Skip to main content
लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 22/12/2017 14:48 या दिवशी प्रकाशित केले.

--भाग दुसरा--

"चिकणदरा, एक अपरिचित वाट रतनगडाची"

रतनगड पाहिला नाही असा ट्रेकर खरं म्हणजे क्वचितच सापडेल. अशा या ट्रेकर्सच्या आवडत्या रतनगडाला एकूण तीन दरवाजे आहेत. रतनवाडीकडील गणेश दरवाजा, साम्रदचा त्र्यंबक दरवाजा आणि कोकण बाजूकडे असल्यामुळे कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा.
गडावर असलेल्या राणीच्या हुड्यापासून डावीकडे जाऊ लागायचं. पुढे जाऊन उजव्या बाजूच्या टेकडीला वळसा घातला की नेढ्याकडे जाता येतं. आणखी थोडं पुढं गेलं की डाव्या हाताला भरभक्कम तटबंदीत बांधलेला एक दरवाजा दिसतो. त्याचं नाव कोकण उर्फ कल्याण दरवाजा. दरवाज्याच्या बाहेर खोल दरी आहे जिथून खाली उतरण्याची वाटच दिसत नाही. जर इथून उतरायला वाटच नाहीये तर मग इथं दरवाजा का बांधला असावा? या दरवाज्याचं नाव कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा असं असल्यानं इथून कल्याणकडे वाट उतरून जात असावी का? असेल तर नेमकी कुठे उतरत असेल? जर वाट असेल तर तिथे वाट असल्याच्या काही खाणाखुणा असतील का? वगैरे अनेक प्रश्न मनात येत होते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांची मग शोधाशोध सुरू होती. अगदी गुगल मॅप पासुन ते जुन्या जाणत्या ट्रेकर्सना विचारून झालं होतं. पण कुणीच मनाचं समाधान मात्र करू शकलं नव्हतं. प्रत्यक्ष तिथं जाऊनच शोधाशोध करावी लागणार असं एकंदरीत दिसत होतं. शोध घ्यायला जायची इच्छा तर खुप होती पण मुहुर्त काही लागत नव्हता.

*************************************

नुकताच ११-१२ नोव्हेंबरला डेहण्यातून अवघड असा 'पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार'चा ट्रेक केला. गुयरीदारच्या वाटेने डेहण्यात परतताना एक नवीन घाटवाट कळली, तिचं नाव 'चिकणदरा' आणि ही वाट कोकणातील डेहण्यातून साम्रदला तर जातेच पण ती रतनगडाच्या कल्याण दरवाज्यातूनही गडावर चढून जात असावी असा स्थानिक लोकांचा अंदाज होता. अर्थात या वाटेने कुणीच गेले नसल्याने त्याबाबत खात्रीशीर मात्र कुणीच काही सांगू शकत नव्हते. आता एवढी माहिती मिळाल्यावर मागे पडत असलेल्या प्रश्नांनी पुन्हा डोके वर काढले. मग आता शांत बसणं शक्य नव्हतं. लवकरच ही शोधमोहिम हाती घ्यावी लागणार होती.

आजोबाचा ट्रेक संपवून पुण्याला परतताना मनात 'चिकणदरा' सारखा घोळत होता. कशी असेल ती वाट? किती वेळ लागेल? कुठे कातळारोहण करावे लागेल का? त्यासाठी काही साधनसामुग्रीची आवश्यकता भासेल का? असे एक ना अनेक विचार मनात येत होते. चारपाच दिवसांनी आजोबाच्या धुंदीतुन बाहेर आल्यावर हळूच सोबत्यांना चिकणदर्‍याला जाण्यासाठी खडा टाकला. माझ्या मनातला विचार सर्वांनीच उचलून धरला. लगेचच डेहण्यातल्या पाटेकरांशी त्याबाबत बोललो. आमचं जवळजवळ या अनवट वाटेने जाण्याचं नक्की झालंही होतं, तारीखही ठरली होती दहा डिसेंबर म्हणजे बरोबर एक महिन्यानेच आणि त्यादृष्टीने सगळी तयारीसुध्दा झाली होती पण नेमकं 'ओखी' चक्रीवादळ जोराचा पाऊस घेऊन आलं. आता आम्हाला आमचा बेत रहीत करावा लागतोय की काय अशी भीती वाटू लागली. देव कृपेने पुढच्या दोन दिवसांत ते शमलं आणि आमचं जाण्याचं नक्की झालं.

नऊ डिसेंबरच्या रात्री जेवण करून निघालो. माळशेज घाटाच्या अलिकडे एका धाब्यावर चहाला थांबलो तर गाडीच्या चाकातून हवा जात असल्याचं लक्षात आलं. मागल्या वेळेसारखा याही वेळेस गाडीने दगा दिला होता. पण एक बरं होतं की ज्या ठिकाणी चाक पंचर झालं तिथून पुढे फक्त अर्ध्या किलोमीटरवरच पंचर काढण्याचं दुकान होतं. दुसर्‍या दिवशी डेहणे, डोळखांब, तळेगाव सारख्या ठिकाणी पंचर काढता आलं असतं पण संध्याकाळी ट्रेक संपायला किती वाजतायत त्यावर ते अवलंबुन असणार होतं. बरं जातानाच वाटेत परत कुठे पुन्हा पंचर झालं असतं तर मग अजुन अवघड झालं असतं त्यामुळे असा धोका न पत्करता खुबीतच थोडा वेळ वाया जाणं आम्हाला परवडणारं होतं. एवढं सगळं करून डेहण्यात पोहोचायला रात्रीचे साडेतीन वाजले. दोनएक तास गावातल्या मारूती मंदीरात झोप काढली.

चित्र उपलब्ध नाही

सकाळचं आवरून बरोबर सहाला आरती केली आणि पाटेकरांकडे नाष्ट्याला हजर झालो. आजोबाच्या ट्रेकच्या वेळचे पोहे काही पोटभरीचे झाले नव्हते म्हणून यावेळी सरळ पोळी-भाजीच नाष्ट्याला सांगितली होती.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

आमच्या वाटाड्यांनी म्हणजे देवू शिवारींनी वोरपडीतुन येऊन रात्रीच पाटेकरांकडे येवून मुक्काम केला होता.

चित्र उपलब्ध नाही

त्यांचंही आवरून झालं होतं त्यामुळे वेळ न घालवता वाल्मिकनगरहुन शाई नदीच्या पात्रात असलेल्या वाटेने तडक निघालो. ही वाट आमच्या ओळखीची होती कारण याच वाटेने आम्ही महिन्याभरापुर्वी आजोबावरून उतरलो होतो.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

पहाटेच्या धुक्यात खुटा-रतनगड, कात्राबाई, करंडा आणि आजोबा ओझरते जाणवत होते. त्यांच्यामागे होत असलेल्या सुर्योदयामुळे सह्याद्रीचा राकटपणा जाणवत होता.

चित्र उपलब्ध नाही

आमच्या थोडंसं डाव्या बाजूला रतनगडाच्या खुटा सुळक्यासारखाच एक सुळका दिसत होता. याला कुईरानाचा कडा किंवा कुईरानाचा कापरा असं स्थानिक लोक म्हणतात. त्याच्या मागच्या बाजुला एक खिंड जाणवत होती. आम्हाला त्या खिंडीत जायचं होतं. त्यातून एक नाळ शाई नदीच्या पात्रात उतरत होती. या खिंडीतून उतरणार्‍या वाटेलाच चिकणदरा किंवा चिकणमातीचा दरा म्हणतात.

चित्र उपलब्ध नाही

नदीपात्राच्या बाजूने गच्च झाडीतुन प्रवास करत आम्ही सर्व जवळजवळ मुख्य रांगेला भिडलो होतो. ऊन लागत नसल्यामुळं पहिला थांबा उंबराच्या पाण्यापाशीच घेतला.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

नदीपात्राच्या बाजूला एक उंबराचं झाड आहे. त्या झाडाच्या बाजूला कुठेही खड्डा खणला तरी बारमाही पाणी मिळू शकतं. डिसेंबर महिना असल्यानं आम्हाला पाण्यासाठी खड्डा काही करावा लागला नाही. इथून पुढं ज्या वाटेने आम्ही परत खाली उतरणार होतो त्या बाणच्या नाळेत पोहोचेपर्यंत आम्हाला पाणी मिळेल याची शाश्वती नव्हती म्हणून पोटभर पाणी पिऊन घेतलं आणि बाटल्याही तंतोतंत भरून घेतल्या.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

आता बाकी आमची वाट डाव्या बाजूच्या डोंगरधारेवर चढू लागली होती. खरंतर चिकणदर्‍याच्या खिंडीतून उतरलेली नाळ थोडी पुढे उतरत होती पण आम्ही एक छोटासा शॉर्टकट मारून खिंडीत पोहोचणार होतो. सुरवातीची वाट दाट झाडीतून होती आणि वाट तयार करतच चढावं लागत होतं.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

साधारण तासाभराच्या चढाईनंतर वाट एका सोंडेवर आली. इथे डोक्याएवढ्या उंचीचं गवत होतं. पण जसजसं वर चढत गेलो तसं ते कमी उंचीचं होत गेलं.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

आता ही सोंड ओलांडून आम्हाला पलिकडच्या नाळेत शिरायचं होतं. पायाखाली वाळलेलं निसरडं गवत आणि जोरात वाहू लागलेल्या थंडगार बोचर्‍या वार्‍यामुळे जीव मुठीत घेऊनच चढावं लागत होतं. त्यातच डाव्या बाजुला चढाची बाजू तर उजव्या बाजूला निसरडा उतार आणि वाट तर फक्त एक पाऊल बसेल एवढी.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

पाऊल पुढे टाकलं तरी ते कधी घसरेल याचा नेम नसे. त्यामुळे काहीजण तर चक्क चतुष्पाद झाले होते. 'बुडत्याला काडीचा आधार' कशाला म्हणतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेत होतो.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

आता आम्ही वरच्या कड्याला भिडलो होतो. एक बरं होतं की आता कड्याला धरता येत होतं. आडवं जात नाळेत शिरलो आणि मस्त झाडी लागली. अशा अवघड टप्प्यावरून शेवटचा माणूस येईपर्यंत थांबणं गरजेचं होतं. अर्थात त्यामूळे सर्वांनाच थोडी विश्रांती मिळणार होती आणि खिंड आता आटोक्यात आली होती त्यामुळे थांबायला काहीच हरकत नव्हती.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

वाट नाळेच्या कधी अल्याड तर कधी पल्याड जात चढत होती. जसजसं खिंडीत जात होतो तसतसं वरच्या बाजूने ढासळलेल्या दगडांच्या ढिगावरून चालून जावं लागत होतं. एखाद्या मोठ्या दगडावरही पाय ठेवल्यानंतर तो कधी खाली घसरेल याचा नेम नव्हता. ज्याला जसं जमेल तसं पण सावधगिरीने चालत हळूहळू सर्वजण खिंडीत पोहोचले. विश्रांती घेत असताना पाटेकरांशी पुढच्या वाटेबद्दल चर्चा केली.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

आमच्याबरोबर आलेले दोन्ही वाटाडे इथून पुढे रतनगडाकडे कधीच न गेल्याने निदान इथपर्यंत तरी त्यांचं काम झालं होतं आणि माझं सुरू झालं होतं. आतापर्यंत केलेल्या डोगरयात्रांमुळे पदरी जमा असलेला अनुभव पणाला लागणार होता. शिवारी आणि पाटेकर आमच्यासोबत येण्यास थोडे नाखुषच दिसत होते. पण आम्हाला रतनगडाची वाट शोधायचीच असल्याने खिंडीत आम्ही रतनगडावर जाण्याची तयारी केली. उजव्या बाजूच्या धारेवर चढलो. थोडं वर गेल्यावर समोरच भलामोठा कातळ आडवा आला.

चित्र उपलब्ध नाही

खरं म्हणजे इथून रतनगड अजिबात दिसत नव्हता. निदान समोरच्या कातळावर चढून गेलो म्हणजे काहीतरी अंदाज आला असता. त्यासाठी कातळावर चढून जाणं भाग होतं. एक नक्की होतं की जर इथून रतनगडावर जायला वाट असेल तर त्याकाळी कातळारोहण करून नक्कीच जात नसणार. पायर्‍या असायलाच हव्या होत्या. त्यादृष्टीने थोडी शोधशोध केल्यावर त्या गवसल्या आणि सर्वांनाच आनंद झाला. पायर्‍यांच्या मागच्या बाजूला थेट कडा होता पण पायर्‍या असल्याने तशी भिती वाटत नव्हती. ही जर रतनगडाची वाट असेल तर या ठिकाणी एखादी चौकी असायला हवी होती पण झाडी एवढी माजलेली होती की शोधणं अवघड होतं.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

समोरच कुईरानाचा कडा किंवा कुईरानाचा कापरा नावाचा आतापार्यंत कुणीही चढाई केलेला सुळका लक्ष वेधुन घेत होता. याची चढाईची उंची ३००-३५० फुट नक्कीच असेल. त्यासाठी एकदा पुर्ण तयारीनिशी आणि वेळ काढून यावे लागेल.

चित्र उपलब्ध नाही

आम्ही ज्यासाठी इतक्या लांबुन इथे आलो होतो ते स्वप्न आज पुर्ण होणार अशी सर्वांनाच आशा वाटु लागली. इथून पुर्वी रतनगडावर जायला नक्की वाट होती याची खात्री पटली होती. आता आम्हाला फक्त पायर्‍यांचा माग काढत जायचं होतं. पायर्‍या चढून वर गेल्यावर अजून एक छोटा कातळटप्पा लागला तिथल्या पायर्‍यांवरून चढल्यावर समोरच्या छोट्या टेकडीमागे असलेला रतनगड नेढ्यावरच्या झेंड्यामुळे चटकन ओळखता आला.

चित्र उपलब्ध नाही

समोर दिसणार्‍या टेकडीच्या उजव्या बाजूला कडा जाणवत होता आणि टेकडीवर चढून जाणंही सोपं दिसत नव्हतं त्यामुळे वाट टेकडीच्या डाव्या बाजूने जात असणार हे उघड होतं. वाटेत भयानक झाडी माजलेली असल्याने वाट तयार करतच जावं जावं लागत होतं त्यामुळे वेळ प्रचंड खर्ची पडत होता. संध्याकाळपर्यंत आम्हाला डेहण्यात पोहोचायचं असल्यानं विश्रांतीसाठी कुठेही थांबा न घेता रतनगडाच्या दिशेने चालत होतो. जुनी कारवी मोडून पडली होती आणि नवीन कारवी त्यामधूनच आली होती त्यामुळे एखादं पाऊल खाली पडलेली कारवी मोडून कधी खालच्या खड्ड्यात जाईल याचा नेम नसायचा. त्यातच मधे उगवलेली आग्याबोंड अंगाला लागली की प्रचंड खाज सुटत असे. काटेरी झुडपे तर अगणित होती त्याने कुणाला ओरखडत होतं तर कुणाच्या अंगात काटा मोडत होता. त्यामुळे एका रेषेत चाललेल्या आमच्या टोळीचा म्होरक्या थकल्यावर आम्ही थोड्या थोड्या वेळाने तो बदलत होतो.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

खरं म्हणजे आम्ही अंदाजेच रतनगड आणि धारेच्या सांध्याकडे चढून जात होतो पण मधेच आलेल्या एका छोट्या कातळटप्प्यावर खोदीव पायर्‍या दिसल्या आणि आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत याची खात्री पटली. तसं आम्ही विश्रांतीसाठी कुठे थांबतही नव्हतो. मागून 'ए जरा थांबा. अंतर पडलंय' अशी आरोळी ऐकू आली की 'अरे चला, संपलंच. थोडंच राहिलंय' असं म्हणून रेटून नेत होतो. घड्याळातली वेळ अडीच वाजल्याचे दाखवत होती. म्हणजे आम्हाला तसा बराच उशीर झाला होता. अंधार पडायच्या आत बाणच्या नाळेने उतरून निदान खालच्या कुंडांपर्यंत तरी पोहोचायला हवं होतं. त्यामुळे थांबून चालणारच नव्हतं. पण काही वेळाने एक वेळ अशी आलीच की मागच्या थकलेल्या मंडळींसाठी थांबावच लागलं. आता इथून पुढं यायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. खरं म्हणजे रतनगड अगदी हाकेच्या अंतरावर दिसत होता. तो इतका जवळ होता की गडावरच्या मंडळींचे बोललेले आवाजही स्पष्ट ऐकू येत होते. त्यामुळे थकलेल्या मंडळींना आम्ही वाटेत थांबवून काही मोजके जण गडाकडे निघालो. मागे थांबलेल्या मंडळींमधे आमचे दोन्ही वाटाडे होते हे काही वेगळं सांगायला नको. थकलेलं टोळकं मागे थांबल्यानं एक गोष्ट बाकी आमच्या पथ्थ्यावर पडणार होती ती म्हणजे त्यांची विश्रांती. दुसरं असं की आम्ही वर जाऊन येईतोपर्यंत त्यांची जेवणे पण होणार होती. पुढे डेहण्यापर्यंत चालण्याच्या दृष्टीनं ही गोष्ट चांगलीच झाली होती. खरं तर जिथे पाणवठा मिळेल तिथे थांबून जेवण करण्याचे ठरविले होते. पण उंबराच्या पाण्यापासून इथंपर्यंत आम्हाला कुठेही पाणी सापडलं नाही. पाणवठा मिळेपर्यंत सोबतचा पाणीसाठा पुरवून वापरावा लागणार होता. रतनगडापर्यंतची वाट कशी असेल याचा अंदाज नसल्याने कातळारोहणासाठी लागणारी जुजबी सामग्री सोबत घेवून वेळ न दवडता पुढे निघालो. आम्ही जसजसं वर चढत होतो तसं झाडांच्या झरोक्यातून रतनगडाची तटबंदी, बुरूज दिसत होते.

चित्र उपलब्ध नाही

रतनगडावरून उतरलेली धार मागे पाहिलेल्या टेकडीपर्यंत आलेली होती. तिच्यावर हळूहळू चढत रतनगडाच्या आणि टेकडीला जोडलेल्या धारेच्या सांध्यात पोहोचलो. इथेही अपेक्षेप्रमाणे पायर्‍या असायला हव्या होत्या तशा त्या दिसल्याच. फारशी शोधाशोध करावी लागलीच नाही. त्या पायर्‍यांचा माग घेतघेत वर चढत गेलो. पण एकवेळ अशी आली की पुढे पायर्‍या संपल्या आणि नव्वद अंशाचा कडा लागला.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

जवळच प्रबळगड आणि कलावंतीणच्या खिंडीत आहे किंवा रायगडाच्या भवानी कड्याखाली आहे तसं एक टाकं दिसलं. गडावर चढून जाण्यासाठी अवघड प्रकारचं कातळारोहण करावं लागलं असतं आणि त्यासाठी वेगळ्या नियोजनाची गरज होती. आम्हाला फक्त वाट शोधायची असल्याने आम्ही त्या नियोजनाने आलो नव्हतो. त्यामुळे इथून पुढे आम्ही काही गेलो नाही. अगदी रतनगडावर कातळारोहण करून गेलोच असतो तरीही डेहणे गाठण्यासाठी खुप मोठा वळसा पडला असता. मागे थांबलेल्यांची एकंदर अवस्था बघता त्वरीत परत आम्ही फिरण्याचा निर्णय घेतला. तसं फक्त आम्ही वाट शोधण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला ती गवसली होती.
आम्ही परत फिरून आमच्या मागे थांबलेल्या सोबत्यांपर्यंत येईस्तोवर त्यांचं जेवण होऊन एक झोप काढून झाली होती.

चित्र उपलब्ध नाही

थकलेली मंडळी ताजीतवानी झाल्यावर त्यांना पुढे पाठवून देऊन आम्ही पटापट आमची जेवणे उरकली आणि ते खिंडीत पोहोचेपर्यंत त्यांना मागुन जाऊन गाठलं.

चित्र उपलब्ध नाही

खिंडीपासून पंधरा-वीस मिनीटात एका मोकळ्या पठारावर आलो. या ठिकाणावरून रतनगड आणि खुटा अगदी पुर्णपणे दिसत होते. पठाराच्या आसपास बांबुची बेटे भरपुर दिसली आणि साम्रदची मंडळी बांबु नेण्यासाठी इथे वरचेवर येतात त्यामुळे या पठारावरून बाणच्या नाळेत जाईपर्यंतची वाट अतिशय मळलेली होती.

चित्र उपलब्ध नाही

मळलेली वाट नाळ ओलांडून साम्रदकडे निघुन गेली आणि आम्ही बाणच्या नाळेतुन उतरू लागलो. थोडं उतरून गेल्यावर स्वच्छ पाण्याचा साठा मिळाला. चिकणदर्‍याखालच्या उंबराच्या पाण्यानंतर आत्ताच पाणी मिळालं होतं. बाणची नाळ माझ्या चांगल्या परिचयाची होती. जानेवारी २००८ च्या पुणे व्हेंचरर्सच्या बाण मोहीमेत मी इथं आठवडाभर मुक्कामाला होतो. आता बारीक नाळेतून मोठ्या झालेल्या नाळेत आलो आणि समोर ८१० फुटांचा बाण सुळका, सांधणदरीची भेग आणि त्यामागे करवली घाट दिसु लागला.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

बाणच्या पायथ्यातून मोठमोठे कातळटप्पे उतरावे लागत होते. सुर्यास्तही होऊ लागला होता त्यामुळे आता जेवढ्या लवकर सांधण खालच्या कुंडांपर्यंत जाता येईल तेवढं जावं लागणार होतं. कारण अंधार पडल्यावर चालण्याचा वेग मंदावतो. बाणच्या नाळेतुन पुर्णपणे खाली उतरून जाता येत नाही. मधे दोन-तीन मोठाले कातळटप्पे आहेत. त्यामुळे बाणची नाळ सोडून आम्हाला डाव्या बाजूच्या नाळेत उतरावे लागणार होते. त्यासाठी अगोदर डाव्या धारेवर चढावे लागले. इथे पोहोचेपर्यंत पुर्णपणे अंधार पडला. त्यामूळे इथून पुढचे फोटो काढता आले नाहीत.
डाव्या धारेवरून नाळेत उतरण्याची वाट इतकी सरळसोट होती की सुरक्षा दोर वापरण्याखेरीज पर्यायच नव्हता. एखादे मोठे झाड पाहून त्याला दोर बांधायचा. एकएक करत सर्वजण खाली आले की शेवटचा भिडू गाठ सोडून दोर त्याच झाडाला इंग्रजी 'U' सारखा ओवायचा आणि दोन्ही टोके खाली सोडायचा. मग दुहेरी झालेला दोर धरुन खाली बाकीच्या सोबत्यांपर्यंत उतरायचा. असं करत करत आमची जत्रा अंधारात खाली उतरत होती. जवळजवळ हा प्रकार आम्ही आठ-दहा वेळा तर नक्कीच केला. बराच वेळ असं आम्ही उतरत होतो. काहीच दिसत नसल्याने तळ किती लांब आहे ते समजत नव्हते. एकदाच्या सांधणदरी खालच्या ओळखीच्या खुणा दिसल्या आणि सुटकेचा निश्वास सोडला. रात्रीचे साडेआठ वाजले होते आणि डेहण्यापर्यंत अजुनही दोनएक तासांची चाल बाकी होती. पण एक बरं होतं की वाट मळलेली, सपाटीची आणि निर्धोक होती. नाही म्हणायला कोल्हेकुई ऐकू येत होती पण तेवढीच. उठतबसत एकदाचे साडेदहा वाजता सर्वजण डेहण्यात पोहोचलो.
आम्हा सर्वांची पुण्यातून निघुन डेहण्यात पोहोचण्याच्या चोवीस तासात फक्त दोनच तास झोप झाली होती आणि इथून पुढे पुण्यापर्यंत पाच तास झोप होणार नव्हती. म्हणजे पुण्यात पोहोचण्या आधीच्या तीस तासात सोळा तास ट्रेक, दहा तास ड्रायविंग, दोन तास आवरण्याचे आणि फक्त दोन तास झोप. एकूण पाटेकरांचा या ट्रेकचा चालण्याबद्दलचा अंदाज साफ चुकला होता. हा ट्रेक एक दिवसाचा खासच नाही.
बहूतेक सर्वांनाच दुसर्‍या दिवशी कामावर जायचे होते त्यामुळे डेहण्यात थांबण्याचा प्रश्नच नव्हता. पाटेकरांकडे चहा घेतला आणि तडक पुण्याकडे निघालो ते याच परीसरात अजून एक नवीन सापडलेल्या घाटवाटेत परत येण्यासाठीच.

महत्त्वाचे असे -
१) सह्याद्रीतील अशा नवीन शोधण्याच्या वाटा डोंगरयात्रांचा पुरेसा अनुभव, कातळारोहणासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीशिवाय आणि ती योग्य प्रकारे वापरण्याचा सराव असल्याखेरीज अजिबात करू नयेत.
२) राखून ठेवलेल्या पाणीसाठ्याव्यतिरिक्त पुरेसा पाण्याचा साठा सोबत असावा.
३) सहा-सात तास वापरता येईल एवढी टॉर्च (शक्यतो हेडटॉर्च) सोबत बाळगावी.
४) पुरेसे अन्न सोबत बाळगावे.

समाप्त.

चित्र उपलब्ध नाही


वाचने 6344
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

ही वाट भन्नाट वाटतेय. साकुर्ली ते सामरद ते कल्याण दरवाजा जाताना त्या भयानक उतारावरचे गवत रतनवाडीतले गावकरी काढताना दिसले. " हे गवत गोठा शाकरायला वापरतो" म्हणाले.
लेख आणि फोटो मस्त. रतनगडाच्या पायथ्याकडे (डेहणे बाजू) हरवण्यातही गम्मत असते


जबरी हो, कमाल केलीत. केवळ चित्तथरारक. आज एकाच दिवसात तुम्ही माझे अ‍ॅड्रीनलीन बरेच वाढवलेत. आता तुमचा धागा वाचायचा म्हणजे ईनोची बाटली सोबत घेउन बसायला लागणार. पुर्ण धागा वाचेपर्यंत एक क्षणही थांबलो नाहीत. जबरी आहेत फोटो. वरुन मी कल्याण दरवाजा पाहिला होता, पण खाली वाट अशी आहे हे माहिती नव्हते. इंग्रजानी केलेल्या उपद्वाप्यामुळे प्रस्तरारोहणाला पर्याय नाही असे दिसते.
सांधण व्हॅलीचा फोटो एका वेगळ्या अँगलने पहायला मिळाला. धाग्याबध्दल शतशः धन्यवाद. आणखी लिहा.


In reply to by दुर्गविहारी

कल्याण दरवाजाच्याची वाट इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या भडिमारामुळेच फुटली का दरड कोसळल्याने किंवा इतर काही कारणांनी हे सांगणे तसे कठीण आहे. मुळात ह्या वाटेची दुर्गमता बघता इथवर तोफांचा मारा होणेच अशक्यप्राय दिसते. खालचा सगळा भाग अशक्य खोल दर्‍यांनी व्यापलेला आहे.

बाकी लेखन उत्कृष्ट. ह्या वाटेवर पायर्‍या असतील अशी कल्पनादेखील केली नव्हती. दुर्गविहारींप्रमाणेच मीही कोकण दरवाजा वरुनच पाहिलेला आहे.


In reply to by प्रचेतस

मुळात अलंग,मदन, चावंड यासारख्या गडांच्या वाटा नष्ट करण्यासाठी ईंग्रजानी तोफांचा उपयोग न करता सुरुंग वापरले. सुरुंग पेरण्यासाठी त्यांनी दगडात केलेली छिद्र आजही पहाता येतात. किंबहुणा त्यातच बोटे रोवून चढाई करावी लागते. या किल्ल्यांवर जानेवारीमधे धागे येतीलच.
माझ्या माहिती प्रमाणे रतनगड हा साम्रद महालात येणारा किल्ला. सहाजिकच कोकणात उतरणारी आणि त्याचबरोबर साम्रदकडे जाणारी वाट महत्वाची असेल म्हणून हि वाट नष्ट केली असावी. अर्थात हा माझाही अंदाजच.


In reply to by दुर्गविहारी

ओह्ह ओके.
तसं असेल तर शक्य आहे. चावण्डला आणि जीवधनला सुरुंग वापरलेले हे माहिती होतं. जीवधनच्या घाटघरमार्गे चढणार्‍या वाटेवर असलेल्या पायर्‍या चढून जाताच एक रॉकपॅच लागतो तिथे तर हे सुरुंगाच्या नळ्या सहजी दिसतात.


मस्त हो. याच विकांताला रतन-हरिश्चन्द्र परिसरात भटकंती झाली. या आधी एकदाच रतनगडाला गेलो तो पावसात, तेव्हा कल्याण दरवाजा फक्त दिसला, खालची वाट या वेळी पहिली. खतरनाक आहे. सलाम.