मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिश टँक ठेवणे

कंजूस · · तंत्रजगत
फिश टँक प्राणी पाळणे म्हटले की कुत्रा, मांजर ,पोपट, ससा हे लगेच आठवतात. आता वन्यजीव कायद्याने पोपट,ससा,कासव,मोर वगैरे पाळणे शक्य नाही. त्यातूनही पळवाट म्हणजे पोपटांचे काही प्रकार भारतीय प्रजाति नाहीत  त्या पाळू शकतो. लहान मुलांकडून बऱ्याचदा कुत्रा मांजर पिलांसाठी हट्ट होतो पण इमारतीमधल्या ब्लॉक्समध्ये कठीणच जातं. घरात कुणीतरी कायम असावं लागतं. आणखी एक प्राणी आहे, तो म्हणजे मासा. फिश टँक नावाच्या काचेच्या पेटीतले फिरणारे मासे त्या दुकानात बघितल्यावर कधी वाटते की अशी टँक ठेवायची का घरात? जमेल का आपल्याला ते संभाळायला? वास येणार नाही ना? दहा बारा दिवस सुटीवर बाहेर गेलो तर मासे जगतील का? तर अशा या शोभेच्या मासे पाळण्याच्या छंदाविषयी हा धागा. माझा हा छंद शाळेत असताना ( '७०) मध्ये सुरू झाला. काही वर्गमित्रांकडे मासे, पोपट, पांढरे उंदीरसुद्धा होते. "अरे, तू सुरू कर, करतो मदत" या बोलीवर एका अॅसीडच्या ( कार ब्याटरीची) छोट्या बरणीत दोन गप्पी मासे आले.  त्यावेळी मित्रांना विचारूनच बदल व्हायचे. पुढे एक काचेचा छोटा टँकच एकाने दिला. 12x9x9 इंचाचा. यामध्ये मग एक गोल्डफिश ठेवला. एकच मासा. तो सात वर्षं जगला. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे मासे ठेवून पाहिले. पण गर्दी  कधीच केली नाही. हवेचा पंप आणल्यावर थोडे मासे वाढवले. पंप बंद केला की पाण्यातली हवा कमी पडायची. मासे वर यायचे आणि कल्ले जोरजोरात हलायचे. मग पाणी बदलावे लागायचे. निगा - माशांची विष्टा आणि  न खाल्लेलं अन्न टाकीतच तळाला राहाते. ते कुजताना खूप ओक्सिजन लागतो. त्यामुळे खाणे कमी घालावे लागते. मी पोळीचा चुरा किंचिंत घालत होतो. ते खाणारेच मासे ठेवावे लागत. एंजल, किसिंग गुरामि, फाइटर हे मासे दिसायला छान असले तरी पोळी खात नसत. किडे ( बारीक गांडुळं) खायचे. मग ते देऊन टाकले. माझा गोल्ड फिश बरा होता, कणकेच्या गोळ्याही मटकावायचा. छोट्या टँकवर जास्ती काळजी घ्यावी लागते. माहिती पुस्तकं - कॉलेजला जाऊ लागल्यावर ब्रिटिश काउन्सल लाइअब्रीचा सभासद झाल्यावर या छंदावरच्या पुस्तकांचे घबाडच हाती आले. माशांची नावे, त्यांच्या सवयी, झाडे, अशी बरीच माहिती वाचून कळली. फोटोही भरपूर. तेव्हा अशी महागडी हार्डकवर पुस्तके कोण विकत घेणार? वाचल्यावर पहिलं महत्त्वाचं लक्षात आलं की टँक आणि पाणी सीझन्ड ( स्थिर) करायला पाहिजे. मग मासे सोडायचे. पाणी आणि आक्सिजन. - त्यासाठी पाणी भरून झाडं मिळवली आणि लावली. लावायची म्हणजे झाडांचा खालचा भाग एका दगडाला बांधून ठेवयचा. कारण मोठे मासे ती ओढतात. खाली बारीक खडीचा एक दीड इंचाचा थर द्यायचा. समजा हातातून दगड निसटला तर तो थेट खालच्या काचेवर आदळत नाही. चारपाच झाडे इकडे तिकडे ठेवायची. झाडं वाढण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो. खिडकीची जागा चांगली. एक दोन तास ऊन आले तर झाड वाढतय असं दिसू लागतं. घराच्या आत टँक ठेवला तर कृत्रिम उजेड द्यावा लागतो. हे काम जरा जोखमिचं आणि लक्ष ठेवावे लागणारं असं आहे. म्हणजे असं की इलेक्ट्रीक वायर आणि पाण्याचा संबंध येता कामा नये. शिवाय पाण्याचे तापमान फार वाढता कामा नये. खूप उजेडाने शेवाळ लगेच वाढतं. मला या लाईटपेक्षा खिडकी बरी वाटली. नैसर्गिक प्रकाश उत्तम. इथे रात्री मासे पाहता येत नाहीत परंतू ते शांत झोपतात. ट्युबच्या उजेडाने दचकतात. पंधरा वीस दिवस वाट पाहायची. झाडं थोडी वाढताहेत असं दिसलं की मासे सोडता येतात. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे शहरातील नळाने येणाऱ्या पाण्यात निर्जंतुक करण्यासाठी जो क्लोरिन वायू मिसळलेला असतो तो गेलेला असतो. नळाच्या पाण्यात काही मासे लगेच मरतात या क्लोरीनमुळे. माशांचं समाजजीवन, आरोग्य. आपण एका छोट्याशा जागेत पाच दहा मासे ठेवतो तेव्हा त्यांचा एकमेकांशी सहवास सुखाचा असावा लागतो. एखादा दादागिरी करणारा मासा इतरांना किंवा दुसऱ्या एखाद्याला पाठलाग करून चावतो का हे लगेच पाच सहा तास लक्ष ठेवून पाहावे लागते. तसं दिसल्यास त्यास वेळीच काढावे लागते. पाणी खराब, फार गरम असल्यास त्यांना त्रास होतो. लगेच बाहेर काढावे लागते. मासे सोडल्यावर ते लगेच तळाशी जाऊन शांत बसले, कल्ले भराभर हलत नसले तर ते उत्तम लक्षण आहे. आक्सिजन भरपूर असला की त्यांचे कल्ले सावकाश हलतात. आपल्या घरी आलेली काही लहान मुले टँकच्या काचेवर जोरजोरात ठोकून माशांना पळवतात. त्यांपासून सावध असावे. तर आता आपला टँक तयार आहे. झाडे आणि मासे एकमेकास आक्सिजन आणि कार्बन डाई आक्साइड वायूंची देवाणघेवाण करत राहिल्याने एकप्रकारचा संतुलितपणा राहतो. रोज दोनवेळा निरिक्षण करून एखादा मासा अस्वस्थ दिसल्यास त्याला बाहेर काढावे लागते. पसरट ट्रेमध्ये चार पाच इंच पाण्यात तो बरा होतो. खाद्य --- लगेच पहिल्या दिवशी खाणे देण्याची गरज नसते. मासेविक्याने भरपूर खायला घातलेले असते. दुसऱ्या दिवसापासून तयार गोळीबंद फिशफुड पाण्यात टाकले की मासे खातात. याचे तंत्र शिकावे लागते. किंचीत पाण्यात या बारीक टणक गोळ्या दोन मिनिटे भिजवून वाटून टाकणे उत्तम. फक्त एकदाच सकाळी टाकावे. ते दिवसभरात माशांनी संपवले पाहिजे. नाही तर कमी टाकावे. उरलेले कुजून पाण्यातला आक्सिजन भराभर संपवतात. गप्पी, ब्ल्याक मॉली आणि काही इतर मासे शेवाळही खातात. त्यांना दहा पंधरा दिवस फिशफुड दिले नाही तरी शेवाळ्यावर जगतात. जिवंत खाद्य माशांना फार आवडते पण त्याचेही तंत्र आहे. ---------- या छंदावरच्या लेखाला सुरुवात केली आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. पंप,फिल्टर,नवनवीन रंगीत प्रकारचे मासे, इतर जलचर, फिश टँक रिपेरिंग इत्यादी. यावर युट्युबवर विडिओज तसेच माहिती देणाऱ्या वेबसाईटसही खूप आहेत. तुम्हीही तुमची माहिती द्या, प्रश्न विचारा. तंत्र जमले तर हा छंद खचितच आनंद देतो, घराची शोभा वाढवतो. फोटो १ ) सध्याचा टँक. यात तीन प्रकारची झाडे आहेत. झाडे वाळूमध्ये/खडीमध्ये चांगली वाढत नाहीत. एका डब्यात मातीमध्ये लावून ती सावकाश खाली ठेवली आहेत. टँक बाल्कनीत आहे, दोन तास ऊन पडते. दोन टेट्रा आणि दोन (खोटे)डॉलर मासे आहेत. ते बराच वेळ तळाशी लपूनच बसतात. फोटो २ ) पाण्यावर तरंगणारी पाने कमळाची ( वॉटर लिली) आहेत. त्याने आडोसा तयार होतो. ((( फिश टँक साईज किती इंची टँकमध्ये किती पाणी राहील. 12x12x12=1728 cubic inches=1cu foot = 7.481 us liquid gallon=28.3 litres 1.34 cubic foot = 10 gallons 15x12x10. =1800 cu inches= 1+~ cu ft= 30litre 16x12x9 = 29litre 24×20x15 = 4 cubic foot 24x18x12 = 3 cubic foot =5184cu inch 2 cu ft = 3456 cu inch 24x12x12 =3456 cu inch = 2 cu ft =56 lit 18x12x10 =1.25cu ft =~10gallons =~35 litres 18x12x9 = 32 litre (1.1cu ft) 18x12x12 = 42.3 litres साधारणपणे पंचवीस लिटर्स पाण्याने भरलेला टँक उचलून दुसरीकडे ठेवता येतो. त्यापेक्षा मोठा असल्यास पाणी कमी करूनच हलवता येईल. 12 inch diameter fish bowl volume =4x22x12x12x12÷3÷7÷8= 905 cu inches = 0.5 cu ft = 14 litres. Less (2÷3)( 22÷7×h.square) (3×r-h) (2÷3)(22÷7×2×2)(3×6-2) (2÷3)(22×2×2÷7)(10) 2×22×2×2×10÷3÷7 22×80÷21 ~80 cu inch 905-80 = 825 cu inch = 0.477 cu ft =~13 lit. 3.785x7.481=28.3 1 gallon = 231 cubic inch 1 gallon = 3.785 litre 2 gallon = 7.6 litre 3 gallons = 11.4 litre 4 gallons = 15.1litre 5 gallons = 19 litre 6 gallons = 22.7 lit 7 gallons = 26.5 8 gallons = 30.25 9 gallons = 34 10 gallons = 37.85 7.481x231 =1728 cubic inch 12x9x9. = 972 cu inch = 0.56cu feet = 15 litres =4 gallons 5 gallons = 1155 cu inches. 12x10x10= 1200. cu inches. 15x12x12 = 35 lit ))) बरेचसे रंगीत मासे अमेझोन नदीतले किंवा सिंगापुरकडचे पूर्वी इकडे आयात केले आहेत. आता पैदास इकडेच होते. झाडेही तिकडचीच. आपल्याकडे तळ्यामधले मासे चंदेरी असतात. टँकसाठी शोभत नाहीत. पण झिंगे टाकले तर ते तळाचे उरलेले फिशफुड खाऊन साफ करायला मदत करतात.

वाचन 36761 प्रतिक्रिया 0