जुळ्यांचं दुखणं

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in विशेष
8 Mar 2015 - 2:05 am
महिला दिन

विषय थोडासा वेगळा आहे, खरंय, पण यच्चयावत जुळ्या भावा बहिणींच्या मनातला आहे. विशेषतः IDENTICAL TWINS! माझ्या नवऱ्याला आणि दिराला (पूर्वी रोज आणि हल्ली कधीकधी) या प्रश्नोत्तरांच्या फैरीला सामोरं जावं लागतं. तुम्ही सुद्धा आठवून बघा , जेव्हा जेव्हा जुळ्या व्यक्ती एकत्र समोर येतात तेव्हा संभाषण या रुळांवरून चालते.

"अरे वा! किंवा अरेच्च्या किंवा अय्या (हे समोरच्या व्यक्तीच्या स्त्री किवा पुरुष असण्यावर अवलंबून आहे .) तुम्ही जुळे आहात? मला माहितीच नव्हते!" या प्रश्नावर मोठ्ठे झालेले डोळे, तेव्हढाच मोठ्ठा वासलेला तोंडाचा "आ" आणि चेहर्‍यावर कोणी अजब प्राणी बघायला मिळाल्याचा कुतूहलमिश्रित भाव हेही आलेच! आता 'आम्ही जुळे आहोत' ही काय पाटीवर लिहून, गळ्यात घालून मिरवण्याची गोष्ट आहे ? की साऱ्यांना महिती असायलाच हवी अशी घटना आहे? बरं , यानंतर पुढचे वाक्य तयार असतंच की, "मग कित्ती मज्जा?" !!!!

मला सांगा ,जुळे असण्यात कसली आलीय मज्जा? लोकांची असेल पण जुळ्यांना चांगलीच सजा होते. जिथं जावं तिथं लोकांची कुजबुज, पुन्हा पुन्हा लोकांच्या वळणाऱ्या माना आणि नजरा, सूचक हास्य (?) .सेलिब्रेटीजना कशाला तोंड द्यावे लागत असेल याची थोडीफार कल्पना येते.

"तू त्याच्या कॉलेजला (आता ऑफिसला) जायचं आणि त्यानं तुझ्या !!!!?????? " कशासाठी? तुम्हाला धमाल येईल म्हणून? अशावेळी उसने हसू तोंडावर आणून "ही ही ही" करावे लागते. कधी एकदा नॉर्मल संवाद चालू होतो याची वाट पाहण्याखेरीज आपल्या हाती काही नसतं. .पण एवढे नशीबवान जुळे नसतात.
"तुमची लग्ने झालीत ? मग तुमच्या बायका कशा ओळखतात तुम्हाला? आणि लग्न झालेलं नसेल तर "आई कशी ओळखते?"

आता काय बोलणार? पण इथे लोकांची तुमच्याकडून खरोखरीच उत्तराची अपेक्षा असते.मग "मला या डाव्या कपाळावर तीळ आहे, हा बघा पण त्याला नाही " असे काहीतरे थातूर मातुर उत्तर द्यावे लागते. आता ज्यांच्या गालावर, नाकावर किंवा अशा दर्शनीय वा बोलनीय भागावर तीळ आहे ते सुटतात पण इतरांची कथा काय सांगावी? एकदा तर एका महाभागानं असाही प्रश्न विचारला की "तो तीळ वगैरे ठीक आहे हो पण समजा वीज गेली तर कसं ओळखतात?" यावर माझ्या नवर्‍याने अत्यंत गंभीरपणे उत्तर दिले की, "त्याचं काय आहे आम्ही जुळे आहोत, मुके किंवा बहिरे नाही! आम्हाला तसेच आमच्या बायकांना बोलता येते त्यामुळे आम्ही आवाजावरून ओळखतो.." पण म्हणतात ना ,"common sense is not so common" !

"तुम्ही बायका सुद्धा जुळ्या करायला हव्या होत्या. म्हणजे सोलिड गम्मत झाली असती."
खरं तर हा सारा विनोदी प्रकार इथेच थांबायला हरकत नाही, पण छे ! समोरची व्यक्ती ही 'गम्मत' शेअर करायला आपल्या मुलांना बोलावते." सोनू, गम्मत दाखवते ये तुला ! हे बघ दोन जुळे काका" आणि मग तो सोनू वा मोनू या जुळ्या काकांकडे टकमक टकमक बघू लागते. आता ते लहान मुल असेल तर ठीक आहे पण यांची श्री अथवा सौ. असेल तर मग झालेच! "अय्या तुम्ही जुळे आहात? " पासून सुरुवात !!
आणि विचारल्या जाणार्‍या प्रश्नाचा हा नमुना बघा.

"तुमची मुले सुद्धा जुळीच आहेत का? नाही? अरेरे!"
"तुम्ही सेम सेम कपडे का नाही घालत?"
"एकाला ताप आला कि दुसरयाला पण येतो ?"
"एकाला लागले कि दुसरयाला दुखते?"
"आणि एकाने औषध घेतले की दुसऱ्याला बरे वाटते?"
"तुम्हाला दोघांना एकदमच भूक लागते का हो?"

आता बोला! अशा वेळी हसावे कि रडावे कळत नाही. मनातले सर्व हिंस्त्र विचार मनातच ठेऊन सुहास्यवदन ठेवायला बालपणापासूनची सवयच लागते.

जुळे असण्याने होणारे गैरसमज तर वेगळेच. पासपोर्ट किंवा तत्सम सरकारी खात्यात घोळ होतोच होतो .माझ्या दिराचा पासपोर्ट आधी बनवला आणि काही वर्षांनंतर माझ्या नवर्‍याचा. त्यावेळी संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून सुद्धा पासपोर्ट मिळाला नाही आणि कार्यालयातून पत्र आले कि त्या जन्मतारखेच्या दिवशी, त्याच जन्म ठिकाणी आणि त्याच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीचा पासपोर्ट आधीच दिलेला आहे त्यामुळे पुन्हा दुसरा पासपोर्ट मिळणार नाही. मग पुन्हा सर्व स्पष्टीकरण दिले.शेवटी "आम्ही दोघे एकाच नाही तर दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत" असे एक affidavit दिल्यानंतर एकदाचा पासपोर्ट मिळाला.

आमच्या एका शेजाऱ्यांनी अगदी अचानक आमच्याशी बोलणे बंद केले.आम्हाला कारण काही समजेना . मागाहून कळले की, इंद्रायणीत त्यांच्या समोरच माझा नवरा बसलेला पण ओळख सुद्धा दाखवली नाही म्हणे ! मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला की तो नक्कीच दुसरा भाऊ असणार. शेवटी "तो मी नव्हेच" असे सांगून रुसवा दूर केला. पण प्रश्न आलाच " अहो आधी का नाही सांगितलेत की तुम्हाला जुळा भाऊ आहे म्हणून?" या प्रसंगानंतर रस्त्यावरील कुणीही अनोळखी किंवा ओळखीचे माणूस किंचितसे देखील हसताना दिसले तर हे दोघे अगदी तोंड पसरून हसून देतात. उगाच कुणाचे मन दुखायला नको. त्याशिवाय आता असे होणारे गैरसमज टाळण्यासाठी आम्ही एक स्पेशल पुणेरी पाटी करायला दिली आहे " इथे जुळ्यापैकी एक भाऊ राहतो. आमच्या जुळे असण्यामुळे जर तुमचा काही गैरसमज झाला असेल तर माफी असावी. पण यात आमची काहीही चूक नाही हेही ध्यानी ठेवावे. "

दोन जुळ्या बहिणी माझ्या पेशंट आहेत. त्या तर या प्रकाराने इतक्या वैतागल्या आहेत की त्या कधीही एकत्र घराबाहेर पडत नाहीत. इतकेच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश घेतला होता ! आता लग्नाचे वय आलेय, त्यामुळे होऊ घातलेले बघण्याचे समारंभ हे त्यांना आलेले मोठ्ठे टेन्शन आहे.

बिच्चारे जुळे ! जुळ्यापैकी एक म्हणून जन्माला येणे काही कुणाच्या हातात असते का?. नशीब बिचाऱ्यांचे" असे म्हणू आपण ! पण असे संवाद टाळणे तर आपल्या हातात आहे. सर्व जुळ्यांच्या (आणि त्यांच्या नवरे / बायकांच्या)वतीने माझी तुम्हाला ही हात जुळवून विनंती !

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 3:13 pm | एक एकटा एकटाच

विषय मस्त आहे

मांडला ही मस्त

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 4:07 pm | सविता००१

माझे चुलत भाउ जुळे आहेत. पण ते एकमेकांसारखे दिसतही नाहीत. तर ते असे कसे एकसारखे नाहीत म्हणून पण बिचार्‍यांना छळवाद सहन करावा लागतो. :(
लेख मात्र मस्तच जमून आलाय

पलाश's picture

8 Mar 2015 - 4:10 pm | पलाश

छान लेख!!! आवडला.

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 4:16 pm | आयुर्हित

व लिहिणारीही दोन दोन नावे वापरत आहे ही पण एक गंमतच म्हणायची!
बाकी काही म्हणा, पण दु:ख शेअर केल्यानंतर कमी होतात असे म्हणतात.
ह्या लेखाच्या निमित्ताने, जुळ्यांचा समदुखी दृष्टीकोण पहिल्यांदाच वाचनात आला.

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 7:38 pm | मधुरा देशपांडे

खुसखुशीत शैलीतील लेख आवडला.
हे होते खरे. दोन जुळ्या बहिणी शेजारी राहायच्या तेव्हाच्या गमतीजमती आठवल्या. नुकतेल एका मैत्रिणीच्या जुळ्या मुलांना बघायला गेलो तेव्हाही असेच झाले. ते दोघे आयडेंटिकल ट्विन्स नाहीत तरीही दोघे सारखेच दिसतात असे मला पुर्वग्रहाने उगाच वाटत होते. :)

हेहे मस्तच. खुसखुशीत झालाय लेख. बिनकामाच्या पिंका लोकं पण किती येता जाता टाकत असतात.

खमंग लेख!झक्कास!! जुळ्याची बायको म्हणून जुळं नाव का असा प्रश्न विचारलेला नाहिये हं मी!!

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 4:06 am | स्पंदना

अय्या!! तुम्ही जुळ्यांच्या घरात्ल्या?
:))

बाकी काही म्हणा लेखिका बाई पण आता जुळे भेटल्यावर त्यांना जुळे असल्याचा वाईट फील देणारं अस काहीही बोलणार नाही!! अगदी दोन्ही कानांना खडा!!

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2015 - 8:04 am | प्राची अश्विनी

:):)

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 9:45 am | श्रीरंग_जोशी

खुमासदार शैलीत गंभीर भाष्य केलं आहे.

भारताच्या तुलनेत अमेरिकेत जुळ्यांचे प्रमाण खूप जास्त दिसते. बहुधा या कारणामुळे इथे भोवतालच्या लोकांची वागणुक भारतातल्यासारखी वाटत नाही.

बाकी या लेखामुळे आज अनेक वर्षांनी दहावीतील इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात असलेली Henry Sambrooke Leigh यांची द ट्विन्स ही कविता आठवली.

या लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

मितान's picture

9 Mar 2015 - 10:30 am | मितान

मस्त खुसखुशीत लेख !
नात्यात नुकतंच जुळं झालंय. एक मुलगा न एक मुलगी. आता त्यांची मज्जाय बाबा ;)

मस्त झालाय लेख खुसखुशीत अगदी !!

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2015 - 5:31 pm | पिलीयन रायडर

मस्त जमलाय लेख!!

निवेदिता-ताई's picture

9 Mar 2015 - 9:07 pm | निवेदिता-ताई

मस्त जमलाय लेख ग

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:21 pm | सस्नेह

छान खुसखुशीत लेख आवडला.

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 8:48 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत लेख!
जुळ्याचं दुखणं आवडलं..
स्वाती

जुइ's picture

10 Mar 2015 - 9:33 pm | जुइ

छान खुमासदार लेख!!

मस्त लेख!जुळ्यांची दुखणी कळली.

जुळ्याचं दुखणं अगदी जवळून बघतिये … डोम्बल मज्जा ….

ही ही ही. मस्त लेखन. काहीही प्रश्न असतात लोकांचे. अगदी खरय. मी आतापर्यंत जेवढी जुळी मुले बघितलीयेत त्यात सगळी आपापल्या भावंडांपेक्षा वेगळी दिसणारी असल्याने हा प्रश्न फारसा पडला नाही. उलट एकांनी कारण नसताना ती दिसत नाहीत पण जुळी आहेत म्हणून जवळ्जवळ एकसारखी नावे ठेवली. असो, गंमत आहे.

विशाखा पाटील's picture

13 Mar 2015 - 8:34 pm | विशाखा पाटील

मस्त लिहिलंय. जुळ्यांना होणाऱ्या त्रासात हिंदी सिनेमांचा हातभार असावा का ?

प्रीत-मोहर's picture

13 Mar 2015 - 9:52 pm | प्रीत-मोहर

आम्च्याही घरात एक जुळं आहे. त्यामुळे हे सगळ माझ्या घरच्यांच्या मनातलच लिहिलय्स ग.

कविता१९७८'s picture

14 Mar 2015 - 11:31 am | कविता१९७८

मस्त लिहीलय

मस्त लिहिलंय. लेखनशैली आवडली.
जुळेपण हे अतिशय नैसर्गिक आणि सर्वसामान्य असताना लोकं का त्याचा बाऊ करतात, समजत नाही.
माझ्या मुलीच्या वर्गात आहेत, जुळे भाऊ-बहिण. आपल्या मैत्रिणीचा भाऊ आपल्याच वर्गात आहे आणि तोही तिच्यासोबत तितक्याच मजेत खेळत, मस्ती करत असतो याचा माझ्या लेकीला भारी हेवा वाटतो. (कारण माझे चिरंजीव तिच्यापेक्षा मोठे आणि तिला सतत सद्गुणाचे उपदेश देणारे आहेत)

मनुराणी's picture

15 Mar 2015 - 11:10 pm | मनुराणी

मस्त जमलायं लेख.जुळ्यांची नेहमी गंमत वाटली आहे. पण त्यांना त्या गमतीचा असा त्रास होत असेल याची कल्पना नव्हती.

प्राची अश्विनी's picture

16 Mar 2015 - 3:03 pm | प्राची अश्विनी

:):):)

हीहीही.. लेख आवडला. आमच्या शाळेत जुळ्या बहिणी होत्या. त्या आम्हाला १ वर्ष सिनियर होत्या. दोघी अगदी सेम होत्या दिसायला. त्यांना बघितले कि नेहमी डोक्यात असेच असंख्य प्रश्न उभे रहायचे. :P

ख्खीक.. यावरुण एक जोक आठवला..दोघा भावांचे जुळ्या बहिणींशी लग्न होते. ( हे भाउ जुळे नसतात), कोणतरी त्यांना विचार्तात , काय हो, तुम्ही आपाप्ल्या बायकांना कसे ओळखता? त्यावर दोघे शांत चेहर्याने विचार्तात, कशाला ओळखायाला हवे?

पीके's picture

20 Sep 2015 - 10:47 pm | पीके

गुस्ताखि माफ...

पीके's picture

20 Sep 2015 - 11:04 pm | पीके

गुस्ताखि माफ...

अभिरुप's picture

20 Mar 2015 - 1:41 pm | अभिरुप

तुमचे पति आणि दिर यांना जुळेपणाचा जो त्रास होत असेल तो समजु शकतो कारण मलासुद्धा दिड वर्षाच्या जुळ्या मुली आहेत.त्यांना पाहुन लोक जी टिप्पणी करतात ती निश्चितच त्रासदायक आहे,पण काहि वेळा मात्र खूप मजेशीर अनुभव येतो.

आणि अर्थात लेखही खूप सुंद्र लिहिला गेलाय.

अंतरा आनंद's picture

20 Mar 2015 - 2:44 pm | अंतरा आनंद

असंही असतं होय जुळ्यांचं!! आम्हाला आपलं वाटायचं काय मज्जा ना.
सुंदर झालाय लेख.

अंतरा आनंद's picture

20 Mar 2015 - 2:45 pm | अंतरा आनंद

अर्थात अश्या विचित्र प्रतिक्रिया कधी दिल्या नाहीत. त्या येणं खरंच त्रासदायक असेल हे समजू शकते.

एस's picture

19 Sep 2015 - 11:14 pm | एस

हाहाहा! फारच छान लेख. हसायला येतंय, पण जुळ्यांबद्दल सहानुभूतीही वाटतेय! :-) मी स्वतः कधी अशी शेरेबाजी केलेली नाही. करणारही नाही.

बादवे, आपण डॉक्टर आहात का?

पैसा's picture

19 Sep 2015 - 11:37 pm | पैसा

मस्त खुसखुशीत लेख!

पद्मावति's picture

20 Sep 2015 - 1:34 am | पद्मावति

खूप मस्तं लेख. बरेच वेळा लोक जुळ्या मुलांचा उल्लेख ते एकच यूनिट असल्यासारखा एकत्र करतात.
मी सुद्धा एकदा जुळ्या मुलींच्या आईला विचारले " मग, काय म्हणतात तुझ्या वीणा, सौम्या " तिने तिथल्या तिथे मला करेक्ट केलं '' वीणा सौम्या नाही गं..... वीणा आणि सौम्या".

दिवाकर कुलकर्णी's picture

20 Sep 2015 - 1:44 am | दिवाकर कुलकर्णी

एक खेलणी विक्रेता एका घरी जातो,'जर माझ्या तीन मुलांची वये सांगीतलीस तर मी
खेलणी घेइन' मालकीण म्हणते. 'सांगा बाईसाहेब आपलं कोडं'विक्रेता
'माझ्या तीनहि मुलांच्या वयाचा गुणाकार ३६ होतो व त्यांच्या वयाची बेरीज शेजारच्या घराच्या
नंबर एव्हडी होते.'विक्रेता शेजारच्या घराचा नबर बघून येतो, डोकं खाजवतो पण उ त्तर कांही येत नाही,
'अजून कांहितरी माहिति हवी बाईसाहेब' 'ठीक आहे,माझी मोठी मुलगी हार्मोनियम चांगली वाजवते'
विक्रेता एकदम एक्साइट होतो,म्हणतो,'सांगतो बाईसाहेब मी!'
बघा तुम्हाला येतं कां? मुलांची वयं व शेजारच्या घराचा नंबर?

जयन्त बा शिम्पि's picture

20 Sep 2015 - 9:16 pm | जयन्त बा शिम्पि

लेख चांगला वाटला. आमचीही नात व नातु जुळे म्हणुन जन्माला आलेत. फार लहान असतांना , चेहर्‍यातील साम्यामुळे लोक असे प्रश्न विचारीत होती, मात्र आता आजुबाजुच्या ओळखीच्या लोकांकडून असे प्रश्न येत नाहीत. त्यावेळी एक छान गंमत व्हायची. मी त्यांना बाबागाडीत बसवून फिरावयास नेत असे. नेहमीप्रमाणे " काय , जुळे वाटतं ? " असा प्रश्न आल्यानंतर , मी होकार देत सांगत असे की " हो, हा पुढे बसलेला नातू आहे आणि ही मागे बसलेली नात आहे . " समोरच्याची प्रतिक्रिया अशी असायची, " छे ! छे ! ही ( म्हणजे नातू ) मुलगी वाटते आणि हा ( म्हणजे नात ) मुलगा वाटतो." आता यावर मी काय म्हणणार ? , पण मी सुद्धा कधी कधी थोडे लांब उभे राहून आमच्या दोन्ही " जुळ्यांकडे " खरंच कां हे असे दिसतात ? " अशा नजरेने पहात असे. त्यांच्या संगोपनाच्या गमती जमतींचा वेगळा धागा होवू शकतो. तुर्तास एव्ह्ढेच पुरे.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

20 Sep 2015 - 11:20 pm | फुलथ्रॉटल जिनियस

मी आणि माझा भाउ जुळे आहोत, कधीकधी आमची आईसुद्धा ओळखायल चुकते, त्यामुळे लोकांना कुतुहल वाटण्यात गैर काहीहि नाही असे माझे मत आहे.

शिल्पा नाईक's picture

22 Sep 2015 - 11:23 am | शिल्पा नाईक

सेम अनुभव, मला माझ्या मुलांबद्द्ल तर याहुन वाईट प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यात.
१. अय्या जुळे आहेत, मग एकाच वर्गात का? (चेहरा खुप मोठ्ठ वेगळ काही ऐकल्याच्या)
२. बघा, देव इथे लोकांना एक पण देत नाही अनि हिला दोन दोन. (खुप वाईट वाट्ल होत मला अनि माझ्या सा.बां ना हे ऐकुन)

जयन्त बा शिम्पि's picture

22 Sep 2015 - 2:59 pm | जयन्त बा शिम्पि

त्यात काय वाईट वाटुन घ्यायचे ? जे आहे ते आहे ! ज्युनिअर के जी पावेतो माझी नात व नातु एकाच वर्गात शिकत होते.वर्गात दोघेजण एकमेकांशी खुप खुप बोलायचे. म्हणुन आम्हीच , सिनियर के जी ला , दोघांना , वेगवेगळ्या वर्गात दाखल करण्यास सांगितले.
जुळे झालेत म्हणुन काही जण , " बरं झालं , हॉस्पिटल चा खर्च ( आणि बाळंतपणाचा त्रास सुद्धा ) एकदाच आला " असेही म्हणाले. त्यावर त्यांना आम्ही उत्तर देत असू की , उलट कपडे ( तेही सारखेच ), खेळणी ( तीही सारखीच ),फिरायला जाणे ( एकाच वेळी दोघांना ), शाळेची फी ( एकाच वेळी ), " असे भरपूर करावे लागते. साधे मोटारसायकलवर , पुढे कोणी बसायचे आणि मागे कोणी बसायचे यावर सुद्धा भांडण होते.
अशा खूप खूप गमती जमती आहेत. आजी - आजोबा म्हणुन आम्ही त्यांच्या जन्मापासून खुप आनंद उपभोगला आहे.