लेखकांच्या बायकोचे नाव.....
लेखनप्रकार (Writing Type)
मी एक लेखक,
कसे तरी कागद काळे करण्याचा माझा दिनक्रम.
अन तू माझी बायको,
कसे तरी नवऱ्याला कामाला लावण्याचा तुझा दिनक्रम.
कोणत्याही विषयांस आमच्या विचारांच्या चौकटीत बसवून त्याची लांबलचक तार बनविण्याचा आमचा उद्योग निरंतर सुरूच असतो. या सगळ्या प्रकारांना कागदाचे असंख्य प्रकार कंटाळले, शेकडो लेखण्या त्यांचे आयुष्य झिजवून गेल्या. दौतीच्या कित्येक बाटल्या रिकाम्या झाल्या, फाउंटन पेनच्या निबांच्या टोकांचे रंगाऱ्याचे ब्रश झालेत. पण आमचे उद्योग शमण्याचे नाव घेत नाहीत. सहस्रावधी विचार कागदावर उमटवून तो कागद स्वतःच्या कवेत सामावून घेणाऱ्या कित्येक कचरा पेट्यांनी अजीर्ण होऊन उलट्या केल्यात. पण आम्ही आजही सीमांत होण्याचे नाकारतो.
तुझ्या भाषेतल्या "फुटकळ लेखांचे" तारू घेऊन शिडांत वारा भरून दर्यापार जाण्याचे (अगम्य) साहस दिवसरात्र चालूच असते. अशा छिद्राळलेल्या शिडांत वारा भरून तारू किनाऱ्यावरच्या वाळुंत फसल्यावर तू (केस) पिंजारून माझ्या अंगावर धावून येण्याचे सोडत नाहीस हे देखील तितकेच सत्य.
फाटलेल्या सदऱ्याच्या हवेशिरपणाशी खेळत विस्कटलेल्या केसांनी शून्यात नजर लावून अगम्य शक्तींच्या साहाय्याने समोरच्याच्या आकलनापलिकडचे लेख वाचल्यावर त्याच्या भंजाळलेल्या चेहेऱ्याकडे पाहून मिळणारा अगम्य आनंद काय वर्णावा? हे सुख केवळ दूरस्थ फाटक्या सदऱ्याच्या दुसऱ्या लेखकांसच समजू शकेल.
आणि ही मंडळी कोणी काहीही म्हटले तरी माना पाडूनच असतात. तसेही त्यांना मान नावाची गोष्ट मिळतच नसते. शिवाय त्यांच्या भार्या देखील तुझ्याच प्रमाणे त्यांना (खाली) मान घालेच म्हणत असावेत. एकूणच काय, तर सर्व जगाकडून त्यांचा छळच होत असतो. त्याचा बदला तर घेता येत नाही, म्हणूनच ही मंडळी शब्दांचा छळ करतात. शब्दच्छल हे त्यांचे प्रभावी अस्त्र.
आणि त्यांचेही मनात एकच विचार सर्वात वर फुरफुरत असावा.....
काश! बायकोचे नावही 'शब्द' ठेवता आले असते....
प्रतिक्रिया
अगागा!
अगागा
भारी !