'सह'ज जमेल
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रस्तावना -
मनातलं ब्लॉग्वर लिहायला लागले तेव्हा दोन महिन्यांपूर्वी हे दोन लेख लिहिले. लेखाचा सूर उपदेशात्मक आहे हे मान्य! पण ते माझे विचार मंथन आहे. सद्य परिस्थितीत काही खटकणार्या गोष्टींमुळे/वागण्यामुळे मनात आलेले विचार लिहिले आहेत म्हणुन तसा सुर त्या तमाम लोकाना उद्देशून आहे. कदाचित तुम्हालाही ह्या गोष्टी खटकत असतील असे वाटले म्हणुन तुमच्या बरोबर शेअर करते आहे. आणि म्हणुनच हे 'जनातलं मनातलं' ह्या सदराखाली लिहित आहे. :)
पहिला लेख - सहज जमेल असे
Kevin Abosch हा एक आइरिश फोटोग्राफर आहे. सध्या त्याचा २०१० सालचा एक फोटो चर्चेत आला आहे. फोटोचे मॉडेल आहे एक बटाटा! हो हो बटाटाच!
एक आइरिश, सेंद्रिय (organic), मातीने माखलेला, पूर्ण काळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा बटाटा केविनच्या कॅमेरामध्ये बंदिस्त झाल्यावर किती मूल्यवान ठरू शकतो हे कळते तेव्हा आपल्यासारख्या सामान्यांना थक्क व्हायला होते. तुम्हाला हा बटाटा बघायचा असेल तर google search करा… potato#345.
एका व्यावसायिकाने अंदाजे १.५ दशलक्ष डॉलर्स देऊन तो फोटो विकत घेतला आहे. काय आ वासला ना तोंडाचा? आपल्या इथे रोजचे खायचे बटाटयाचे भाव कडाडले की जीव कासावीस होणारे आपण… आपल्यासाठी हे अद्भुत आहे.
प्रत्येकाचे स्वतंत्र मत आणि प्रतिक्रिया असु शकतात. पण ह्यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आर्थिक विषमता भारतातच नाही तर जगभर आढळते आहे.
जशा अनेक समस्या आहेत तशीच ही समस्या पण जुनाट जर्जर झालेली आहे. ती समूळ नष्ट होणे कठीण असले तरी त्यासाठी आपणच काही पावले उचलून तिला आणि बळकट होण्यापासून परावृत्त करू शकतो.
समाजाचे जे तीन घटक आहेत त्यातील श्रीमंत आणि गरीब यांच्या मधला वर्ग हे काम नक्की करू शकतो. श्रीमंत त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहेत. आपण मध्यम वर्गाने आपल्याकडून आपल्यासारख्या किंवा आपल्यापेक्षा गरीब लोकांचा फायदा कसा होईल ते फक्त पाहायचे. रोजच्या जीवनात फक्त हे लक्षात ठेवायचे की आपल्याकडून त्यांचे काही नुकसान तर होत नाही ना?
भाजी घेताना क्षुल्लक घासघीस टाळता येते. सुपर मार्केट मधून भाजी घेताना आपण करतो का अशी घासाघीस? नाही ना! तिथे तर प्रत्येक गोष्ट नगद घ्यावी लागते. मग ह्यांना ५-१० रुपये मिळाले जास्त तर मिळू देत की!
आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की अनेक बिलांवर आपल्यायला तत्पर भरणा सवलत (Prompt Payment Discount) मिळते ते? १००० रुपयांच्या बिलावर साधारण १% म्हणजे १० रुपये सवलत मिळू शकत असेल तर आपण तिला महत्व देत नाही. पण प्रत्येकाचे १० रुपये मिळून त्या कंपानीला किती नफा होत असेल? प्रत्येकाने ते सवलतीचे १० रुपये व स्वत:च्या खिशातले आणि १० रुपये असे २० रुपये सत्कारणी लावले तर फायदा कोणाचा होणार? गरीब जनतेचा आर्थिक व आपला मानसिक!
आपल्याकडे एवढा विचार करायला वेळच नसतो. गृहिणी असू दे अथवा नोकरी करणारी स्त्री… बहुतांशी घरी तिचा दिवस आज बनवायच्या डब्या पासून सुरु होउन उद्या डब्यात काय ह्या विचाराने संपत असावा. त्यामुळे समाजाचा उद्धार करायला वेळ कुठून काढणार? पण खरे तर फार काही नाही करायचे. खर्च करताना थोडा विचार करायचा की ह्या पैशाचा फायदा कोणाला होणार आहे? गरिबाला होणार असेल तर सढळ हस्ते खर्च करयचा. श्रीमंत आणि थोडे गब्बर होणार असतील तर आपला हात थोडा आखडता घ्यायचा.
आहे की नाही सहज जमेल असे?
दुसरा लेख - 'सह'
‘सह’ – किती सुंदर शब्द! सतत सोबत करणारा – एकांतात अथवा गोंगाटात!
सहचर, सहचारी, सहचारिणी, सहकारी, सहवास असे अनेक शब्द ही जाणीव सर्वार्थाने करून देणारे.
असाच एक शब्द ‘सहवेदना’ अथवा ‘सहअनुभूती’ ज्याला आपण इंग्रजी मध्ये empathy असे म्हणतो.
अंह! सहानुभूती ज्याला आपण इंग्रजी मध्ये sympathy म्हणतो ती नाही.
सहवेदना अथवा सहअनुभूती म्हणजे इतरांची भावना अथवा वेदना कळणे.
आता दुष्काळ पडला आहे. त्याबद्दल सहानुभूती सगळ्यांना असेल. शंकाच नाही. पण सहअनुभूती आहे का?
जर आहे तर मग ती वागण्यातून दिसत का नाही? आपल्याकडे सर्रास पाण्याचा अपव्यय का होत असतो?
रोजच्या रोज बादलीभर पाण्याने गाड्या धुतल्या जातात. अरे इथे एक कळशी पाण्यासाठी वणवण करावी लागते तिथे तुम्ही अनेक कळशा अश्याच साफसफाईच्या नावाखाली वाया जाऊ देता? घर, अंगण साफ करताना पाणी जपून वापराल तर तुमची जाणीव, कळकळ दिसून येईल. त्यांची वेदना जोपर्यंत तुम्हाला जाणवणार नाही तोपर्यंत हा अपव्यय अटळ आणि क्लेशदायी आहे.
बागेतील/कुंडीतील झाडांना/रोपांना आवश्यकतेनुसार पाणी द्या. उगीच त्यांना न्हाऊ घालून कुडकुडायला लावू नका. दिवसातून अनेक वेळा अशा लोकांची आठवण काढा ज्यांना अतिशय कंमी पाणी मिळतंय किंवा ज्यांचे पाण्यासाठी खूप हाल होत आहेत आणि मग जर तुमचे वागणे बदलले तर तुम्हाला खऱ्या अर्थी ‘सहअनुभूती’चा साक्षात्कार झाला म्हणायचे.
‘सह’ चा खरा अर्थ समजून घ्या, त्याप्रमाणे कृती करा आणि ‘सहकार्य’ करा ही विनंती!
-उल्का कडले
प्रतिक्रिया
पहिल्या लेखाबद्दल :
सविस्तर प्रतिसादाबद्दल
तो विडीओ मी पण पाहिला तो उगाच
वाट्टेल ते भाव लावले तर
छान लिहिलंय
अगं छोटे छोटे होते म्हणुन