ओढ समुद्राची
ओढ समुद्राची
आमच्या चिपळूण पासून समुद्र तसा लांबच. म्हणजे समुद्र बघायला जायचं तर जवळच्या जवळ म्हणजे गुहागर गाठायला हवं. नाहीतर जरा लांब रत्नागिरी किंवा दापोली जवळचे बीच. त्यामुळे लहानपणी समुद्रावर जाणं खूपच कमी होतं. हां पण ओढ मात्र नक्की होती. लहान असताना आमच्या बिल्डिंग मधले शेजारी एखाद्या शनिवारी त्यांच्या मुलीबरोबर मलादेखील घेऊन जायचे. दोन तीन तास समुद्रावर घालवल्यावर त्यांच्या गाडीतून येताना दमून सॉलिड झोप लागायची. वर्षातून साधारण एकदा आमची कौटुंबिक म्हणजेच आम्ही चौघे आणि अप्पा काकांचं कुटुंब, ते चौघे असे आमच्या कुलदैवताला जायचो. देव आणि देवी दोन्ही रत्नागिरीच्या जवळपास त्यामुळे हमखास गणपतीपुळे वारी व्हायचीच. तेव्हा अगदी न चुकता समुद्रावर जाऊन पाण्यात पाय घालून यायचो. मस्त वाटायचं. पायाखालून वाळू निघून जाताना पायाला गुदगुल्या करीत जायची.
तेव्हापासूनच समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटायला लागला. वाटायचं, कसलं मस्त आहे ना यांना. रोज संध्याकाळी समुद्रवर फिरायला यायचं, रोज तो सुंदर असा सूर्यास्त बघायचा, जेव्हा मनाला येईल तेव्हा पाण्यात डुंबायचं, नाहीतर नुसतं पाण्यात पाय घालून आलं परत, कधी वाटलं तर वाळूत खेळलं, किंवा चप्पल काढून चालायला गेलं. पिक्चर मध्ये समुद्रवजवळच्या मोठ्या खडकांचे सीन असायचे ना तेव्हा इतके आवडायचे ते खडक. स्पेशली जेव्हा एखादा हिरो किंवा हिरॉईन अशा मोठ्या खडकावर विचार करीत बसलेले असत तेव्हा बघताना वाटायचं किती मस्त निवांत बसलेत, कोणी नाही त्यांना हाकलून लावायला कि डिस्टर्ब करायला. आपल्याच तंद्रीत मस्त वारा खात निवांत बसायचं. आता लहानपणी जायचो त्या लिमिटेड समुद्र किनाऱ्यावर असे मोठे खडक मला तरी दिसले नाहीत. आणि कधी दिसले तर ते आमच्यापासून खूप लांब असायचे. मग मोठी माणसं कधी जाऊन देत नसत.
मोठी होऊन नोकरीला मुंबईला आले. मुक्काम ठाण्याला त्यामुळे इथेही समुद्र तसा लांबच. मैत्रिणींबरोबर गेट वे ऑफ इंडियाला जाऊन समुद्र बघितला, जुहूला जाऊन बघितला, वरळीला सी फेस बघितला, दादरला जाऊन आले. प्रत्येक ठिकाणी हा वेगळाच वाटला मला. वरळीचा एकदम सोफिस्टिकेटेड, तर जुहूचा अगदी सगळ्यांना सामावून घेणारा किनारा असणारा, तर गेट वे ऑफ इंडिया म्हणजे विविधतेत एकता चे दर्शन घडवणारा टिपिकल टुरिस्ट प्लेस. दादरचा बीच बघितल्यावर मला शंकाच आली कि काय हे? अरे किनाराच नाही त्याला. मग कसला हा समुद्र ? अतिक्रमण इतकं कि बिचारा किनाराच गायब. नाही म्हणायला बँड स्टॅन्ड बघायला जरा बरं वाटलं. तिथे लगतच्या सी सी डी मध्ये बसून कॉफी पीत मैत्रिणींशी गप्पा मारत घालवलेली संध्याकाळ छानच लक्षात आहे. पण तरीही मला वाटणारी ओढ या समुद्राची नक्कीच नव्हती. इथे मला कधीही छान तास च्या तास घालवावेत असं कधीही वाटलं नाही. इथे छान मोठे मोठे खडक होते पण त्यावर लोक इतकी होती कि काय विचारता ? शिवाय कोणी ना कोणी फेरीवाला येऊन हटकून जायचाच . छे हे काही पिक्चर मध्ये दाखवतात तसं छान नाहीये असं जाणवलं .
मध्यंतरी ताईच लग्न झालं नि कोळथरे या सुंदर गावी ती राहायला गेली . इथे समुद्र मात्र अगदी मनासारखा अनुभवायला मिळाला. ताईकडे आलं कि संध्याकाळची समुद्रावरची फेरी कधी चुकली नाही. मी खरं तर ४ वाजताच जाऊ का जाऊ का करत असते. आणि ताई वेळ आहे अजून म्हणून थांबवून ठेवते. मला सूर्यास्त होईल याची भीती असते. पण नारळी पोफळीच्या आड लपलेला सूर्य समुद्रावर गेलं कि चांगलाच वर असायचा. आरामात वाळूत बसून गप्पा मारायच्या, कधी चप्पल काढून मस्त वाळूत फेऱ्या मारायच्या किंवा कधी मनसोक्त पाण्यात डुंबायचं. हा समुद्र मला खूप जवळचा वाटायला लागला. स्वच्छ, सुंदर आणि मोठा मस्त समुद्र किनारा आणि किनाऱ्यालगत नारळी पोफळीच्या बागा. बाग आणि किनार्याच्या मध्ये केवड्याचे बन हद्दीसारखं. खूप मस्त वाटतं अजूनही तिथे गेलं कि. तिथे अजूनही मोबाईल नेटवर्क नाही. आमच्यासारख्या लोकांना ते खूप बरं वाटतं. अगदी काळोख होईपर्यंत किनाऱ्यावर बसून गप्पा मारायच्या. अस्तास जाणारा सूर्य कितीतरी वेळा डोळ्यात साठवून घेतलाय मी इथे. एकटी जेव्हा केव्हा आलेय इथे कितीतरी वेळा खूप बोललेय समुद्राशी. गप्प राहण्याचा स्वभाव नाही. पण मग कोणी बरोबर नसताना काय करणार ?मग समुद्रालाच सांगायच्या मनातल्या गोष्टी. तो न्यूट्रल असतो. ना माझ्या बाजूने बोलतो ना माझ्या विरुद्ध. आश्चर्य म्हणजे घर कि मुर्गी दाल बराबर याचा प्रत्यय इथे आला. गावातले क्वचितच कोणी समुद्रवर फिरकतात. आहे काय रोज त्यात बघण्यासारख असा वर प्रश्न ?मी तर डोक्याला हात लावले. एकदा मी नि श्रीनिवास सकाळी सकाळी उठून समुद्रावर निघालो. तर ताईच्या सासूबाई विचारतात , "काय गो एवढं तिथे जाऊन बघता ? त्या लाटा काय ? एकदा पुढे येणार एकदा मागे जाणार . त्यात काय बघायचं ?" आम्ही दोघेही निशब्द. तरी यांचं माहेर गुहागर म्हणजे समुद्रकिनारीच आणि इथे त्यांच्या सासरीदेखील समुद्र. पण नाही बाई त्यांना त्यात काही खास वाटत. ताई मात्र आम्ही आलो कि न चुकता येते समुद्रावर. त्या निमीत्ताने येणं होत म्हणते. एरवी कोणी तिला अडवत नाही. पण एकटीनं येणं तिच्या स्वभावात नाही. मग तिला कोणी आलं कि बरं वाटत.
इकडच्या तिकडच्या फिरण्यात रत्नागिरीचा बीच, आरेवारे बीच, गुहागर बीच, जयगड, अंजनवेल,आंजर्ले बीच,कर्दे बीच, आचरा बीच, कुणकेश्वर बीच, देवगड हि गावंसुद्धा पालथी घालून झाली. इथेही समुद्र वेगवेगळ्या रूपात भेटत होता. पण जास्त आवडला तो कोळथरचाच.
माझं लग्न झालं नि मी पहिल्यांदा आमच्या अर्थात वेळणेश्वर गावी आले. वेळणेश्वरला याआधी भेट दिलेली पुसटशी आठवत होती. माझ्यासाठी आवडती गोष्ट म्हणजे इथे असणारा समुद्र. अगदी पहिल्या दिवशी काही कार्यक्रमासाठी गेल्याने समुद्रावर जात आलं नव्हतं. पण मग एकदा निवांत गेलो. तशी आता हि पण टुरिस्ट प्लेस झाल्याने थोडीफार गर्दी असतेच. पण तरीही हा समुद्र मला आवडला. आपला वाटला. श्रीनिवास नि मी रात्री समुद्रावर फिरायला आलो. आधी रात्री समुद्रावर फिरायला जाणे हि पिक्चर मधलीच कल्पना वाटलेली. पण खरंच आम्ही गेलो समुद्रावर. त्याच्यासाठी लहानपणापासूनचिच सवय असल्याने काही वेगळं वाटत नव्हतं. पण माझ्यासाठी एक नुसतीच कल्पनेत असलेली गोष्ट साकारत होती. रात्री किनार्यावर कोणी नव्हते. किनाऱ्यावर बसण्यासाठी बाकडी टाकलेली आहेत तिथेच बसलो. निरव शांतता, लाटांचा आवाज, आकाशभर पसरलेल्या चांदण्या आणि हवाहवासा जोडीदार. अविस्मरणीय अशी रात्र होती ती. नंतर देखील अश्या कितीतरी रात्री आम्ही समुद्रावर घालवल्या. कधी दोघंच, कधी दीर भावजय. ती दोघं असली कि विषय पुरायचे नाहीत बोलायला. कधी रुसवे फुगवे, कधी गमती जमती, खूप सारा मोकळेपणा, बरोबरीची आणि जिवाभावाची माणसं आणि सोबतीला अखंड साथ देणारा समुद्र. रात्रीच्या वेळच एक वेगळच रूप समुद्राने दाखवून दिलंन. एक दोन वेळा तर चक्क समुद्रात हिरव्या रंगाच्या चमकत्या लाटा दिसल्या. जेली फिश किनाऱ्यालगत आल्याने लाटांना असा रंग येतो असं कळलं. हाही एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळाला.
दुर्दैवाने इथे देखील समुद्र हळूहळू आत घुसायला सुरवात झाली आहे . दर पावसाळ्यात किनाऱ्यालगतची एखाद दोन नारळीची झाड किनाऱ्यावर आडवी पडतायत. समुद्र भरतीला आत आत घुसू पाहतोय. एखाद्या ठिकाणी भर घातली तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या कुठेतरी सुद्धा होणारच. नियमच आहे तो.
नंतर आजूबाजूच्या गावात देखील तिथल्या किनाऱ्यांवर जाऊन आलो . जस कि बुदल, कारुळ, बोऱ्या, हेदवी, तवसाळ,अंजनवेल यांचेही शांत निवांत स्वच्छ सुंदर किनारे मन भरेपर्यंत पहिले. अजूनही भटकंतीला जाताना बीच हि आमची पसंती असते. दोघांनाही समुद्राचं आकर्षण आहे. श्रीनिवास लहानपणापासून समुद्राच्या सहवासात वाढला तरी ते कमी झालं नाही आणि मला ते आकर्षण उशिरा वाटायला लागल्याने अजूनही नवीन म्हणून. अजूनही समुद्र बोलावतोय, खुणावतोय. अजून बरेच किनारे पालथे घालायचेत. बघू कसे कुठे कधी ते ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे किती छान लिहिलं आहे.
छान लिहिलंय. .
निवती, भोगवे नक्की करा.
अगदी काळोख होईपर्यंत
खूप सुरेख लिहिलंय.
अगदी काळोख होईपर्यंत
अगदी काळोख होईपर्यंत किनाऱ्यावर बसून गप्पा मारायच्याहो , पण डास हाकलतात.जिव्हाळ्याचा विषय
फ्लेमिंगो
खूप छान
वा ! सुंदर लिहीलंय .
मस्त लिहीलंय
+ पाळेमुळे नाही
पाळेलोम नाही
सुंदर लिखाण
समुद्राशी नाळ जन्माला
अग्नी आणि समुद्र
अर्रर्ररारा खतरनाक...
धन्यवाद !