'छंदामागचं त्रिकूट'

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
17 Jun 2018 - 11:38 am

आपल्या बाबतीत एखाद्या गोष्टीचं छंदात किंवा मराठीत ज्याला पॅशन म्हणतात त्यात रुपांतर कधी होतं?
जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे उदा.चित्रकला असो किंवा गायन,वादन,लेखन,वस्तूंची निर्मिती,दुरुस्ती,विक्रीकला कोणतंही क्षेत्र असो, त्यातून स्वत:ला आनंद तर मिळायला हवाच पण लोकांकडूनही कौतुक व्हायला हवं तरच ती कला,तो छंद अजून बहरतो.त्या छंदातलं अजून जितकं काही शिकता येईल तितकं शिकण्याचा हुरुप वाढतो.हा हुरुप वाढवण्याचं काम लोक करत असतात.त्यांच्यामुळेच तर कळतं की आपण सामान्यापेक्षा थोडेसे का होईना वरचढ आहोत.ही 'थोडसं वरचढ' असण्याची भावनाच सुरुवातीच्या प्रेरणेचं काम करत असते.त्या प्रेरणेच्या जोरावरच आपण अजून शिकत जातो.
या सोबतच अजून एक गोष्ट विसरता कामा नये.ती म्हणजे निसर्गाची देणगी.छंदांसाठी लागणारं मेंदूतलं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याबाबत निसर्गाचीही कृपा असावी लागते.
कलेच्या बाबत हे ठळकपणे दिसून येईल.गायकाला मधूर आवाज,गाता गळा,सुरांचं ज्ञान,चित्रकाराला हातांच्या बोटाचं सहज वळणं,चित्राची कल्पना सुचणं,वादकाला वाद्याशी संबंधित शारिरीक अवयव सहजपणे वापरता येणं,किंवा खेळाडूला खेळासाठी आवश्यक अशी शरीररचना,कुशल अभियंत्याला यंत्राची रचना पटकन समजणं; क्षेत्र कोणतंही असो छंद किंवा ध्यासात रुपांतर होण्यासाठी हे निसर्गाकडून 'इतरांपेक्षा किमान थोडसं अधिक' मिळणं महत्वाचं असतं.
याच प्रेरणेतून आपण हळूहळू सरावाने पारंगत होतो आणि त्यातून पुढे प्रभुत्व मिळवतो.
यातही निसर्गाचं दान हे खुप महत्वाचं.कारण हे आपण मागून मिळत नाही,एवढंच काय पण सर्वांना समानही मिळत नाही.तसं असतं तर गल्लोगल्ली सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर आणि ए.आर.रेहमान निर्माण झाले असते.
निसर्गाकडून मिळालेल्या या दानाला मेहनतीचीही जोड हवीच.त्याला नकार नाहीच.पण तो नंतरचा भाग.आधी हे आयतं दान मिळणं महत्वाचं.हे दान ज्याला जितकं जास्त तितकी ती व्यक्ती उच्चपदाला पोहचते.
छंदामागचं हे 'स्वानंद+कौतुक+निसर्गाचं दान' त्रिकूट हे असं महत्वाचं असतं.

कलाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

17 Jun 2018 - 3:13 pm | चौकटराजा

आपल्यात काहीतरी अव्यक्त पातळीवर का होईना नैसर्गिक मूळ असल्याशिवाय कोणत्याच गोष्टीची आवड केवळ परिसर व संधी यामुळे निर्माण होत नाही . आपल्यात असा एक छंद निर्माण झाला की त्याचा आनंद प्राविण्य नसताना देखील मिळत असतोच ! प्राविण्य व यश यांची पातळी आणखीनच वेगळी आहे. छंदात इच्छा या तत्वाचा भाग आहे तर प्राविण्यात क्षमता व मेहनत यांचा . नैसर्गिक क्षमता असली की त्याचे फायदे त्या त्या क्षेत्रात मिळत जातात . यश हे नुसत्या प्राविण्याने वा मेहनत घेउन मिळतेच असे नाही तर त्याला नशीब ही लागते . दिलीप कुमार यांनी आपल्या यशात नशीबाचा वाटा ही मोठा आहेच हे वारंवार प्रतिपादिले आहे . आता नशीब म्हणजे खूप व्यामिश्र अशी गोष्ट आहे हे मात्र खरे . कोणीतरी एक नंबर वरून घसरल्या खेरीज दुसरा एका नंबरवर पोहोचत नाही या त्याचा साधा असा अर्थ आहे. कुमार सानू , उदित नारायण व सोनू निगम याना क्रमाक्रमानेच पहिला क्रमांक मिळत गेला . कारण नशीबाचा कौल मिळेपर्यंत क्षमता असूनही वाट पहावी लागली .

चित्रगुप्त's picture

11 Aug 2018 - 9:37 pm | चित्रगुप्त

@ चौरा;

आपल्यात असा एक छंद निर्माण झाला की त्याचा आनंद प्राविण्य नसताना देखील मिळत असतोच ! प्राविण्य व यश यांची पातळी आणखीनच वेगळी आहे.

खरे आहे. बरेचदा तर असा आनंद हा प्राविण्य मिळवण्याआधीच्या प्रयत्नांमधे जास्त असतो. उदाहरणार्थ एकादे वाद्य चुकत माकत वाजवण्याचा प्रयत्न करताना एकादी सुरावट वाजवता आली, वा लहानपणी चांदोबा वगैरेतून बघून रेखाटन करताना आपल्याला ते 'जमले' हा आनंद पुढे प्राविण्य मिळाल्यावर निव्वळ सवयीने गाणे,वाजवणे, चित्र काढणे यातून तितकासा लाभत नाही. प्राविण्य मिळाल्यानंतरही काहीतरी कलाकारी करण्यातून नेहमीच आनंद लाभतो असे नाही, त्यात भरपूर मानसिक संघर्ष, निराशा, वगैरेही असतेच. बरेचदा आपल्या या उद्योगाचे ज्यांना कौतुक वाटेल, असे कुणी उरलेलेच नसते (विषेषतः एकदा बालपण सरल्यावर. कलावंत प्रौढ झाल्यावर घरच्या मंडळींना आपण वाजवलेले, गायलेले, चित्रित केलेले, लिहीलेले बघण्या- ऐकण्या - वाचण्यापेक्षा त्यातून पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल का, यातच जास्त रुची असण्याचीही बरीच शक्यता असते)
दीर्घ प्रयत्नातून एकदा अमूक एका बाबतीतले प्राविण्य मिळवले गेले, की लौकिक यश मिळवणे काहीसे सुकर होत असले (अर्थात तसे यश नशिबात असेल तर), तरी हाडाच्या कलावंताला तेच ते करण्यातून समाधान लाभेनासे होते आणि पुन्हा काहीतरी पहिल्यापासून सुरू करण्याची ओढ लागते. (पाडगावकरांची 'जिप्सी' ही कविता)

कलावंत करत असलेल्या कला-प्रयोगातून त्याला आनंद, यश, महत्व, कौतुक, कीर्ति, वगैरेपलिकडलेही काहीतरी गवसत असते, वा तसे काहीतरी गवसण्याची आशा वाटत असते. हे 'काहीतरी' प्रत्येक कलावंताच्या बाबतीत वेगळाले असू शकते, किंबहुना असतेच. या 'काहीतरी' चा शोध घेत रहाणे हेच खरेतर कलावंताचे जीवनकार्य असते. बाकी आनंद, प्रविणता, लौकिक यश या गोष्टी त्या मानाने दुय्यम असतात. अर्थात हे सर्व खर्‍याखुर्‍या, 'हाडाच्या' कलावंताबद्दल.

निशाचर's picture

12 Aug 2018 - 3:49 am | निशाचर

प्रतिसाद आवडला.

कंजूस's picture

18 Jun 2018 - 10:09 am | कंजूस

छंद का नंबर?

छंद वेगळा.

विजुभाऊ's picture

18 Jun 2018 - 10:04 pm | विजुभाऊ

लेख नक्की कशाबद्दल आहे तेच समजत नाहिय्ये.

उपयोजक's picture

19 Jun 2018 - 12:45 am | उपयोजक

एखाद्या गोष्टीचं छंदात किंवा मराठीत ज्याला पॅशन म्हणतात त्यात रुपांतर कधी होतं?

नाखु's picture

12 Aug 2018 - 2:51 pm | नाखु

एखाद्या गोष्टीचं छंदात किंवा मराठीत ज्याला पॅशन म्हणतात त्यात रुपांतर कधी होतं?

पॅशन म्हणजे ध्यास अगदी गायकीत असो की खेळाडू म्हणून असू दे पछाडले गेल्या सारखे तहान भूक विसरून तपस्या, पराकाष्ठा प्रयत्न केले जातात.

छंद बरेचदा स्वांतसुखाय असतो,अगदी व्यावसायिक नाही वाजवता आलं तरी हरकत नाही पण स्वत:लागेल व इतरांना आनंद होतो आहे हेच पुरेसे आहे छंदात.
छंद योग्य गुरु मुळे कधीतरी चांगले पैलू पडताच उत्तम कलाकार यात रुपांतर होते.

असं असलच पाहिजे असं नाही पण पहिल्या गोष्टीत खडतर व्रत अपेक्षित आहे

मध्यमवर्गीय नाखु पांढरपेशा