येत्या १५ वर्षात...

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
23 Dec 2018 - 1:50 pm
गाभा: 

हा धागा आमच्या एका व्हॉटसअॅप समुहात झालेल्या चर्चेवर आधारीत आहे.

मी काही व्यवसायांची यादी आणि ते येत्या १५ वर्षात भारतात त्यांची मागणी का मंदावेल याची कारणंही देतो आहे. ती बरोबरंच आहेत असा अजिबात दावा नाहीये.किंबहूना ती बरोबर आहेत का हे तपासण्यासाठीच इथे देतोय.

तुम्हालाही अशी येत्या १५ वर्षात मागणी मंदावू शकणारी अजून काही क्षेत्रे आणि त्यामागची अंदाजे कारणं माहित असतील तर जरुर लिहा.

प्रतिसाद देण्यापूर्वी कृपया खालील गोष्टी ध्यानात घ्या.

१.आपण येत्या १५ वर्षातला अंदाज घेतोय.२०१८ पर्यंत जी क्षेत्रे चांगली फायद्यात होती त्यांचा आढावा किंवा इतिहास जाणून घेत नाही आहोत.
२. आपण स्वत: किंवा आपला जोडीदार,पाल्य खाली दिलेल्या क्षेत्रात असेल तर त्या क्षेत्राबद्दल सहानुभूती,आपुलकी वाटणं अगदी साहजिकच आहे त्यामुळे तटस्थपणे निरीक्षण आणि मतमांडणी असावी अशी अपेक्षा आहे. _/\_
३. दिलेल्या उपजीविका क्षेत्रांच्या केवळ मुंबई,पुणे,चेन्नई,दिल्ली,नागपूर अशा भल्या दांडग्या शहरांमधील येत्या १५ वर्षातील अवस्था विचारात घेतलेली नाही तर कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद,भुवनेश्वर, कन्याकुमारी,वाराणसी जालना,नाशिक,रत्नागिरी अशी तुलनेने लहान शहरेही विचारात घेतलेली आहेत हे लक्षात घ्यावे. _/\_

१. क्लासेस

यात प्रामुख्याने १ ली ते १२ पर्यंतच्या ट्यूशन्स/क्लासेसचा विचार केला आहे.शिक्षणावर होणारा खर्च,जाणारा वेळ आणि त्याचा अर्थप्राप्तीसाठी उपयोग याचा हिशोब लोक मांडू लागतील.एकूणच भारतीय शिक्षणव्यवस्था ही फारशी भरवशाची नसल्याने नावापुरती पदवी घेऊन 'एवढा पैसा क्लासेसवर अोतण्यापेक्षा या पैशात काही बिझनेस सुरु करु.त्यातल्या टक्क्याटोणप्यामुळे मिळणारं ज्ञान हे जास्त शिकवून जाईल.'असा विचार बळावणे.शिवाय हल्ली अॉनलाईन क्लासेस,युट्युब हे पर्याय तुलनेने स्वस्त आहेत.बायजुसारख्या शैक्षणिक सॉफ्टवेअरची जाहिरात शाहरुख खान सारखा सुपरस्टार करतो यावरुन यातली आर्थिक गुंतवणूक लक्षात यावी.होमस्कूलिंगही वाढू शकतं.

सोबतच UPSC,MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा खर्च आणि त्यात यशस्वी होणार्‍या उमेदवारांची संख्या पाहिली तर अजून थोडे वास्तव समोर येईल.लोक यापुढे या क्षेत्रात पुरेसा विचार उतरतील असे वाटते.

२. फास्ट फूड,जंक फूड निर्मिती

यांच्या सेवनामुळे येणारा लठ्ठपणा आणि इतर आजारांवर बर्‍यापैकी प्रबोधन होऊन लोक आरोग्यदायी आहाराकडे वळणे

३. कागदावरची,प्लॅस्टीक माध्यमांवरची छपाई

यात पुस्तके,रस्त्यावर लावले जाणारे फ्लेक्सबोर्ड यांचा खप रोडावेल;कारण पुस्तकंच काय पण काहीही वाचायला मुळातच लोकांकडे पुरेसा वेळ नाहीये.हा वेळ दिवसेंदिवस कमीच होत जाणारेय.शिवाय 'पुस्तकी ज्ञान नको प्रत्यक्षात काही काम केलं असेल तर ते सांगा' असा प्रचार वाढीस लागू शकतो.
प्लॅस्टीकबंदी कधीही कडक होऊन फ्लेक्सवर, अन्नपदार्थ पॅकबंद करायच्या पिशव्यांवर बंदी येऊ शकते. दुसरं स्वस्त,सर्व हवामानात टिकणारं,विघटनशील आणि ज्यावर चांगली छपाई होईल असं माध्यम अजूनतरी उपलब्ध नसणं ही कारणे असतील.
पण हा व्यवसाय अगदीच रसातळाला जाईल असंही नाही.अॉफिस,शाळा,कॉलेज यांना लागणारी पुस्तकं,वह्या,बिलबुकं यांना थोडीफार मागणी असेल.ती सुद्धा 'पेपरलेस' चा प्रचार फार झाला नाही तरच.

४. छोटे दुकानदारी व्यवसाय

अॅमेझॉन,स्नॅपडील,गुगल यांसारखे अॉनलाईन वस्तू विक्रेते प्रत्यक्ष मोठालं दुकान थाटून थेट विक्रीत उतरणे.महिन्याचा,वर्षाचा किराणा माल मॉलमधून एकदमच डिस्काऊंटवर खरेदी करणे.नुकताच संगमनेर मधील व्यापार्‍यांनी अॉनलाईन वस्तू विक्री कंपन्यामुळे व्यवसाय मंदावल्यामुळे आलेल्या वैफल्यातून केलेला प्रकार वाचनात आलाच असेल.

५. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती

भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फार बनतंच नसल्याने शिवाय त्या दुरुस्त करण्याइतपत सहज नसल्याने स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी बळावून अशा वस्तू दुरुस्त करण्यासाठी खुप कुशल अशा तंत्रज्ञांची गरजच न भासणे किंवा त्यांच्यासाठी पुरेसं कामच उपलब्ध न होणे.

६. जाहिरात कंपन्या

यात उत्पादनांसाठी टॅगलाईन सुचवणार्‍या कंपन्या,कलाकारांना घेऊन प्रत्यक्षात जाहिराती बनवणार्‍या कंपन्या विचारात घेतल्या आहेत.गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या 'डिजिटल मार्केंटींग'वाल्या कंपन्यांचं भांडवल मुळातंच कमी असतं त्यामुळे त्यांच्या संख्येवरुन जाहिरात क्षेत्र फायद्यात आहे आणि राहीलंच असा निष्कर्ष काढणं योग्य नाही.

उत्पादनाची/सेवेची जाहिरात आणि उत्पादनाची विक्री यांचे आंतरसंबंध तपासून देणार्‍या अत्याधुनिक यंत्रणा,प्रणाली यांचा वापर वाढणे जेणेकरुन जाहिरात कुठे करावी,कशी करावी याचे निर्णय उत्पादक कंपनी स्वत:च घेणे आणि ते बरोबर निघणे.पर्यायाने जाहिरात कंपनीला कंत्राट देणे कमी होणे.जाहिरातींवरचा खर्च कमी होणे.एखाद्या उत्पादनाची टॅगलाईन आवडली किंवा ती विविध माध्यमांतून वारंवार दिसते एवढे दोनंच निकष लावून आपण ते उत्पादन घेतो हा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल.बर्‍याच अॅपमधे जाहिरातींचा भडीमार असतो.ती जाहिरातीतली प्रत्येक वस्तू आपण लगेच विकत घेत नाही.

७.आर्किटेक्ट

बांधकाम करणारा इंजिनिअरच या बाबत पुरेसा सक्षम असणे;शिवाय इंटरनेटवर आयत्या तयार प्लॅन्सची संख्या भरपूर असणे,आर्कीटेक्ट नावापुरता,प्लॅन अप्रुव्ह करण्यापुरता कंस्ट्रक्शन कंपनीत असणे किंवा त्याला पुरेसं श्रेय मिळत नसल्याने पैसे चांगले मिळत असले तरी कामाचं समाधान न मिळणे; कारण आर्किटेक्ट हा जरा कमी कलाकारच असतो.कलाकार हे बर्‍यापैकी संवेदनशील असतातंच.
त्याशिवाय मुंबई,दिल्ली,पुण्यासारख्या भल्या मोठ्या शहरातल्या आर्किटेक्टकडून काम करुन घेण्याचा ट्रेंड वाढणे आणि त्यामुळे छोट्या शहरातल्या आर्किटेक्टना पुरेशी मागणी नसणे,आधीच्या आर्किटेक्टचे पैसे देणं बाकी असणे,राजकीय सेटींग नसणे ही सुद्धा कारणे असतीलच.

८. टेक्स्टाईल इंजिनिअरिंग

या शाखेत भरतीच कमी आहे.पदवीला अंदाजे 120 आणि पदविकेला 100 उत्तीर्ण होतात महाराष्ट्रातून. यावरून प्रमाण बघा.विशेषत: 2008 पासून प्रकर्षाने.आऊटसोर्सिंगही बरंच वाढलंय.१९९० नंतर पॉलिस्टरचं प्रमाण वाढल्याने कपड्यांचं आयुर्मानही वाढलंय.

९.स्टील फोटोग्राफी

फोटो स्टुडीओ बिजनेस तालुका आणि साधारण जिल्हापातळीवर ठप्प झालेला आहे.स्मार्टफोनमधेच २०-२२ मेगापिक्सेलचे कॅमेरे येताहेत.अर्थात हे स्टील फोटोग्राफीबद्दल.
मात्र व्हिडिओ शुटींग करणार्‍यांना थीम वेडींग,टिव्ही मालिका,सिनेमे,राजकीय सभा इथून मागणी राहीलंच.अर्थात दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या त्या म्हणजे अशा मालिका,सिनेमे,राजकीय सभा आयोजकांकडे 'जॅक लावता येणे आणि त्यांच्याकडून कामाचे पूर्ण पैसे मिळेपर्यंत तग धरणे हे जमलं तरंच!

१०. अॉटोमेशन

सध्या साखर तसेच इतर मोठ्या कारखान्यांमधे अॉटोमेशन वाढतं आहे.गव्हाणीपासुन ते बग्याज आऊटलेट फुल auto, प्रोडक्शन मधे जुस ते पार शुगर्स सायलो पर्यंत आणि को जेन boiler पासुन gas outlet सगळीकडे अॉटोमेशन येतं आहे.अर्थातंच छोटे कारखाने परवडेबल नसल्याने अॉटोमेशनकडे वळण्याची शक्यता कमी आहे;पण मोठ्या कंपन्यांत हे प्रमाण अजून वाढेल.

११ आय टी

या क्षेत्राबद्दल बर्‍यापैकी संदिग्धता आहे.काही जण म्हणत आहेत की आयटीला मरण नाही.वाईंडप करायलाच १० वर्षे जातील तर दुसरीकडे क्लाऊड कॉम्प्युटिंग, AI,अॉटोमेशन यांचही प्रमाण या क्षेत्रात वाढतंय त्यामुळे यात सध्या जितके लोक काम करतायत त्यात बर्‍यापैकी घट होईल.जोडीला या क्षेत्रातला मानसिक ताण आहेच.

मिपावर आयटीतले लोक बरेच आहेत त्यामुळे याबद्दल इथल्याच आयटी तज्ञांनी वास्तव सांगावं.

सर्वांचे आधीच आभार मानतो! _/\_

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

23 Dec 2018 - 2:33 pm | दुर्गविहारी

उत्तम विषयावर चा धागा. रोजच्या आयुष्यातील अनेक क्षेत्रात आव्हाने वाढत चालली आहेत, हे दिसतयं. वरच्या सर्व क्षेत्रात खरंच अडचणी वाढत चालल्यात. तंत्रज्ञानातील प्रगती माणसाच्या मुळावर येणार कि काय असे वाटु लागले आहे.
वरची क्षेत्रे काय , अगदी बँकींग कमी होत जाईल. यातील बरीच क्षेत्रं खुप रोजगार निर्मिती करतात, तिथे हि तथाकथित प्रगती बरीच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
उलट शेतीसारख्या क्षेत्रात मनुष्यबळ मिळत नाही, अशी विरोधी परिस्थिती आहेच.

उपयोजक's picture

23 Dec 2018 - 3:06 pm | उपयोजक

दुर्गविहारी!

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2018 - 7:32 pm | टवाळ कार्टा

आयटीबद्दल सहमत....चीनी लोक ज्या दिवशी इंग्लिश बोलायला लागतील त्या दिवसापासून आयटीचा ओघ तिथे वळणार....अर्ध्या किंमतीत कामे करुन देतील ते लोक

नावातकायआहे's picture

23 Dec 2018 - 10:03 pm | नावातकायआहे
डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2018 - 9:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते होण्याच्या आत भारतिय आयटी संस्था आणि तज्ज्ञांनी आपले काम, हमाली कामावरून, (खेळात नवीन असलेल्यांना मिळवायला वेळ लागेल अश्या) अतीकौशल्य (हाय प्रिसिजन / हाय क्वालिटी / हाय टेक; उदा: एई, ऑटोमेशन, इ) असलेल्या गोष्टींकडे वळवले पाहिजे... जसे जर्मनी व जपानने बर्‍याच व्यापारी क्षेत्रांत करून आपले आर्थिक-व्यापारी स्थान गेली अनेक दशके बर्‍यापैकी कायम ठेवले आहे.

युरोपीयन आणी अमेरिकन कंपनी आपले सेन्सेटीव काम तिकडे देतील असे वाटत नाही....

विजुभाऊ's picture

4 Jan 2019 - 2:54 pm | विजुभाऊ

टवाळ भाऊ
आय टी म्हणजे फक्त कॉल सेंटर चा व्यवसाय असतो असे म्हणायचे आहे का तुम्हाला.
चिनी लोकांच्या इंग्रजी बोलण्याचा आयटी शी काय संबन्ध ?
तसेही कॉल सेंटर उद्योगाला शेवटची घरघर लागलेलीच आहे. दोन एक वर्षातच तो जवळजवळ नामशेष होईल

छोट्या रिटेल व्यापाऱ्यांना जास्त धोका नाही पण त्यांना त्यांच्या मार्केट मध्ये स्थान टिकवून ठेवण्यासाठी जास्त काळ स्पर्धा करावी लागेल. कारण कोणताही मोठा रिटेलर असला तरी स्थानिक मार्केट मधील मागण्या अचूक पूर्ण करताना काही अडचणी असतात. त्याचाच फायदा छोट्या दुकानांना घ्यावा लागेल. तसेच रिटेल व्यवसायाचे स्वरूप बदलु शकते पण हे क्षेत्र कायमस्वरूपी राहील.

उपयोजक's picture

4 Jan 2019 - 9:47 am | उपयोजक
तेजस आठवले's picture

24 Dec 2018 - 4:24 pm | तेजस आठवले

वेगवेगळ्या समाजघटकांना आरक्षणासाठी मोर्चेकरी पुरविण्याचा धंदा तेजीत राहील असा आमचा आपला एक अंदाज.

जेव्हा यंत्र माणसाला पर्याय होईल .
तेव्हा मानवी जनसंख्या कमी होईल .
आताच लग्नाचं वय 30 chya पुढे गेले आहे आणि मुलांची संख्या 1 वर आली आहे .जेव्हा परिस्थिती गंभीर बनेल तास
लग्न करणे आणि मुलांची उत्पत्ती 1 वरून झीरो वर
येईल .
माणूस च नसेल तर समस्या पण नसतील

विजुभाऊ's picture

4 Jan 2019 - 2:58 pm | विजुभाऊ

तेव्हा मानवी जनसंख्या कमी होईल .

उत्तर प्रदेशात हे ज्यावेळेस होईल त्याच दिवशी भारतातही हे खरे ठरेल. तूर्तास तरी ही शक्यता अजिब्बात नस्से.

चौकटराजा's picture

26 Dec 2018 - 7:54 pm | चौकटराजा

माझे मते साधारणपणे अगदी जगाच्या इतिहासात ही म्हणा हवे तर ... १९५० च्य दरम्यान जी मुले जन्माला आली ती खरोखरच भाग्यवान ! ती योग्य वेळी जन्माला आली अन योग्य वेळी मरणार आहेत .मी ही त्या भाग्यवंतातील एक . या ६० वर्षात जग ऐहिक दृष्ट्या इतके बदलले आहे की थक्क व्हायला होते. याच प्रगतीच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे प्रदूषण , वाढते आयुर्मान , बेकारी ,गुन्हेगारी हे वाढत राहाणार आहे .सारी काळजी देवाला तो जीवन देतो तर घासही देईल ही भाबडी भावना गुंडाळून ठेवावी लागेल हे नक्की . एकविसावे शतक हे मेधावान व गुंड यांचेच राहील .उपयोजक ,..... आपण वर जी यादी दिली आहे तीत नीट विचार केला विस्मय व भय वाटेल इतकी ती लांबविता येईल .आज जे लोक २० वर्षाचे हप्ते ठरवून घरे घेऊन राहिले आहेत त्या बँका बुडणार आहेत अशी मला धास्ती वाटते.अर्थात ते पाहायला मी नसेन .सुतार ,लोहार,,चाम्भार हे व्यवसाय तर नामशेष होतील . नाही म्हणायला अन्न ,औषध हे व्यवसाय जगतील.

मार्मिक गोडसे's picture

26 Dec 2018 - 8:38 pm | मार्मिक गोडसे

सध्या बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ह्या टेक्नॉलॉजीमुळे भविष्यात गवंड्यांना कामच मिळणार नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2018 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

अशी आणि इतरही अनेक तंत्रे मोठ्या प्रकल्पांसाठी नक्कीच विकसित केली जातील, यात संशय नाही. पण, कितीही झाले तरी छोटेमोठे काम करणासाठी त्यांचा उपयोग शून्य. बारा बलुतेदारांना जगात कोठेही मरण नाही कधीच मरण नाही. विकसित देशांत बारा बलुतेदारांचे दर ताशी बर्‍याचदा उच्च विद्याविभुषित तज्ज्ञांच्या तुलनेत फार कमी नाहीत. या वर्षीचे अमेरिकेतील प्लंबरचे दर ताशी $४५ ते $२०० असे आहेत.

उपयोजक's picture

30 Dec 2018 - 8:10 pm | उपयोजक

हे अमेरिकेत.
शिवाय प्लंबरला सतत काम असतं का? या क्षेत्रात सतत असेल तर इतर क्षेत्रात येत्या १५ वर्षांत जर अत्याधुनिक तंत्रज्ञान येणार असेल तर प्लंबिंगच्या क्षेत्रातही येईलंच की!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2018 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

बारा बलुतेदारांचे किंवा पाश्चिमात्य जगात ज्यांना ब्ल्यू कॉलर जॉब म्हणतात, त्यामध्ये सरासरी (अवॅरेज) प्रतीचे कौशल्य असलेला माणूस तीन-चार माणसांचे कुटुंब तिथल्या स्तरावर खाऊनपिऊन सुखी असावा इतके कमावतो. तिथले बारा बलुतेदार स्वतंत्र/रोजंदारीवर काम न करता बहुदा युटिलिटी सर्विसेस कंपनीमध्ये नोकरीवर असतात. अश्या कंपनीला फोन केला की फोनवरच ताशी दर पक्का होऊन त्यांचा माणूस आपल्या घरी येतो.

गेली काही दशके पाश्चिमात्य देशांत उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी होत गेले आहे, याचे एक महत्वाचे कारण असे सांगितले जाते... १० किंवा १२ + १-२ वर्षे धंदा (ट्रेड) शिक्षण / अनुभव यांच्या बळावर मिळणारे उत्पन्न जर ठिकठाक असले की, सर्वसाधारणपणे, लोकांचा अधिक ४ ते ६ वर्षे खर्च करून खूप महागडे उच्च शिक्षण मिळविण्याकडे कल रहात नाही.

ऑटोमेशन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये वेळ, श्रम आणि पैसा वाचवते, व त्यात नवनवीन विकास होत राहील यात शंका नाही. त्याकामात ती मशिन्स चालविण्याचे उच्च कौशल्य असलेली माणसे, जास्त पगार असणारी, पण कमी संख्येने तंत्रज्ञ लागतील.

मात्र, घरे व लहान-मोठ्या इमारतींमधील देखरेखीचे काम (मेंटेनन्स) हे सतत चालू राहणारी गरज असल्याने व त्या कामात ऑटोमेशन असलेली महागडी मशिन्स उपयोगी नसल्याने (घरातला उंदीर मारातला तोफ उपयोगी नसते :) ), त्या कामामध्ये बारा बलुतेदारांना मरण नाही.

उपयोजक's picture

30 Dec 2018 - 8:57 pm | उपयोजक

नागपूरला पाणी टंचाईची समस्या होती
oCW या फ्रेंच कंपनीला पाणी जोडणी आणि बिल आकारणी दिल्यावर पाणी गळती आणि चोरी यात घट होऊन सध्यातरी पाण्याची कमतरता जाणवत नाही गेली सहा सात वर्षे.

अगदी गल्ली बोळातल्या व्हॉल्व्हचे मॅपिंग,metering होऊन थेट पॅरिसहून मॉनिटर होते.

मार्मिक गोडसे's picture

26 Dec 2018 - 9:56 pm | मार्मिक गोडसे

पाच वर्षांपूर्वी फक्त बडे बिल्डर्स हे तंत्रज्ञान वापरत. आता नैसर्गिक वाळू,भाजलेल्या विटा आणि मजुरी वाढल्यामुळे छोटे बिल्डरही हे तंत्रज्ञान वापरू लागले आहे, त्यामुळे ते आता स्वस्तही झाले आहे. मिरर बिल्डिंग/बंगले बांधल्यामुळे खर्चात खूप कपात होते त्यामुळे छोट्या बांधकामातही आता हे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे.

अमित मुंबईचा's picture

27 Dec 2018 - 10:04 am | अमित मुंबईचा

सध्या मोबाइल संचांची घटती किंमत, स्वस्त डेटा, चांगली काँनेक्टिव्हिटी यामुळे विडिओ कन्टेन्ट च मार्केट फारच जोमात आहे.

यामध्ये नवीन OTT प्लॅटफॉर्म्स येत आहेत जसे नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम, हॉटस्टार वगैरे, त्याशिवाय युट्युब तर आहेच.

मला वाटत येत्या १५ वर्षात या क्षेत्रात वाढ दिसून येईल.

नितिन थत्ते's picture

27 Dec 2018 - 11:28 am | नितिन थत्ते

मी नक्की रिटायर होईन येत्या १५ वर्षात :)

Blackcat's picture

27 Dec 2018 - 4:32 pm | Blackcat (not verified)

क्लासचा धंदा बंद होणार नाही ,
Evergreen profession

मुक्त विहारि's picture

27 Dec 2018 - 5:38 pm | मुक्त विहारि

किंवा मग "बाबा-महाराज" व्हायचे...

चार कुटाळ टाळकी जमली की, हा धंदा तेजीत...

ह्या धंद्याला मरण नाही शिवाय पुढच्या १०-१२ पिढ्या बसून खातील इतके उत्पन्न हमखास...

हे पण न जमल्यास, एखादे "बाबा" मंदिर तळमजल्यावर स्थापन करायचे...एक कोटीच्या भांडवलावर, महिना किमान एक लाख नक्की...शिवाय रात्री-बेरात्री
किंवा पहाटे कितीही ध्वनी प्रदूषण करा, कुणी काही बोलले तर, भक्तगण समस्त सोसायटीलाच धंद्याला लावू शकण्याची शक्यता आहे....

उपयोजक's picture

4 Jan 2019 - 9:40 am | उपयोजक

ही जुनी बातमी वाचा

malvika

चौकटराजा's picture

27 Dec 2018 - 8:12 pm | चौकटराजा

जगाच्य अंतापर्यंत देवावरची श्रद्धा कायम रहाणार सबब देवळे टिकतील व वादासाठी मिपाची !

मुक्त विहारि's picture

29 Dec 2018 - 10:43 am | मुक्त विहारि

+ १

काही ही काम धंदा न करता, महिना एक-दीड लाख, हमखास उत्पन्न आणि ते पण वाढते, मिळायची शक्यता जास्त...पुढे-मागे सोसायटीतील जनता ध्वनी प्रदूषणाला कंटाळून, सोडून जायची शक्यता पण नाकारता येत नाही...मग बाजारभावापेक्षा कमी दरात, ते फ्लॅट पण आपल्यालाच मिळायची पण शक्यता आहेच....

पण देवापेक्षा, बाबा-महाराज-आई इ. मानवसमाजातील ह.भ.प. मंदिरे, डोंबिवलीत जास्त गर्दी खेचतात आणी मग पैसा पण येतोच...आणि जे जे डोंबोलीत ते ते जगात, असा आजकाल ट्रेंड आहे...

कंजूस's picture

29 Dec 2018 - 4:00 pm | कंजूस

आता त्या चिनी आक्रमणाने अमेरिकाही काबिज केली आहे. इतकी की ते घाबरून त्यावर बंदी आणण्याचा विचार करत आहेत. ( हुआवे आणि झेडटीइ मोबाइलवर बंदी घालण्याचा विचार चालू आहे.

डँबिस००७'s picture

31 Dec 2018 - 12:15 am | डँबिस००७

उपयोजक
ह्या नविन विषयावरचा उत्तम धागा !

भारतातील समाजमान वेगाने बदलत आहे. मोबाईलच्या प्रसाराने माहितीच प्रसारण वेगाने होत आहे. लोक मोबाईल तंत्रामुळे जोडले गेलेत. पण ह्या तंत्राचा वापर चांगल्या तसेच वाईट अश्या दोन्ही तर्हेने होऊ शकेल, होत आहे. अफवा पसरवण्यासाठी याचा जोरदार वापर होत आहे.

मुळातच भारतीय जनता भावना प्रधान व तसेच नाईव्ह असल्याने त्यांच्या प्रतिक्रीया काय होतील त्याचा अंदाज बांधुन तश्या प्रकारची माहीती त्यांच्याकडे पोहोचवुन हवे तसे जनमत तयार करता येते. भारतीय जनतेला कोणत्याही आपात स्थितीत काय करायला पाहीजे त्याची प्राथमीक माहिती, शिक्षण नसल्याने त्यांच्या कडुन कोणत्याही आपात स्थितीत कोणतीही मदत होईल अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. ऊलट अश्या स्थितीत जनता स्वतः जिवावर उदार होऊन बळींची संख्या वाढवेल. उदाहरण एखाद्या पेट्रोल नेणार्या टँकरला आग लागली तर त्या पासुन दुर जाण्या एवजी जवळ जाऊन पहाणार्यांची संख्या आपल्या कडे जास्त आहे. त्याशिवाय फुकटात पेट्रोल मिळत मग काय मिळेल त्यात भरुन घ्या भले स्वतःकडे वहानाच्या नावने सायकल सुद्धा नसेल !! अशी घटना गेल्या दोन वर्षीपुर्वी पाकिस्तानात होऊन ५० - ६० लोक मृत्युमुखी पडले होते. ह्या बाबतीत भारतीय खुप वेगळे नाहीत. भारतीयांना स्वतःचा व तसेच ईतरांचा जीव खुप महत्वाचा आहे हे लहानपणा पासुन (शाळेतुन ) शिकवले जावे. जापान कडुन ह्या बाबतीत खुप शिकता येईल.

भारतात गेल्या ४ वर्षांपासुन वहातुकीच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. रेल्वे, रस्त्याशिवाय जल वहातुकीला सुद्धा ह्या सरकारने प्राधान्य दिलेल आहे. जगभरात देशातंर्गत वहातुकीचा खर्च हा ९ ते १२ % ईतका असतो. म्हणजे १०० रु च्या वस्तुवर ९ रु ते १२ रु.
चीन मध्ये हा रेट ८ % च्या खाली आहे. सर्वात महाग वहातुक ही रस्त्यावरची असते, त्या खालोखाल रेल्वेने व त्यातल्या त्यात जल वहातुक स्वस्त असते. जगभरात आतंरदेशीय वहातुकी बरोबरच आंतरदेशीय वहातुक ही जलमार्गानेच होत असते. भारतात ब्रिटीश सरकार यायच्या अगोदर देशांतर्गत वहातुक ही जलमार्गानेच होत असे. त्यातली काही व्यवस्था आजही केरळ, गोव्यात टिकुन आहे.

ह्या सरकारच्या प्रयत्नाला जर यश मिळाल तर देशांतर्गत वहातुक स्वस्त होईल . ह्याचा अर्थ देशातल्या देशात वस्तु स्वस्त होतील. परदेशात निर्यात होणार्या वस्तुंवर सुद्धा देशांतर्गत वहातुक खर्च कमी होऊन एकुण खर्च कमी होईल व वस्तूंची किंमत परदेशी मार्केट मध्ये स्पर्धेला तोंड देण्यासाठी योग्य असेल .

येत्या ३ ते ५ वर्षांत वहातुक क्षेत्रात खुप वाव निर्माण होणार आहे.

क्रमश :

अहो आपल्याकडे पण नागोठण्याला २५-३० वर्षांपुर्वी अशी घटना झाली होती. ऑइल टँकर उलटला आणि खेडेगावातल्या लोकांची टँकरमधले पेट्रोल भरायला झुंबड उडाली. ती सकाळची पहाटेची वेळ होती आणि सडकेच्या कडेला "बसलेल्या" महाशयांनी तोंडातल्या बिडीचे थोटूक नेमके सांडलेल्या ऑईलवर फेकून दिले. क्षणार्धात आग लागली आणि पाच सहा लोक मृत्युमुखी पडले.

अमित मुंबईचा's picture

4 Jan 2019 - 1:10 pm | अमित मुंबईचा

मला माझ्या आई ने असाच प्रसंग सांगितलं होता पण तो सुरूर (सातारा ) इथे घडलेला, कालावधी पण सेम

नागोठण्याला पण असे काहीतरी झाले होते असे वाचल्याचे आठवते.

डँबिस००७'s picture

31 Dec 2018 - 4:59 pm | डँबिस००७

सागर माला ह्या प्रकल्पात देशात अस्तित्वात असलेली बंदरांचा पुनर्विकास केला जाईल. त्या बंदराची कॅपॅसीटी वाढवली जाईल . जीथे नविन बंदरे बांधता येतील तीथे नविन बंदरे उभारली जातील. नदीतुन जलमार्ग विकास केला जाईल. बोटी जाण्यासाठी ३ मीटरचा ड्राफ्ट ड्रेजींग करुन केला जाईल. हे सध्या काम चालु आहे .

२ नोव्हेंबरला कोलकत्ता वरुन १६ कंटेनर घेऊन एक जहाज वाराणसीला पोहोचल. पेप्सी कंपनीचे हे १६ कंटेनर होते. हा मार्ग जल वहातुकीला आता खुला झालेला आहे. गंगा नदीतुन जाणारा हा जल मार्ग ४ राज्यांना वापरायला मिळणार आहे. युपी, बिहार, झारखंड व प. बंगाल ह्या राज्यादरम्यान गंगा नदीतुन ही जल वहातुक सुरु झालेली आहे. वाराणसीत बनलेला माल आता कंटेनर ने कोलकत्ता पर्यंत जल मार्गाने पुढे ते कंटेनर मोठ्या बोटीतुन निर्यात केले जाउ शकतात .

अश्या प्रकारे नविन मार्ग आता उपलब्ध होऊ लागतील.

व्यवसायाच्या संधी :
छोट्या बोटीतुन माल वहातुक,
बंदरातुन माल नेणे आणणे.
कंटेनर स्टफींग.
रेल्वे करता माल चढवणे
वहातुकीच्या माल साठी यार्ड तयार करुन तिथुन वेगवेगळ्या मार्गाने माल वहातुक बुक करणे.

यंत्र काम करणार जनता बेकार मग साबना पासून टूथपेस्ट खरेदी कोण करेल .
बहुसंख्य जनताच जर बेकार झाली तर ,माणसांनी माणसं साठी निर्माण केलेली कृत्रिम अर्थव्यवस्था टिकेल का .
जे बहुसंख्य लोक असतील ते बाकी लोकांना सुखाने जगून देतील का .
आशा चालत्या bolty मानवी बॉम्ब च उपयोग किती तरी देश करून घेतील

बहुसंख्य जनताच जर बेकार झाली तर ,माणसांनी माणसं साठी निर्माण केलेली कृत्रिम अर्थव्यवस्था टिकेल का .

तीच चिंता आहे.
तंत्रानुसार नवनवे रोजगार येतील, पण "उत्तम शेती ".......... हे मात्र जगाच्या अंतापर्यंत खरे राहील.

बहुसंख्य जनताच जर बेकार झाली तर ,माणसांनी माणसं साठी निर्माण केलेली कृत्रिम अर्थव्यवस्था टिकेल का .

लक्षात घ्या की कृत्रिम अर्थव्यवस्था ही कधीही टिकणार नाही म्हणुन अर्थ व्यवस्था अशी असायला पाहीजे जी टिकु शकेल ! हे तेंव्हा होईल जेंव्हा आता असलेली व्यवस्था जास्त चांगली अद्ययावत होईल. हि सूरुवात होते आहे शेतीतुन . गेली दोन दशके शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यावर उपाय कोणी केला ? फक्त कर्ज माफी करण्याचे वायदे करुन लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलेले आहे आता पर्यंतच्या सरकारने . शेतकर्याची मूळ समस्या आहे ही शेत मालाला बाजार पेठ.
उदा १. देशातला पुर्ण बाजार सध्या शेतकर्याला उपलब्ध नाहीय . म्हणजे लासल गावचा कांदा हा आसाम मध्ये पोहोचतो तिथल्या व लासल गावातल्या व्यापार्यांच्या मर्जीवर ! तसेच तोच कांदा भारतातल्या
इतर दुर्गम भागात ही वेळेवर सुस्थितीत पोहोचत नाही. शेतकर्याला वाटत मालाला उठाव नाही. पण त्याच वेळेला अशी बाजार पेठ असते जिथे हा माल पोहोचतच ना ही. जर पोहोचला तर तो खुप महाग असतो.
ऊदा २. मैसुर जवळ एक प्रसिद्द हॉटेल आहे. ते लोक कांद्या पासुन भजी सारखा एक वडा बनवतात. गेले १०० वर्षे हा धंदा चालु आहे. त्यांना ह्या वड्यासाठी उत्तम प्रतिचा कांदा लागतो. त्यांची पसंती ही लासल गावच्या कांद्यालाच असते. पण ते लोक कांदा हा तिथल्या
लोकल व्यापार्याकडुन ज्या भावाला मिळेल त्या भावाला विकत घेतात.

पण समजा उत्तर पुर्वेतला ग्राहक किंवा मैसुर मधला हॉटेल मालक जर लासल गावच्या शेतकर्याशी डायरेक्ट संपर्कात आला तर त्याला चांगला माल उत्तम रित्या पॅक करुन स्वस्तात मिळु शकेल व त्याच्या भावी जरुरी प्रमाणे त्या प्रमाणात मिळु शकेल. शेतकर्याला आपल्या माल डायरेक्ट विकण्याचा पर्याय आता उपलब्ध झालेला आहे. त्या व्यवस्थेच नाव आहे ईनाम ( ENAM ELECTRONIC NATIONAL AGRICULTURE MARKET ) ह्या व्यवस्थेत काम करण्यासाठी शेतकर्याला नविन टेक्निक शिकाव्या लागतील. आपल्या मालाच्या गुणवत्तेचे प्रमाण पत्रक तयार करुन घ्यावे लागेल.
शेतकर्याने ENAM च्या वेबसाईट वर आपल्या माला बद्दल माहिती टाकायची फोटो, प्रमाण पत्र , किमंत टाकायची . ज्या ग्राहकाला मालाची गरज आहे तो त्या वेब साईट वर येऊन मालाची खात्री करुन पटलेल्या किमतीला माल विकत घेऊ शकेल. पै श्याचा व्यवहार हा त्या वेबसाईट तर्फेच होणार असल्याने त्याची खात्री आहे. माल पॅक करुन तयार करण्याची जवाबदारी शेतकर्याची. तर माल उचलण्याची
जवाबदारी ग्राहकाची.

ह्या ENAM व्यवस्थेत शेतकरी, प्रमाण पत्र देणारी लॅब, व्यव हार करणारी बँक, माल पॅक करण्यासाठी लोक, वहातुकी साठी लोक
लागणार आहेत. ईतकी मोठी व्यवस्था तयार व्हायला वेळ लागेल पण लोकांनी शिकुन ह्यामध्ये शिरण्याची गरज आहे. स्वतः काही न करता
दुसर्यावर वा सरकारवर दोष देता येणार नाही.

दुबईत मार्केट मध्ये फक्त एकट्या सफरचंदाच्या १२ ते १५ जाती उपलब्ध असतात. हि सफरचंद फ्रांस पासुन चीन पर्यंत वेगवेगळ्या देशातुन येत असतात पण हिमाचल कश्मिरमधल सफरचंद तिथे कधीही दिसत नाही. नाही म्हणायला कांदा दिसतो, पण तो ईतका खालच्या दर्ज्याचा असतो की सुपर माकेट मध्ये सर्वात स्वस्त काही मिळत असेल तर तो भारतातला कांदा. कांदा चीन मधुन ही येत असतो पण तो मात्र खुप सुंदर चांगल्या दर्ज्याचा असल्याने खुप चांगली किंमत मिळवुन जातो. भारतातला माल एकंदरच ईतक्या वाईट पॅकींग ने येतो की कोणी ही विकत घ्यायच्या अगोदर दोनदा विचार करेल !

पण ह्या सरकारने