावे या उद्देशाने तत्परता दाखवली जात होती.
...

*मराठीत मुकासा - जहागीरदार ( मुकासा, मोकासा : लष्करांतील नोकरीची अट घालून त्या संबंधानें किंवा इनाम म्हणून दिलेलीं गावें, जमिनी वगैरे. २ गांवच्या वसुलामध्यें व अंमलामध्यें हिस्सा. ३ चौथाईपैकीं राजबाबती वजा करून राहिलेला भाग; कोशार्थात अनुस्वारांची रेलचेल लक्षात येते.)

** संदर्भ - भाग १ पान ६५९ राजा श्री शिवछत्रपती गजानन भा मेहेंदळे
पुढे चालू

प्रतिक्रिया

बरीच नवीन माहिती मिळाली आज..

योगविवेक's picture

11 Mar 2020 - 2:52 pm | योगविवेक

पहिलवानांच्या फोटोतून चेहर्‍यावरील क्रूर भाव आणि उंचीतील तफावत यातून जाणवणारी महाराजांच्या विजयाची अशक्यता जाणवते. अशा हरलेल्या बाजीला महाराजांच्या धूर्त पवित्रे, दुर्दम्य साहस, समयसूचकता यातून कशी मात दिली ते वाचायला उत्सुक आहे.

शशिकांत ओक's picture

12 Mar 2020 - 1:05 pm | शशिकांत ओक

योग विवेक, आपल्याकडून मिळालेल्या उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल.

महाराजांचा इतिहास माहीत आहे पण एका नवीन दृष्टीकोनातून वाचायला उत्सुक आहे.... पुढील भागाच्या प्रतिक्षेत

चौकस२१२'s picture

12 Mar 2020 - 4:13 pm | चौकस२१२

प्रतापगड बाहेरुन
IMG_5281[1]

IMG_5298[1]

IMG_5297[1]

IMG_5290[1]

IMG_5307[1]

IMG_5289[1]

शशिकांत ओक's picture

12 Mar 2020 - 7:31 pm | शशिकांत ओक

विषयाला पूरक फोटो सादर केलेत.

दुर्गविहारी's picture

12 Mar 2020 - 11:43 pm | दुर्गविहारी

मस्त ! वाचायला मजा येती आहे. भाग थोडे मोठे करा.

Rajesh188's picture

13 Mar 2020 - 12:38 pm | Rajesh188

अगदी त्या काळात गेल्याचा भास होतोय.
तुमच्या लेखनात ताकत आहे.
भाग जरा मोठे करा ही विनंती