लेखनप्रकार
काल बातमी आली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघणारा फूट ओव्हर ब्रिज कोसळला. काही माणसं मेली.
कसंही मरण येऊ शकतं आपल्या देशात. कोणी उघड्या गटारात पडून मरतं, कोणी रस्त्यावरच्या सुट्या विजेच्या तारेला धक्का लागून मरतं, कोणी झाड पडून मरतं. कोणी भिंत पडून मरतं तर कोणी इमारत कोसळून मरतं. कोणी सरकारी दवाखान्यात योग्य उपचार न मिळाल्याने मरतं तर कोणी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून मरतं. कुठेना कुठेतरी या सगळ्याची मुळं भ्रष्ट सामाजिक व्यवस्थेत आणि मानसिकतेत असतात. आपण तरी धुतल्या तांदळासारखे पवित्र कुठे असतो? काही जणं 70% भ्रष्ट असतील तर कदाचित आपण 30% च असू. फक्त प्रमाण काय ते तेवढं कमी जास्त असतं इतकंच. पण हमाम मे सब नंगे होते हैं तसच इस देश में सब भ्रष्ट होते हैं असच समजायचं का?
आता ह्या पुलाची देखभाल करायची जबाबदारी कोणाचीच नव्हती हे तर शक्यच नाही. आपण समुद्रात पूल बांधू शकतो, सरदार पटेल यांचा अवाढव्य पुतळा उभारू शकतो. पण त्याच देशात पूल मात्र कोसळू शकतो. आता हे विदारक सत्य मी पचवायला पाहिजे. कारण आताशा माझ्या लक्षात आलंय की मरणाला सुद्धा अर्थशास्त्र असतं. ज्या अर्थशास्त्राचा जन्म माणसाचं जगणं सुलभ करण्यासाठी झाला तेच अर्थशास्त्र काही वेळा विदारक सत्य कळण्यासाठी उपयोगाला येतं. जिथे पुरवठा वाढतो तिथे मूल्य कमी होतं हेच तर सांगतं अर्थशास्त्र आपल्याला. आपल्या देशात माणसांचा पुरवठा वाढला आणि मग माणसाचं मूल्य (value) कमी झालं. मग अतीपरीचयात अवज्ञा तसं, माणसाला माणसाबद्दल काही वाटेनासं झालं. सगळं अर्थशास्त्र आहे.
आपण जेव्हा रोजच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतो तेव्हा रोज हेच सत्य नंगा नाच करत डोळ्यांसमोर येत असतं आपल्या. अर्थात आपणही या अर्थशास्त्राला आपल्यापरीने हातभार लावतच असतो. एकमेकांना स्माईल द्यायला जिवावर येतं पण खेकसायला मात्र आतूर असतो. टीका करण्यासाठी आपण तत्पर असतो पण कौतुक करताना मात्र जीभ जड होते. आपल्याकडून चूक होते त्यामागे परिस्थिती किंवा दुसरं कोणीतरी कारणीभूत असतं पण दुसरा कोणी चूक करतो तेव्हा फक्त तो आणि तोच कारणीभूत असतो असं आपल्याला सतत वाटत राहतं. भले दुसऱ्याने चांगलं काम केलं की त्यावेळी त्याचं कौतुक करायला आपण संवादाच्या कलेत पारंगत नसू पण आपल्या गाडीला रस्त्यावर दुसऱ्याच्या गाडीचा नुसता स्पर्श जरी झाला तरी आपण अस्खलितपणे आपल्या भावना व्यक्त करायला लागतो. रस्त्यावर अपघातात सापडलेल्या माणसाला मदत करायला सुद्धा आपण थांबत नाही कारण आपल्याला सतत कुठेतरी जायचं असतं किंवा आयुष्यात काहीतरी मिळवायचं असतं.
खरंच त्या पुलाची कोणीच देखभाल केली नसेल का? किंवा आता तो पूल पडल्यावर ज्या कोणाची ती जबाबदारी होती त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लागली नसेल का? का त्या 'ओह माय गॉड' सिनेमा सारखं, त्या ब्रिजचं पडणं हे act of God या सदरात मोडतं? दर आठवड्यातून एकदा मी त्या ब्रिजखाली उभा राहून टॅक्सी ची वाट बघत असतो. तोच पूल आज कोणासाठी तरी यमदूत ठरला म्हणून वाईट वाटून घ्यायचं का त्यावेळी त्या पुलाखाली मी नव्हतो म्हणून सुस्कारा सोडायचा आणि त्या पुलासमोर सेल्फी काढत बसायचं हा वास्तविक सदसद्विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या माणसासाठी प्रश्नच असता कामा नये. पण इथे सदसद्विवेकबुद्धी जागृत आहे कोणाची? मग आपण तरी मागे का रहा? गम्मत म्हणजे माणसांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या या सारख्या घटनांवर विधायक चर्चा करायला 24X7 news channels कडे वेळच नसतो आणि तिथेही सदसद्विवेकबुद्धीची बोंबच असते. त्यांना फक्त कोंबड्यांची झुंज लावतात तशी माणसांची झुंज लावायची असते स्वतःचं पोट भरण्यासाठी. फक्त असं कबूल करणं कमीपणाचं वाटतं मग त्याला Debate असं गोंडस नाव दिलं जातं.
या दुर्घटनेला सरकारी अनास्था किंवा भ्रष्टाचार जबाबदार आहे असं खुळचट विधान आतातरी मी करणार नाही. कारण आता मला अर्थशास्त्र कळलय. मरणाचं अर्थशास्त्र. जिथे पुरवठा वाढतो तिथे मूल्य कमी होतं. मग त्याला कोण काय करणार? शेवटी माझ्यासारख्या शिकलेल्याने अर्थशास्त्रावर विश्वास नाही ठेवायचा तर मग कोणी ठेवायचा?
मिसळपाव
हृदयस्पर्शी लिखाण. थेट भिडले.
लेखाशी सहमत !
खूप वाईट वाटलं बातमी बघून!
आता अशी पुढील दुर्घटना
हम्म
दुर्दवी घटना !
लोकसंख्येचा स्फोट....
In reply to लोकसंख्येचा स्फोट.... by मुक्त विहारि
थोडेफार
खरंच त्या पुलाची कोणीच देखभाल केली नसेल का?
केवल सरकारलाच दोष का द्यायचा?
याला सामान्य नागरिक आणि