Skip to main content

ओट्सचा झटपट उत्तपा

लेखक रुपी यांनी शनिवार, 27/05/2017 05:14 या दिवशी प्रकाशित केले.
. ओट्सचा आहारात कसा समावेश करावा हा प्रश्न बर्‍याचदा सतावतो. ओट्सचे बिस्कीट आवडतात, पण किती वेळा करणार, म्हणून हा एक प्रयोग करुन पाहिला. ओट्सचा डोसा, उत्तपा असे प्रकार ऐकले होते, पण शोधाशोध करण्याइतका वेळ नव्हता. म्हणून नेहमी रव्याचे उत्तपे करते तसेच ओट्सचे करुन पाहिले. मस्त आणि फस्तही झाले! घाईत हाच फोटो बरा आला. साहित्यः २ वाट्या ओट्स (मिक्सरमध्ये बारीक करुन पूड करुन), १ वाटी रवा, दीड वाटी दही, १ हि. मिरची बारीक चिरुन, पाणी, तेल, मीठ, १/२ टी. स्पून सोडा, कांदा, कोथिंबीर बारीक चिरून कृती: १. ओट्सची पूड, रवा, दही एकत्र करा. उत्तपे, डोसे घालता येतील असे मिश्रण होईल इतपत पाणी घाला. २. मीठ, मिरची, सोडा घालून एकत्र करुन घ्या. साधारण अर्धा तास झाकून ठेवा. ३. मध्यम आचेवर नॉनस्टीक पॅन गरम करुन तेलाचे ४-५ थेंब टाकून उत्तपा घाला. ४. वरुन कांदा, कोथिंबीर पसरवा (मी कोथिंबीरीऐवजी पालक बारीक चिरुन घातला). ५. २-३ मिनिटांनी उत्तपा उलटून दुसर्‍या बाजूने थोडासा भाजून घ्या. गरम-गरम उत्तपा केचप, चटणीबरोबर खायला द्या.

वाचने 8671
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

लै भारी. अजून येवू द्या. -दिलीप बिरुटे

मस्तच ग

धन्यवाद! @एस भाऊ - नाही हो. माझ्यात इतकी कला कुठली? :) माझ्याकडे एक मॅट आहे ते चित्र असलेलं, त्यावर डीश ठेवून फोटो काढला. @दशानन - ओट्स हे एक तृणधान्य आहे. मी वापरलेले ओट्सचा हा अ‍ॅमेझॉनवरुन फोटो. त्याची पूड करुन यात वापरलीये. oats

In reply to by दशानन

"हुग्गीचे" म्हणजे काय? हे गहू नाहीत. ओट्स (Oats) हे वेगळे धान्य आहे. हे फोटोमधले चपटे केलेले आहेत. त्यांना Rolled Oats म्हणतात.

केले आजच. रव्या ऐवजी इडली रवा वापरला. ओट्स जास्त घेतले गेले बहुदा म्हणुन मिश्रण खुप चिकट झालं पण उत्तम झाले. Uttape