प्रॉन्स पफ

Primary tabs

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
11 Jul 2018 - 11:25 am

प्रॉन्स पफ

.

कोलंबी पुराणातला आणखी एक अध्याय.माझ्या आईची पाककृती. तिच्या कोण्या क्रिष्चन मैत्रिणीने सांगितली होती तिला.
तेव्हा आमच्याकडे ती चोकोनी कपटासारखी,पुढे दार उघडणारी भट्टी होती.हो,हो,भट्टीच, तेव्हा ओव्हन नव्हते म्हणत तिला.
घमेल्यात कोळसे घालूनकिंवा चुलीवर किंवा स्टोव्हवर ठेवून प्रिहिट करायची.टायमर हा प्रकारच नव्हता तेव्हा.मग गरम झाली की नाही हे पाहायला अलगद दार उघडून एक कागदाचा कपटा घालावा लागे. तो पिंगट झाला की हवी तेव्हढी गरम झाली असं समजायचो.जर कपटा काळपट झाला तर वाजवीपेक्षा जात गरम झालीय असं समजून निखारे किंवा स्टोव्हची धग कमी करायची. मग पुन्हा अलगद दार उघडून पेपर टेस्ट करून योग्य तापमान मिळालं कीच पफचं भांडं आत ठेवून समान धगीवर पदार्थ शिजू द्यायचा.
दार मात्र अलगदच उघडायची काळजी घ्यावी लागायची,कारण एकतर त्याची कडीही तापलेली असायची आणि दुसरं म्हणजे त्यातून येणाऱ्या वाफेने हात भाजण्याची शक्यता असायची.तेव्हा ओव्हनसाठी वापरायचे हातमोजेही नसायचे,दोन्ही हाताला कपडा गुंडाळून ही सव्याप्सव्ये चालायची.
आत पदार्थ ठेवला की एका बाजूला घड्याळाचा गजर न विसरता लावायचा,कारण टायमर नसायचा ना!
साधारण पाऊण तासाने खमंग वासाचा दरवळ नाकाला सुखवायला लागे आणि आता मिनीटभरातच गजर होईल ही खात्री होइपर्यंत गजर होईच.
मग आम्ही सगळी भावंडं हातातली कामं किंवा अभ्यास डोडून स्वयंपाकघरात जमत असू.भट्टीचं दार अलगद उघडुन आई त्यातलं पफचं भांडं बाहेर काढत असे,मघाशी पिवळसर,शेंदरट दिसणारा हा पदार्थ आता चॉकलेटी दिसू लागे. मग आई त्यात मध्यभागी विणायची सुई घालून पाहत असे.
सुई स्वच्छ निघाली की आम्हाला हायसं होई.''ससsss हं''असा आवाज सगळ्यांच्याच तोंडून येई.कारण सुई बरबटलेली निघाली की पुन्हा त्याची रवानगी काही काळासाठी भट्टीत व्हायची आणि काही वेळासाठी तरी आम्हाला आमच्या जिभेला सुटलेलं पाणीच गिळत बसण्याची पाळी यायची.
पफ तयार झाला,थोडी वाफ जिरली की आई सुरीने त्याचे तुकडे करी.शेजारी वाटी पोचवली की आम्हाला वाढून देई.वर, 'सावकाश खा रे' असं सांगायला चुकत नसे. कारण आमच्या घाईमुळे वाफेने आमची तोंडं भाजू नयेत.
अहाहा!काय ती चव! अवर्णनीयच अगदी! आता मीही करते तशीच कृती करून.खाणारे सगळे चविष्ट असल्याची खात्री देतातही पण मला मात्र ती चव काही येत नाही हे खरं.

सांगते आता कृती.जमवा साहित्य.
सहित्यः-

१. एक वाटी उकडलेली कोलंबी,(यासाठी लहान कोलंबी वापरा)

२. दोन वाट्या उकडून किसलेला बटाटा,

३. एक मध्यम कांदा बारीक चिरून,

४.एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,

५.दोन टेबलस्पून मैदा,

६. चार अंडी ,

७. एक चहाचा चमचा लाल मिर्चीपूड,

८. अर्ध्या चहाचा चमचा हळदपूड,

९. एक चहाचा चमचा गरममसालापूड,

१०.अर्धा चहाचा चमचा आमचुरपूड,

११. मीठ चवीनुसार,

१२. अर्धा चहाचा चमचा तेल.

१३.दीड चहाचा चमचा आले लसून पेस्ट.

कृती:-
१.उकडलेली कोलंबी हातानेच जाडसर कुस्करा.

२.कांदा +कोथिंबीर +लाल मिर्चीपूड+हळदपूड+गरममसाला पूड,+आमचुरपू=+ आले ल्सुन पेस्ट आणि मीठ एकत्र करून जरासे चुरून घ्या.

३. अंडी फेसून घ्या,त्यातच मैदा मिसळून फेसून घ्या.

४.उकडलेला बटाटा आणि कुसरलेली कोलंबी हलक्या हाताने कांद्याच्या मिश्रणात घाला.

५. फेसलेली अंडी मिसळून,मिश्रण हातानेच एक दिशेने फिरवा.

६. मिश्रण थलथलीत झाले पाहिजे,थोडेसे पाणी घालू शकता.

७. ओव्हनप्रूफ भांडयाला तेल लावून त्यात हे मिश्रण ओता. भांडे ठोकून मिश्रण समतल करा.

८.प्रिहिट केलेल्या ओव्हनमध्ये 200 अंशांवर १५ ते २० मिनिटे भाजून घ्या.

९. गरममागरम आस्वाद घ्या.

https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/36913051_414301242390183_6...

प्रतिक्रिया

एस's picture

11 Jul 2018 - 11:39 am | एस

वाह! तोंपासू.

जागु's picture

11 Jul 2018 - 11:39 am | जागु

लय भारी.

मनिम्याऊ's picture

11 Jul 2018 - 11:42 am | मनिम्याऊ

वाचूनच तोंडाला पाणी सुटले

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2018 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोलंबी केक ! भारी ! पाकृवरून पदार्थ फारच चवदार असावा असे दिसते !

अतीकोलंबीप्रेमी असूनही हा पदार्थ अजून खाल्लेला नाही (काय हे !) :(

जेम्स वांड's picture

11 Jul 2018 - 12:36 pm | जेम्स वांड

कोळंबी ढोकळा एकप्रकारे. मस्त रेसिपी.

यशोधरा's picture

11 Jul 2018 - 7:39 pm | यशोधरा

मस्त रेसिपी!

सोमनाथ खांदवे's picture

18 Jul 2018 - 8:54 pm | सोमनाथ खांदवे

एक तर पावसाळ्याचे दिवस त्यात तुम्ही कोळंबी ची रेसिपी सांगताय !!
आह ! आवंढा गिळत वाचायची वेळ आली आहे .

ताई फक्त तेवढं एकच सांगा ' तो ' चहाचा चमचा कुठं भेटेल वो ?

नूतन सावंत's picture

18 Jul 2018 - 10:13 pm | नूतन सावंत

अहो चहा करताना तुम्ही चहा साखर घालताना जो चमचा. टीस्पूनचं मराठी भाषांतर.