Skip to main content

मदत

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 14/03/2016 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
"देवा ते प्रेस नोट झाली का हो तयार?" "करतोय साहेब" "ती कॉन्फरन्सची पावती फाडा काय असल ती. पाकीटासहीत प्रेस्नोट देऊन टाका" "हो साहेब" "ते आपलं ल्याबराडार कुठं खपलंय? फोटोसहीत कव्हरेज पाह्यजे म्हणाव. नुसती हाडकं चघळाया पाय्जेत" "सांगतो साहेब" "ते फाउंडेशनचं काय लागतय का पत्ता?" "साहेब तेनी बीड ला हायत म्हणं कार्यक्रमाला" "बघावं का सांगून दादासाहबाकडून?" "नको साहेब, कव्हरेज तेनीच खातेत, आकडा बी आधीच द्यावा लागतो म्हण" "राव्ह दे राव्ह दे. आपन हाव हितं. आपनच करायचं" "हो साहेब" "ते आमचे शेक्रेट्री कुठं खाजवत बसलेत, पाठवा जरा." "हो साहेब" ................. "कामाच्या टायमाला कुठं हिंडता राजे?" "हाय की साहेब, जरा ते पत्ते लिहून काढीत होतो" "किती निघालेत?" "बावीस हायत. आकडा मेन्शन करावा का?" "नाय नाय. बावीस म्हणजे मोठा खुट्टाय राव, परहेड कमी करावं लागतील" "मग कसं करावं? चेक तयार करुन घेतो." "ठिकाय. नावं टाकून ठिवा. फिगर नंतर सांगतो. पाकीटात शिस्तीत पॅक करा. कार्यक्रम होस्तवर फोडू दिवू नका" " होय साहेब" "स्टेजचं कसं?" "ते धाकटे सरकार बघतेत" "बर बर. पिंट्याकडून मारुन घ्या. तेचे मागचे बी द्यायचेत. सगळं एकदम देऊ म्हणाव" "हो साहेब" "बघा जरा तुमीच जाउन, आमचं धाकलं जरा सर्कीट हाय" "हो साहेब" ...................... "काय म्हणतेत रं?" काय नाय. ते स्टेजचं" "कितीला ठरलं?" "सत्तर " "आन डिजिटल?" "डिझाइन पायी थांबलय" "आर्र काय असातय बे. एक साईड मस्तपैकी फास टाकायचा, हिकडं डोस्क्याला हात लावलेला गडी टाकायचा. खतम" "हेडलाइन द्या म्हणतेत" "आर लिहि की, दुश्काळाला साथ, आमचा हात" "जरा येगळा अर्थ होतय ओ त्यातून" "अर्थ वाचत नसतेत बे कोण. लिहि कायतर हर्दिक मदत बिदत" "नुसती दुश्काळ्ग्रस्ताना मदत लिव्ह्तो" "वेटेज आलं पाह्यजे भौ. जंगी दिसला पाह्यजे बॅकड्रॉप" "हो साहेब" "रस्त्यावर दोन होर्डिंग, स्टेजसमोर एक, खांबावर पन्नास. रिक्षावर पन्नास. किती होईल?" "साठ सत्तरची लेवल हुईल की" "करा" "साहेब ते आलेल्यांची उतरायाची कशी करावी व्येवस्था?" "वरच्या दोन हॉलमधी कर सगळ्याना अ‍ॅडजस्ट" "आमदार हैत त्यादिवशी एसी ला. गोंधळ हुइल." "बेसमेंटला थांबेव मग" "हो साहेब" "ते पेपरच्या जाहीरातीचं झालं का? कीती लागतील?" "दोन द्यावे लागतील आत्ता" "करा करा. ते मस्ट हाय बघा" "ही ताटली बाटली ग्यांग" "पन्नास दिले साहेब" "ते चॅनेलचे बोलला का" "येतय टायमावर. दिलेत तेला बी" "आपले साह्य्बाचा ड्रेस आन जाकीट?" "येतय." "टायमावर फेशेल कराया पाठीव" "हो साहेब" "ती अँकर आयटम कोण रे? सांगितला का तिला?" "ती न्हाय म्हणती आता. दुसरी हाय. मेकपसहीत १५ म्हणतीय" "देऊन टाक. रौनक नाय येत तेच्याबिगर" ............................ "साहेब ते काय मदत करणारेत असं इचारत आलेत" "मदतीचा हात हाय तो. मोजत नस्ताव आम्ही सांग" "न्हाई, संघटनेतर्फे तेनी बी देऊ म्हणतेत" "काय नको. कारखान्याच्या इलेक्षनला हेनीच मारलेत आपली. आता आपली आपनच गाजवायची" "स्टेजवर हारगुच्च तरी" "कोन दिसाया न्हाय पाह्यजे. फकस्त आपन न आपले" "ते मदत द्यायची ते" "खाल्लाकडं उभं कर, सत्कार वगेरे आटपले की एकेक सोडायचे" "ती रडनारी मावशी?" "ते कॅमेर्‍याच्या टायमाला तिला आन" "साहेब ती चेकवर फिगर टाकायची राह्यलीय." "आता लिव्ह कायतर पाच साहा. टोटल मिळून एकवर जाऊ दिवू नको. ऑलरेडी लै खर्च झालंय" "हो साहेब. सह्या राह्यल्याती" "घे कुनाच्या तर. आप्ल्याच पतसंस्थेचा तर हाय चेक." "हो साहेब" ................................ स्थानिक वार्ताहरः आजच शहरात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात दुष्काळ्ग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीचे वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमास आपल्या शहरातील मान्यवर______ ______ ______ ______ ______ ______ याच कार्यक्रमाशेवटी बळीराजाप्रती असणारी आपली सामाजिक बांधिलकी अधिक वृध्दिंगत होण्यासाठी सढळ हस्ते मदतीचे आवाहन करण्यात आले. .................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13311
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

ब्लॅक ह्युमर खूप छान प्रकारे व्यक्त झालेला आहे. राजकारण कसं केलं जातं हे साध्या संवादांतून नेमकेपणाने मांडलंय. आवडलं. (नुसतंच चिडवत नाहीस तर. लिहितोस देखील छान. ती दुसरी येर्टेल वाली बंद आहे काय?)

In reply to by नीलमोहर

२ लै भारी लिहिलायस बे अभ्या...! सगळी गाबडी समोर दिसायली.

हर्दिक मदत, ऑलरेडी लै खर्च झालाय वगैरे वाक्ये खतरनाक आहेत. कशाबद्दल आहे याचा संदर्भ थोडा पुढे लागतो, त्यामुळे पहिला भाग पुन्हा जाउन वाचला.

संधीसाधू राजकारणावर भाष्य करणारं लेखन आवडलं. मदत मिळणारे बदलत राहीले तरी संधीसाधू राजकारणी तसेच राहतात व उत्तरोत्तर प्रगती करत राहतात :-( .

साले!... जाऊ द्या. एक नंबर लिहिलंय.

साल्या लय कडू लिवतोस जबराट

"आर लिहि की, दुश्काळाला साथ, आमचा हात" "जरा येगळा अर्थ होतय ओ त्यातून"
----/\----

बेणं "आत पुत्तुर" पोचलेल आहे हे माहित होतच, आज पुन्हा कळालं. एक्दम टांगा पलटी लिखाण..

वस्तुस्थिती दाखवणारे लिखाण अभ्याभौ! महानिर्वाण नाटकाची आठवण आली!

धार दार टोकदार आणि चमकदार गोष्ट आवडली. टाळूवरचे लोणी खाणार्या जमातीचे यथायोग्य चित्रण केले आहे. पैजारबुवा,

.

किमान शब्दात कमाल परिणाम संवादशैली आवडली रमेश भिडे - ब्लॅक ह्युमर खूप छान प्रकारे व्यक्त झालेला आहे. एस - साले!... - दोघांशी प्रचंड सहमत

याला जीवन ऐसे नाव.

कडक ए कडक … दैनिक महासंग्राम झाल्ली वाचून

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही कथा पोचली पाहिजे आणि.... "दुश्काळाला साथ, आमचा हात" हे लोकांना "कळलं" पाहिजे! Sandy

राजकारण आणि 'माज'कारण.. जसं आहे तसं उतरलंय...

मुख्यमंत्रीनिधी साठी दिलेले अनेक चेक बाउंस झाले. माध्यमांत नेहमी लांडगा आला रे आला होत असल्याने बातमी आली तेव्हा हे चेक मुख्यमंत्रीनिधीतून दिले आणि बाउंस झाले असा समज झाला. खरेतर अनेक मोठ्या नेत्यांनी असे मोठ्या रकमेचे चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी तोंडदेखल्या कार्यक्रमात उदार हस्ते देतोय असा आव आणला, नंतर चेक बाउंस झाले ते कुठे बाहेर येणार? साहेबांनी शेतकर्‍यांसाठी मदत दिली याची डिजिटल दवंडी पिटायला कार्यकर्ते मोकळे. अभ्या.. यांना विचारतो, ह्या डिजीटल दवंडीचे तरी पैसे मिळतात ना नीट?

लेख आवडला. पंचेस अगदी मार्मिक आहेत.

एक नंबर लिवलय भौ! आता एखादं डिजिटल बॅनर बी टाका "दुश्काळाला साथ, आमचा हात"

मस्त टोकदार लिहिले आहेस

हातात कला अन पेनात तागद हय तुझ्या !!!

In reply to by वपाडाव

क्या बात...क्या बात...! अभ्याच्या लेखणीनं वप्याला खेचून आणलं जणू मिपावर.

In reply to by प्रचेतस

"हस्तीदंती" हूच्चभ्रू न होता दर्दी आणि कौतुक करायला अजिबात न लाजणारा आहे हे पुन्हा सिद्ध झाले. धन्यावाद वप्या !!!

चांगलं लिहिलंय. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

अप्रतिम

वास्तववादी जबरा चपराकी लेखन एकदम !!!!

बेक्कार लिहलयस रे :( बेक्कार म्हणजे लयच खुपनार या अर्थी. क्रुगैसन. _/\_

+१

मस्त उतरलंय लेखणीतून. लिहिते राहा ..

आणी पन्नासावा सत्कार माझा मीच करुन घेतो. एक कोरा विनासहीचा चेक घेऊन. ;) सर्व वाचकांचे मनापासून आभार. हे काही अगदी श्रेष्ठ दर्जाचे लिखाण नाही. मला वाटले, दिसले, खुपले, जाणवले ते शब्दात मांडायचा प्रयत्न केला. प्रतिसादभिशीच्या धुळवडीत देखील कथेला ५० प्रतिसाद मिळाले. मला तेवढे बस्स आहेत. पुनः धन्यवाद.