जकार्ताच्या आठवणी : १ : तयारी

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
8 May 2015 - 3:42 pm

माझी सध्याची कंपनी अ‍ॅमडॉक्सच्या कृपेने मला माझ्या पहिल्या विदेश दौऱ्याची संधी मिळाली. प्रोजेक्टच्या काही कामासाठी मला इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे जवळपास एक महिना जाण्यासाठी विचारलं होतं. अर्थात, मी क्षणभरही उशीर न करता होकार दिला.

माझ्या अशा संधींच्या गतेतिहासाप्रमाणेच हि संधीसुद्धा एका क्षणी गेल्यातच जमा होती. पण परत पारडं पालटलं आणि जाण्याचं नक्की झालं. याआधी माझ्या आधीच्या कंपनीमध्ये मी चीनला एक वर्षासाठी जाणार होतो. माझं वर्क परमिटसुद्धा बनलं होतं. पण ऐनवेळी आमच्या कस्टमरने तो प्लान रद्द केला आणि माझी संधी हुकली. याशिवाय सुद्धा आधीच्या आणि आताच्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या वेळी अशा ऑन साईट ट्रीपसाठी विचारणा झाली होती, पण कधी विसाच्या अटी तर कधी कंपनीच्या नियमांमुळे आणि अशा कैक कारणांमुळे ते जमलं नाही.

चीनची गोष्ट तर इतकी पक्की झाली होती, आणि एक वर्षासाठी जाणार असल्यामुळे हि बातमी माझ्या दूरदूरच्या नातेवाईक आणि मित्रांमध्येपण पसरली होति. त्यामुळे हे जेव्हा रद्द झालं तेव्हा थोडी लाजिरवाणी स्थिती झाली होती. त्यामुळेच यावेळी जेव्हा मी विदेशी जाण्याची शक्यता होती, तेव्हा मी "शक्यतो" हा शब्द अगदी माझ्या निघण्याच्या दिवसापर्यंत वापरला. आणि त्या दिवशीसुद्धा कधीही माझ्या बॉसचा फोन येईल आणि तिकीट रद्द करून मला नेहमीप्रमाणे ऑफिसला यायला सांगेल अशी मी माझ्या मनाची तयारी ठेवली होति.

माझा एक सहकारी आधीच जकार्ताला गेलेला होता, आणि मी त्याचीच जागा घ्यायला जाणार होतो. त्याने मला सगळी तयारी करायला बरीच मदत केली. तिकडचं अन्न आपल्याला मानवत नाही, तू घरूनच पूर्ण तयारीनिशी ये या त्याच्या सुचनेमुळे मी खाण्यापिण्याच्या बऱ्याच गोष्टींची खरेदी केली. एक महिना पुरेल एवढं सामान न्यायचं होतं. पण विमानामध्ये प्रती माणशी ३० कि. सामान निःशुल्क नेता येतं. त्यावर जर सामान झालं तर प्रत्येक विमान कंपनी वेगवेगळ्या पद्धतीने शुल्क आकारणी करते. त्यामुळे सर्व सामान त्या मर्यादेत बसवणे हे एक आव्हान होते. मी फक्त खरेदी केलेल्या खाण्याच्या गोष्टी भरल्या, आणि आमच्या साध्या वजनकाट्यावर वजन केलं. पण गंमत झाली ती अशी कि, ती बॅंग आडवी ठेवली तर २५ किलो आणि उभी ठेवली तर २२ किलो भरत होती. साहजिकच त्या वजनकाट्याचा सामानाचं वजन करण्यासाठी काही उपयोग नव्हता.

मी अजून माझे कपडे, कॅमेरा, आणि बाकी काहीच भरलं नव्हतं तरी एवढं वजन झालं होतं. आणि त्यात भर म्हणजे माझ्या आईसाहेब आणि सासूबाई यांनी औरंगाबादहून आणखी काही खास टिकाऊ खाद्यपदार्थ बनवून माझ्या वहिनीसोबत पाठवले. वहिनीने ते माझ्या बायकोला तिच्या ऑफिसमध्ये नेउन दिले आणि तिचा तिथूनच फोन आला कि हे सामान सहज ७-८ किलो असेल. मी तिला सांगून टाकलं कि मी काही कपडे वगैरे नेतच नाही, फक्त खाद्यपदार्थच घेऊन जातो. :D
सामानासाठी काहीतरी करावं लागणारच होतं. आम्ही पुन्हा सगळी बॅंग रिकामी केली. आधी घेतलेलं थोडं सामान कमी केलं. सगळ्याच गोष्टीचं प्रमाण थोडं कमी केलं. आधी माझे कपडे आणि बाकी सामान एका दुसऱ्या बॅंगमध्ये भरले होते. पण आम्हाला जेव्हा कळलं कि त्या बॅंगचंच वजन ३ किलो आहे तेव्हा ती बॅंग रिकामी करून सगळं सामान एकाच मोठ्या बॅंगमध्ये कसंबसं कोंबलं.

आता खाण्याची आणि कपड्याची अशी ती एकच मोठ्ठी बॅंग होती. त्याशिवाय माझी लॅपटॉप बॅंग होती आणि आणखी काही बारीकसारीक सामान होतं. हे सगळं अजून एका छोट्या ऑफिस बॅंग मध्ये टाकलं. आणि शेवटी आमचं पॅकिंग संपलं. मग आम्ही जाऊन एक स्प्रिंग बॅंलंसिंग वाली स्केल आणली. तिची कमाल क्षमता होती ५० किलो. पुढेसुद्धा अशी बाहेर जाण्याची संधी मिळेलच तर उपयोगी पडेल अशा विचाराने आम्ही ती विकतच आणली. :)

जरी त्या स्केलची क्षमता ५० किलो होती तरी त्या स्केलला एवढी अवजड बॅंग लटकावून, स्केलच्या छोट्याश्या मेटालिक ग्रीपला पकडून उचलून धरणे खूप अवघड आहे. मी ते उचलून जितका वेळ जमेल तेवढं धरलं. ती बॅंग जवळपास २८ किलो भरली. आणि दुसरी छोटी ऑफिस बॅंग २-३ किलो. म्हणजे अगदीच काठोकाठ ३० किलो झालं होतं.

मी आता पुन्हा पॅक करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. म्हणून मी आवश्यक असल्यास सामान शुल्क भरण्याची मनाची तयारी केली. माझी टँक्सी वेळेवर आली आणि मी मुंबईला रवाना झालो. साधारणपणे, पुणे मुंबई प्रवासाला 3-3.5 तास लागतात. पण कधी मोठ्या कंटेनरचा एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला, आणि काही तास रस्ता पूर्ण ब्लॉक होऊन जाईल ते तुम्हाला सांगता येत नाही. किंवा तुम्ही पटकन पनवेलला पोहोचूनसुद्धा नंतर विमानतळापर्यंत जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे मी खूपच लवकर पुण्याहून निघालो आणि वेळेच्या खूप आधी विमानतळावर पोहोचलो.

माझी एक मैत्रीण विमानतळावर मला भेटण्यासाठी आली नसती तर मी विमानाचं बोर्डिंग होईपर्यंत खूप कंटाळलो असतो. आम्ही भरपूर वेळ गप्पा मारल्या आणि नंतर ती गेली. अशातच सुरु झालेलं मुंबई विमानतळ टर्मिनल 2 खूपच मस्त आहे. सर्व काही अगदी भव्यदिव्य, चकचकीत आणि नवल वाटावं इतकं सुंदर आहे. क्षणभर तुम्ही मुंबईमध्ये उभे आहात हेच विसरून जाल. :D

चेक इनच्या रांगेत अर्धा एक तास प्रतीक्षा केल्यानंतर शेवटी मी माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानात बसलो, आणि जकार्ताकडे निघालो. :)

प्रतिक्रिया

खंडेराव's picture

8 May 2015 - 3:58 pm | खंडेराव

जकार्ता.. वाट पहातोय, येउद्या पुढचे भाग!

गणेशा's picture

8 May 2015 - 4:54 pm | गणेशा

सुरुवात झकास...........

प्रमोद देर्देकर's picture

8 May 2015 - 5:08 pm | प्रमोद देर्देकर

क्रमश: टाकायचं राहिलंय काय?

आकाश खोत's picture

11 May 2015 - 6:48 pm | आकाश खोत

शीर्षकात क्रमांक टाकलेत देर्देकर साहेब :) म्हणुन क्रमशः वेगळे टाकले नाही

रेवती's picture

8 May 2015 - 6:22 pm | रेवती

वाचतीये.

एस's picture

8 May 2015 - 7:11 pm | एस

वाचतोय.

अत्रन्गि पाउस's picture

8 May 2015 - 6:23 pm | अत्रन्गि पाउस

माझी एक मैत्रीण विमानतळावर मला भेटण्यासाठी आली नसती तर मी विमानाचं बोर्डिंग होईपर्यंत खूप कंटाळलो असतो. आम्ही भरपूर वेळ गप्पा मारल्या आणि नंतर ती गेली.

आदूबाळ's picture

8 May 2015 - 7:49 pm | आदूबाळ

झक्कास!

इंडोनेशियन अन्न आपल्यासारखंच असतं की हो! मला बामी गोरेंग आणि नासी गोरेंग वगैरे भरपूर आवडतं.

आकाश खोत's picture

11 May 2015 - 6:49 pm | आकाश खोत

मला पण आवडले

श्रीरंग_जोशी's picture

9 May 2015 - 12:40 am | श्रीरंग_जोशी

इंडोनेशियाला कामानिमित्त जाणारे अन त्याविषयी मराठी आंतरजालावर लिहिणारे माझ्या पाहण्यातले तुम्ही पहिलेच. तसे मिपाकर सुधीर काळे जकार्तामध्येच राहतात.

यावरून नुकतीच संपलेली मनोगतवरची ही लेखमालिका आठवली - आणि मी यू.के. ला जाऊन आले.

पुभाप्र.

पिवळा डांबिस's picture

9 May 2015 - 11:32 am | पिवळा डांबिस

ती बॅंग आडवी ठेवली तर २५ किलो आणि उभी ठेवली तर २२ किलो भरत होती.

म्हणूनच स्त्रीलिंगी वस्तूंना उभी ठेउन त्यांचं वजन करतात!!!
(बिंदास! आमी काय अनाहिता लॉबीला घाबरत नाय काय!!!!)
:)
बाकी तुमी जाकार्ताचं वर्णन करणार आहांत तेंव्हा जरूर करा पण जरा जपून.
यानिमित्ताने पूर्वी एकदा जाकार्ताला टेंपोत धाडून दिलेल्या एका नगाचा किस्सा आठवला!!!!
मिपावर दीर्घकाळ रहाण्याचा हा दोष, नसते नसते जुने किस्से आठवतात!
:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा ! येऊद्या इंडोनेशियाच्या अनुभवांचे वर्णन भराभर !

चित्रे टाकायला अजिबात विसरू नका !

बालीतले जेवण तर मला खास आवडले होते... आता जावा बेटावर वेगळी परिस्थिती असल्यास माहीत नाही.

जुइ's picture

10 May 2015 - 11:28 pm | जुइ

पुढील भाग लवकर येऊद्या!

आकाश खोत's picture

11 May 2015 - 6:39 pm | आकाश खोत
पैसा's picture

11 May 2015 - 7:31 pm | पैसा

छान सुरुवात!

ही लेखमालिका आत्ता सापडली! झकास सुरु झाली आहे.बँकाॅकच्या हाॅटेलला इंडोनेशियन बुफे लावला होता तेव्हा नुसत्या वासानेच पळता भुई थोडी झाली होती!!