Skip to main content

शाळेतले दिवस..

लेखक फिलोकॅलिस्ट यांनी शनिवार, 14/11/2015 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सवयीप्रमाणी पयलं व्हाट्सअप चेक केलं. विशेष काही नव्हतं. काही चांगले मेसेजेस आलते, पुढं ढकलले अर्थात इकडचे तिकडं आन तिकडचे इकडं. बाकी काही मेसेज ढकलतानी जरा एडीट करायला लागत्यात नाही तर पंचाईत होऊन बसती. मग आसंच शाळा आठवली... पाचवीला इंग्रजीचं मास्तर जरा मारकुटं होतं. त्यांनी गृहपाठ म्हणून निबंध लिहून आणायला सांगितला 'माय मदर', तशी इंग्रजीपेक्शा मास्तरचीच लय भीती वाटायची. घरी गेल्याव पयलं निबंध लिहायला बसलो. कुठनं सुरवात करायची काय कळंना. मग संध्याकाळी बहिणीला इचारून निबंध खरडून काढला. थोड्या वेळानी एक वर्गमित्र आला, त्याला बी निबंध लिहायचा होता. 'उद्या सकाळी शाळेत देतो' आसं म्हणून वही घिउन गेला. निबंध लिहून झाल्यामुळं मी निवांत होतो... सकाळी पहिला तास इंग्रजीचाच.. मी माझी वही घितली आन् मित्राला म्हणलं, 'काय काय छापलंयस बघू', त्यानी सगळं जसंच्या तसं उतरून काढलेलं. 'च्यायला छापतानी जरा डोकं लावयचं ना भावा..' तो म्हणला, 'आता काय करू', म्हणलं 'मदरचं नाव बदल, बाकी राहू दे!!' आता शिस्तीत नावाव एक काट मारायची तर भाऊनी # सारखी चिन्हं काढली आन् त्याच्या मदरचं नाव लिहलं. त्याची वही तपासतानी मास्तरच्या ध्यानात आलंच. मग काय पुढं बोलवून घेतला. मास्तर, 'आईचं नाव काय रे?' मित्र आधीच घाबरलेला, त्याला वाटलं आता एखादी तरी मुस्काटात बसणार. त्यानी भितभितचं नाव सांगितलं. मास्तर, 'मग खोडलेलं नाव कुणाचंय.' तसा तो माझ्याकडं बघायला लागला. मग काय मला बी वही घिउन पुढं यायला सांगितलं. मास्तर दोन्ही निबंध बघत होतं. एका मिन्टात मित्राच्या वहीचं पान फाडलं आन् त्याच्या थोबाडीत ठिउन दिली. मला म्हणलं, 'इकडं जरा उजव्या हाताला उभा रहा.' आता मी बी जरा टराकलो. त्यामुळं आधीच गालाव हात ठिउन उभा होतो. मास्तर, 'निबंध चांगला लिहलाय.' मी जरा निवांत झालो, हात खाली घेतला तशी मास्तरनी कानाखाली वाजवली. मास्तर म्हणलं, 'परत कुणाला वही देऊ नको, जा जागेवर.' त्यानंतर कुणी निबंधाची वही मागितली की डायरेक्ट नाही म्हणायचो. आज बालदिन त्यामुळे शाळेतले दिवस आठवले आणि मिपावर पहिला लेख पण लिहून झाला. तुमच्याहि काही आठवणी शेअर करा..

वाचने 891
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पार्थनाच्या वक्ताला हात फुढं करुण हुभा रायला दोस्ताचा खांदा लय कामं याचा भौ!

मी जरा निवांत झालो, हात खाली घेतला तशी मास्तरनी कानाखाली वाजवली. >>> हा खरा तुम्हाला त्या दिवशी मिळालेला धडा :)