अतृप्त आत्मा 12

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
16 Dec 2018 - 7:37 pm

नान्याला छळण्यात आम्हाला आता काहीही स्वारस्य उरलं नव्हतं.अपेक्षित दहशत त्याच्या मनात बसलेली असल्याने तो आता आमचं सर्व ऐकायला बांधील होता.

नाना नानीची वरात पुन्हा प्रेसजवळ पोहचल्यावर नाना थंडीने आणी भितीने थरथर कापत जीन्यावरुन घरात गेला.आता त्याला आरामाची गरज होती.एकंदर सर्व घटनाक्रमाचा त्याच्या मनावर ताण निर्माण झाला होता .आता पुन्हा जर काही घडते तर तो देखील नानीला विधवा करुन आमच्याबरोबर वावरायला मोकळा झाला असता.आणी आम्हाला ते नको होते.

त्याला तात्पुर्त सोडुन आम्ही त्याच्या अॉफीसमधे आता पुढे काय करायचं याचा विचार करीत त्याच्याच खुर्चीत रेलुन बसलो.

एव्हाना सकाळ झाली होती.आणी आमचे अस्थि सावडायला मसणात आमच्या चिरंजीवांबरोबर काही नातलग आणी चाळकरी जमा झालेले.आप्पा देखील आलेला आणी त्याने बाबल्याला नानाकडे त्याला बोलवायला पाठवले.

बाबल्या अॉफिसमधे आला आणी नानाला हाका मारु लागला.आम्ही तिथेच बसलेलो होतो.

नाना काही आज उठणार नव्हता.पहाटे चार साडेचारला थंडी भरुन झोपलेल्या नानाला आता ताप भरला होता.आणी हेच सांगण्यासाठी आम्ही खुर्चीतुनच बाबल्याला आवाज देउन बसायला सांगितलं .

"बापु ! इथं काय करताय ? ओ बापु !!कुठय तुम्ही ?? " बाबल्या भैसाटल्यासारखा ओरडत बाहेर पळायला लागला. दरवाज्यातच त्याचं मानगुट पकडुन त्याला समोरच्या खुर्चीत बसवला.डोळे विस्फारत बाबल्या आमच्याकडे बघु लागला.आम्ही एक पाय वर दुमडुन रेलुन खुर्ची त्याच्या जवळ सरकवली .आणी पाठीवर थोपटत बोलायला सुरुवात केली
"कोण कोण जमलय रे तीकडे ?"

"हैत आट धा जण ,आप्पानी पाठिवलं नानांना बोलवायल" बाबल्या

" नाना नाही येत आज. तापलाय रात्रीत" आम्ही बोललो.

"ओ बापु ! आता समद्या गावाला धरणार का" बाबल्या डोळा घालत बोलला.आता तो थोडा सावरला होता.

"आप्पाला सांग नाना नाही येत आज. तापलाय तो " सट्टकन त्याच्या गालात वाजवत आम्ही बोललो.त्यासरशी बाबल्या उठुन जायला लागला.

"आणी मी येतोय हे पण सांग त्या गोखल्याला " आम्ही बोललो.

बाबल्या मसणाकडे पळत सुटला.

आम्ही थोडेसे रिलॕक्स होत असतानाच संतु आला आणी खालुनच नानीला हाका मारु लागला.नानीही लगेच खाली आली आणी दरवाजा उघडुन अॉफीसमधे टेबलापाशी येउ लागली.आम्हीही लगेचच खुर्चीतुन उठुन बाजुला जाउन उभे राहीलो.

" संतु ! बापुच्या घरी जाउन हे पुडकं देउन ये .आणी उघडुन बघु नको.पैसे आहेत त्यात.नानांनी दिलेत म्हणुन सांग ." नानी ड्रॉवर मधलं बंडल पाकीटात ठेवत त्याला बोलली.

पाकिट हातात घेउन संतु गेला.संतु प्रामाणिक होता त्याच्यावर नानाचा जास्त विश्वास होता.त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो.

" कुठं जिव अडकलाय मेल्याचा कुणास ठाउक " कोपऱ्यातल्या हनुमंताला नमस्कार करत नानी पुटपुटली. नानाने सर्व सांगितलं की काय ?आम्हाला प्रश्न पडला.

पण विचार करायला वेळ नव्हता.आम्हीही संतुच्या मागे चाळीकडे निघालो.कितीही विश्वास असला तरी माणसाची नियत कधी बदलेल सांगता येत नाही.

चाळीपाशी पोहचलो संत्याच्या मागे जीना चढताना समोरुन जयडी आली.केस विसकटलेल्या आणी रडुन डोळे लाल झालेल्या अवस्थेत तीला बघुन एकदम कसंतरीच झालं.आम्ही तीला दिसु शकणार नव्हतो.

हताशपणे संत्याच्या मागेमागे घरापाशी पोहचलो.बाहेरच्या खोलीत आमच्या लाकडी खुर्चीत आमचा देखणा हसरा असा फोटो हार घालुन ठेवलेला.आमचं कुटुंब डोळे पुसत बसलेलं.आणी चार नातेवाईक आणी चाळकरी बायका भोवती खुसफुस चर्चा करत बसलेल्या.संत्याने फोटोला आणी दिव्याला नमस्कार करुन पैश्यांच पुडकं बायडीच्या हातात सोपवलं.

" नानांनी दिलेत ,बापुचा पगार आहे " संतु बोलला
बायडीला एकदमच भडभडुन आलं.ती एकदम मंदा मावशीच्या गळ्यात पडुन रडु लागली.आणी हि मावशी नानाच्या दातृत्वाचं कौतुक करत बायडीला थोपटु लागली.

च्यायला सगळेच चोर साले सारख्याला वारखे.आज या मंदा मावशीला दर्शन द्यायचं आणी उधारी वसुल करायची हे आमच्या मनात पक्क झालं.

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

17 Dec 2018 - 12:23 am | टवाळ कार्टा

पुढचे भाग लौकर टाका....मस्त चालली आहे मालिका

दुर्गविहारी's picture

17 Dec 2018 - 6:50 am | दुर्गविहारी

मजा येती आहे. जरा मोठे भाग टाका.

प्रमोद देर्देकर's picture

17 Dec 2018 - 9:36 am | प्रमोद देर्देकर

मस्त मग पुढे काय ?

किमान 50 भाग तरी झाले पाहिजे नाहीतर मिपाची भूतावळ तुमच्या मागे लागेल बघा .

नावातकायआहे's picture

17 Dec 2018 - 11:42 am | नावातकायआहे

+१