दिवाळी किल्ला: दगड, माती न वापरता !!! (पुनः प्रकाशित)

बोलघेवडा's picture
बोलघेवडा in मिपा कलादालन
20 Oct 2017 - 8:35 pm

नमस्कार मंडळी,
दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचं जस फराळ, आकाशकंदील, फटाके, नवीन कपडे , गुलाबी थंडी, उटणं यांच्याबरोबर अतूट नातं आहे तसंच नातं आणखीन एक गोष्टीबरोबर आहे. किल्ला !!!
आपण प्रत्येकानेच लहानपणी किल्ला केलेला आहे. अगदी स्वतः नाही तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे किल्ल्याच्या निर्मितीत भाग घेतलेला आहेच. ज्यांचं बालपण वाड्यात किंवा जुन्या सोसायटीत गेल आहे त्यांनी तर हा आनंद मनमुराद लुटलेला आहे.
परंतु सध्याची पिढी या बाबतीत थोडी कमनशिबी आहे अस म्हणायला लागेल. कारण किल्ला करायला लागणाऱ्या जागेची उपलब्धता, मऊ चिकणमाती दगड, विटा या गोष्टी तितक्या सहजपणे उपलब्ध होत नाहीत. त्यातून पुन्हा किल्ला तयार करायला घेतल्यावर होणारा चिखल, आकारामध्ये वारंवार करावा लागणारा बदल यामुळे गोष्टी त्रासदायक होत जातात. त्याहूनही मोठा त्रास म्हणजे दिवाळी संपल्यानंतर किल्ल्यातील दगड मातीची विल्हेवाट लावणे. या सगळ्या गोष्टी गोळा करून बाहेर टाकून येणे व घरात साफसफाई करणे. या कारणांमुळे किल्ला करणे ही कितीही आनंददायी गोष्ट असली तरी नंतर ती काहीशी नकोशी होऊन बसते.
पण आता मात्र ह्या अडचणींवर मात करून एक सहज सोपी, झटपट, घरातील साहित्य वापरून हि आपण घरी किल्ला करू शकाल अशी एक पद्धत मी आपल्याला सांगणार आहे.

किल्ला करण्यासाठी लागणार साहित्य:

  1. साधारण 10 ते 15 निरनिराळ्या आकाराचे प्लास्टिकचे डबे
  2. चॉकलेटी रंगाचे कपडे टेबलक्लाथ
  3. ग्रे, पांढरा आणि चॉकलेटी रंगाचा जाड पेपर
  4. हिरव्या रंगाचा पातळ पतंगाचा कागद
  5. पांढरा खडू किंवा व्हाइटनर पेन
  6. पट्टी, पेन्सिल
  7. कात्री, चिकट पट्टी

आता किल्ल्यासाठी जी जागी आपण निश्चित केली असेल तिथे आपलया जवळचे प्लास्टिकचे डबे फोटोत दाखवल्याप्रमाणे रचून घ्यावेत. डबे रचताना शक्यतो ते नंतर उंच सखल आकार तयार करतील अश्या पद्धतीत रचावेत. एकाच ओळीत जास्त डबे नको.मग या डब्यांच्या रचनेवर एकदा आपल्या जवळचे चॉकलेटी कापड टाकून बघावे. कापड आधीच चुरगळून (crush) घ्यावे. अगदी परिघडीचे नको.कापडाला काही ठिकाणी मुद्दाम चुण्या पडून घ्याव्यात. जर किल्ल्याचा आकार मनाजोगता झाला असेल तर सर्व डबे चिकट पट्टीने जमिनीला किंवा एखाद्या भक्कम आधारावर चिकटवून घ्यावेत. डबे हलणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर आकार नीट आला नसेल डब्यांची मांडणी बदलून बघावी. योग्य मांडणी केल्यानंतरचं दृश्य फोटोत दाखवल्याप्रमाणे. (फोटो क्रमांक. १).
IMG-20171014-180257
किल्ल्यावर साधारण 7 ते 8 सखल भाग तयार करावेत जेणेकरून त्यावर मावळे, तोफा, बुरुजांसाठी जागा होईल. महाराजांसाठी सर्वात उंच आणि प्रशस्त जागा तयार करावी.

बुरुज तयार करणे
निळ्या कागदाचा साधारण आयताकृती तुकडा कापून घ्यावा. त्याच्या 2 सामान घड्या घालून एका बाजूने वरून साधारण 2 cm अंतरावर उभे काप घ्यावेत. मग पूर्ण घडी उघडून बघावी. (फोटो क्रमांक 2)
IMG-20171021-083507
आता विषम संख्या असलेले काप म्हणजे 1,3,5,7... दुमडून टाकावेत म्हणजे फोटोत दाखवल्याप्रमाणे बुरुजाची तटबंदी तयार होईल.आता यावर खडूने अथवा व्हाइटनर पेनाने दगडी विटांचे डिझाईन काढावे कि बुरुज तयार!!! (फोटो क्रमांक ३)
IMG-20171021-083610

याच पद्धतीने बाकीचे बुरुज व तटबंदी , दरवाजा तयार करून किल्ल्यावर चिकटवावे.
IMG-20171021-083654

खाली गाव तयार करण्यासाठी हिरव्या रंगाचा पातळ पतंगाचा कागद चुरगाळून (क्रश) करून पसरवा. कडेने चॉकलेटी रंगाच्या कागदाची जाड बॉर्डर करून घ्या.
पांढऱ्या कागदावर ढगांचे चित्र काढून फोटोत दिल्या प्रमाणे रंगावावे. (फोटो क्रमांक ४)
IMG-20171021-083904

हे सर्व चिकटवून झाले की झाला आपला किल्ला तयार!!! मग त्यावर छानपैकी चित्र आणून किल्ला सजवावा. (फोटो क्रमांक ५)
IMG-20171018-102840

IMG-20171018-113824

हा झाला बेसिक किल्ला. याउपर आपली कल्पनाशक्ती आणि हाताशी असलेला वेळ वापरून आपण सहज निर्मितीचा आनंद आपल्या मुलांना देऊ शकता.

प्रतिक्रिया

रेवती's picture

20 Oct 2017 - 8:56 pm | रेवती

आयडिया आवडली.

एस's picture

20 Oct 2017 - 11:01 pm | एस

चांगली कल्पना आहे.

सही रे सई's picture

20 Oct 2017 - 11:58 pm | सही रे सई

खरचं छान कल्पना आहे.. अता या वर्षी नाही पण पुढील वर्षी नक्की करून बघेन.

बोलघेवडा's picture

29 Oct 2018 - 8:28 pm | बोलघेवडा

पुनः प्रकाशित करत आहे.

साबु's picture

30 Oct 2018 - 2:51 pm | साबु

पण किल्ला करताना मातीत खेळायची मजा काही औरच असते. ती हळीव टाकायची मग ती उगवून येते. नंतर गुहेत फटाके फोडायला पण मजा येते.