अतृप्त आत्मा -४

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
15 Nov 2018 - 6:03 pm

गॕलरीतुन खाली बघितलं तर सर्व सक्रिय कार्यकर्ते आमची पालखी बांधत होते.

"अरे नालायकांनो किती घाई करता रे ".

हलकटांना भलताच उत्साह संचारलेला.चाळीतल्या लोकांना अश्या कामात नेहमीच आनंद मिळायचा.मीच कसा या कामात ज्ञानी अनुभवी आहे हे दाखवण्याची अगदी चढाओढ लागलेली.सगळे एकमेकांना हातवारे करुन तिरडी कशी बांधावी याचा सल्ला देत होते.

काय बोलताहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमचा द्रोण कॕमेरा खाली उतरवला.

आप्पा गोखल्या स्वतःची अर्ध्याहुन जास्त लाकडं मसणात गेली असताना बांबुला कामट्या अगदी सराईत पणे बांधत होता.(हरामखोर साला )

"अरे मी तुझ्या पोराच्या वयाचा ना.आडवा आला नसतास तर आज तुझा जावई असतो रे " असं बोलायचा प्रयत्न केला आम्ही पण....

तिकडे शंभ्यापण गोखल्याला मदत करताना बोलत होता "काका घट्ट बांधा ,बाप्याचा काही भरोसा नाही चुकुन ढिल मिळाली तर पळायचा"
आणी दोघे फिदीफिदी हसले .
शंभ्याच्या कानाखाली जोरात हाणायला गेलो आम्ही पण....

वरती आमचा देह निष्प्राण पडलेला आणी खाली आत्मा द्रोणात बसलेला.

"हाय रे कर्मा " शारिरीक भावना व्यक्त करायला साधनच नव्हतं.

जवळ जवळ दोन तास होउन गेलेले आम्ही खपुन.एवढ्या गर्दित आणी गदारोळात असुनही मागील दोन तासांत आमचं कुणाशीही साधं हाय हॕलो देखील झालं नव्हतं .म्हणजे मेलो असल्याने आमच्या अस्तित्वाची दखल आमच्याशिवाय कुणालाही नव्हती.आता बघा ना एवढे आम्ही त्या गर्दित सगळ्यांच्या जवळ सर्व बांधाबांध बघत असुनही कुणालाही माहित नव्हतं की आम्ही हे सगळं बघतोय .

तीकडे बाबल्याचा कारागीर हातात एक पिशवी घेउन आला आणी त्याने ती मटक्याजवळ ठेवली.उत्सुकतेने तरंगत जाउन आम्ही आत डोकावलं.तर आत ओल्डमंकची चपटी आणी भज्यांचा पुडा.
बाबल्या मनाने खुप चांगला असल्याची जाणीव झाली.आमची आवड त्याला माहीत असल्याने आमची शेवटची इच्छा म्हणुन तिकडे ठेवण्यासाठीच त्याने ते आणलेलं.
लव्ह यु बाबल्या असं मनात म्हणुन आम्ही भजी उचलायचा प्रयत्न केला .पण....

तेवढ्यात चौकातल्या वडाच्या पारापाशी एक डुक्कर रिक्षा येउन थांबली .आले असतील कुणीतरी पाहुणे रडायला असं समजुन आम्ही दुर्लक्ष केलं.

पण रिक्षा जरा विचीत्रच होती .काळीकभिन्न,त्यावर सोनेरी छप्पर मुकुटासारखं बसवलेलं.त्यावर डेकोरेशनसाठीची शिंग .आतुन रिक्षा चालवणारा चालकही काळाकभिन्न .तो बाहेर आला आणी आमच्याकडे बघुन खुणा करत बोलावु लागला.

मायला ! एवढावेळ इथे असलेल्या लोकांशी आम्ही बोलायचा प्रयत्न करत होतो पण कुणालाही देणंघेणं नव्हतं.आणी हा काळ्या जाडु आम्हाला बघत होता,बोलवत होता.कोण असेल हा ?
बहुतेक आमच्या प्रिंटींग प्रेसवाल्या मालकाने पाठवला असेल .कालचं बरच कंपोझींग फाट्यावर मारुन आलेलो आम्ही.दिवाळी बोनस देत नव्हता साला. बस म्हणलं बोंबलत.

पण अशी वेळ आली की मालक स्वतः यायचा नाक घासत त्याची मारुती 800 कार घेउन.मीन्नतवार्या करुन घेउन जायचा कामावर.

मग आज हा रिक्षावाला का पाठवला असेल शिंच्याने ? मन साशंक झालं.

नाट्य

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

15 Nov 2018 - 9:12 pm | टवाळ कार्टा

खुसखुशीत...और आंदो

प्रमोद पानसे's picture

16 Nov 2018 - 1:59 am | प्रमोद पानसे

यसससस्

पद्मावति's picture

15 Nov 2018 - 11:11 pm | पद्मावति

मस्तं लिहिताय. एक सजेस्ट करू का? जरा मोठे भाग टाका म्हणजे वाचायला अजून मजा येईल. लिहीत राहा. पु.भा.प्र.

प्रमोद पानसे's picture

16 Nov 2018 - 12:14 am | प्रमोद पानसे

धन्यवाद..

diggi12's picture

17 Nov 2018 - 11:39 pm | diggi12

भारी लिहताय