यूं ही चला चल राही….भाग - १

Primary tabs

मालविका's picture
मालविका in भटकंती
28 Nov 2018 - 9:48 pm

श्रीनिवास, माझा नवरा, सुरवातीला ट्रेकिंग करायचा. आता त्याला सायकलिंगचा नाद लागलाय. इतकाकि मी कधी कधी त्याला सायकल वेडा म्हणते. एरवी दोघांमध्ये मीच जास्त बडबड करणारी. पण सायकलचा विषय निघाला कि श्रीनिवास एकदा जो सुरु होतो तो थांबतच नाही. कधीतरी मी सांगतेसुद्धाकि बास बाबाआता सायकल पुराण. पण तो थांबत नाही. आपण सायकलने इकडे जाऊया, मग तिथून दुसरीकडे जाऊया असे प्लॅन अखंड करत असतो. यातल्या बऱ्याच वेळेला मी दुर्लक्ष करते कारण माझ्याच्याने ते झेपणार नाही याची मला खात्री असते. श्रीनिवास सायकलची फारच काळजी घेतो. कोणाला उगाच तिला चालवू देणार नाही, कुठेतरी तिला उभे करणार नाही, तीच सर्विसिन्ग वेळेवर करून घेईल, तिच्यासाठी अथवा तिच्याबरोबर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विकत घेताना कधीही मागेपुढे पाहणार नाही. डेकॅथलॉन म्हणजे तर त्याची आवडती जागा. लॉटरी लागली तर हे साहेब सगळे पैसे तिथेच उडवून येतील. आता असं असताना का बरं मला तिच्याविषयी असूया वाटणार नाही? पण आता हळूहळू मला देखील सायलकलिंग मध्ये त्याने ओढून आणलाय. आणि हळूहळू का होईना पण मी सायकलिंग करायला लागलेय.

या आधी श्रीनिवासला कबूल केल्याप्रमाणे मी माझ्या माहेरी अर्थात खेरशेतला सायकलने जाऊन आलो. जाऊन येऊन ७० किमी अंतर कापून झालं. मी स्वतः यावर समाधानी होते. खडपोली – खेरशेत राईडसाठी माझ्या मैत्रिणीची फायरफॉक्स कर्मा सायकल नेली होती. मला नक्की जमतंय कि नाही याची शाश्वती नव्हती पण, एकदा केल्यावर उत्साह आला. सायकलने राईड करण्याचं प्रॉमिस मी पूर्ण केलं होतं. आता श्रीनिवासची टर्न होती त्याचं प्रॉमिस पूर्ण करण्याचं. कबूल केल्याप्रमाणे पुढच्याच रविवारी कोल्हापूरला जाऊन माझ्यासाठी नवीकोरी मॉन्टरा ट्रान्स विकत घेऊन आलो. दिवाळीच्या सुट्टीत कुठे जायचं याचा टेंटेटिव्ह प्लॅन झाला होता. त्याप्रमाणे नवीन सायकल आल्यावर जवळच अलोरे शिरगाव असं साधारण १३/१४ किमीच्या अंतरावर छोट्या मोठ्या चढ उत्तरांची प्रॅक्टिस चालू केली. हळू हळू गियरची अडजस्टमेन्ट समजून घेऊन चढात कोणते गियर टाकायचे, उतारात कोणते गियर टाकायचे, गियर वर सायकल कशी कंट्रोल करायची याची हळूहळू कल्पना आली. सायकलला माझी नि मला सायकलची सवय होऊ लागली.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी धनत्रयोदशीला इथून परशुरामला जाऊन आलो. सोबत ईशान देखील होताच. जाऊन येऊन ३२किमी अंतर झाले. यात परशुरामचा माझ्या दृष्टीने मोठा घाट होता. फक्त ३ किमी असलेला हा घाट चांगलाच दमवतो. माझ्यासारखीला तर अजूनच. खालून वर बघून साधारण उंचीचा अंदाज आला कि मी आधी मनाने खाली जाते. डोंगराच्या टोकाला कुठवर चढून जायचंय याचा अंदाज आता साधारण मोबाईल टॉवर बघून लक्षात यायला लागलाय. त्यामुळे मी आधीच जमणार नाही म्हणायला लागले कि श्रीनिवासच लेक्चर सुरु होतं. “जमणार नाही असं काही नसतं. हे सगळं मानसिक असतं. तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. you can stretch your body as much as you want.” त्यामुळे यावेळी मी परशुराम घाट थांबत थांबत का होईना पण सायकलने चढले. घरून सकाळी 0७.00 ला निघून आम्ही 0८.१० ला परशुरामला पोहोचलो. सकाळी मस्त धुकं पडलं होत त्यामुळे उन्हाचा त्रास नाही झाला. परशुराम गावात आत न जाता हायवेवरच्याच शिवसागरमध्ये नाश्ता केला नि परत फिरलो. १०.३० पर्यंत घरी देखील पोहोचलो. हि सायकल राईड माझ्यासाठी अजून जास्त उत्साहाची ठरली कारण यावेळी मला घाट सायकलने चढता आला.

श्रीनिवासने सुट्टीचा प्लॅन आधीच ठरवला होता. खडपोली -चिपळूण – खेड – दापोली -कोळथरे – दाभोळ – वेलदूर – गुहागर – वेळणेश्वर – चिपळूण – खडपोली असा रूट ठरला. साधारण ५०किमी रोजचे सायकलिंग करायचे असे ठरवले होते. त्याप्रमाणे खेड, कोळथरे, वेळणेश्वर मुक्काम करून घरी परत यायचा प्लॅन ठरला. पण मग अचानक श्रीनिवासच्या डोक्यात काय आले माहित नाही, तो म्हणाला आपण पहिल्या दिवशी डायरेक्ट कोळथरे गाठूया. मला कल्पनेनेच घाम फुटला. खडपोली – कोळथरे गुगल मॅप ८८किमी दाखवत होता. एवढ़े एका दिवसात पार करायचं? माझा नाहीचा पाढा सुरु झाला. पण श्रीनिवासने हट्ट सोडला नाही. त्यातला त्यात थोडे कमी कष्ट म्हणून आम्ही खडपोली चिपळूण १०किमी आदल्या दिवशीच करून माझ्या भावाकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता माझ्या भावाकडे सुमंताकडे पोहोचलो. चला मी तेव्हढीच उद्याचे १०किमी कमी झाले म्हणून खुश!

क्रमश:

प्रतिक्रिया

II श्रीमंत पेशवे II's picture

29 Nov 2018 - 3:06 pm | II श्रीमंत पेशवे II

लिहा अजून......मालविका ताई ....
खूप छान लिहिताय ......पण प्रवासातले अजून थोडे बारकावे पण टाका ,,,उदा.,म्हणजे उतरताना रस्ता कसा दिसला .....उगवता सूर्य .......
आणि फोटो तेव्हढे जरूर टाका ....खूप मजा येईल वाचायला .......

मालविका's picture

7 Dec 2018 - 9:29 pm | मालविका

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

मला कधी जमणार कोणास ठाऊक ? माझ्याकडे पण कर्मा आहे पण वजन जास्त असल्याने मला चढ जमतच नाहीत, पायात गोळे येतात