यूं-ही-चला-चल-राही भाग - ३

Primary tabs

मालविका's picture
मालविका in भटकंती
1 Dec 2018 - 8:37 pm

13 November, 2018

तिसरा दिवस उजाडला.आज कोळथरे ते वेळणेश्वर असे अंतर पार करायचे होते. गूगल मॅप ४५किमी दाखवत होता. मध्ये दाभोळ – धोपावे फेरी बोट होती. धोपावे इथे उतरून वेलदूर – गुहागर मार्गे वेळणेश्वर असा आमचा मार्ग होता. निघू निघू म्हणता म्हणता ०७. ४५ झाले. भावजींनी दोन बाटल्या भरून शहाळ्याचे पाणी दिल होत आणि एक साध्या पाण्याची बाटली होती. सकाळचा चहा पिऊन सर्वाना बाय करून निघालो. जाताना एकदम मस्त वाटत होत. पंचनदी पाठी टाकून दाभोळच्या रस्त्याला लागलो आणि मग सुरवातीला साधा सरळ असणाऱ्या रस्त्याला फक्त चढ एके चढ लागायला लागले. १-१ असा गिअरचा रेशो असूनसुद्धा पॅडल मारायला जड जायला लागलं. तरी नशिबाने ऊन चढलं नव्हतं. सांगताना सुरवातीला सगळ्यांनी थोडासा चढ आणि मग खाली दाभोळ जेटीपर्यंत उतार असच वर्णन केलं होत. पण गाडीतून जाताना लागणारे चढ नि सायकल वरून जाणवणारे चढ यात किती फरक असतो हे कोळथरेला येईपर्यंतच जाणवला होत. तिथल्या मानाने काहीच नाही असं म्हणत चढ चढवत होते. शेवटी एकदाचा दाभोळ जेटीकडे जाणारा रस्ता असा बोर्ड लागला. अजून थोडासा चढ चढला आणि मग मात्र उतार सुरु झाला. इथे मात्र या उतारात रस्ता एकदम नीट होता. क्वचितच एखादा खड्डा होता. त्यामुळे उतार उतरायला खूप मस्त वाटलं. एकदम स्पीड मध्ये केव्हाच उतरून झाला उतार. जेटी वर पोचलो नि दुर्दैवाने ५ मिनिटांसाठी आमची फेरी चुकली. पहिली फेरी ०८. १५ ची असते असं भावजी म्हणाले होते. म्हणजे पुढची तासाभराने ०९. १५ ला असणार असं गृहीत धरून आम्ही ०९. १५ ची फेरी गाठायला ९.०५ मिनीटांनी पोचलो. पण इथे पुढच्या फेरी मध्ये तासाभराच नसून फक्त ४५मिनिटांचं अंतर होत. त्यामुळे आमची फेरी चुकली. मग काय तिकीट काढून वाट बघत बसलो. समोर धोपावे जेटी दिसत होती. थोड्याच वेळात फेरी बोट हजर झाली. मंगळवार असल्याने बोटीला जास्त गर्दी नव्हती. आरामात सायकल पार्क करून आम्ही जागा पकडल्या.

१५-२० मिनिटात बोट पलीकडच्या धक्क्याला लागली. आता इथून पुढे वेलदूर. इथे श्रीनिवासच्या मित्राचं हॉटेल आहे तिथे नाश्त्याला येतो म्हणून सांगितलं होत. धोपावे ते वेलदूर मोठाच्या मोठा चढ आहे. परत एकदा पॅडल मारायला सुरवात केली. पण इथे मात्र एक झालं कि हा चढ एकदम तीव्र नव्हता. ग्रॅजुएल होता. त्यामुळे चढताना एकमार्गी चढत होतो. श्रीनिवास मधून मधून बडबड करित मला एन्करेज करत होता. पण मी तोंडातून एक अक्षर काढत नव्हते. न जाणो बोलून आणखी दम लागायचा. इथे फेरीत पॉझ केलेले रनकीपर फेरीतून उतरल्यावर चालू करायचे विसरले. त्यामुळे धोपावे ते वेलदूर हे साधारण ३. ५० ते ४ किमी अंतर त्यात रेकॉर्ड झाले नाही. हळूहळू चढ चढत एनरॉन च्या गेटपाशी आलो. इथे समोरच श्रीनिवासचा मित्र निलेश नि माझी मैत्रीण अमिता यांचं पूर्णब्रह्म हॉटेल आहे . भेट प्लस नाश्ता प्लस ब्रेक प्लस गप्पा अस एकदम झालं. मस्त पोहे आणि कोकम सरबत झालं त्यांच्याकडे. इथून गुहागर ८-१० किमी होतं. याच रस्त्याने जाताना आरे म्हणून गाव लागत. माझी मावशी राहते तिथे. मावशीची मुलगी प्राजक्ता तिच्या मुलासह सुट्टीला आली होती. मग दुपारच्या जेवणाला मावशीकडे जायचं ठरलं. पूर्णब्रह्म मधूनच फोन करून मावशीला कल्पना दिली नि निघालो परत स्वार होऊन. इथे मला भलताच आनंद झाला. कारणआता पूर्ण गुहागर पर्यंत उतार आणि एनरॉनचा रस्ता असलयाने गुळगुळीत रस्ता. त्यामुळे वेळ कशाला लागतोय. इथे सकाळी आमच्या पाठून निघालेला माझा भाऊ सुमंतने आम्हाला बाईक वरून गाठले. परत त्याला फोटो घेण्याची रिक्वेस्ट केली. आणि त्याने पण लगेच दोघांचा सायकलवरचा एक फोटो क्लिक केलंन. आम्हाला बाय करून तो निघून गेला. आम्ही जरा थांबत थांबत आरे फाटा कुठे आहे बघत होतो. आणि थोड्याच वेळात आलो.

फाट्यावरून थोडंफार आत आहे मावशीच घर हे महित होत पण नक्की किती हे मात्र नव्हतं माहित. बघू पुढे जाऊन, असं म्हणून फाट्यावरून आत गेलो. चढ उतार बरेच होते रस्त्याला आणि शिवाय रस्त्याची स्थिती पण बघण्यालायक नव्हती. १५-२० मिनिट गेल्यावर २ बायका दिसल्या त्यांना विचारलं जोश्यांचं घर कुठे आहे तर त्या म्हणाल्या बरंच पुढे आहे. इथून १५/२० मिनीटांनी ब्राह्मण वाडी लागेल तिथून अजून पुढे. मी उडालेच ऑलरेडी आम्ही जवळ जवळ एक ते दीड किमी तो खडबडीत रस्ता पार करून आलो होतो आणि त्यात अजून साधारण तेव्हढाच रास्ता पार करायचा होता .साधारण १५ मिनिट पुढे गेल्यावर मात्र श्रीनिवास या म्हटलं आता प्राजक्ताला फोन कर. उगाचच्या उगाच पुढे नाही जायचं. नशिबाने फोन एक झटक्यात लागला. तिने आजू १५ मिनिटांचा रस्ता सांगितला. आता माझी मानसिक दमणूक झाली. चढ उताराचा तो खडबडीत रस्ता काही संपत नव्हता नि मावशीच घर काही येत नव्हतं. शेवटी एकदाचा तिचा मुलगा ओम आम्हाला दिसला. पण खरी मज्जा तर पुढेच होती. मावशीच घर रस्त्यापासून ५मिनटे खाली उतरून होत. आणि इथे फक्त पायवाट होती. मी कपाळावर हात मारून घेतला. श्रीनिवास सायकल सोडून खाली यायला तयार नव्हता. मग काय चला! त्या रस्त्यावरून कशा बश्या काही उचलून तर हातात धरून सायकल खाली आणल्या. मावशीच्या घरी सोफ्यावर अंग झोकून दिलं. पाचेक मिनिटं आडवं पडल्यावर बरं वाटलं. कोळथरेला आल्यापासून गोडं पाणी मिळाला नव्हतं. मावशीकडे पोटभर गोडं पाणी पिऊन घेतलं. आम्ही आयत्या वेळी कल्पना दिल्याने मावशी नि ताई स्वयंपाक करण्यात गुंतल्या होत्या. आजूबाजूने रोजची गडी माणसं वावरत होती. पिनड्रॉप म्हणतात तसा सायलेन्स होता तिथे. खरंच खूप बरं वाटलं. आजूबाजूने हिरवीगार झाडी असल्याने आपसूक हवेत गारवा होता. थोड्याच वेळात मावशीने पान मांडलंन. भरपेट जेवून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. थोडी झाड झुडूप बघितल्यावर श्रीनिवासची उत्सुकता जागी झाली. नाही नाही म्हणता एक जरबेराचा कंद आणि एक जास्वंदीच्या फांदीची सामनात भरती झाली . परत एकदा मागचाच पायवाटेचा चढ चढून आम्ही मूळ रस्त्यावर पोचलो. इथून पुढे परत मेन रस्त्यावर येण्यासाठी साधारण ३ किमी कापायचे होते. भर दुपारच्या २. ३० च्या उन्हात केली सुरवात. इथे मात्र रस्त्याने वैताग आणला. मजल दरमजल करीत मी एकदाची मेन रस्त्याला आले. मग परत गुहागर पर्यंत मस्त उतार लागला.

गुहागर मध्ये एक दोन ठिकाणी हाक मारून वेळणेश्वरच्या वाटेला लागलो. इथे देखील सुरवात चढाने झाली . पण हा देखील ग्रॅजुएल चढ होता. त्यामुळे चढवणे तसं कठीण गेलं नाही. मोडका आगार वरून उजवीकडे वळण घेऊन वेळणेश्वरला लागलो. इथून १५/१६ किमी अंतर आहे. फक्त मध्ये पालशेत गावातला मोठ्ठा चढ लागतो. बारीक सारीक चढ आहेतच वाटेत. पण श्रीनिवासच्या भाषेत सांगायचं तर ते छोटेसे अपहिल्स आहेत क्लाइम्बस नाहीत. त्याचा बाऊ करायचा नाही. एकदाचे पालशेतला पोचलो. आधी मोठा उतार नि मग वळणावळणाचा तीव्र चढ. पण इथेही उतारात असंख्य खड्डे तर चढ एकदम गुळगुळीत. हा रस्ता पालशेत गावातून जातो त्यामुळे रस्त्यावर थोड्या फार प्रमाणात गर्दी होती. लोक कुतूहलाने बघत होते. काही काही जण २ व्हिलर वरून आमच्या बरोबरीने जात विचारपूस करत होत. तुम्ही हे का करताय? कुणासाठी करताय? विचारात होती . आम्ही तर स्वतःसाठीच हे करतोय असं सांगितलं तर लोक “काय वेडी माणसं असतात एकेक” असा लुक देऊन जात होती तर काही कौतुक करीत चिअर अप करीत होती.

पालशेतचा बराचसा चढ चढले मग मात्र दमायला झाल्याने सायकल हातात धरून चालायला सुरवात केली. आणि अगदी ३/४ मिनिटं झाली नि चढ संपला. हुश्श केलं. पाणी पिऊन परत सायकल चालवायला सुरवात केली. आता अगदीच थोडं अंतर उरलं होत. पिंपर फाट्यावरून वेळणेश्वरला जायला वळलो. इथे सगळं उताराचा होता आणि सगळं रस्ता चांगला होता. सटासट पॅडल मारत निघालो. शेवटचा मोठ्ठा उतार लागला. इथे जरा जपून ब्रेक दाबत सावकाश आलो. आणि मग एकदाचे घरी पोहोचलो. घरी गेल्यावर हुश्श झालं. हे आमचं गाव नि आमचं मूळ घर इथे. माझा दीर-जाऊ हृषिकेश नि ऋत्वा इथे राहतात. घरी आल्यावर मस्त गरम पाण्याने अंघोळ केली. मग समोरच्या घरातील अभिषेक – धनश्री नि त्यांची मुलगी इशा यांच्याबरोबर समुद्रावर गेलो. मस्त गप्पा प्लस कांदा भजी नि चहा. घरातच लागून लॉज असल्याने आणि सुट्टी असल्याने लॉजवर गर्दी होती . ऋत्वाशी थोड्याफार गप्पा झाल्यावर जेवून ०९.०० – ०९.३० वाजताच झोपायला गेलो.

क्रमशः

प्रतिक्रिया

II श्रीमंत पेशवे II's picture

3 Dec 2018 - 3:46 pm | II श्रीमंत पेशवे II

मस्त .....
कोकणातील रस्ते पण तिथल्या माणसांसारखे असतात ......
हिरव्यागार हृद्याचे पण प्रचंड चढउतार असलेले ....

छान लिहिताय

मालविका's picture

7 Dec 2018 - 9:27 pm | मालविका

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !