उपटसूंभ
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
उपटसूंभ
काही गोष्टी ज्या जाणवतात त्या मांडल्याच पाहीजेत. जगामधे जेवढी मोठी धरणे आहेत त्यातली निम्मी धरणे भारतात आहेत. भारतात जेवढी मोठी धरणे आहेत त्यातली निम्मी महाराष्ट्रात आहेत. दुसरी गोष्ट महाराष्ट्रामधे नावे घेता येतील असे अनेक जलसंधारण तज्ञ आहेत. त्यातल्या काही तज्ञांचा तर जागतिक किर्तीचे जलसंधारण तज्ञ असाही उल्लेख केला जातो. आपल्याकडे कौतुकाचीही एक विशिष्ट पद्धत आहे. अमुक एक व्यक्ती फार विद्वान आहे म्हणजे मॅट्रिकला बोर्डात आली होती. विद्यापीठाच्या परीक्षेमधे सुवर्णपदक मिळवले होते वगैरे सांगितले जाते. पण प्रश्न पडतो प्रत्यक्ष दिलेल्या कामामधे या लोकांच्या तथाकथित हुशारीचा नेमका उपयोग काय झाला. तुम्ही असाल हो जागतिक जलसंधारण तज्ञ पण राज्यामधल्या अधिकाधिक जमिनीपर्यंत सिंचनाचे पाणी पोचले का ? पाण्याविना शेती उजाड का झाली ? शेतीवर अवलंबून राहणे इतके अवघड का झाले ? शेतीच्या दुरवस्थेने राज्याला आज असे व्यापून का टाकले ? आणि जर असे असेल तर मग तुमच्या सुवर्णपदकाचा, जागतिक किर्तीच्या विद्वत्तेचा, बोर्डात येण्याचा खरंच प्रत्यक्ष कामात काय उपयोग झाला ? पाण्यापासून वंचित राहीलेल्या शेतकर्याला सांगू शकाल तुमच्या विद्वत्तेचे कौतुक ?आणि सांगू शकत नसाल तर शेतकर्याच्या परीक्षेत तुम्ही नापासच झालेला आहात. देशाचे एक सर्वोच्च नेते जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ होते. जे पूर्वी देशाचे अर्थमंत्री होते, रिजर्व ब्यांकेचे गवर्नरही होते. त्यांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असे वाटले होते. पण झाले भलतेच. देशात अनेक आर्थिक घोटाळे झाले. निरनिराळी लायसन्य देताना खूप खाबूगिरी झाली. त्यांच्या काळात ८६% चलन हे ५०० आणि १००० च्या नोटांच्या स्वरूपात होते. नोटा या साधन म्हणून वापरायच्या ऐवजी साध्य बनल्या. विनिमयाऐवजी साठवून ठेवणे सोपे झाले. त्यांच्या काळात आलेला सरल फॉर्म हा तितकासा सरल नव्हता असे सामान्य माणसाचे मत होते. त्यामुळे अर्थतज्ञ नेत्यांच्या काळात जी आर्थिक शिस्त येइल असे वाटले होते ती आलीच नाही. आजही त्यांचा जागतिक अर्थतज्ञ असा लौकीक कायम आहे. प्रश्न पडतो मग विद्वत्ता या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि विद्यापीठांमधल्या शिक्षणाला शिक्षण का म्हणायचे ? कारण लौकिक अर्थाने शाळेचेही शिक्षण पूर्ण न केलेला एखादा मनुष्य देशातल्या व्यवस्थांचा बारकाईने अभ्यास करतो. त्यामधे नेमके बदल सुचवतो. महाराष्ट्र राज्याच्या माहिती अधिकार कायद्याचा मसूदा तयार करतो. हे नवे बदल प्रशासकीय व्यवस्थेला स्वीकारावे लागतात. अति उच्च शिक्षण घेतलेल्या, बुद्धिमान आयएएस अधिकार्यांना त्याची अंमलबजावणी करावी लागते. महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजेंद्रसिंग राजस्थानातून महाराष्ट्रात येतात. मोठ्या धरणांच्या गोष्टी ते करत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींमधून भूजलाची पातळी वाढवून दाखवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सिव्हिल इंजिनीयर्सही काम करतात. एरवी सरकारी सेवेत असताना मोठ्या धरणांची बाजू मांडणारे जागतिक जलतज्ञही आता राजेंद्रसिंगाचीच भाषा बोलतात. स्वतः राजेंद्रसिंग सिव्हिल इंजिनीयर नाहीत. जागतिक अर्थतज्ञ देशाची अर्थव्यवस्था सुधारू शकत नाहीत. पण एक अर्थतज्ञ नसलेला मनुष्य मात्र नोटाबंदीचा उपाय सुचवतो. नवी कररचना सुचवतो. व्यवस्थेमधे बदलाचे नवे प्रारूप मांडतो. अर्थविषयाचे विद्यापीठात शिक्षण घेतलेले लोकही मग त्या मनुष्याचीच भाषा बोलायला लागतात. कृषी विद्यापीठामधून शिक्षण घेतलेले लोक स्वतःला शेती तज्ञ म्हणवून घेतात. तालुक्याच्या ठिकाणी कृषी सेवा केंद्रे चालवतात. गिर्हाईक म्हणून दुकानात आलेल्या शेतकर्याला शेती विषयक सल्ले देतात. त्यांना खते, किटकनाशके विकतात. पण प्रत्यक्षात ते शेती करून ती फायद्यात आणून दाखवताना दिसत नाहीत. असलेच तर अशांची संख्या फार कमी. आपण दिलेल्या सल्ल्यामुळे शेतीचे भलेच होइल अशी खात्री ते देऊ शकत नाहीत. आणि मग कृषी विद्यापीठात मिळालेले शिक्षण जो नाकारतो आणि पुन्हा पुन्हा "कृषी विद्यापीठे धादांत खोटे बोलतात" असे प्रतिपादन जो करतो. त्याच्याकडे अनेक शेतकरी आणि कृषी पदवीधर मार्गदर्शनासाठी गर्दी करतात. काय होतंय नेमकं या देशात ? विद्यापीठामधे सुवर्णपदके पटकवणारे लोक काहीच का उजेड पाडू शकत नाहीत. शिक्षणामधेच काहीतरी गडबड झाली आहे का ? आणि म्हणून त्या त्या विषयाचे शिक्षण न घेतलेले उपटसूंभच नव्या क्रांतीचे अग्रदूत बनले आहेत का ?
प्रतिक्रिया
विचार करायला लावणारा लेख.
मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना
लैच विचार करायला लावणारा लेख
आकाराने मोठी.
विद्यापीठामधे सुवर्णपदके
या लेखाशी अगदी पुर्ण संबंध