दि लायन किंग - एक मस्त अनुभव देणारा चित्रपट

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
16 Aug 2019 - 9:45 pm

दि लायन किंग - एक मस्त अनुभव देणारा चित्रपट

एका कौटुंबिक संमेलनासाठी ठाण्यात जाण्याचा योग्य आला. त्याच दरम्यान 'दि लायन किंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुदैवाने हिंदी शोची काही तिकिटे शिल्लक होती. माझ्या नणंदेने मला ऑनलाईन तिकिटे बुक करून दिली आणि मी नि ईशान कोरम मॉल मध्ये चित्रपट पाहण्याकरता पोहोचलो.

ईशान (वय वर्षे ८ पूर्ण, शिक्षण - मराठी माध्यम ), माझा मुलगा याच्यासाठी हा चित्रपट पाहणे एक सरप्राईज होत. नुकतेच त्याने एका परीक्षेत शाळेत पहिला नंबर काढल्याने त्याला बक्षीस द्यायचेच होते. चिपळूण सारख्या छोट्या शहरात मॉल सारख्या गमती, ३डी पिक्चर अनुभवायला मिळत नाहीत. मग ठाण्यात आल्यावर मॉल मध्ये चक्कर, थोडंफार शॉपिंग, कधी गेम्स असं काहीतरी आम्ही आवर्जून करतो. याआधीच्या मुंबई पुणे फेऱ्यांमध्ये आमच्या वेळेनुसार एकही चित्रपट नव्हता. त्यामुळे हा ईशानसाठी पहिलाच ३डी पिक्चरचा अनुभव होता. १२. ३० च्या शो आधी मस्त पास्ता हादडून पॉपकॉर्न घेऊन आम्ही चित्रपटगृहात गेलो. जाताना तिथल्या मुलीने आम्हाला गॉगल्स दिले. ईशानला जेव्हा सांगितलं कि गॉगल लावून पिक्चर बघायचा आहे तेव्हा त्याला काहीतरी वेगळाच वाटलं. त्याच्यासाठी हे नवीन आणि उत्सुकतापूर्ण होत. आणि अर्थात प्रश्नांची सरबत्ती करणारं. 'आई हे गॉगल्स कशासाठी ?','हे जाताना घरी घेऊन जायचे का ?','पिक्चर मध्ये काय आहे?','कोण कोण आहे?','एवढा मोठा आवाज का आहे ?' आणि बरंच काही.

थोड्याच वेळात पिक्चर सुरु झाला. थोड्याफार कार्टून बघण्याने ईशानला आता हिंदी समजू लागले आहे. त्यामुळे पिक्चर समजणे अवघड गेले नाही. तरीही त्याचे अधे मध्ये प्रश्न विचारणे चालूच होते. सुरवातीला गॉगल लावून पाहणे त्याला विचित्रच वाटत होते. पण थोड्याच वेळात तो सरावाला. 'आई हत्ती बघ कसे अंगावर आल्यासारखे वाटतायत','आई पक्षी बघ किती जवळून उडतायत', 'आई काजवे बघ कित्ती छान चमकतायत', अशा त्याच्या प्रतिक्रिया येत होत्या आणि तो चित्रपटाची मजा घेत असल्याचं जाणवून मलाही बरं वाटत होतं. सिम्बा लहान असतानाची त्याची मजा मस्ती पाहताना माझा छोटा सिम्बा पण रंगून गेला होता.

सिम्बा आणि नाला जेव्हा काली घाटी मध्ये जातात आणि तरसांच्या तावडीत सापडतात, ते दृश्य बघितल्यावर ईशान थोडा घाबरला होता. आता पुढे काय होईल? ते तरस एव्हढे दुष्ट का आहेत ?आता ते सिम्बाला मारणार का ?असे प्रश्न तो विचारायला लागला. जेव्हा ते तरस सिम्बावर झडप घेतात नि सिम्बा नि नाला जीव वाचवून पळायला लागतात तेव्हा ईशानने नकळत माझा हात धरला. नंतर त्यांना वाचवायला मुफासा अर्थात सिम्बाचे बाबा येतात तेव्हा ईशान बऱ्यापैकी मोठ्याने ओरडला,'आई,सिम्बाचे बाबा आले. आता सिम्बाला काही नाही होणार.' पुढच्या लाईनमधले लोक बघायला लागले पण मला त्यांची पर्वा नव्हती. ईशानच्या प्रतिसादच कौतुक वाटलं. तो खूपच मनापासून गुंग झाला होता त्या गोष्टीत. संकटात असलेला सिम्बा बघताना टेन्शन आलेला ईशान मुफासा दिसल्यावर खूपच आश्वस्त वाटत होता. सिम्बाचा बाबा शूर आहे तो त्याला काही होऊ देणार नाही याची खात्री त्याच्या चेहऱ्यावर दिसली. मला त्याची ती एक्सप्रेशन्स पाहून खूपच छान वाटत होत.

यानंतरचा मुफासा आणि सिम्बा यांचा सीन अप्रतिम आहे. मुफासा सिम्बाला समज देताना काय करावं, का करू नये हे सांगत असतो. तेव्हाच सिम्बा त्याला तो कधी घाबरल्याचं विचारतो. आपले शूर बाबा कधीच कुणाला घाबरत नाहीत या समजात असलेल्या सिम्बाला मुफासा समजावून सांगतो. बाप मुलाचं नाजूक नातं हळुवारपणे उलगडलंय. मुलाला संकटात पाहून एखाद्या बापाचा जीव कसा कासावीस होतो नि त्याला एक क्षण का होईना पण भीती वाटते. सिम्बा नि मुफासाच्या संवादातून हे खूपच प्रभावीपणे दाखवलाय. त्यात बॅकग्राऊंडला एका उंच टेकडीवर असंख्य ताऱ्यांच्या सोबतीने त्यांचं हे संभाषण दाखवलाय जे परिणामकारक आहे. नंतर जेव्हा मुफासा मरतो तेव्हा सिम्बा स्वतःला दोष देत दूर निघून जातो. हे सगळं ईशान भारावून बघत होता. त्याला आतून काहीतरी वाटत होत पण सांगता येत नव्हतं. 'आई, आता सिम्बाच काय होणार ग ?' ईशान चा प्रश्न.

सिम्बा पळून जातो आणि त्याला टिमॉन आणि पुम्बा हे नवीन मित्र मिळतात. आणि मग त्यांची धमाल मस्ती एकदम जमून आलेय. प्रत्येकाला दिलेले आवाज अगदी छान फिट्ट बसलेत. मी आधी त्याकडे लक्षच दिल नव्हतं. घरी आल्यावर मी चेक केलं तर चक्क शाहरुख खानचा आवाज मुफासा साठी दिलेला आहे. इतरही आवाज जसे कि असरानी, श्रेयस तळपदे यांचे आवाज देखील बरोबर सूट झालेत. पुम्बा आणि टिमॉन बरोबरचे डायलॉग मधेच मुन्नाभाई स्टाईल वाटतात पण मुलांना कळतात. शेवटची सिम्बा आणि स्कारची लढाई बघताना आणि त्यात सिम्बाची सरशी होताना पाहून ईशान खूपच उत्साहित झाला होता.

एकूणच सिनेमा खूप आवडला. ईशानचा देखील पहिलाच ३डी सिनेमाचा अनुभव त्याने मनापासून एन्जॉय केला. सिनेमाच्या बरोबरीने पॉपकॉर्न, आईस्क्रिमची खादाडी झाली त्यामुळे स्वारी एकदम खुशीत होती. अजून थोडा वेळ भटकून घरी आलो. घरी आल्यावर बाबाला सगळ्या चित्रपटाचं वर्णन करून झालं. सिनेमाची गोष्ट तर सांगितलीच शिवाय गॉगल घालून बघताना कशी मजा आली वगैरे वर्णन पण जोरदार झालं. यात बाबाची भूमिका फक्त ऐकण्याची होती. असा हा छानसा लहानांबरोबरच मोठ्यांनीसुद्धा बघावा असा सिम्बा आम्हाला खूपच आवडला.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

16 Aug 2019 - 9:54 pm | जॉनविक्क

घरी आल्यावर मी चेक केलं तर चक्क शाहरुख खानचा आवाज मुफासा साठी दिलेला आहे.

आणि त्याचं पोर्ग आर्यन खानने सिम्बाला हिंदी आवाज दिला आहे.

बाकी ईशानची घालमेल वाचताना 25 एक वर्षापूर्वी माझा लायनकिंग 2d बघताना चा अनुभव परत जिवंत झाला.

मुक्त विहारि's picture

17 Aug 2019 - 6:58 am | मुक्त विहारि

मुलांबरोबर सिनेमा बघायची मजा काही औरच.

ज्योति अळवणी's picture

17 Aug 2019 - 4:26 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलंय.

मुलं खरंच अडकून जातात कथेमध्ये

जुइ's picture

18 Aug 2019 - 12:32 am | जुइ

लेकी बरोबर हा सिनेमा गेल्याच आठवड्यात पाहण्यात आला. पूर्ण सिनेमाभर अखंड प्रश्नांची सरबराई तिने केली. त्यातील भावनिक प्रसंग समजण्या इतके तिचे वय नाही. पण एकंदरीत तिला सिनेमा आवडला. यावेळी हा सिनेमा जास्त आवडला कारण तो पूर्णपणे अ‍ॅनिमेटेड नाहीये आणि खर्‍या जंगल सफारीवर गेल्या सारखे वाटते.

ट्रम्प's picture

18 Aug 2019 - 9:44 am | ट्रम्प

उत्तम वर्णन !!!
पुम्बा आणि टिमॉन चे डायलॉग मस्त खुशखुशीत आहेत .

उपेक्षित's picture

18 Aug 2019 - 12:47 pm | उपेक्षित

मुलांबरोबर लहान होऊन सिनेमा पाहणे मलाही खूप आवडते, रादर बर्याचदा मुलापेक्षा मीच जास्ती अशा मुविजची वाट पहात असतो.
लेटेस्ट आवडत्या स्पाय्डीचा फार फ्रोम होम पहिला आणि लयी आवडला.

मालविका's picture

20 Aug 2019 - 11:04 am | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !