अतृप्त आत्मा -७

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
16 Nov 2018 - 7:55 pm

तिकडे आकाशाची लाली पुर्ण ओसरली होती.हळुहळु सुर्य समुद्रात विरघळला .एक बारीक लाल रंगाची रेघ लाटांवर डचमळत विलीन झाली .आणी इकडे फट् आवाज करत कवटी फुटली.चला !चला !! झालं म्हणत सगळे परत फिरु लागले.आप्प्याने शहाणपणा करत सगळ्यांना थोपावुन आम्ही कसे चांगले होतो आणी आज चाळ कशी एका प्रतिष्ठीत ,सज्जन ,मनमिळाउ,थोर सहकारी मित्र वगैरे वगैरे अश्या व्यक्तीला मुकली असं बोलुन दोन मिनीटाची श्रद्धांजली वाहिली.

सोपस्कार पार पाडुन सगळे हळुहळु परतु लागले .नान्याच्या मोटारीजवळ तो आप्प्याकडे आमच्यानावे खडे फोडत उभा होता.

समुद्री वार्यामुळे झाडांची सळसळ वाढली होती.समुद्राची गाज स्मशानाचं गांभिर्य आणी भयानकता वाढवत होती .आम्हाला अचानक काहितरी विचीत्र जडपणा आला.गेल्या पाचसहा तासांच हलकेपण गायब झालं.हळुहळु वार्याचा स्पर्श जाणवु लागला.आम्ही तिथल्याच एका वडाच्या पाराकडे आपोआप ओढले जाउ लागलो.ती ओढ तो गार स्पर्श सगळंच अतर्कीक ,अद्भुत ,असामान्य होतं.बहुदा आम्ही मानवी रुपात प्रवेशलो होतो.जाणुन घेण्याची इच्छा वाढली होती.

आणी तेवढ्यात स्मशानाच्या कोपर्यात एक अंधुक हालचाल दिसली.

अरे ! हा तर बाबल्या .हा काय करतोय तीथे ?असा विचार मनात येताच आम्ही त्याच्या दिशेने ओढले जाउ लागलो.बाबल्याने रमची बाटली उघडली होती आणी इकडे तिकडे बघत तो ती तोंडाला लावणारच होता.तोच एक सुगडं घेउन तीथल्याच नळावरचं पाणी भरुन आम्ही त्याच्या समोर प्रकटलो .कसं काय घडलं आम्हालाही नाही समजलं.
मनातल्या इच्छा व्यक्त व्हायला खुप वेगाने सुरुवात झाले होती.

"बाबल्या ! हरामखोर !! मला पण दे .ओत ह्याच्यात " आम्ही बोललो.
चक्क शब्द उच्चारलेले बाबल्याने ऐकले देखील .

कारण आवाज ऐकुन बाबल्या बावचळलाच एकदम.सुगडाकडे भयभीत नजरेने बघत टरकुन मागे सरकला.आम्ही पुन्हा सुगडं समोर धरुन त्याला त्यात रम ओतायला सांगितलं .
"भाड्या ! मला ठेवायला आणलेली ना ? मग ओत की रांडच्या " आम्ही खेकसलो
आता मात्र बाबल्याची बोबडी वळली होती .सुगडाकडे बघत एकदम मागे सरुन तो पळायला लागला.

म्हणजे त्याला फक्त तरंगणार सुगडच दिसत होतं आम्ही नाही?

थोडंस वाईट वाटलं.पण तो पळु नये म्हणुन आम्ही त्याचं मानगुट घट्ट पकडलं.तो पर्यंत तो दहा बारा फुट लांब पळालेला....

आम्ही अचानक दृष्यरुपात आलेलं आमच्या बारा फुट लांब हातावरुन आमच्या लक्षात आलं.

तसाच मागे खेचुन बाबल्याला आम्ही जवळ आणला.

"बाssssबो ! बापु तुम्ही इथं कसे " डोळे पांढरे करत आणी तोंड विचीत्र करत बाबल्या किंचाळलाच.

"फुकणीच्या ! माझ्यासाठी आणलेली दारु ढोसतोस ? आणी मलाच विचारतो ?? " आम्ही

तोवर बाबल्याचा पायजमा ओला झाला होता आणी त्यामुळे गारठ्याने बाबल्या कापायला लागला होता.

स्मशानातल्या वडाच्या पारापाशी आमचं हे नाट्य ऐन रंगात आलेलं.काळाकुट्ट अंधार ,विस्तर्ण पसरलेल्या वडाच्या पारंब्या,थोड्याश्या चांदण्यात त्याच्या हलणार्या सावल्या,समुद्रातल्या लांबवरच्या दिपस्तंभातुन किनार्यावर अधुनमधुन फिरणारा फोकस,स्मशानाच्या फाटकापाशी मंद प्रकाश पडणारा खांबावरचा बल्ब , विझत्या चितेतले चमचमणारे निखारे आणी समोर जमिनीपासुन काही अंतर राखून तरंगणारे साक्षात आम्ही बापु जोशी .

बाबल्याला प्राण सोडण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती.

" बापु ! तुम्ही सगळी प्या पण मला सोडा हो " बाबल्या गयावया करत होता.

त्याला उचलुन पारावर आदळला आणी त्याच्यासमोर पाराला समांतर रेषेत अधांतरी आम्ही मांडा ठोकला.

"ओत ह्याच्यात ,आपण थोडी थोडी घेउ .बरं वाटेल तुला" "आम्ही प्रेमळ जरबेत बोललो.

बाबल्याने थरथर कापत अर्धी बाटली सुगडात ओतली .आणी आम्ही डोळ्याने घे असं खुणावताच बाकी सगळी एका दमात स्वतःच्या घशात ओतली.डोळे गच्च मिटुन डोकं जोरात हलवत हळुहळु आमच्याकडे भेदरुन बघायला सुरुवात केली.

कच्च्या गरम गरम रमचे चार घोट पोटात जाताच त्याला थोडी तरतरी आली होती.खिशातले चार फुटाणे तोंडात टाकत बाबल्या सरळ विचारता झाला.

"बापु ! हि काय हो भानगड ? तुम्ही जिवंत कसे..?" बाबल्या

त्याला गेल्या पाचसहा तासातले सगळे प्रकार सांगून आमच्या परत येण्याचं प्रयोजनही सांगितलं .आणी हि गोष्ट कुणालाही न सांगता मला माझ्या कामात मदत करणार असशील तरच तुला सोडतो .असा दम वजा दिलासा दिला.

बरीच वचनं आणी आणाभाका देउन बाबल्या तिथुन ढुंगणाला पाय लावुन पळाला. पण त्याला
आमच्या वेगाचा अंदाज नसल्याने तो फाटका बाहेर जाउन सुटकेचा निश्वास सोडत दम खात होता .आणी आम्ही त्याच्या पाठीवर हात फिरवत उरलेलं सुगड्यातलं द्रव्य त्याच्यापुढे केलं.

नाट्य

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

16 Nov 2018 - 10:07 pm | प्रमोद देर्देकर

भन्नाट . मग पुढं .

Nitin Palkar's picture

16 Nov 2018 - 10:19 pm | Nitin Palkar

छान, मजा येतेय. लिहित रहा.

वैभवराज's picture

17 Nov 2018 - 10:15 am | वैभवराज

मस्त मजा येतेय

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Nov 2018 - 11:02 am | डॉ सुहास म्हात्रे

कथानक रंगायला लागलं आहे. भाग खूप लहान आहेत त्यामुळे रसभंग होतो, जरा मोठे भाग टाकलेत तर विचारांची साखळी तुटण्याचे प्रमाण कमी होऊन अजून मजा येईल.

प्रमोद पानसे's picture

17 Nov 2018 - 12:08 pm | प्रमोद पानसे

त्याच प्रयत्नात आहे