फोडशी/कुलुची भाजी

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in पाककृती
14 Jul 2015 - 7:15 pm

फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात.
हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

फोडशी/कुलुची भाजी
# पध्दत १ (सुकट घालून)
साहित्य:

  • फोडशी/कुलु - १ जुडी
  • सुकट /सुका जवळा- १/२ कप
  • चिरलेला कांदा- १ कप
  • ठेचलेल्या लसूण पाकळ्या - ६ ते ८
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- २ टीस्पून
  • कोकम/आमसूल- ३
  • मीठ चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून

कृती:

  • सुकट निवडून पाण्यात किमान १५ मिनिटे भिजत घाला. नंतर पाण्यातून काढून घट्ट पिळुन घ्या.
  • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.
  • भरपूर पाण्यात काळजीपुर्वक स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ आणि पानांच्या चुणेत माती असते.
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल.
  • एका कढईत तेल गरम करून त्यात लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता.
  • त्यात भिजवून पिळुन घेतलेली सुकट टाका व जराशी परतून घ्या.
  • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या.
  • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल.
  • गरमागरम भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

........................................................................................

# पध्दत २ (डाळ घालून)
साहित्य:

  • फोडशी/कुलु - १ जुडी
  • चणा डाळ - २ टेबलस्पून
  • चिरलेला कांदा- १ कप
  • ठेचलेला लसूण पाकळ्या - ६
  • राई/ मोहरी- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+ गरम मसाला- १ टीस्पून)
  • मीठ चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून
  • खवलेले ओलं खोबरं- २ टेबलस्पून (ऐच्छिक)

कृती:

  • चणा डाळ धुवून २ तास भिजत ठेवा.
  • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.
  • भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ माती असते.
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल.
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता.
  • त्यात भिजलेली डाळ व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या.
  • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या.
  • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल.
  • वरून ओलं खोबरं पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
  • टिपा:
  • हि भाजी पातीच्या कांद्याप्रमाणे दिसते. पतीचा कांदा फार लवकर शिजतो पण ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागतो.
  • तुम्ही वरील पद्धतीने सुकट घालुन पातीच्या कांद्याची भाजी करू शकता.
  • हि भाजी किंचित कडू असते पण अगदी मेथी इतकी कडू नसते.
  • या भाजीच्या पानांची भाजी पण करता येते. पालक किंवा मेथीची गोळा भजी करतो तशी.

अधिक माहितीसाठी: http://marathifoodfunda.blogspot.in/

fodashi

प्रतिक्रिया

नुसतीच भाजी दिसतेय फोटोत. दोनपैकी एकातरी पद्धतीच्या शिजवलेल्या डिशचा फोटो टाकायला हवा होता.

सानिकास्वप्निल's picture

14 Jul 2015 - 8:52 pm | सानिकास्वप्निल

छान आहे पाककृती पण तयार भाजीचा / पदार्थाचा फोटो ही द्या.

पैसा's picture

14 Jul 2015 - 9:45 pm | पैसा

छान डिटेल पाकृ. गोव्यात या भाजीला "आंकूर" म्हणतात.

सूड's picture

14 Jul 2015 - 10:25 pm | सूड

जियो!!

कविता१९७८'s picture

14 Jul 2015 - 10:43 pm | कविता१९७८

मस्त पा.क्रु. , जागु स्टाईल मुगाची डाळ घालुनरुन पाहीली होती आता अशीही करुन पाहीन

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2015 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्लर्प ssssss !

पावसाळ्यातल्या जंगली भाज्याच्या पाकृ पाहून लहानपणीच्या दिवसांच्या चविष्ट आठवणी जाग्या होते आहेत :)

बेसन पेरून उलपातीसारखी (कांद्याच्या पातीसारखी) तव्यावर खरपूस केलेली ही भाजी भारी आवडते !

तयार भाजीचा एक तरी फोटो टाका.

सहीच. खरंच तयार भाजीचा फोटो टाका जमलं तर.

सध्या आमच्या इथे सर्वत्र फोडशीचं साम्राज्य आहे बाजारात!
डाळ घालुन करुन पाहीन.

सोंड्या's picture

15 Jul 2015 - 11:02 am | सोंड्या

कोलू बद्दल आमचेही चार शब्द-
कोलूच्या भाजीचा जो कंद असतो तो म्हणजेच सफेद मुसळी
स्थानीक जनता आणी पोलीस अज्ञानात होते तोवर काही धेंडांनी याची तस्करी करून बक्कळ माया कमवली
या तस्करीपायी रानात भाजी दिसनं मुश्किल झाल होत
पण आता बर्यापैकी चाप बसलाय
( पोलीस जागे झाले हप्त्याबाबत ;) )

नूतन सावंत's picture

22 Jul 2015 - 5:16 pm | नूतन सावंत

सुकट घालून कधी केली नाही.पण आता नक्की करेन.हा पर्याय दिल्याबद्दल आभार.डाळ घालून नेहमीच करते.फक्त भाजी चिरली की उकडून पिळून घेते.त्यमुळे तिचा कडवटपणा कमी होतो.ही माझ्या आईची पद्धत.

..

मितान's picture

22 Jul 2015 - 5:42 pm | मितान

नवीनच भाजी !
आमच्या मंडैतल्या काकुंना विचारते आहे का..

दीपा माने's picture

23 Jul 2015 - 2:12 am | दीपा माने

अशीच दिसणारी पालेभाजी चायनीज दुकानात पाहीली. नाव चायनीजमध्ये होते तरीही घेतली पण मुगडाळ घालून केली. आम्हा दोघांनाही आवडली चवीला.
भारतात असताना खाल्लेल्या ह्या भाजीला आता ४३ वर्ष झाल्याने मुळ चव आठवत नाही.