.

"रस्ता" - चित्रलेख

Primary tabs

समर्पक's picture
समर्पक in मिपा कलादालन
13 Apr 2016 - 9:47 pm

'रस्ता' या विषयावर चालू असलेल्या स्पर्धेच्या निमित्ताने काही चित्रे संबंधित धाग्यावर प्रकाशित केली होती त्याच्या संबंधित अधिक माहितीसाठी हा लेख काही मिपाकरांच्या प्रोत्साहनामुळे प्रकाशित करत आहे. सोबत त्या प्रवासातील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारी काही अधिक चित्रे... एक वेगळा प्रयत्न…

पाऊलवाटा:
पहिले चित्र हे अनुक्रमे मणिपूर, आसाम व त्रिपुरा येथील जंगल वाटांचे आहे. या प्रवासाचे मुख्य ध्येय तेथील अनोखा निसर्ग अनुभवण्याचे होते, आणि या तीनही वाटा मला तीन अविस्मरणीय अनुभवांकडे नेणाऱ्या ठरल्या. पट्टेरी वाघांपेक्षाही दुर्मिळ प्राणी याच वाटांवर पहावयास मिळाले…मणिपूर मध्ये अगदी मध्यभागी लोकताक नावाचे सरोवर आहे, इथे पाण्यावर तरंगणारी गवताची एक प्रजाती वाढते. हा प्रदेश 'कैबुल लामजाव' राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत येतो व 'सांगाई' (Panolia eldii eldi) या दुर्मिळ हरणाच्या प्रजातीचे हे अभय स्थान आहे. केवळ येथेच आढळणारी ही प्रजाती केवळ २०० च्या आसपास शिल्लक आहे.
आसाम मधील ब्रह्मपुत्रेच्या पात्रात एका बेटावरील दुसरी पायवाट, इथे 'सुवर्णकपि' (Golden Langur) कुटुंब वास्तव्यास आहे. भूतान व भारत मिळुन संख्या २००० च्या आसपास, भारतात केवळ आसाम व त्रिपुरा मध्ये आश्रय.


त्रिपुरा मधील तिसरी पायवाट, दोन डौलदार हत्ती दिसत आहेतच, पण हे जंगल खास आहे ते येथील एका बिडाल प्रजातीमुळे. 'अभ्रांकित बिबळ्या' (Clouded Leopard) ही भारतातील अतिदुर्मिळ प्रजाती केवळ येथेच पहावयास मिळते. हि प्रजाती 'बिग-कॅट' कुटुंबातील सर्वात लहान व झाडावर चढण्यात सर्वात तरबेज! आग्नेय आशियामध्ये काही ठिकाणी अजूनही हे अस्तित्व टिकवून आहेत, परंतु भारतीय जंगलात यांची संख्या केवळ २० ते ३० च्या दरम्यान. इतक्या दुर्मिळ प्राण्याचा असा फोटो मिळणे हे महाभाग्य निश्चये!! या सगळ्यासाठी अर्थात जंगलात ठिय्या देऊन बसणे आवश्यक, पण सर्व श्रमाचे सार्थक!


चौथी पायवाट ब्रह्मदेशातील इरावतीच्या काठी, एका शांत संध्याकाळी, विशाल वटवृक्षाखाली येऊ पाहणाऱ्या तिरकस किरणांनी उजळलेली…


दुर्मिळ वन्य प्राण्यांचा विषय निघालाच आहे त्यामुळे वाटेवरचा नसला तरी या प्रदेशाशी निगडीत एक सुंदर पक्षी, 'हरितमयूर' (Green Peafowl) आपल्याकडील मोरापेक्षा थोडा बेढब व रानटी दिसणारा हा पक्षी. मुख्यतः मान व तुरा यात वेगळेपण लगेच समजते.


हवाई चित्रण:
पहिला रस्ता नायगारा जवळील कॅनडा आंतरराष्ट्रीय सीमा. जलप्रपात पाहणे हा मुख्य हेतू, त्याचाही एक फोटो.दुसरा रस्ता कोलोरॅडो राज्यातील ॲस्पेन शहराजवळ टिपलेला आहे, शरदातील रंगबदल हा एक अनुपम नैसर्गिक सोहळा आहे. त्याचे काही हवाई चित्रण. (मागे 'मानवी स्थापत्य' या विषयावरील स्पर्धेत एक चित्र टाकले होते)


शरदरंग :

वरील विषयावरूनच पुढे हि दोन्ही चित्रे कोलोरॅडो येथील. फार वाहतूक नसणाऱ्या रस्त्यांच्या शोधात गेलो असता असे सुंदर प्रदेश पहावयास मिळाले …
लाल खडीचा रस्ता:
हा रस्ता झायॉन नॅशनल पार्क मधील आहे. पूर्ण परिसरात असेच लाल खाडीचे गुलाबी झाक असलेले रस्ते, पहिल्यांदाच पहिले. बाकी सर्व फोटो हे माझ्या एकल प्रवासातील आहेत परंतु हा एकमात्र अपवाद.


पर्वतीय व वाळवंटी रस्ते:
हे पेरूमधील रस्ते. १० ते १४ हजार फुट उंचीवरील पठारावरून जात असतानाचे हे फोटो. विरळ हवा व धुळीचा अभाव यामुळे अशा ठिकाणी फोटो नेहमीच स्वच्छ येतात. तिसरे चित्र पॅराकास किनारी वाळवंट, अटाकामा वाळवंटाचा एक भाग (पेरू मालिकेत पूर्वप्रकाशित)


रस्ते व हिरवाई:
पहिला रस्ता थायलंड येथील उत्तर सीमावर्ती महामार्ग. इथे लाओस, ब्रह्मदेश व थायलंड यांच्या सीमा एकत्र येतात. मेकाँग नदीच्या खोऱ्यातील संपन्न प्रदेश. (आग्नेय आशिया मालिकेत या भागावर लेखन)


दुसरा रस्ता दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे येथील. जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प 'ईताईपु' ब्राझील व पॅराग्वे यांच्या सीमेवर पराना नदीवर बांधण्यात आला आहे त्या परिसरातील हे चित्र. अशी अभियांत्रिकी आश्चर्य ही आधुनिक तीर्थक्षेत्रे!!


ईताईपु प्रकल्प, जिथून पाणी बाहेर पडताना दिसत आहे, त्याच्या पलीकडे ब्राझील, अलीकडे पॅराग्वे. एकूण क्षमता १४,००० मेगावॉट.शहरी रस्ते:
पहिला रस्ता ग्वाटेमाला येथील, काही वादक, विक्रेते चित्रामध्ये दिसत आहेत, शहराचा अतिशय उत्साही भाग (ग्वाटेमाला धाग्यावर पूर्वप्रकाशित)

दुसरा रस्ता मेक्सिको मधील पुएब्ला या शहरातील. मेक्सिको सिटी च्या दक्षिणेकडे वसलेले टुमदार शहर, येथेही स्पेनच्या स्थापत्य पद्धतीचा प्रभाव.


लोहमार्ग:
उटीला जाणाऱ्या वाफेवरच्या आगगाडीचे रूळ. अजून एक चित्र.


पुरातन बांधणीचे रस्ते:

पहिला भुवनगिरि किल्ल्याचा मार्ग. हा किल्ला तेलंगणात हैदराबादेपासून अगदी तासाभारावर आहे.

दुसरा कांची च्या कैलासनाथ मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग, माझे दक्षिणेतील सर्वात आवडत्या मंदिरांपैकी एक. आश्चर्य म्हणजे पर्यटक अथवा भाविक कोणाचीही अजिबात गर्दी नाही.

मंदिराचा दर्शनी भाग:

शेवटी आसाम मधील एकाकी वाट, माझे आवडते चित्र. सॉलकुची या रेशीम उत्पादन व विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या खेडेगावाजवळ, ब्रह्मपुत्रेच्या किनारी.


प्रतिक्रिया

यशोधरा's picture

13 Apr 2016 - 9:52 pm | यशोधरा

अतीव सुंदर!

राघवेंद्र's picture

13 Apr 2016 - 9:55 pm | राघवेंद्र

सुरेख फोटो व माहिती!!! असेच नवनवीन प्रदेशावर कमीतकमी फोटो लेखमाला येउद्यात.

खटपट्या's picture

14 Apr 2016 - 5:34 am | खटपट्या

सर्व फोटो अतीसुंदर...
एक शंका - तुम्ही फोटोग्राफीच्या छंदासाठी प्रवास करता की प्रवासाच्या छंदापायी फोटोग्राफीही होते? :)
कारण तुमचे धागे पाहता तुमचा प्रवास हेवा वाटण्यासारखा झालेला आहे. आणि फोटोग्राफीतर कसलेल्या फोटोग्राफरला लाजवेल अशी आहे.

पैलवान's picture

14 Apr 2016 - 2:49 pm | पैलवान

तुमचे धागे पाहता तुमचा प्रवास हेवा वाटण्यासारखा झालेला आहे.
ग्वाटेमाला-पेरू-म्यानमार-कॅनडा-मलेशिया-आसाम-ऊटी---------
_/\_

समर्पक's picture

14 Apr 2016 - 10:12 pm | समर्पक

प्रवासाच्या छंदापायी फोटोग्राफी: निसर्ग व संस्कृतीवैविध्य यांच्या अनुभवासाठी, आनंदासाठी खरा प्रवासाचा खटाटोप. थोडं फार जे कॅमेरात पकडणं शक्य आहे ते हे फोटो.

जुइ's picture

14 Apr 2016 - 6:26 am | जुइ

एकसे एक फोटो आहेत.

नीलमोहर's picture

14 Apr 2016 - 11:25 am | नीलमोहर

एकापेक्षा एक सुंदर फोटो..
या सर्व ठिकाणी आपण जाऊन आलेले आहात हे पाहून हेवा वाटला.

नंदन's picture

14 Apr 2016 - 11:49 am | नंदन

वेगळा धागा काढल्याबद्दल आभार. सारेच फोटो सुरेख आहेत.

नाखु's picture

14 Apr 2016 - 12:48 pm | नाखु

चुटपुट लावली होती इथे समर्पक दखखल घेतली त्या बद्दल धन्यवाद...

नुसते पर्यटन नाही तर कश्यासाठी पर्यटन यासाठी तुम्हाला आणि एक्काकाकांना कडक सलाम..

घरकोंबडा नाखु

जगप्रवासी's picture

14 Apr 2016 - 3:21 pm | जगप्रवासी

आधीच फोटोंनी डोळ्याचे पारणे फेडले होते, त्यात अशी माहिती टाकून अजून हेवा वाटायला लावला. लेख आवडला.

इस्पिकचा एक्का यांच्या पर्यटन लेखांचा पंखा
जगप्रवासी

वेल्लाभट's picture

14 Apr 2016 - 3:04 pm | वेल्लाभट

काय चायला!
एक से एक अशी चित्र टाकून वेडं करतात माणसं. रस्ता च्छायाचित्र स्पर्धेचं निर्विवाद जेतेपद घेऊन बसताय तुम्ही बघा आता.

असो, अप्रतिम ! शब्दातीत. खूप आवडले फोटो वर संक्षिप्त वर्णनं पण.

सूड's picture

14 Apr 2016 - 3:16 pm | सूड

निव्वळ अप्रतिम!!

एस's picture

14 Apr 2016 - 3:29 pm | एस

वाखुसाआ!

बोका-ए-आझम's picture

14 Apr 2016 - 6:10 pm | बोका-ए-आझम

काय फोटो काय फोटो!

अजया's picture

14 Apr 2016 - 10:14 pm | अजया

अप्रतिम

अभ्या..'s picture

14 Apr 2016 - 10:16 pm | अभ्या..

अहाहाहाहा
अप्रतिम. केवळ अप्रतिम

रातराणी's picture

15 Apr 2016 - 1:16 am | रातराणी

सुरेख!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2016 - 2:07 am | डॉ सुहास म्हात्रे

फोटो आणि त्यांचे थोडक्यात पण चपखल वर्णन, दोन्ही भन्नाट आवडले. अजून असेच सचित्र लेख टाकावे.

निशाचर's picture

15 Apr 2016 - 3:02 pm | निशाचर

फोटोंना वर्णनाची सुंदर जोड दिली आहे.

पैसा's picture

15 Apr 2016 - 4:00 pm | पैसा

अतिशय नेत्रसुखद चित्रे! सोबत माहिती दिल्यामुळे अधिकच आवडली.

प्रमोद देर्देकर's picture

15 Apr 2016 - 4:08 pm | प्रमोद देर्देकर

तुम्ही हे फटो अगोदरच काढुन ठेवलेत जणु काही तुम्हाला माहित होते की मिपावर परिक्षा होणार आहे.

तो इरावतीच्या काठचा शांत संध्याकाळचा विशाल वटवृक्षाचा आणि शेवटचा ब्रह्मपुत्रेचा किनारा हे फोटु अप्रतिम. शांत जागा.

"त्या तरुतळी" या गीतासाठी योग्य वातावरण असणारा...

रुपी's picture

13 Dec 2017 - 3:57 am | रुपी

अप्रतिम!

हा धागा केव्हाचा निवांत पाहायचा म्हणून ठेवला होता, मध्यंतरी विसरुन गेले, आज पुन्हा पाहिला.
तुमची प्रवासवर्णने आणि हे फोटोही सुरेख!

चित्रगुप्त's picture

18 Sep 2018 - 2:36 am | चित्रगुप्त

वा... एकाहून एक सरस.

चौथा कोनाडा's picture

20 Sep 2018 - 4:55 pm | चौथा कोनाडा

सुंदर, सुरेख, क्लासिक !

काय जबरदस्त रस्ते आहेत ! धाग्याची थीम खुपच आवडली ! अजून वेगवेगळ्या थीमवरचे फोटोज येवू द्या !

चष्मेबद्दूर's picture

20 Sep 2018 - 9:39 pm | चष्मेबद्दूर
चष्मेबद्दूर's picture

20 Sep 2018 - 9:39 pm | चष्मेबद्दूर
शब्दबम्बाळ's picture

21 Sep 2018 - 2:05 am | शब्दबम्बाळ

भारीच की!!
असेही, इतक्या ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तीचे "रस्त्याशी" घट्ट नाते असणारच! :)