✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बोचरी संध्याकाळ

अ
अश्विनी वैद्य यांनी
Tue, 10/04/2016 - 01:14  ·  लेख
लेख

बोचरी संध्याकाळ

मुंबई हून निघताना विमानाची चाकं take off च्या वेळी जेव्हा जमीन सोडतात ना, तो एक क्षण श्राव्याला नेहमी अस्वस्थ करतो. त्या क्षणी एक हुरहूर उगाच दाटून येते. "सगळं घेतलंस ना गं नीट…काही विसरू नकोस बाई… तू येणार म्हणून तुझ्यासाठी महिनाभर आधी पासूनच लक्षात येतील तशा गोष्टी घेवून ठेवत होते गं…तू आल्यावर मग खूप धावपळ होते ना, वेळ पण नाही पुरत…तिकडे मिळतंच म्हणा हल्ली सगळं, तरी उगाच आपलं माझं समाधान गं…" श्राव्याच्या आईची अशी सगळी मायेची वाक्यं take off च्या त्या क्षणी तिच्या कानांत तिला परत परत ऐकू येत होती. काय काय घेणार आणि किती किती नेणार…या सगळ्या नश्वर गोष्टी बरोबर नेताना तिच्या हळव्या मनाला मात्र इथेच ठेवून विमानाची ती चाकं नेहमी सारखी भरधाव वेगात जमीन सोडून हवेत उडाली सुद्धा होती. भारतातल्या वास्तव्यातल्या वाऱ्या सारख्या उडून गेलेल्या दिवसांची उजळणी त्या क्षणी तिच्या डोळ्यासमोरून भरकन सरकली. माणसांच्यात रमायची, त्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांना पारखत त्यांना समजून घ्यायची, नकळत जाणायची एक गोड खुबी श्राव्यामध्ये अगदी उपजत होती… आणि त्यामुळं आत्तापर्यंत अनेक माणसं तिनं आपोआप जोडली होती. सासर-माहेरच्या स्वतःच्या माणसांबरोबरच मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, ओळखीचे अशी बरीच मोठी भेटीची यादी दरवेळी भारतात आल्यावर पूर्ण करता करता इथले दिवस कधी संपून जायचे कळायचंच नाही. एक एक दिवस घरात अगदी सणासुदी सारखा वाटावा इतकी सगळ्यांची गडबड, मस्ती, धम्माल चालायची. भेटी-गाठी, मनमोकळ्या गप्पा यातून फुललेले नात्यांचे गुंतलेपण, आठवणींच्या रुपात शिदोरी म्हणून गाठीशी बांधून परत निघताना तिचा पाय मात्र नेहमी तिथेच घुटमळत राहायचा. "माणसांची किंमत कळायला अंतरांची दरी पार करावीच लागते का…कोण जाणे…चालायचंच.…!" शांतपणे डोळे मिटून चाललेल्या या तिच्या विचार प्रवाहाला विमानात सुरु झालेल्या एका सुचनेनं खंड पडला आणि मग कोरड पडलेल्या घशाला घोटभर पाण्याने शांत करत ती थोडी भानावर आली. सहप्रवाशांवर एकवार नजर गेली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे साधारण तिच्यासारखेच असलेले संमिश्र भाव बघून तार्कीकार्थी तरी "We are in the same boat (plane) " या वाक्प्रचाराचा उगम कसा झाला असेल हे त्या क्षणी उगाच पटल्यासारखे वाटले. इथे आत्ता असं अथांगात उडत असताना या वेळच्या भारत भेटीत भेटलेल्या त्या सगळ्या लोकांच्या विचारांनी तिचं मन मात्र राहून राहून खाली जमिनीकडेच झेपावत होतं. भारतातील तिची महिन्याभराची ही सुट्टी अगदी ठरल्याप्रमाणे गेली होती. याच दिवसांत येणाऱ्या तिच्या आजीच्या स्मृती दिनाला यावेळी भारतात असल्याने तिला हजेरी लावता आली होती. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही त्यांच्या ठरलेल्या त्या वृद्धाश्रमातल्या लोकांना गोडाचे जेवण आणि काही पुस्तकं देण्याच्या तिच्या बाबांच्या नेमाला यावेळी तिला हातभारही लावता आला होता. खाणेपिणे, पुस्तकं हे केवळ एक निमित्त…पण तिथे दिवसभर थांबून त्या सगळ्या आजी-आजोबांबरोबर गप्पा मारणे, त्यांचं बोलणं, अनुभव ऐकणे आणि त्या साऱ्यात स्वतःच्या आजीचं हरवलेपण शोधणे यासाठी इथं येणं हा खरतर तिचा मुख्य उद्देश होता. त्या दिवशीचं वृद्धाश्रमातलं ते सारं चित्र आज परत एकदा तिला अगदी जसच्या तसं आठवत होतं. त्या अनोळखी आजी आजोबांचे चेहरे अगदी डोळ्यासमोर येत होते. काही अगदी बोलके, चेहऱ्यावर कायम फक्त हास्यच कोरलेले, आपल्या मुला-नातवंडानबद्दल भेटेल त्यांच्याशी भरभरून बोलणारे, काही अगदीच शांत, स्वतःच्या विश्वात हरवलेले, तर काही तिथे राहावं लागत असल्याचा अपराधीपणा वाटून नजर चुकवत बोलणे टाळणारे हे सारं सारं आठवत होतं. एकदा का एखादी न रुचणारी गोष्ट मनापासून मान्य केली कि त्याचा त्रास होईनासा होतो हे उतरणीला लागलेल्या आयुष्याच्या या टप्प्यावर आमलात आणत त्या आश्रमातही सुखासमाधानात राहणारे आजी आजोबांचे एक जोडपे तिला खूप उत्साही, मनमोकळे, अगदी आनंदी दिसले होते. इथे राहावं लागत असण्याची प्रत्येकाची वेगवेगळी काहीही कारणं असोत, पण या वयात या सगळ्या आजी आजोबांना स्वतःचं घर, माणसं सोडून हे असं होस्टेलवर राहिल्यासारखं बघताना तिचं काळीज मात्र तुटलं होतं. याच आधारावर तिच्या आईच्या घराजवळ राहणाऱ्या आज्जींचीही आत्ता तिला खूप आठवण आली. 'पंधरा वर्षांपूर्वी नवरा गेल्यानंतर एकुलत्या एका मुलाकडे अगदी आश्रिता सारखं त्यांना राहावं लागत होतं. आपण आईकडे गेल्यावर मुद्दाम भेटायला म्हणून आलेल्या त्या आज्जींच्या डोळ्यातले ते बिचारेपण आत्ताही डोळ्यासमोर येवून अंगावर अगदी शिरशिरी आली. ऐंशीच्या घरातले वय, खोल गेलेले डोळे, हाडांना केवळ झाकण्यासाठी उरलेली कातडी असा उंच देह आणि या साऱ्या बरोबर लपवण्याची कुचेष्टा करणारे चेहऱ्यावरचे आगतिकतेचे भाव.' "आजी चहा घ्या ना थोडासा" या आईच्या वाक्यावर, "नको हो, अगदी तुमच्या साठी करणार असाल तरच घोटभर घेईन हो, उगाच माझ्यासाठी नका मुद्दाम करू" असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातील भुकेले भाव पोटातल्या खड्ड्याच्या वाटेकडे सरकलेले त्यावेळी जाणवले होते. मात्र ती सारी आगतिकता लपवण्याची त्यांची धडपडही लक्षात येत होती. मग आम्ही तिघींनी मिळून घेतलेल्या त्या चहा बिस्कीटाबरोबर मारलेल्या गप्पांनी त्याचं मन थोडं हलकं झाल्याचं जाणवलं होतं . त्या गेल्यावर आईने सांगितलेली त्यांच्या परिस्थिती बद्दलची माहिती खूप काही बरी नव्हतीच म्हणा. घरातल्या सार्यांनी त्यांच्या अस्तित्वाचीच न घेतलेली दखल त्यांना खूप असह्य व्हायची. उच्च कुळातील एकुलत्या एक मुलाने संवाद आणि जेवण या दोन्ही जीवनावश्यक बाबतीत त्यांच्याशी पुकारलेला असहकार त्यांच्या काळजाला घरं करायचा. पण त्यांच्या उच्च कुलाची उच्चता या वंशाच्या दिव्याने आईला वृद्धाश्रमात पाठवून धुळीस मिळवली अशी समाजातील नाचक्की टाळण्यासाठी त्याने अशा प्रकारे घरीच नरक यातना देण्याची पुरेपूर सोय मात्र करून ठेवली होती. या साऱ्या मागची त्यांची घरगुती कारणे काहीही असोत पण हे सारं किमान माणुसकीला धरूनही नव्हतं हे खरच खूप भयंकर होतं. खऱ्या आयुष्यात कोणी असं वागू शकतं हे पचणंच खूप अवघड होतं. मग यापेक्षा त्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांचं कुटुंबाविना पण किमान मुलभूत गरजा भागून तरी चाललेलं आयुष्य त्यामानानं बरं म्हणावं कि काय असं वाटलं. आत्तापर्यंत टीव्ही सिनेमात-नाटकात पाहिलेल्या, वर्तमानपत्रात वाचलेल्या या अशा गोष्टी इतक्या जवळून बघताना एक विचित्र कल्लोळ मनात भरून आला.' इकडे इंग्लंड मध्ये तिची अगदी जवळची एक भारतीय मैत्रीण…जी भारतातून इथे शिकण्यासाठी येवून नंतर इथेच जन्मलेल्या आणि वाढलेल्या अशा भारतीय वंशाच्या ब्रिटीश मुलाबरोबर संसार करत होती. सहजिकच त्याचं अगदी आजी आजोबां पर्यंतचं सारं कुटुंब इथे इंग्लंड मध्येच वास्तव्याला होतं. मग मध्ये अचानक पडल्याचं निमित्त होवून तिच्या आजेसासूबाईनी जेव्हा अंथरून धरलं, त्यावेळी मात्र कोणत्याही पण-परंतु चा स्वर न लावता तिने त्यांचे सारे काही करायला मायेने पुढाकार घेतला. हे सारं त्या आजीनाही खूप कौतुकास्पद वाटलं होतं. भारतातल्या कुठल्यातरी गावात जन्मलेली, वाढलेली मुलगी, आपल्या नातवाची पत्नी या नात्याने या परदेशी भूमीतही अगदी प्रेमानं आपली देखभाल करत आहे हे बघून त्यांचा उरही अगदी भरून यायचा. हे सगळं आत्ता श्राव्याला परत परत आठवत होतं. तिच्या इंग्लंड मधल्या घराशेजारी एकटीने राहणाऱ्या नव्वदीला टेकलेल्या तरीही अतिशय उत्साहाने बागकाम, घरकाम करणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या ब्रिटीश आजीही एकदम डोळ्यासमोर आल्या. असेच एकदा कामामुळे इंग्लंड मधल्या care home मध्ये जाण्याची संधी मिळाली होती, तेव्हा स्वतःला वेगवेगळ्या उद्योगात गुंतवून ठेवत राहत असलेल्या तिथल्या त्या साऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर मारलेल्या गप्पाही आठवल्या. जगण्याच्या कक्षा रुंदावत नेताना, थोडक्यात स्वतःच्या comfort zone मधून बाहेर पडताना आपल्याला माहित नसलेल्या जगाची जी ओळख व्हायला लागते ती पचवणं सुरवातीला नेहमीच थोडं अवघड जातं. त्यामुळंच कदाचित श्राव्याला हे सगळं अनुभवताना आतून काहीतरी हलल्यासारखं झालं होतं. या साऱ्या आधारावर आत्ता तिच्या मनात येत असलेले हे विचार आजपर्यंत अनुभवास आलेल्या प्रसंगांना एकमेकांशी जोडत, नवीन संदर्भ शोधत होते. मग यात संस्कार, परंपरा, परिस्थिती, चूक, बरोबर, भोग, प्राक्तन या साऱ्याच्या पुढे जावून मुळात 'म्हातारपण' या शब्दाला चिकटलेल्या आम्हा सगळ्या तरुणांच्या जाणीवा मात्र किती म्हाताऱ्या झाल्या आहेत हे अगदी ठळकपणे जाणवलं. . त्या क्षणी विमानाच्या खिडकीतून दिसत असलेल्या त्या सूर्यास्ताच्या वेळी आपल्या आयुष्याची संध्याकाळही कशी आणि किती बोचरी असेल कोण जाणे, या सगळ्या विचारांमुळे त्या कातरवेळेची कातरता श्राव्याला आणखीनच बोचरी वाटत राहिली. अस्वस्थ करत राहिली. -----अश्विनी वैद्य
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
4211 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

छान लिहिलेय

विशाखा राऊत
Tue, 10/04/2016 - 02:43 नवीन
छान लिहिलेय
  • Log in or register to post comments

अतिशय भावपुर्ण लेख. छान.

जयन्त बा शिम्पि
Tue, 10/04/2016 - 03:01 नवीन
अतिशय भावपुर्ण लेख. छान. आवडला. १ ऑक्टोबर ला " जेष्ठ नागरिक दिन '' होता. त्या निमित्ताने शनिवारच्या ' लोकसत्ता ' च्या चतुरंग पुरवणीत आलेला " ‘शेवटाची’ परिपक्व सुरुवात " हा लेखसुद्धा वाचण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

सुखीमाणूस
Tue, 10/04/2016 - 06:30 नवीन
लेखामध्ये जेष्ठ नागरिकान्चे यथार्थ वर्णन आले आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलय

अमृत
Tue, 10/04/2016 - 09:46 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

सुरेख!

रातराणी
Tue, 10/04/2016 - 09:53 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

लेख आवडला!

एस
Tue, 10/04/2016 - 10:07 नवीन
लेख आवडला!
  • Log in or register to post comments

लेख आवडला

श्रेयसी
Tue, 10/04/2016 - 15:38 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलय

पैसा
Tue, 10/04/2016 - 16:06 नवीन
छान लिहिलय
  • Log in or register to post comments

छान लिखाण.

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 10/05/2016 - 12:32 नवीन
छान लिखाण.
  • Log in or register to post comments

भापो. संवेदनशीलतेने मांडलेला

यशोधरा
Wed, 10/05/2016 - 13:18 नवीन
भापो. संवेदनशीलतेने मांडलेला विषय आवडला.
  • Log in or register to post comments

प्रकटन छानंच जमलंय

वटवट
Wed, 10/05/2016 - 14:54 नवीन
प्रकटन छानंच जमलंय
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय

पाटीलभाऊ
Wed, 10/05/2016 - 14:58 नवीन
मस्त लिहिलंय
  • Log in or register to post comments

Thank you so much all for

अश्विनी वैद्य
Wed, 10/05/2016 - 16:12 नवीन
Thank you so much all for reading and your comments....!
  • Log in or register to post comments

संवेदनशील मन दाखवणारा लेख

अजया
Wed, 10/05/2016 - 16:48 नवीन
संवेदनशील मन दाखवणारा लेख आवडला.
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिलंय. आवडलं.

पद्मावति
Wed, 10/05/2016 - 17:15 नवीन
खूप छान लिहिलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

रेवती
Wed, 10/05/2016 - 18:11 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

छान लेख

रघुनाथ.केरकर
Wed, 10/05/2016 - 18:12 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments

सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद

अश्विनी वैद्य
Fri, 10/07/2016 - 02:21 नवीन
सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मनापासून आवडले. सामान्यतः

निशदे
Fri, 10/07/2016 - 02:39 नवीन
मनापासून आवडले. सामान्यतः सासू-सून-मुलगा हे लेख आवडत नाहीत पण तुम्ही इतक्या संवेदनशीलतेने हे लेखन केले आहे की अगदी काळजात घर करून राहिले.
  • Log in or register to post comments

तुमची प्रतिक्रीया खूप आवडली

अश्विनी वैद्य
Fri, 10/07/2016 - 18:43 नवीन
तुमची प्रतिक्रीया खूप आवडली निशदेजी....धन्यवाद....! पुण्यातल्या 'निवारा' सारख्या ठिकाणी दिसणारे चित्र डोळ्यासमोर आठवले क, ती सन्ध्याकाळ खरच खूपच बोचरी वाटते हो...!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा