पत्राद्वारे दासबोध अभ्यास उपक्रम - चाळीशीत

विटेकर's picture
विटेकर in जनातलं, मनातलं
25 Aug 2019 - 6:47 am

घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर व गीताताई  केळकर यांनी  "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा  उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. *क्रिया करून करवावी* या समर्थ उक्तीप्रमाणे ती. आप्पा केळकरांनी समाजातील सज्जन शक्तीचे संघटन करून चाळीस वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे बघता बघता  मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले पाहिले. साधारण १ लाख लोकांनी आजपावेतो हा अभ्यास केला आणि आज ही दरवर्षी हजारो विद्यार्थी ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करत आहेत. सर्वसामान्यांना या उपक्रमामुळे दासबोधाचा अभ्यास करावासा वाटतो हे आप्पांचे खरे यश आहे. एरवी बासनात बांधून देवघरात हा ग्रंथ ठेवलेला असे. त्याची नुसती पूजा करायची नसून तो व्यवहारात आचरणात आणावयाचा शैक्षणिक ग्रंथ आहे हे लोकांना पटविण्यात अप्पा यशस्वी झाले. हाडाचे शिक्षक असलेल्या आप्पानी ग्रंथाचा धांडोळा घेऊन त्याचा तीन वर्षांचा आकृतीबंध तयार केला. गेली ४० वर्षे हा साचा अश्याच पद्धतीने सुरू आहे यातच त्याचे यश आहे ! अनेक भरकटलेल्या मनाना या अभ्यासाने दिलासा दिला, निराश मनाला उभारी दिली,उत्तम जगण्याची आणि प्रपंचात राहूनही उत्तरोत्तर शाश्वत सुखाकडे निश्चित जाता येते हा विश्वास निर्माण केला. या सोप्या पण गुणकारी उपायाने अनेकांची आयुष्ये उजळलीआहेत, उत्तरोत्तर उन्नत झाली आहेत !

आमचा अभ्यासक्रम हा बालवाडीचा आहे असे आप्पा गमतीने म्हणत ! आणि ते खरेच होते , ३५००० ओव्यांच्या समर्थ वाड्मयाला एका आयुष्यात गवसणी घालणे अशक्यच ! पण जिज्ञासू अभ्यासकांची , साधकांची जिज्ञासा चाळवली गेली आणि या पायवाटेने अनेक समर्थभक्त त्या अक्षर आकाशात प्रवेश करते झाले !

कर्ता मनुष्य थांबला की उपक्रम थंडावतो पण या उपक्रमाला श्री समर्थांचाच आशीर्वाद होता ! ती. आप्पानी निवृत्त व्हायचे ठरविल्यावर श्री. अशोक गानू या योग साधकाने आपल्या समर्थ खांद्यावर हा उपक्रम तोलून धरला ..आप्पांच्या मागे तो त्याच अनुशासनात चालू राहील असा आग्रह धरला ! श्री. गानू निवृत्त झाल्यावर श्री कोठारी पती-पत्नीनी ही धुरा सांभाळली. त्या पाठोपाठ समर्थभक्त कै. आगरकरासारखा दृष्टा संचालक मिळाला, काळाने त्यांना फार लवकर बोलावून घेतले.
विद्यमान अध्यक्ष श्री. विजयराव गाडगीळ उपक्रमाचा मूळ गाभा तोच ठेऊन कालसापेक्ष बदल घडवत आहेत, असे युगानुकूल बदल उपक्रमाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आवश्यकच आहेत !

श्री समर्थांची शिकवण त्रिकालाबाधित आहे. आज महाराष्टातच नव्हे तर त्याबाहेर भारतात व परदेशातही हा अभ्यास पोचला आहे. आता इंटरनेटवरून आमची तरुण पिढीदेखील हा अभ्यास करते आहे. या उपक्रमाला तरुण नेतृत्वही  लाभले आहे, ते नव्या नव्या कल्पना राबवत आहेत ही मोठी जमेची बाजू आहे. 
आज अप्पा आपल्यात नाहीत. चार वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ते समर्थ चरणी लीन झाले. केळकर पती पत्नी पूर्वी दोघेही शाळेत अध्यापनाचे कार्य करीत होते. तेथेही त्यांनी वेगळा ठसा उमटविला. सर विज्ञानाचे शिक्षक होते, शाळेशाळेतून त्यांनी प्रयोगातून विज्ञान सुरु केले. मुलांच्या विचारांना चालना मिळेल अशी पुस्तके लिहिली. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत ‘आदर्श शिक्षक’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाला. 
जीवनाचे खरे सार्थक या ग्रंथाच्या अभ्यासाने होते. घरी बसल्या बसल्या हा अभ्यास करता येतो. तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत हा अभ्यास पोचावा म्ह्णून अप्पांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाचे रान केले.

डॉकटर काका देशमुख, श्री.सुनील चिंचोळकर, बोरकर, केंदूरकर पती- पत्नी, साठ्ये काका, म.वि.जोशी, वैद्य पती-पत्नी ही सारी निस्पृह मंडळी आपांच्या या दैवी संकेताला हाक देऊन निस्पृहपणे सामील झाली !

वक्ता दश सहस्त्रेषु शिवाजीराव भोसले, शिक्षण शास्त्री चिपळूणकर , मारुतीबुवा रामदासी अशा अनेक विभूती उपक्रमाशी जोडल्या गेल्या , जोडलेल्या राहिल्या!

उपक्रम वाढला तसे त्याचे विभागवार केंद्र स्थापन केले. त्यावर केंद्रप्रमुख म्हणूनही तशाच तोलामोलाचे निस्पृह भक्त महंत मिळाले. मुख्य म्हणजे सेवा मंडळाचे प्रथमपासून प्रचंड सहकार्य मिळाले. ‘सज्जनगड’ मासिकातून या उपक्रमाची सुरुवात झाली. श्रीसमर्थ सेवा मंडळाचे स.भ. कै. बन्याबापू गोडबोले, समर्थलीन अण्णाबुवा कालगावकर, यांनी अप्पांना सर्वतोपरी सहकार्य केले. आताही स.भ.मारुतीबुवा रामदासी, स.भ.अरुणराव गोडबोले यांनीही हा उपक्रम उचलून धरला. सज्जनगड मासिकाचे संपादक कै. स.भ.वसंतराव वैद्य, विद्यमान संपादक स.भ.अजितदादा कुलकर्णी यांनी तर हा उपक्रम आपलाच मानला. नवीन नवीन प्रयोग करून मासिकाला शिखरावर नेणारे मधुकाका नेने या सर्वांनीच या उपक्रमाला आपलेसे करून हिरिरीने प्रचार केला. 
कोणत्याही उपक्रमाच्या कार्याच्या यशात अनेकांचा वाट असतो, सहभाग असतो हे वरील व्यक्तींवरून दिसतेच. अशी सहभागी असणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. हजारो समीक्षक, गावोगावीचे निःस्पृह प्रचारक म्हणजे समर्थांचे छोट्या प्रमाणात महंत.यांचा या उपक्रमात मोठा वाटा आहे. ते जुने जाणते निस्पृहच आहेत. त्यातील बरेच जण आता वयोपरत्वे निवृत्त झाले आहे. 
मुंबई केंद्राच्या मा. रत्नप्रभाताई जोशी, अक्कांच्या लाडक्या शिष्या, लेखिका व धडाडीच्या कार्यकर्त्या. त्यांनी मुंबई केंद्राचे काम अनेक वर्षे सांभाळले, वाढवले. अनेक अभ्यास मंडळे, मेळावे निरनिराळ्या भागात सुरु केली व या ग्रंथाचा प्रसार करण्यासाठी जीवाचे रान केले. आता मुंबई केंद्राचे काम तरुण तडफदार श्री. संतोष सप्रे नोकरी सांभाळून करत आहेत. ते देखील मोठ्या उत्साहाने शिबिराचे व मेळाव्याचे आयोजन करतात व प्रसार करतात.
अंबरनाथ(आता बदलापूर) केंद्राचे काम खुद्द स.भ.भागवतकार अक्का वेलणकर यांनीच सांभाळले. त्यांचे कार्य माहित नाही असा एकही समर्थभक्त नाही. त्यांना बंधू तसेच भाचे श्री प्रबोध वेलणकर यांनीही खूप साथ दिली.  त्यांच्या पश्चात प्रबोध यांनी नोकरी सांभाळून या कामासाठी हे योगदान दिले.सध्या सौ.नीलमताई जोशी मोठ्या हिरीरीने हे काम सांभाळत आहेत. प्रचार-प्रसार यासाठी त्यांचे मंडळ नेहमीच पुढे असते.
गेल्या २-३ वर्षांपासून सोयीसाठी कराड-सातारा हे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. श्री.  बोधे काका याचे प्रमुख आहेत. बोधे काका व काकू यांचे नाव माहित नाही असा एकही समर्थभक्त सापडणार नाही. शिवथरघळीचे व्यवस्थापक, वर्षानुवर्षे चाफळच्या वर्गाचे शिस्तबद्ध नियोजक आणि आता निरंतर केंद्राचे प्रमुख. जिथे कमी तिथे आम्ही असा यांचा बाणा!!  
नाशिक केंद्राचे संचालक स.भ.पाठक काका काकू हे केंद्र अनेक वर्ष यशस्वीपणे सांभाळत आहेत. पाठक काकांच्या मोठ्या आजारपणातही त्यांनी ही सेवा सोडली नाही, याला काय म्हणायचे!! पाठक काकांनी शिबिरे, मेळावे, अभ्यासार्थींशी संवाद साधत प्रचाराचे मोठे काम केले. त्यांच्या या यशात पाठक काकूंचा मोठा सहभाग आहे.
औरंगाबाद केंद्राच्या सौ.ज्योतीताई चिटगोपेकर रामभक्त. एकदा त्यांचा गौरव करताना श्री. गाडगीळ सर म्हणाले, अयोध्याचे राम मंदिर होवो अथवा न होवो पण आमच्या ताईंनी व डॉक्टरांनी स्मशानभूमीतच अत्यंत बिकट परिस्थितीत राम मंदिर उभारले. आज ते औरंगाबादचे भूषण आहे. मराठवाडा विभाग त्यांनी पिंजून काढला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आता सौ.मानसी याडकीकर हे केंद्र समर्थपणे सांभाळते. आईची (प्रभाताई पांडे) यांची परंपरा तिने जपली आहे.
नागपूर केंद्राचे मोठे स.भ.तात्यासाहेब व सौ लीलाताई गाडगीळ यांची वेगळी ओळख सांगणे म्हणजे काजव्याने सूर्याची स्तुती. स.भ.अक्काताई वेलणकरांचे शिष्य त्यांच्या पावलावर पाऊल टाकून दा. सखोलसाठी व प.दा.अ.साठी अक्षरशः झिजणारे हे उभयता. समीक्षकांसाठी तयार केलेले मार्गदीप पहिल्या भागाची लेखिका म्हणजे सौ.लीलाताई. विदर्भात प्रचार करणारे हे दोघे महंतच. त्यांच्या निवृत्तीनंतर स.भ.फडके काका हे केंद्र सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल काय लिहावे!!! अवघे पाऊणशे वयमान परंतु तरूणांनाही लाजवेल असं काम फडके काका करत आहेत.
सांगली केंद्राच्या लढवय्या संचालक अनुराधाताई मोडक यांचेही काम मोठे आहे. केंद्राच्या कामाव्यतिरिक्त समाजसेवेचे काम करण्यासाठी त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली व जिंकली.आता सौ. ज्योतीताई कोरबू बँकेतील काम सांभाळून हे काम समर्थपणे सांभाळत आहेत. 
अकोला केंद्राचे आ. रत्नाळीकर दादा हे तर सर्वांच्या गळ्यातले ताईतच आहेत. त्यांच्या कार्याचा फार मोठा व्याप आहे. अनेक पदयात्रा काढून समर्थ साहित्याच्या प्रसारचा त्यांनी वसाच घेतला आहे. समर्थ स्थापित मठात त्यांनी दासबोधाची खूप पारायणे केली व त्या माध्यमातून लोकांना या ग्रंथाचे महत्त्व पटवून दिले.  अकोल्यातील स. भ.प्रभाताई पांडे या दोन बंधू भगिनीने अकोला परिसर प.दा.अ.च्या प्रसारासाठी पिंजून काढला. आता श्री. गणोरकर हे काम मोठ्या उत्साहाने सांभाळतात. ते सुद्धा उत्तम काम करत आहेत.
गोवा राज्याचे काम स.भ.भागवत काका काकूंनी मोठ्या तडफेने सांभाळले, वाढवले. निरंतर केंद्राची सुरवात केली. निवासी शिबिरे घेत इतर धर्मियांच्या प्रांतीही हा समर्थ भक्तीचा मळा फुलविला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत कै.स.भ.सुमित्राताई भावे यांनी हा कार्यभार सांभाळला. मोठ्या उत्साहाने त्या कार्यरत होत्या. पण जो आवडतो सर्वांना तो आवडे देवाला.असो. आता श्री. सुरेश तळावलीकर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. ते सुद्धा तरुण व तडफदार कार्यकर्ते आहेत.

खांडवा केंद्राचे काम स.भ.सुधाकारकाका जोशी यांनी हिंदी मराठी या दोन्ही भाषेतून सांभाळले. चाफळच्या वर्गाला ते नियमित उपस्थित राहत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांचे ध्येय. आता श्री धडफळे काका हे काम इंदोरहून पाहतात. उत्तम हस्ताक्षर हा त्यांचा गुण सर्वांनी स्वीकारण्यासारखा आहे. 

अशी ही उत्तम टीम अप्पांच्या सहाय्याला होती. आताही नवीन महंतांची टीम चांगलीच आहे. हे सगळे महंत त्या त्या शहराचे भूषण आहेत.

"श्रीग्रंथराज दासबोध अध्ययन अभ्यासक्रम" अध्यक्षपदाची धुरा सध्या श्री. विजय गाडगीळ सर जोमाने व उत्साहाने पार पाडत आहेत. तसेच पुणे केंद्राचे केंद्रसंचालक श्री.सुहास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री.सुहास कुलकर्णी, श्री.प्रसन्न हळबे, श्री. ओंकार जोशी, सौ. माधवी महाजन, श्रीमती कल्पना धर्माधिकारी, सौ.वृंदा जोगळेकर, सौ. हेमा पुराणिक अशी अनेक  नवी मंडळी वेगवेगळ्या अनेक जबाबदाऱ्या व  नवे उपक्रम राबवत आहेत. देश-परदेशात सध्या वाढलेला दासबोधाचा ई-मेलद्वारे अभ्यासक्रम विशेषतः तरूण मंडळींमध्ये जास्त लोकप्रिय होत आहे.  तरुण वर्ग या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी होत असताना दिसत असून  त्यामुळे समाजालाही ऊर्जितावस्था येईल अशी आशा वाढली आहे. अप्पांच्या जवळ तक्त्यांची पेटी असे; त्या पेटीला ते रत्नपेटी म्हणत असत. त्याप्रमाणे ही सर्व नवी-जुनी मंडळी त्यांच्या पेटीतील रत्नेच आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एक अतिशय सकारात्मक गोष्ट उज्ज्वल भवितव्यासाठी पूरक ठरत आहे.

अप्पा नेहमी म्हणत, ‘समीक्षक प्रचारक हा या उपक्रमाच्या पाठीचा कणाच आहे. श्री समर्थ सेवा मंडळाची ही एक मोठी शाखा आहे. गडावर डिसेंबर मध्ये समीक्षक अभ्यासार्थींचे तीन दिवसांचे शिबीर असते. एक वर्षी मोठे विद्वान मा. प्रा. कै. शिवाजीराव भोसले प्रमुख अतिथी म्हणून आले. त्यांनी भाषणात सर्वांचे कौतुक केलेच पण त्यांच्या खास शैलीत ते म्हणाले, ‘ज्या उपक्रमात त्या निर्माण करणाऱ्या संयोजकांच्या पत्नीला गती नसेल तर त्या कार्याला लवकरच सद्गती प्राप्त होते. पण येथे असे नसून त्या कार्यात  अप्पांची पत्नी सहभागी होती व त्यांचे संपूर्ण कुटुंबच यात सहभागी झाले. मुलगा डॉ.विक्रम, स्नुषा सौ.वैदेही, नातू प्रबोध सगळेच सक्रिय होते. या कुटुंबाचे खरेच आपल्या सर्वांवर..... समाजावर ऋणच आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पण ते व्यक्त करणे त्यांना आवडणारही नाही.

‘ग्रंथराज दासबॊध’ हा दीपस्तंभ आहे. उंबरठ्याचा दीप जसा दोन्ही घरं प्रकाशमान करतो त्याप्रमाणे समर्थविचार, तत्त्वज्ञान, ऐहिक व पारमार्थिक जीवन दोन्हीकडे सफलता मिळवून देतात. अभ्यासार्थीने मनापासून अभ्यास करावा व तो आपल्या जीवनात उतरवावा व आपल्या जीवनाचे सोने करून घ्यावे. प्रवेश, परिचय, प्रबोध असा तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. 

जानेवारीमध्ये सुरवात व डिसेंबरमध्ये शेवट व परत जानेवारीत दुसऱ्या वर्षाची सुरवात होते. आता तर मुंबई, औरंगाबाद व कराड ह्या केंद्रांमध्ये केव्हाही "निरंतर योजनेद्वारे"  प्रवेश घेता येतो. श्री. दा.अ. अध्ययन केंद्राचे  मुख्य ऑफिस श्रीसमर्थ सोसा., पटवर्धन बाग, एरंडवणे, पुणे ४ येथे  आहे. 

पूर्वी अप्पांच्या घरातून हा सगळा कारभार चालत असे. पण व्याप वाढला तसे ऑफिस घेतले. जवळ जवळ २१ वर्षे त्यांनी घरातून अत्यंत काटकसरीने सर्व काम पाहिले.. अप्पा नेहमी म्हणत, ‘ अनर्थकारी अर्थापासून हा उपक्रम दूर आहे.’ येथे कुणालाही मानधन नाही, पगार नाही. सर्व समीक्षक "सेवा" म्हणून काम करतात. 
या उपक्रमामागे अत्यंत तळमळीचे समर्थभक्त महाडचे कै. अप्पासाहेब वैद्य, अप्पांची आई आहेत. अप्पा वैद्यांनी १९६५ सालापासून श्री. दासबोध अभ्यास वर्ग घळीत सुरु केला व त्या वर्गाला अप्पा केळकर नियमित जात असत. तेथे होणारा अभ्यास, वाचन व चर्चा संवाद यातूनच ते प्रेरित झाले. पुढे मा. वि. चिपळूणकर सर ( शिक्षण संचालक) , गावडे सर (संत साहित्याचे गाढे अभ्यासक व अप्पांचे मुख्याध्यपक) यांच्या सहकार्यामुळे व्ही . आर. एस. घेऊन या उपक्रमाची त्यांनी छोट्या प्रमाणात सुरुवात केली. हळूहळू प्रयोग करत उपक्रमाला आताचे स्वरूप प्राप्त झाले. गीता ताईंच्या हस्ताक्षरातील सुरेख रजिस्टर, नेमका पत्रव्यवहार, टापटिपीने ठेवलेली सर्व पत्रके, पुस्तके, साहित्य, नेटके व्यवस्थापन कसे असावे हे त्या उभयतांकडून शिकावे.

अप्पांना अनेक पुरस्कार मिळाले. सेवा मंडळाने त्यांचा खूप मोठा सत्कार केला. श्री स्वामी संस्थानानेही पुरस्कार दिला. पंढरपूरला अप्पांचा सत्कार पु. अनंतराव आठवले (पु. वरदानंद भारती संतश्रेष्ठ दासगणू महाराज प्रतिष्ठान )यांच्या हस्ते झाला. वारकरी संप्रदायाने समर्थ संप्रदायाचा केलेला सत्कार हा वेगळा ठरला. 

आपणही या समर्थ भक्तांनी निर्माण केलेल्या वाटेवरून जावे म्हणजे सर्वांनी या जीवनाला दिशा देणा-या  ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करावा. तसेच त्याला आपल्या जीवनाचा मार्गदर्शक बनवायला हवा.

सौ.यशस्विनी केंदूरकर, पुणे.
Dasbodh.abhyas@gmail.com
Dasbodhabhyas.org
Whatsapp 9881476020

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Aug 2019 - 8:57 am | ज्ञानोबाचे पैजार

घराघरात दासबोध पोचवण्यासाठी केलेली ही धडपड खरोखरच सुत्य आहे.

पत्राद्वारे दासबोध मंडळाचे कार्यकर्ते अतिशय मनापासून आणि तळमळीने हा उपक्रम चालवतात. केंद्रात केव्हाही गेले तरी प्रसन्न हसतमुख चेहरे आपले स्वागत करतात आणि कोणतीही अडचण सांगितली तरी त्यावर उपाय शोधायचा मनापासून प्रयत्न केला जातो. या लोकांनी दासबोध नुसता वाचलाच नाही तर आचरणातही आणला आहे हे क्षणोक्षणी जाणवते.

ह्या लोकांनी अभ्यासक्रमासाठीच्या मार्गदर्शिका इतक्या अल्प दरात कशा उपलब्ध करुन दिल्या असाव्या याचे नेहमीच कुरुहल वाटत आले आहे. बालभारतीची पुस्तके सुध्दा या पुस्तकांच्या तुलनेने खुप महाग असतात.

हा उपक्रम असाच उत्तरोत्तर वाढत राहो ही शुभेच्छा

पैजारबुवा,