मुंबईचे धडे - ४

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Nov 2019 - 4:07 pm

मुंबईचे धडे - ४
मुंबईचे धडे - १ http://misalpav.com/node/43794
मुंबईचे धडे - २ http://misalpav.com/node/43805
मुंबईचे धडे - ३ http://misalpav.com/node/43868

हळू हळू मुंबई मध्ये रुळायला सुरवात झाली. नोकरी मिळाली होती. ठाण्याला राहून विक्रोळीला जायचे होते. पण कंपनीची बस असल्याने ट्रेनच्या गर्दीचा त्रास नाही झाला. एकूणच रिलॅक्स होत सगळं. ठाणे - दादर - पार्ले प्रवास अंगवळणी पडला. नवीन गोष्टी बघण्याचा उत्साह होताच. मग काय जस जमेल तसं दिवसा ढवळ्या कुठे ते फिरून यायचं. सुट्टीला कधी आळसात लोळून दिवस काढायचा नाही हे पक्क ठरवलं. मजा येत होती. लॅपटॉप नव्हते जवळ पण सायबर कॅफेत जाऊन एका तासाला २० रुपये मग १० रुपये असे जाऊन मेल बघून यायचो. नौकरी डॉट कॉम, मॉन्स्टर इत्यादी साईटवर रेझ्युमे अपडेट करायचा, तेव्हाच फॉर्मात असलेलं ऑर्कुट जाऊन बघायचं, असे उद्योग चालायचे. माझ्या शिफ्ट ड्यूटीज होत्या. महिन्यातून २ नाईट शिफ्ट असायच्या. १० च्या शिफ्टला ९ /९. १५वाजता तीन हात नाक्याला बस यायची. LBS रोड वरून सगळी दुनिया फिरत रात्रीची मुंबई बघत गाडी विक्रोळीला पोहोचायची. मजा यायची. सुरवाती सुरवातीला ऑफिसमध्ये पोहोचले कि आईला फोन करायचे. मग ते अंगवळणी पडलं. गावी घरी आले नि कोणी विचारलं आणि सांगितलं कि नाईट शिफ्ट असते तर लोकं आ वासून बघायचे. मुलगी असून नाईट शिफ्ट कशी करायला लावतात ?

पण हळूहळू ते कॉर्पोरेट कल्चर अंगवळणी पडायला लागलं. गावाकडे पूर्वीसारखीच राहणारी मी मुंबईला आल्यावर केव्हा कशी बदलले मला देखील कळलं नाही. आपण पण हे करू शकतो किंवा आपल्याला हे जमेल हा आत्मविश्वास मला मुंबईने दिला. अगदी साधी गोष्ट. मी लहान असताना जीन्स घालायचे. पण मग जवळजवळ ७ वि नंतर कधी घातलीच नव्हती. मग लोक काय म्हणतील? शोभून दिसेल का? अश्या बऱ्याच गोष्टींचा विचार करायचे. नोकरीचा इंटरव्यूसाठी म्हणून मी बहिणीबरोबर जाऊन फॉर्मल ट्रॉउझर घेतली. त्याआधी फॉर्मल ड्रेस म्हणजे काय हेच माहित नव्हतं. क्लास मध्ये एक पेर्सोनालिटी ग्रूमिंगच सेशन घेतलं होतं. त्यात त्यांनी फॉर्मल म्हणजे कोणते कपडे, कॅज्युअल म्हणजे कोणते कपडे इत्यादीवर मार्गदर्शन केलं होतं. जे आमच्यासारख्या नवशिक्यांसाठी खूप गरजेचं आणि महत्वाचं होतं.

मग नोकरी लागल्यावर पहिल्या पगारातून जीन्स घेतली. गावाकडच्या दुकानामध्ये तेव्हा ट्रायल रूम वगैरे प्रकार नव्हता. मुंबईत मला तो कळला. बहिणीच्याच आग्रहाने जीन्सवर टी शर्ट पण घेतला. ट्रायल रूमच्या आरशात स्वतःच्या रूपाला पाहताना वेगळच वाटलं. खरंच कि चांगली दिसतेय मी. मजा वाटली. शिवाय इथे मुंबईत कोण आहे बघायला नि नावं ठेवायला ? इथे लोकांना स्वतः सोडून कुणाकडे बघायला वेळ नाही तेव्हा आपणपण बिनधास्त राहायचं असं ठरवलं. मग एकदा मी नि केतकी जाऊन फॅशन स्ट्रीटची चक्कर मारून आलो. फारशी खरेदी जरी केली नसली तरी एकूण सगळं बाजार बघण्याची मजा वाटली.

कार्पोरेट लाईफ मध्ये मीही जुळवून घ्यायला लागले . २४/७ वर्किंग असल्याने शिफ्ट असायच्या. ५ डे वीक असला तरी शनिवार रविवारीच सुट्टी मिळायची अस नाही. ती फक्त टीम लीडर नि वरच्या पोस्टवाल्याना. त्यामुळे मग सोमवार ते शुक्रवार फॉर्मल वेअर आणि शनिवार रविवार असेल तर कॅज्युअल वेअर हे मीही अगदी वेळापत्रक असल्यासारखं पाळायला लागले. पंजाबी मनापासून आवडत असल्याने मी बरच वेळा ऑफिसला पंजाबी ड्रेस घालायचे. पण आता माझे पंजाबी सूट कमी होऊन ट्रॉउझर नि जीन्स ची गर्दी वाढायला लागली. आता ऑफिसच्या मित्र मंडळींचा पण ग्रुप जमला होता. त्यांच्याबरोबरदेखील कुठे कुठे फिरणं व्हायचं. नवीन ठिकाणं बघायला आवडत होती. मॉलला जाऊन खरेदी करण्याचं धाडस व्हायला लागलं. सुदैवाने घरी पैसे पाठवायला लागत नव्हते. (क्वचित मागावेच लागत होते :) )त्यामुळे माझा राहण्याचा खाण्याचा खर्च करून आलेला पगार मी अशाच इतर गोष्टीवर खर्च करत होते. बॉलिंग, गो कार्टिन असले फक्त टीव्हीमध्ये दिसणारे प्रकार अनुभवायला मिळत होते. मॅकडॉनल्ड्स , सीसीडी, पिझ्झा हट सारख्या ठिकाणी जायचं, काय ऑर्डर करायचं, काही गोष्टींचे उच्चार काय/ कसे आहेत? या सगळ्या प्रकारचे अनुभव मिळत होते. गावाकडे यातलं काहीच नसल्याने हे सगळं मला नवीन होत. या सगळ्या गोष्टी मी पटापट शिकत होते.

आमच्या बरोबर दक्षा म्हणून मुलगी होती. नाईट शिफ्टला असताना एकदा आम्हाला फार काम नव्हते, म्हणून आम्ही ऑफिस कॅम्पसमध्येच राऊंड मारायला बाहेर पडलो. तर ती आम्हाला घेऊन मेन रस्त्यावर आली. बाकी टीम मेम्बर्ससाठी कदाचित ते नेहमीच होत पण माझ्यासाठी नवीनच प्रकार होता तो. रात्रीचे २ वाजता बाहेर कशाला पडायचं ?असा माझा चेहरा. पण टीममधले सगळेच होतो म्हणून चालत चालत रस्त्यावरआलो.बघते तर रस्त्यावर आधीच इतर मूल पण फिरत होती, सिगारेटी फुंकत होती. रस्ताच्या पलीकडे ४/५ सायकलवाले होते. हे आता रात्रीचे काय करतात असा प्रश्न पडेपर्यंत दक्षा तिथे गेली. त्याच्याकडून तिने सिगारेट घेतली आणि ओढायला सुरवात. आम्ही तिच्याजवळ पोहोचताच तिने चहा कॉफी कोणी घेणार का विचारलं. सगळे चहाला तयार झाले . सगळ्यांनी चहा घेऊन तिथेच फूटपाथवर बसकण मारली. एकीकडे आम्ही चहा पित होतो तर ती चहा पिता पिता सिगारेट ओढत होती. माझ्यासाठी असा एवढ्या जवळून मुलीने सिगारेट ओढण्याचा पहिलाच प्रसंग. एरवी वाचलेलं किंवा पिक्चर मध्ये पाहिलेलं दृश्य, स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर नाही म्हटलं तरी थोडासा धक्काच बसला. माझ्या मध्यमवर्गीय त्यातही गावठी मनाला ती गोष्ट लागलीच. पण तिथे ती एकटीच नव्हती, आजूबाजूला असे बरेच जण होते. चहा झाल्यावर आम्ही परत ऑफिस मध्ये येऊन काम करायला लागलो. घरी येईपर्यंत,एवढ कशाला, अगदी आजही मला तो प्रसंग जश्याचा तसा आठवतोय. आता याही घटनेला १२/१४ वर्ष झाली. पण पिक्चर मध्ये दिसणार सगळंच खोटं नसतं हाही एक धडा मिळाला.

शिवाय बाहेरून कितीही बदलेले तरी काही गोष्टी या मनाने स्वीकारणं गरजेचं असतं. तोवर तुम्ही बदलला असा म्हणता येत नाही. काळाप्रमाणे गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे अथवा तुम्ही मागे पडता असं म्हणतात. तरीही कोणत्या गोष्टी तुम्ही स्वीकारू शकता आणि कोणत्या नाही यावर देखील आपली स्वतःची काही बंधने असतात. पण मग तुम्ही मागे पडलात तरी त्याची देखील तयारी हवी. आणि त्या प्रसंगाने मला हेच शिकवले. जरी मी कितीही कार्पोरेट कल्चर मध्ये सामावून जायचा प्रयत्न केला तरी माझ्यासाठी ते खूप कठीण जाणार आहे याचाच तो धडा होता. आणि मी माझी लाईन आखून घेतली.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

आणि मी माझी लाईन आखून घेतली.

हे खूप महत्वाचे वाक्य आहे.

बाकी वाचत आहे.

छान लिहिताय तुम्ही. सर्व धडे वाचले. पुढच्या धड्याच्या प्रतीक्षेत. :)

अजुन लिहा.

अजूनही त्या एलबिएस रोडवर आरसिटीमॉल ते विक्रोळी स्टेशन दुपारी जेवणाच्या सुटीत मुली सिगरेटी ओढत असतात. तिथल्या कामाच्या ताणातून आराम मिळत असेल.

लेखन आणि अनुभव लिहिता हे चांगले आहे.

जालिम लोशन's picture

19 Nov 2019 - 4:27 pm | जालिम लोशन

छान

दुर्गविहारी's picture

21 Nov 2019 - 4:37 pm | दुर्गविहारी

अनुभव खुप छान शब्दबद्ध केलेत. दोन धाग्यात जास्त अंतर ठेऊ नका, लिंक तुटते.

मालविका's picture

3 Dec 2019 - 8:07 am | मालविका

नक्की प्रयत्न करेन .

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 7:48 pm | मुक्त विहारि

आता पुढचा भाग कधी?

मालविका's picture

3 Dec 2019 - 8:06 am | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !

जॉनविक्क's picture

3 Dec 2019 - 8:30 am | जॉनविक्क

तुम्ही तुमची लाईन आखून घेतली ही शुद्ध थाप