✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाऊस असा...

म
माधुरी विनायक यांनी
Fri, 06/24/2016 - 18:29  ·  लेख
लेख
मुंबईत पाऊस पडतोय. मुंबईचा म्हणून ओळखला जाणारा पाऊस पडतोय. पागोळीची सुरावट सुरू आहे बराच वेळ... एका सुरात... पागोळीला अजून तरी शहराचं वावडं नाही, मुंबईचं वावडं नाही. त्यामुळे ती आहेच... परळ भागातला हा म्हटलं तर मध्यवर्ती, म्हटलं तर शांत असा भाग. इमारतीखाली, आजुबाजूला पावसाचा चिकचिकाट, रस्त्यावर साचलेलं पाणी, शाळेतून परतणारी मुलं, त्यांना न्यायला आलेल्या, पावसामुळे खोळंबलेल्या आया, किरकोळ विक्रेते, त्यांचे ठेले, भज्यांचा खमंग दरवळ, वाफाळत्या चहाच्या हाका, त्या ओढीने गर्दी करणारी कोंडाळी... पाऊस थोडा सुस्तावलाय आता. म्हणून तर पागोळीचं ठिबकणं इतकं छान स्पष्ट ऐकू येतंय... झेंडा अमुचा प्रिय देशाचा... स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात समुहगायनात गायचं गाणं लेक गाऊन दाखवतेय... माझ्या मनात मात्र पाऊस... गाणं ऐकून, मान डोलावली मी आणि शाळेतून कुडकुडून आलेली लेक चादर गुरफटून मांडीवर डोकं ठेवून झोपलीसुद्धा.. माझ्या मनात पाऊस सुरूच... माझा आवडता ऋतू पावसाळा... ऋतू हा शब्दही खास पावसाळ्यासाठीच जन्मला असावा, असं नेहमीच वाटत आलेलं... मी पावसाळ्याच्या आणि बहुधा तो ही माझ्या तुडुंब प्रेमात... मन आनंदाने भरलेलं असो, नाराज असो, दु:खी असो किंवा आणखी काही.. तो आनंद घेऊनच येणार. मी आनंदात असले तर त्यात आणखी भर घालणार... काही माणसं असतात ना, आपल्याला उगीचच आवडणारी. अगदी ओळख नसली तरी. त्यांना फक्त बघीतलं, तरी हसू फुलतं ओठांवर आपसूक... तसाच पाऊस.. तितकाच आवडता, हवाहवासा पाऊस... आठवणीतला पाऊस, पावसाळ्याच्या आठवणी, आठवणींचा पाऊस... म्हटलं ना मी.. असं होतं वेडावल्यासारखं... मनाला बेचैन करणारी बरसत्या पावसाची रिमझिम आपल्याही नकळत आपण भिजतो, आठवणींनी, ओलेचिंब... पावसाचा नाद, कोसळतो मनात झिरपत राहतो मनभर... सरी बरसतात आठवणींच्या न थांबता क्षणभर... मध्येच कधीतरी थांबतो पाऊस अचानक आपल्याच धुंदीत भानावर येतो, पुन्हा बरसतो त्याच त्या धुंदीत, लयीत...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1086 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

सुरेख! एकदम दिलसे आलेलं

रातराणी
Sat, 06/25/2016 - 12:06 नवीन
सुरेख! एकदम दिलसे आलेलं मुक्तक!
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
Sat, 06/25/2016 - 22:49 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा