जाहिरातींची (लागली) "वाट"

Primary tabs

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
11 Jul 2019 - 10:15 pm

(टीव्हीवर नेहमी लागणाऱ्या काही जाहिरातींची मी लावलेली "वाट" मूळ जाहिराती पाहिलेल्या असतील तरच वाचतांना मजा येईल! हा प्रयोग कसा वाटला ते सांगा!)

***

नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडे नवऱ्या मुलाचा म्हणजे राहुलचा मित्र अजय भेटायला येतो.

त्याला समोर एक बाळ रांगतांना दिसतं.

अजय म्हणतो, "काय हो वाहिनी, हे कुणाचं बाळ? आणि राहुल कुठेय?"

वाहिनी रडू लागते, "अहो भावजी! काय सांगू तुम्हाला? आम्ही किराण्यात आणलेला संतूर साबण ह्यांनी आताच चुकून ऑरेंज सोन पापडी समजून खाल्ला आणि ते क्षणार्धात बाळ बनले!"

अजय म्हणतो, "आरं आरं वाहिनी! काय झालं हे! मग आता तुम्ही बी संतूर खावा, लहान व्हावा आन् दोघं जोडीनं एकत्र मोठं व्हावा! हलू हलू! चला येतो मी!"

वाहिनी, "आओ भावजी, सरबत तर पिऊन जा!"

अजय, "नगं नगं! मला नगं ते! सरबत बी नको आनं, चा बी नको! उगाच म्या बी छोटा होऊन गेलो तर!"

***

परदेशात -
पोलीस - "डॉलर कुठ्ठे?
अक्षय - "डॉलर इथ्थे!"
पोलीस हसून त्याला जाऊ देते.
भारतात -
पोलीस - "रुपया कुठ्ठे?"
अक्षय - "रुपया इथ्थे"
पोलीस जोरात कानाखाली मारते.
अक्षय गाल चोळतो.
पोलीस म्हणते (तुरुंगाकडे बोट दाखवून) -
"तुमची रवानगी आता इथ्थे!!"

***

मम्मी: हे बघ मुली मी कॉलेजमध्ये काही कारणास्तव जातेय फितूर साबण लावून. मी तुझी शाळा पण बंद केली आणि तुला कायम माझ्यासोबत घेऊन फिरते, त्याचं कारण तुला माहितीये. आता मुकाट झाडामागे लपून उभी राहा आणि काही संकट आलं की काय करायचं ते माहीत आहे ना तुला?

मुलगी: हो मम्मी!

(मम्मी मुलीसोबत कॉलेजमध्ये जाते.)

दोन स्टुडंट म्हणतात: "संध्याकाळी तू आमच्यासोबत ये. आमच्याकडे डान्स प्रोग्रॅमचे स्टुडंट पासेस आहेत!"

झाडामागच्या मुलीला संकटाचा एहसास होतो आणि ती स्लो मोशन मध्ये "मम्मीsss" असं ओरडत पळत येते.

ते दोन स्टुडंट अति आश्चर्य चकित होतात म्हणतात, "मम्मी? आम्हाला तुम्ही पाचवीच्या स्टुडंट वाटल्या, छोटुश्या. पण तुम्ही तर मम्मीsss आहात?"

मम्मी: "फितूर साबण लावत जा, तुम्ही वयापेक्षा वीसेक वर्षांनी लहान वाटाल!"

(स्टेजवर नाचण्याआधी मम्मी मुलीला स्टेज मागे खांबाच्या आड लपून राहायला बजावते. मम्मी नाचते.)

दोन स्टुडंट: "अरे, हिला तर आपण सकाळी पहिलंय कॉलेज आवारात!"

मम्मी स्टेजमागच्या मुलीला संकटाचा एहसास दिलवते.

ती स्लो मोशन मध्ये "मम्मीsss" असं ओरडत पळत येते.

सगळे प्रेक्षक: "मम्मी???"

मम्मी मुलीला कडेवर घेते आणि दोन्ही जणी फितूर साबण सगळ्यांना घ्यायला आर्जव करतात आणि तेवढ्यात...

एका कंपनीचा CEO धावत स्टेजवर येतो. आणि त्या मम्मीच्या पाया पडतो आणि म्हणतो, "आजी sss"

***

एका मोठ्ठ्या हॉल मध्ये सगळ्या तरुण स्त्रिया खुर्च्यांवर बसतात. त्यात काही पत्रकारही असतात. स्टेजवर एक तरुण स्त्री येते, "नामी उत्तम" नावाची आणि माईक घेऊन बोलू लागते. स्टेज अचानक खूप उजळून निघतं. काहीतरी नवीन शोध सगळ्यांना आता कळणार असतो.

स्टेजवरील तरुणी: "ओळखलं का सगळ्यांनी मला? हो, बरोबर! मी तीच, तुमच्या वतीने तारखांचा 'निर्णय' घेणाऱ्या तुमच्या घरातल्या त्या कॅलेंडरवर हातातील मेहेंदी दाखवत उभी असते, तीच मी!"

सर्व प्रेक्षक मुली: "ओळखलं! तुम्ही नामी उत्तम! हे! हे! हे! आम्हाला सेल्फी काढू द्या ना तुमच्यासोबत, नामीजी!"

नामी उत्तम: "नक्की काढू पण आधी मी काय म्हणते ते तर ऐका!"

सर्व प्रेक्षक मुली (सरसावून बसतात): "सांगा ना, सांगा ना!"

नामी उत्तम: "ऐका तर मग! आतापर्यंत साधे ब्लॅक व्हाईट टीव्ही होते, पिक्चर ट्यूब वाले, 5:9 रिझोलुशन असलेले. नीट चित्र दिसत होतं का त्यात?"

सर्व प्रेक्षक मुली (ओरडतात): "नाही! ssss

एक मुलगी प्रेक्षकांतून उठून उभी राहाते: "पण इथे आम्हाला तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शिकवायला आला आहात का मॅडम?"

नामी उत्तम: "नाही, आधी ऐका मी काय म्हणते ते! ब्लॅक व्हाईट टीव्ही जाऊन रंगीत टीव्ही आले, मग 16:9 रिझोलुशन वाले टीव्ही आले, पिक्चर ट्यूब गेली आणि LCD आणि LED वाले फ्लॅट टीव्ही आलेत. पडलात ना फ्लॅट ही टीव्हीची प्रगती ऐकून!"

हे ऐकून जमिनीवर फ्लॅट पडलेल्या सर्व प्रेक्षक मुलींना तेथील महिला पोलीस आणि सिक्युरिटी गार्ड उठवून पुन्हा खुर्च्यांवर बसवतात.

नामी उत्तम: "मग आपण सर्वांनी का मागे राहावे स्त्रियांनो? आपला उजळपणा तोच जुना आहे, अजूनही. 5:9 उजळपणा. पिक्चर ट्यूबवाल्या जमान्यातील. तर आता एका आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून एका HD LED इलेक्ट्रॉनिक चिपचे तुकडे आपण फेयरनेस क्रीम मध्ये टाकलेत."

ही अजब आणि "नामी" शक्कल ऐकून सर्व प्रेक्षक मुली आणि पत्रकार परत एकदा बेशुद्ध होतात. त्यांना फेयरनेस क्रीमच्या वासाने घाबरवून शुद्धीवर आणले जाते.

नामी उत्तम: "तर मग मी काय सांगत होते की ही क्रीम लावली की ते चिपचे HD तुकडे त्वचेच्या आतमध्ये जाऊन त्वचेला आतमधून मालिश आणि पॉलिश करतात आणि देतात तुम्हाला HD उजळपणा! ही एकमेव कंपनी बनवते अशा फेयरनेस क्रीम आणि देते तुम्हाला एचडी ग्लो. हे क्रीम लावून आता जिथे जाल तिथे चमकाल आणि इतरांनाही चमकवाल!"

स्टेजवर अचानक सर्व प्रेक्षकांतील तरुणींची ती फेयरनेस क्रीम घ्यायला आणि सेल्फी काढायला झुंबड उडते. सर्वजणी त्या क्रीम विकत घेऊन चेहऱ्यावर लावू लागतात आणि सेल्फी घ्यायला धडपडतात आणि पडतात. या गडबडीत नामी उत्तम धडपडून खाली पडते आणि माईक दुसऱ्या बाजूला पडतो. तिच्या अंगावरून सर्वजणी चालू लागतात. त्या गर्दीतून कसाबसा मार्ग काढून नामी उत्तम हळूच तिथून पसार होते. त्यानंतर ते स्टेज अनेक वर्षे HD glow ने चमकत राहतं. तो प्रकाश आजही रात्री चंद्रापेक्षाही जास्त उजेड देतो. हजारो लोक ते तेज स्टेज बघायला आजही येत असतात. आणि त्या तरुणी सगळीकडे HD उजळपणा उधळत फिरत असतात. सूर्याला पण आता तो उजळपणा पाहून लाजायला होतं.

***

एक मोठ्ठा आफ्रिकन डायनोसॉर रागात येतो आणि भारतातल्या एका बिल्डिंगला तोडायला धावतो.

हात, पाय आणि शेपटी जोरजोरात बिल्डिंगवर आदळतो.

पण बिल्डिंग काही तुटत नाही. शेवटी त्याची शेपटीच तुटते आणि बिचारा तो नाराज होऊन परत जातो.

सिमेंटने बनलेला "भांगुर" नावाचा ब्रिटिश माणूस बिल्डिंगवरच्या पोस्टरवर शांत हाताची घडी घालून उभा असतो.

तो लाडात येऊन बोलतो, "भारतीयांनो, आमचे ब्रिटिश भांगुर सिमेंट घ्या. सोन्यापेक्षा महाग आहे पण डायनोसॉर कडून पण तुटत नाही.

सास्ता नाई साबसे आच्चा! मला हिंदी पण नीट बोलता येत नाही पण तरीही टूम हमारा शिमेन्ट लो!"

***

बऱ्याच वर्षांनी अनिल कपूर जाहिरात करतांना दिसला आणि तीही एका "जलशुद्धीकरण" यंत्राची (water purifier) जाहिरात!

हेमा मालिनी, माधुरी या दोघीजणी पण शुद्ध पाण्याचे महत्व कधीपासून टीव्हीवर जाहिरातीत सांगत आहेत.
इतर अभिनेत्यांनो अभिनेत्रींनो जरा शिका काहीतरी यांचेकडून!

तुम्ही आपले करत बसले आहात शीतपेये, मादक पेये यांची जाहिरात! (हृदयशुद्धीकरण).

रणवीर सिंग पण बिचारा "दातस्वच्छीकरण" पेस्टची जाहिरात करत सकाळी ऑफिस ला जाणाऱ्या लोकांच्या गाड्यांवर नाचून त्यांना ऑफिसला उशीर करत आहे.

प्रियांका पण त्याच्या पावलावर पाऊल टाकतेय.

मात्र दीपिका आणि करिना सध्या "शरिरशुद्धीकरण" म्हणजे साबणांचा प्रचार करताहेत.

एकूणच बॉलिवूड वाल्यांनी एक प्रकारचे "शुद्धीकरण अभियान" सुरु केलेले दिसते!!

***

सैफ नवाबाच्या घरी (मुकेश) ऋषी चोरी करायला येतो.

नवाब त्याचा फोन हिसकावतो व म्हणतो - "थांब तुझ्या आईला फोन लावतो!"

ऋषी हसायला लागतो.

नवाब विचारतो - "का रे? का हसतो?"

ऋषी म्हणतो - "बघच आता. कळेलच!"

तेवढ्यात ऋषीच्या फोनस्क्रिन डिस्प्ले वर सोनम नाचायला सुरुवात करते आणि म्हणते, "मां क्का फोन आया, तेरी मां क्का फोन आया.."

मग फोनमधूनच परेश रावल चा आवाज येतो, "उठाले रे बाबा, तेरी मां का फोन है!"

नंतर फवाद मोबाईल मधून एक फोन फेकतो, तो नवाब च्या कपाळावर जोरात आपटतो.

ऋषी म्हणतो - "अरे उचल ना! माझ्या आईचा फोन आहे. तुझ्याशी बोलायचं आहे तीला!"

नवाब विचारतो- "का रे? मी तिला फोन करण्या ऐवजी तीच मला फोन करतेय?"

फोन वरून "मां" बोलते, "ए येड्या नवाबा, म्याच आता माह्या पोराले बी "बडे आराम से" घालाया लावतीया. तव्हा पासून त्यो लई भारी चोऱ्या करतुया. माला त्यो चोरी करताना लई चांगला वाटतोया. म्हीच त्याला चोरी करायला धाड्तीया.. करुदे त्यास्नी चोरी!"

ऋषी "बडे आराम से" चोरी करतो आणि नवाबला "बडे आराम से" एका कपाटात बंद करुन ठेवतो!

अमूल चाचो - बडे आराम से (चोरी करो!)

***

मिठातसुद्धा तब्बल 84 मिनरल्स असतात हे मला माहिती नव्हते!

हे सामान्य ज्ञान मला डोक्यावरचे पांढरे केस काळे करण्याच्या जाहिरातीमधल्या एका अभिनेत्याने दिले.

लोकं विसरू नये म्हणून तो रोज परत परत अनेक वेळा ते सांगतो आणि ते मीठ विकत घ्यायला विनंती करतो!
मिठाचे हे ज्ञान देतांना मात्र त्याने त्याच्या डोक्यावरचे अर्धे पांढरे केस कायम ठेवले होते!! म्हणजे ते केस काळे करण्याचे प्रॉडक्ट तो वापरत नाही का? की मग फक्त मिठाची जाहिरात करतांना वापरात नाही? पांढऱ्या मिठाचे प्रतीक म्हणून?

आणि तो हे मीठ तरी त्याच्या घरी जेवणात वापरत असेल का? की मीठ खाऊन खाऊन 84 मिनरल्समुळे त्याचे केस पांढरे झाले आणि ते काळे करायला त्याने ते प्रॉडक्ट वापरले?

आणि इतके दिवस आपण उगाच साधे मीठ खात मोठे झालो आणि 84 मिनरल्सला मुकलो!

खाल्ले असते तर आपणही इतके हेल्दी इतके हेल्दी झालो असतो ना की मोग्याम्बोला पण दे दणादण धुतले असते!!

***

अनिल कपूर रोज सांगतो: "आज से खाने का नमक बदल डालो!"
अरे दादा, रोज रोज नवीन नमक कोठून आणणार?

***

"विरे डी वेडिंग" आटोपून बादशाहला आणि करिष्माला बाय बाय करून सोनम माझेकडे आली.

सोनमला मी म्हटलं, "वा, कमाल आहे तुझी! प्युरो हेल्दी सॉल्ट खातेस ना, म्हणून हेल्दी आहेस! होर दस, किंनी तरिफान चाईदा तेंनु!"

सोनम आश्चर्याने म्हणाली,"जास्त तरिफान नको मला, पण बाय दि वे, ते मीठ नाही खात मी, तुला कुणी सांगितलं?"

मी म्हणालो, "तुझे पप्पा रोज टिव्हीवर जीव तोडून सांगतात की नमक हेल्दी तो फॅमिली हेल्दी!"

सोनम हसायला लागली, "अरे, गम्मत करतात ते, सवय आहे त्यांना! पूर्वी ते हेयर डाय बद्दल सुध्दा सांगायचे पण मिठाच्या जाहिरातीत त्यांचे केस किती पांढरे दिसतात, यावरून समजून घे!"

***

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

11 Jul 2019 - 10:49 pm | जॉनविक्क

धमाल क्रिएटीव्हीटी... पुभाप्र.

लई भारी's picture

12 Jul 2019 - 3:51 pm | लई भारी

विडंबन आवडलं :-)
अजून येउद्या!

जेम्स वांड's picture

12 Jul 2019 - 5:00 pm | जेम्स वांड

ओढूनताणून लिहिलेला वाटला. फिल्म/ऍड इत्यादीवर क्रिएटिव्ह सटायर करण्यात चिनार जोशींचे लेख जब्बरदस्त असतात, एकदम ओघवतं अन सहजसुलभ तरीही विलक्षण हास्यरसयुक्त लेखन असते त्यांचे. तुमच्यात प्रतिभा आहे ती मुक्त करून लिहा जमेल तुम्हाला पण, पुढील लेखनास शुभेच्छा.

जेम्स वांड's picture

12 Jul 2019 - 5:00 pm | जेम्स वांड

ओढूनताणून लिहिलेला वाटला. फिल्म/ऍड इत्यादीवर क्रिएटिव्ह सटायर करण्यात चिनार जोशींचे लेख जब्बरदस्त असतात, एकदम ओघवतं अन सहजसुलभ तरीही विलक्षण हास्यरसयुक्त लेखन असते त्यांचे. तुमच्यात प्रतिभा आहे ती मुक्त करून लिहा जमेल तुम्हाला पण, पुढील लेखनास शुभेच्छा.

निमिष सोनार's picture

29 Aug 2019 - 4:43 pm | निमिष सोनार

.

जॉनविक्क's picture

29 Aug 2019 - 9:02 pm | जॉनविक्क

ठसका लागे पर्यंत हसू येत होते :) :D =))

उपेक्षित's picture

30 Aug 2019 - 2:21 pm | उपेक्षित

मस्त आवडले